माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १९ मार्च, २०१७

        

कॉलेजकट्याचे अंतरंग 

(भाग २) 

कॉलेजचा पहिला दिवस


             

कॉलेजची प्रवेश प्रक्रिया संपवून माझा परिक्रमा मधील प्रवेश निश्चित झाला होता. माझा परिक्रमा मधील प्रवेश निश्चित झाल्याचं पाहून आईबाबांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. आजोबा पाठीवर हात फिरवून मिठीच मारली आणि तेव्हा त्यांचे डोळे खरेतर भरुन आले होते. त्याला दोन कारणं होती. एक कारण तर त्यांचा नातू अभियंता होणार होता आणि दुसरं म्हणजे आजवर घरापासून दूर शिक्षण घेणारा मी आता घराजवळून शिक्षण पूर्ण करणार होतो. माझ्याही मनात याचं गोडं हसू अमलत होतं. प्रवेशप्रक्रियेच्या दरम्यान अनेकांनी पुण्यातील कॉलेजमधे प्रवेश घेण्याचे सल्ले दिले होते. पण घरच्यांच्या आग्रहाखातर आणि माझीही मनातून इच्छा असल्याने मी शहरातून गावाकडे परतत घराजवळच्या कॉलेजमधे प्रवेश घेतला होता.
माझ्या प्रवेशाची बातमी ऐकून या सल्लागार मंडळींपेकी अनेकांच्या चेहऱ्यावर किंचितसं हसूही होतंच. अशा मंडळींच्या चेहऱ्यावरील स्वगत हसण्याचं कोडं मला उमजत होतं. भविष्यात कधी मला शहरातून गावाकडे परतत घराजवळच्या कॉलेजमधे प्रवेश घेतल्याचा पस्तावा आला तर सोयीस्करपणे घरच्यांकडे हात दाखवता येईल आणि इंजिनिअरींगचा पस्तावा आला तर मात्र ही सल्लागार मंडळी माझ्याकडं बोट दाखवणार हे निश्चित होतं. शेवटी काय तर या सल्लागार मंडळीला माझा प्रवेश फारसा रूचलेला नव्हताच आणि आपण या जबाबदारीतून सुटल्याचं हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं. त्यादिवशी मात्र मला माझीच लाज वाटत होती. पण तेव्हा एक निश्चय केला की आता जे काही होईल ते आपल्याच हाती आहे आणि आपल्यालाच आपलं भविष्य घडवावं लागणार आहे.
इंजिनिअरींगच्या या सगळ्या प्रवेश प्रक्रियेत माझ्या इंजिनिअरींगच्या प्रवेशावर बाबांची म्हणजे दादांची फारशी काहीच भूमिका नव्हती. आजवर शाळा असो की कॉलेज, कोणत्या क्षेत्रात पुढे काम करायचं असं कधीच त्यांनी विचारलं नाही. ना कधी चांगले गूण मिळाले म्हणून गावभर सांगत बसले नाहीत की कमी गूण मिळाले म्हणून नाराज झाले. तसे त्यांना त्यांच्या मुलामुलींनी कधी शैक्षणिक प्रगतीत कधी नाराजीची संधीच दिली नाही. आम्ही चारही भावंड अभ्यासात तसे बरे असल्याने त्या कारणाकरता त्यांना आम्हाला कधी सांगण्याची आवश्यकताच पडली नाही. त्यामुळेच आम्ही आमच्या आयुष्याचा निर्णय घ्यायला मोकळे ठरलो. इंजिनिअरींगला जाण्याचा निर्णय सर्वस्वी माझा होता. पण मला शहराकडून पुन्हा गावाकडं यायचे नसल्याने मी शेवटपर्यंत आईदादांना हेच सांगत होतो की मी परिक्रमाला प्रवेश घेतोय केवळ तुमच्या मुळेच. आणि तसं मनातल्या मनात हाही विचार येत होताच की उद्या आपण यात अपयशी झालो तर हात झटकून त्यांच्याकडे बोट दाखवायला मोकळे. खरंतर मी त्या दिवशी दादांना ओळखायला पुर्णत: अपयशी ठरलो होतो. हीच गोष्ट मला आयुष्यात त्यांच्याकडे अपयशाबाबतीत बोट दाखवण्याची वेळ न येण्याकरता आयुष्यात यशस्वी होणयाकरता आपार कष्ट आणि मेहनत करण्याची सकारात्मक उर्जा आणून देते. 
तीन दिवसाच्या सुट्टीनंतर माझा इंजिनिअरींगचा प्रवास सुरू होणार होता. मनात असंख्य प्रश्न होते. अन त्याची उत्तरं शोधणारी स्वप्नही होती. या स्वप्नांना घेऊनच १३ सप्टेंबरचा दिवस उजाडला होता. सकाळी दहाला पहिलं लेक्चर सुरू होत असलं तरी माझी उठल्यापासूनच गडबड आणि घाई सुरू होती.
“व्यवस्थित सांभाळून जा. इकडे तुझी काळजी लागेल अस काही करू नको पहिल्याच दिवशी. पोहचल्यावर फोन कर.”
“हो ग आई, मी आजच जातोय का कॉलेजला आणि आता कळतंय सगळ मला. आपलंच आहे की कॉलेज. नको काळजी करू.”
“तू बाप झाला ना मग कळेल तुला काळजी काय असते. ”
आई माझी दृष्ट काढत होती. मी आरशात मस्तकावर गंध लावून त्यावर एक मोठा तांदूळ लावून जायला होतो.
गावात शाळेला असताना बऱ्यापैकी पराक्रम गाजवल्यामुळे आईचा काळजीचा सुर होता. पण आता त्याला तीन वर्ष उलटली. आणि त्यात कॉलेज घरचंच होतं. तसेही माझ्यावर लक्ष ठेवायला बरीच पाहूण्यारावळ्यांची फौज होतीच कॉलेजमधे. त्यामुळे माझं भविष्य घडेल म्हणून घरच्यांची लगबग सुरू झाली होती.
बराच वेळ दृष्ट काढण्याच्या नादात मला उशीर होईल म्हणून मी ओरडलो,
“तुला माहिती आहे ना कि माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे मी देवही मानत नाही आणि भूतही, आवर लवकर आता नाहीतर पहिलं लेक्चर चुकेल. ”
एकदाच आईच दृष्ट काढून संपलं. भाकर ओवाळून टाकणे, मिरची मिरी काहीतरी ओवाळून टाकणे हे सगळं विनोदीच वाटत होतं. नटून थटून हेडफोन कानात घालून कॉलेजला निघालो होतो. कॉलेजचा पहिला दिवस असल्याने प्रत्येक विद्यार्थांसाठी जसा अविस्मरणीय दिवस ठरतो तसाच आपल्याकरताही असावा याच विचारात मी गाडी चालवत होता. डिप्लोमाच्या सुट्टीपासून आपल्या गावतल्या कॉलेजमध्ये जाण्याची स्वप्न पाहणाऱ्यापैकी मी एक होतो. डिप्लोमाचा गणवेश, शिस्त, शिक्षक, मित्रमैत्रिणी या सगळ्याच्या आठवणी पहिल्या दिवशी मनात ठेवून मी कॉलेजमध्ये प्रवेश करत होतो.
रेल्वेचं फाटक पडल्यानं पहिला लेक्चर चुकल होतं. सव्वा दहाच्या आसपास माझी गाडी कॉलेजच्या गेटजवळ पोहचली. दूरवरूनच खरंतर कॉलेजंचं गेट मला इतके दिवस खुणावत होतं त्या कॉलेजात मी आज माझ्या इंजिनिअरींगच्या जीवनाचा प्रवास सुरू करणार होतो. डेरेदार कमानीसमोर प्रवेशप्रक्रियेची माहिती देणारे फ्लेक्स झळकत होते. शेजारीच आजोबांचा, मा. ना. बबनराव पाचपुते यांचाही एक मोठे छायाचित्र असणारा फ्लेक्स झळकत होता.
मी गेटमधून आत शिरून थोडे अंतर चालून गेल्यावर प्रथम उजवीकडे उंच इमारती होत्या. काहींच अजून कामच तालू होतं. माझे दाजी तिथे असल्याने लहान मुलांची शाळा परिचयाची होती. परिक्रमा पब्लिक स्कुल. दोन तीन वळण घेत मी अजून एका इमारतीजवळ पोहचलो. परिक्रमा पॉलिटेक्निकच्या इमारतीचं काम सुरू होतं. तिथूनच समोर नजर फिरवली अन तीन गोलाकर इमारतींची मिळून असणारं परिक्रमाचं इंदिनिअरिंगचं कॉलेज दृष्टीक्षेपास पडलं. त्यातीलच रस्त्या लगतच्या एका गोलाकार इमारतीशेजारी गाडी पार्क करून मी मुख्य इमारतीकडे निघालो. मुख्य इमारतीच्या समोरच बाहेरच्या आवारत मैदान होतं. उजव्या बाजूस एक छोटीशी इमारत होती त्यातच कॅन्टीन होते. आणि त्या शेजारीच पाण्याचं डबकं भासावं असं तुडूंब भरलेलं तळं होतं.
कॉलेजचं कॅन्टीन शोधायला तसे कष्ट पडले नाहीत. वडापाव हा असा पदार्थ होता की तो सगळीकडे उपलब्ध होतो तसा तिथेही होताच. म्हणजेच,  कुठेही  गेलात आणि  बटाटेवड्याचा वास हुंगत पाठलाग केला तर समोर आपोआप कॅन्टीन उभं रहातं तसंच मला कॉलेजला कॅन्टीन असल्याचं पाहून जरा हायसं वाटलं. कारण डिप्लोमा कॉलेजला कॅन्टीन सोडून सगळं काही होतं. त्यामुळे कॅन्टीनमधे असा कॉलेजकट्टा कधीच भरला नाही. बटाटेवड्याचा वास मला मुख्य इमारतीऐवजी कॅन्टीनच्या दिशेला घेऊन गेला.
कॅन्टीन ही जागाच अशी असती की जी नेहमीच गजबजलेली असते तसंच वीस पंचविस टेबल खुर्चांचं कॅन्टीन तुडूंब भरलेलं होतं. सगळी कॉलेलजचीच गर्दी होती. कॅन्टीन ही जागा कधीही रिकामी दिसत नाही आणि जरी रिकामी दिसली तरी  भासत नाही असं असलं तरी एक गोष्ट चटकन जाणवली ती म्हणजे एवढ्या गर्दीत एकही मुलगी मात्र दिसत नव्हती. त्यामुळे कॉलेजमधे मुली नाहीतच की काय असाच प्रश्न पडला होता. तशीही मेकॅनिकलला असल्याने मुली फारशा नसणार हे माहित होते. पण संपूर्ण कॉलेजमधेच मुली नाहीत की काय असंच वाटत होतं. घरून नाष्टा कून आलो असलो तरीही बटाटेवड्याचा वास मला चैण पडू देत नव्हता. दोन वडापाववर ताव मारूननच मी कॅन्टीनचा निरोप घेत मुख्य इमारतीकडे वळालो. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मला ती जागा आपलीशी वाटायला लागली.
 नेहमीच्या सवयीप्रमाणे मी कॉलेजच्या पहिला दिवस असल्याने मुख्य इमारतीच्या पायरीच्या पाया पडलो अन पहिलं पाऊल टाकलं तेव्हा आजूबाजूच्या अनेक मुलांनी विचित्र नजरेने पाहिलं. मुख्य इमारतीच्या आत शिरलो तेव्हा नुकतेच प्रवेश घेतलेलेच चेहरे नजरेला पडत होते. पहिल्या फेरीतील प्रवेशाचा शेवटचा दिवस असल्याने समोरच्या कार्यालयात सोमवार असल्याने तुडुंब गर्दी होती. कार्यलयीन कामकाजाव्यतिरिक्त त्या इमारतीमध्ये डावीकडे आणखी दोनचार केबिन होत्या. विविध कॉलेजसच्या प्राचार्याकरता आणि मॅनेजमेंटच्या लोकांकरता. त्यांच्या बाहेर त्या त्या व्यकितींची नावे होती.  मुख्य केबिनमधे प्राचार्यांची मिटींग चालू होती. शेजारीच बाकड्यांच्या मधील जागेत ११० एकराच्या या मोठ्या संकुलाची प्रतिकृती उभारलेली होती. ती प्रतिक-ती पाहून कोणीही कॉलेज कॅम्पसच्या प्रेमात पडावे असंच भासत होतं. त्यातही हेलिपॅडचं आकर्षण वेगळंच.  प्रतिक-ती सारखं प्रत्यक्षात नसल्यामुळे भव्य असली तरी एकूणच इमारत पाहून फार आनंददायक वाटले नाही. मुख्य रस्ता कॉलेजकडून वसतीगृहाकडे जात होता. वाचनालयाच्यामागे वर्कशॉपची छोटी इमारत होती. एकूण आवार खूपच मोठे होते. आवारातच प्राध्यापकांचीही घरे होती.
