माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २५ मार्च, २०१७

नोटबंदी...!!!

 




                    चलनबदल हा नियमित व्हायला हवा हे तर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनास्वीकृती दरम्यानच सांगितले होते. त्यामुळे नोटाबंदीला विरोध नाहीच मुळी. परंतु नियोजशुन्य कारभाराने सामान्य जनता वेठीस धरली गेली याचं दुःख आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरता हा निर्णय घेण्यात आला असे म्हटले जाते तरी नवीन वाढीव किमतीच्या नोटा काढल्याने शशांकता आहेच.                   दुसरी गोष्ट आपला कायदा सांगतो दहा अपराधी सुटले तरी चालतील परंतु एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये. परंतु सध्या निवडक भ्रष्टाचारी लोकांच्या करता संपूर्ण देशाला वेठीस धरण्याचा प्रकार घडला आहे तो तितकासा रूचणारा नाहीच. आजची परिस्थिती अशी आहे की पेट्रोल डिझेल टाकायला पैसे चालतात परंतु अन्न विकत घेऊन खायला चालत नाही. ग्रामीण भागातील अवस्था एकवेळ ठीक आहे की लोक एकमेकांना अन्न देऊन जगवत आहेत. परंतु शहरात अवस्था विचार करण्याजोगी आहे. चलनतुटवडा इतका आहे की बॅन्का प्रत्येकी दोन हजार रुपये सुद्धा ग्राहकाला देऊ शकत नाही. एटीएम व्यवस्था सुरळीत व्हायला अजून महिन्याभराचा कालावधी लागू शकतो.
                   पुरेशा प्रमाणात नोटा छापण्यात आल्या नसल्याने आणि एटीएम चे अद्यावतीकरण पूर्वी केले नसल्याने सध्या आजारापेक्षा उपचार भयानक वाटू लागला आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेतकरी वर्गाला बसला आहे. शेतात उत्पादन तर झाले आहे. परंतु पैशाच्या टंचाईअभावी व्यापारी खरेदी करू शकत नाही. परिणामी कवडीमोल भावात शेतीमाल एकतर विकावा लागतो आहे किंवा रस्त्यावर टाकून द्यावा लागतो आहे. अगोदरच दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती तून सावरताना शेतकऱ्याला या नव्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.             पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याचा तर पंतप्रधानांच्या भावनिक आवाहन आणि प्रामाणिक प्रयत्नांवर सामान्य लोकांना शंका नाहीच. परंतु नियोजशुन्य कारभाराने सामान्य जनतेचे हाल होत आहेत ते नक्कीच दुर्दैवाचे आहे.                    

                दुसरीकडे या निर्णयाला सरळ देशभक्तीशी जोडून जो सर्टीफिकेट वाटपाचा कार्यक्रम सत्ताधारी पक्ष, मुख्यमंत्री आणि जे लोक करत आहेत त्यांनी ग्राऊंड लेवलवर येऊन लोकांच्या भावनांना समजून वाचाळ वक्तव्य थांबवून बोलायला हवे. ज्या बापाचा मुलगा पैशाच्या गोंधळाचा बळी पडला तो बाप जर या निर्णयाने व्यथित होऊन बोलत असेल आणि आपण त्याला देशद्रोहाच्या चौकटीत उभा करत असोत तर आपली वैचारिक आकलनशक्ती कितपत योग्य आहे यावर प्रश्न आहे. दुसरीकडे या समर्थनार्थ आणि विरोधात भाष्य करताना जी पातळी सोडून भाषा वापरली जाते आहे ती सुद्धा चुक आहे. टीका आणि समर्थन दोन्ही चा अधिकार आपल्याला आहे पण आपण ज्या व्यक्तीला दूषणं देत पातळी सोडून बोलतो तेही चूक आहे.
                 नरेंद्र मोदी काय, शरदचंद्र पवार काय किंवा मनमोहन सिंग काय या प्रत्येकाचे देशाच्या विकासासाठी योगदान आहे. राहिला प्रश्न नोटाबंदीने उद्भवलेल्या परिस्थितीचा तर आता याला पर्याय नाही. आपल्या परीने जो त्रास कमी होईल तितका तो कमी करायला प्रयत्न केले जावेत. आणि ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारली जावी हीच अपेक्षा आहे.
या निर्णयाने काळा पैसा किती बाहेर पडला हे सरकारने जाहीर करण्याची तसदी घेतली म्हणजे बरं होईल. पण एक मात्र समाधानकारक आहे की या निर्णयाने पैशाने माणूसकी हरवलेल्या माणसांना पुन्हा जमिनीवर आणले गेले आणि माणूसकी ची जाणीव करून दिली हे महत्वाचे.



गणेश दादा शितोळे
(२४ मार्च २०१७)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा