मला
भेटलेला आनंदयात्री – महेश जाधव
आजही तो दिवस तसाच लख्ख आठवतोय. जसा तो लकाकणारा
तारा आहे. डोमेन नावचं भूत तेव्हा डोक्यावर गाजत असताना इंटर्नशीपला असाच डोमेन
असणारा एक नवा मुलगा दाखल झाला होता. डोमेन म्हणजे थोडक्यात अनुभव असणारी अशी
त्रोटक व्याख्या आमच्या मनात होती. परंतु त्या मुलाचं सुरवातीच्या दिवसात एस ए पी
या नव्या क्षेत्रात पाऊल टाकण्याची धडपड पाहूनच कळंलं की डोमेन असणारी माणसं
आपल्याला या क्षेत्रात कशी पाचोळ्यासारखी भिरकावून लावतील. महेश जाधव नावाची ही
हस्ती समोरून हसऱ्या चेहऱ्याची दिसत असली तरी ती तितकी सोपी अन सहज नसणार याची
खात्री तेव्हाच झाली.
तो आला, वातावरणात सामिल झाला अन वातावरणाचाच
भाग बनून गेला. सुरवातीला आम्हाला एस ए पी या नव्या क्षेत्राची वाटणारी भीती
त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. तो एक धैय्य घेऊनच आला होता की ज्याचा आमच्यात
अभाव होता. ओळख झाल्यानंतर हळूहळू बोलणं वाढलं. एकूण एस ए पी विषयी असणारी बरीत
गृहीतकं लक्षात आली. तो ऑफिसमधल्या सगळ्यांना धरून खोदून खोदून विचारत एस एपी ची
जोरदार अभ्यास करत होता. दरम्यानच्या काळात ऑफिसमधे डमी प्रोजेक्ट सुरू झाला होता.
तो आमचा क्लायंट होता. त्याने एकूण चर्चेदरम्यान अशा काही गोष्टी करून मागितल्या
की चर्चा कमी अन हमरीतुमरीच होत होती. डोमेनचा काय परिणाम होतो हे तेव्हा जवळून
पाहिलं. नंतर तो प्रोजक्टही बारगळला. अन मी तिथेच ट्रेनिंग सेंटरला एस डी शिकून
जॉईन झालो.
क्लायंट-कन्सलटंट, ज्युनिअर-सिनिअर मधून आमचा
प्रवास मैत्रीच्या प्रगतीपथावर सुरू झाला होता. ट्रेनिंग सेंटरला जॉईन झाल्यापासून
मग रोज नवीन काही शिकण्याकरता दिवस दिवस आमची चर्चा रंगायची. अगदी पैजा लावून काही
गोष्टी शिकत होतो. एस ए पी सारख्या नवख्या क्षेत्रातही सुरवातीला वाटणारा बेरंग
महेशमुळे पुन्हा रंगछटेत बदलला. नव्या क्षेत्रात पाऊल टाकताना आपण कसं झोकून
द्यायचं हे त्याने शिकवलं. एस ए पी सारख्या नवख्या क्षेत्रात आज टिकून आहे यामागचं
एक कारण महेश जाधव ही व्यक्ती आहे हे नाकारू शकत नाही. कारण नवख्या क्षेत्राचा
आनंद घेत आपलं काम कसं करायचे याची प्रेरणा देणारा तोच. म्हणूनच एस ए पी सारख्या
नव्या क्षेत्रात अनोळखी वाटेने प्रवास करताना भेटलेला तो एक आनंदयात्रीच आहे.
नोव्हेंबर नंतर तो मगरपट्टा ऑफिसला गेला आणि
आमची रोज होणारी भेट संपली. आमची मैत्री घट्ट होत होती. त्यात अजून दोन वाटेकरीही
झाले होते. आशिष मोगल आणि वैभव जाधव. चार मित्रांची ही जोडी घट्ट मैत्रीच्या
बंधाने बांधली गेली होती. नंतर काही दिवसात त्याला गुजरातला पाठवल्याने आमची भेट
झाली नाही. अधूनमधून काही कामानिमित्ताने पुण्यात आला तर तो भेटत होता. क्लायंट
साईडला आलेले विविध अनुभवांवर रोजच्या गप्पा रंगत होत्याच. कालांतराने मीही
मगरपट्ट्यात गेलो. परंतु गुजरातला असल्याने आमची भेट झाली नाही. आणि त्यात
जिएसटीचं भूत मानगुटीवर बसल्याने मीही मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होतो. ऑफिसची
कामं चालूच राहिली. आमच्या गप्पाही चालूच राहिल्या. वास्तवातली अंतर वाढली, बदलली.
पण आम्ही मित्र म्हणून कायम टिकून राहिलो.
आमची मैत्रीला खऱ्या अर्थाने पालवी फुटली ती
जीएसटी संपल्यावर मगरपट्टा ऑफिसला आल्यावर. बसायलाही शेजारीच जागा. त्यामुळे
दिवसभर एकत्रंच. रोज नव्या विषयावर गप्पा रंगत. मैत्रीच्या वटवृक्षाला पारंब्या
यायला सुरवात झाली होती. आमच्या गप्पांचा विषय दोन वर्षात कधीच बदलला नाही. तो
कायम एस ए पी वरंच राहिला. त्यामुळे अनेकदा एस ए पी सोडून बोलणार असलो तर भेटू असं
बोलून अटीवर भेटायचो. अगदी युरोपाचं इंप्लिमेंटेशनला जाईपर्यंत हे असंच सुरू होतं.
काळ जसा जसा सरतो तशी नाती घट्ट होत जातात. नात्याचा मुरांब्याची चव काय असते हे
वेळोवेळी अनुभवले आहे.
गेले काही दिवस
झालं आमच्यात काहीतरी बिनसलंय. तसा आमच्यात चिडावं रागवावं असं काहीच घडलं नाही. तसे
आम्ही आजही मित्र आहोतंच. जसे काल ही होतो. आपण आपल्या जागी योग्य
असू ही पण चुकलो होता हे स्विकारलंही पाहीजे. थोडासा अबोला
आहे अन त्यात दुराव्यानं आपलं फावून घेतलं बस्स. मुळात हा
दुरावा, अबोला ही मीच माझी परीक्षा घेतोय. माणसांनी एकदा मनात जागा निर्माण केली की ती इतक्या पटदीशी पुसत नाही.
फुंकर मारली की धूळ उडून जावी. मतभेद नक्कीच
आहेत. मनभेद.? अजून तरी तसं वाटत नाही.
आशा आहे. चार महीने झाले असाच काही मित्रांचा
कायमचा निरोप घेतला. अनोळखी होण्यासाठीच. आजवर या परीक्षेत चांगलं यश मिळाले आहे. आता
हीसुद्धा तशीच परीक्षा. पुन्हा तेच बंध जोडणे कठीणंच.
अशक्य मी कधीच मानत नाही. स्वतःचं आत्मपरिक्षण
माणसाला कणखर बनवतं. शेवटी चुकलेल्या सेल्फी डिलीट कराव्यात
इतकं सोपं नसतं आयुष्य !!!
कारण आपलेपणा
बोलण्याइतकाच न बोलता जपायलाही लागतो. नक्षीदार जाळीसाठी
कुरमुजण्याकरता आडपदर करून झाकलेलं आणि आठवणीतले फोटोही काढता न यावे इतके अवघडही
नाही ना आयुष्य. चार मित्रांची गोष्ट खरंतर संपणार नाहीच आहे.
पण मग ती गोष्ट ठरणारंच नाही ना...? व्यक्ती
गेल्याचे दुःख अधिक नसते तर स्वतःला लागलेली त्या व्यक्तीची सवय मोडण्याचे दुःख
अधिक असते. ही दोस्ती तुटायची नाही म्हणूनही लक्ष्याला निरोप
घ्यायलाच लावायचाय का शेवटी....? असं नातं अर्धवट राहिलं की
रूखरूख लागून राहते. तेव्हा वाटतं, मन
अडकूच नये कशात. ब्लॉकमधला मोबाईल क्रमांक सहज निघेल पण
मनाचं काय.? मित्र या शब्दाची व्याख्या अजून त्याची पक्की
झाली नाहीय पण म्हणून तूर्तास फक्त परिचित म्हणूनच राहिलेला बराय का...?
जुना कॅसेट चा
टेपवरून कधी गाणी ऐकताना मधेच कॅसेट अडकली तर गाणी थांबवतो आपण अन काढून धूळ पुसून
पुन्हा पहिल्यापासून सुरू करतो. आताही तसंच करयाचं ठरवलं होतं मी.
फुलस्टॉप द्यायचा. अन पुन्हा पहील्यापासून
सुरवात करायची. कदाचित नवीन काही मिळेल. टाइम प्लीज. बहुतेक म्हणून उमेश कामत आवडत असेल.
टाइम प्लीज, आयुष्य खूप छोटं आहे. काही वेळा मोकळा वेळ जाऊन द्यावा लागतो. तो पर्यंत
त्याची मनातली जागा तशीच. अनोळखी होऊ पण नाती ताजीतवानी
होतील. मलाही माहीतेय इतक्या सहज कोणतेही नाते कधी रिस्टार्ट
करता येतं. पण आमच्या टेपरेकॉर्डरच्या कॅसेट मधे कधी धूळ
इतकी वाढलीय की कॅसेट पुसायला गेलो तर ती खराबच होईल की काय म्हणून भीती वाटतेय.
प्रत्येकवेळी
भांडून वेगळेच व्हायचे असा काही नियम असतो का ? प्रत्येक
वेळी संयमित राहणं प्रत्येकालाच शक्य नसतं मान्य. पण काही
घटना संस्मरणीय असतात तर काही विस्मरणीय असतात. बऱ्याच
वेळेला आपण काहीतरी चुकीचे करतोय अशी जाणीव आपल्याला होते ना. टाळता येणाऱ्या गोष्टी टाळता येतात, पण न टाळता
येणाऱ्या गोष्टी टाळता येत नाहीत हे कळतंय. कारण गुंता
सोडवण्याचा त्रास होत नाही, विनाकारण गुंतल्याच दु:ख होतंय. माणसांच्या जीवनात नेहमीच नवीन नवीन घटना
घडतात. म्हणूनंच या सगळ्याच्या पलीकडचं सत्य स्विकारलंय मी. चांगलं, वाईट,
योग्य, अयोग्य याच्याही पलीकडचं.
काही वेळेस
नात्यांशी आपण जितकं लवकर जुळवून घेतो तितकंच लवकर त्यांना निरोप ही द्यावा लागतो. मनात
नसूनही निरोपाची वेळ फार लवकर येते कधी कधी. असंच काहीसं.
हो पण पहिल्या दिवसापासून असं नसतं, हळू हळू
ते नातं तयार होतं. नातीही काही शी अशीच असतात ना. प्रत्येक वेळी आपल्याला नवीन काही शिकवतात, अनुभुती
देतात. पण एखादी गोष्ट या आधी कधीच झालेली नाही याचा अर्थ ती
कधीच होऊ शकत नाही असा होत नाही. पण त्यावेळी परिस्थिती आणि
आपली मनस्थिती त्या जाणीवेपेक्षा मोठी अन महत्वाची ठरते.
हक्क नि
जबाबदारी यांच्या गणितात न अडकता दूरावा, अंतर काही वाढलं तरीही
जागा ती अन तशीच राहिल. नाती टिकवायची असतील, तर आणखी एक गोष्ट आपल्या मनाला शिकवायला हवी. खुपदा
भांडला. चिडलाही अनेकदा तो.
प्रत्येकवेळी तो तसाच वागला अन वागतंच राहीला. पण मतभेद हा
भांडणाचा १० टक्केच भाग असतो, बाकी ९० टक्के भांडण हे ते
मतभेद मांडले कसे जातात यावर उभं असतं लक्षात घ्यावं त्याने. 'जुन्याच गोष्टींचा काथ्याकूट न करता बदल स्वीकारावा. तेव्हा 'तसं' वागणारी व्यक्ती
आता 'असं' वागू शकते, माणसात नित्य बदल घडतो हे लक्षात घ्यावं.
सगळ्या इच्छा, अपेक्षा,
हेवेदावे, मतभेद, मनभेद
मागे सोडून आपण जे आहोत तसे राहता येईल असं नातं बनवू. प्रत्येक
नात्याला त्याचा वेळ दिला गेला, मनमोकळं बोलता आलं, तर ते नातं छान बहरून येईल. खरंतर हा फरक फक्त
वस्तुस्थिती आणि आपला दृष्टीकोन मिळून ठरवत असतात. आपली सोबत,
साथ कायम राहील. अगदी कायम. अनोळखी असेल किंवा मैत्रीचंही. काळ वेळ जे जे चुकले
होते वाटतंय तेच प्रत्येक ठरवेल.
माणसाने
माणसासारखंच चुकत चुकतंच जगावं, यंत्रासारखी कृत्रिम अचूकता
जगणं निरस करते. भावनांच्या आहारी न जाता आपलं मत व्यक्त
करणं आणि दुसऱ्यालाही तसंच स्वीकारणं हे कौशल्य आपल्यात आलं, तर आपण नक्कीच हे नातं टिकवू शकतो. आणि हो कधी कधी
आपण सगळे सगळेच आपल्याजागी बरोबर असतो, कधीकधी इतर सगळे
त्यांच्याजागी चुकलेले असतात. मैत्रीत शिकावं, शिकवावं. एकमेकांना समजावून घ्यावं. खुल्या मनानं कौतुक करावं, चुकीचे होत असेल तर तेही
मोकळेपणानं सांगावं. अन आपलं काहीतरी चुकलंय हे मान्यही करावं.
मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं,
विश्वासाचं एक संजीवन नातं असावं.! त्याने कधी
त्याचं मत सांगितलं नाहीच.
खरंतर मैत्रीत
कोणतेही कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त मर्यादांचं एक मोकळं अंगण
असावं. विश्वास म्हणजे मैत्रीचा श्वास. नेमकं हेच त्याला कधी कळलं नाही. पण एक खरंय की त्याच्या
मनात काहीच रहात नाही. तो चालतच राहीला. आपल्याच ढंगात अन आपल्याच रंगात. आताही त्याला काहीच
फरक पडला असेल वाटत नाही. तो तसांच आहे हे सत्य आम्ही
स्विकारलंय. पण आम्ही आम्हीच आहोत तो कधी स्विकारणार.
उथळ पाण्याच्या खळखळाटासारखा तो कायमंच स्फुरतंच असतो. म्हणूनंच मैत्रीच्या नात्याच्या खोलीचा ठाव त्याला कधी लागलाही नाही
लागणारही नाही.
“किती भांडलो
आपण,
वाद घातला आपण, कधी कधी तर अगदी प्रमाणाबाहेर. पण ये Sorry. माफ कर. वाटतं
यापुढे कधीच भेटणार, बोलणार नाही. हा
पण पण ना सगळा घोटाळा करून मोकळा होतो. असतात थोडे फारच
रुसवे फुगवे. पण.? पण तरीही राहुन
राहुन पुन्हा सगळं विसरून त्यादिवशी एक फोन आला की ते दोन शब्द आपण लगेच बोललोच ना. आपण दोघेही आपापल्या जागी योग्य आहोत. चुकली वेळ,
चुकला क्षण, चुकला प्रसंग. तो चुकला नाही ही खात्री आहे मनात. कारण आपण
एकमेकांचे स्वभाव चांगले ओळखतो. खरंतर हे सगळं मुळीच
अपेक्षित नव्हतंच. कारण आपल्याला जी लोकं आपल्या आयुष्यभर
सोबत राहावी अशी वाटतात. त्यांना सोबत राहाण्यासाठी कारणे ही
आपोआप मिळतात. तू तर मला भेटलेला आनंदयात्री. गैरसमज असतील
नव्हे आहेत. जेवढ्या लवकर संपतील तितक्या लवकर ही आनंदयात्रा पुन्हा सुरू होईल.
आशा आहे लवकरंच हे सगळं संपेल.”
प्रश्न
अनुत्तरित असेल.
का.? कुणी.?
अन कसं.?
पण हो उत्तर
खूप सोप्पं आहे.
ह्रदयातून फक्त
रक्त वहातं,
मनात रहातात
माणसं....
वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा महेश.
 |
| चार मित्रांची गोष्ट |
 |
| B4 - AVMG |
 |
| भाऊ असाच हसत रहा फक्त.... |
गणेश सुवर्णा तुकाराम
१५ ऑक्टोबर २०१८