कार्यालयीन इमारतीच्या समोरील जीन्यलगतच वाचनालयाची मोठी इमारत होती. पहिल्या गोलाकार इमारतीला सुरूवात झाली ती वाचनालयापासून. असाही पहिलं लेक्चर बुडल्याने आता दुपारच्या सुट्टीनंतरच वर्गात जाणार होतो. मी तासभर या सगळ्या गोलाकार इमारती पहात हिंडत होतो. दरम्यान “अरे तुझं नाव काय ? ये तूला किती टक्के मिळाले ? तुझं कॉलेज कोणतं असे संवाद सगळ्या इमारतीत अधूनमधून ऐकायला मिळत होते.
दुपारच्या सुट्टीनंतर वर्गात जायचं होतं. सकाळपासून फार्मसी कॉलेज, एमबीए कॉलेज आणि इंजिनिअरींगचं कॉलेज करत करत वर्गांचे नंबर शोधता शोधता गोंधळून गेलो होतो. पण दुपारच्या सुट्टीत शाळेतील जून मित्र भेटले आणि मी उसासा सोडला. वैभव कोकाटे, अभिजीत पाचपुते त्यांच्यामुळे वर्ग सापडला  होता. सगळे नवीन चेहरे समोर होते. वैभव माझ्याच वर्गात असल्याने त्याच्यासोबतच्या काही जणांची ओळख झाली होती. सागर गाडे, पंकज चिखले.
दुपारच्या सुट्टीनंतर लेक्चर सुरू झालं होतं. वैभव शेजारी दुसऱ्या बाकावर पंकज बसला असल्याने नाईलाजाने मी पहिल्या मोकळ्या बाकावर बसलो होतो. इंजिनिअरींगचा मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस (एमपी) विषय तसा नवीनच होता. पण डिप्लोमाला त्यातलं बऱ्यापैकी झालेलं असल्यानं मग सगळच नवीन होतं आणि आवडत पण होतं. मी पहिल्या बाकावर बसून त्याकडे लक्ष देत होतो. सर अगदी त्वेषाने शिकवत होते. अगदी अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. तसं माझं पाहिलं लेक्चर असल्यामुळे मग सरांच्या शिकवण्यापेक्षा शेजारच्या मित्रांच्या ओळखी करण्यातच गेलं.
लेक्चर संपल्यानंतर शेजारी बसलेल्या सागरने स्मितहास्य करून ओळख दिली आणि आम्ही बोलू लागलो. नाव, शाळा, कुठे राहतो या सगळ्या चर्चा पुढच्या पाच मिनिटात झाल्या. अजून दोन तीन जणही आले आणि आम्हाला जॉईन झाले. त्यातच शाळेतला जुना मित्रही होता. रोहित जाधव. पहिल्याच दिवशी वैभव मुळे एकंदरीत वर्गातील इतर मुलांशी ओळख झाली. थोडीशी भिती, कुतूहल व उत्सुकता असलेली नजर सर्वत्र भिरभिरत होती, न्याहाळत होती अन स्वप्नही रंगवत होती. इथून पुढच्या कॉलेज लाईफचे. त्या दिवशी माझ्या अनेक जणांशी आपल्या ओळखी झाल्या तरी आपल्या शाळेतील अजून कोणी भेटतं का याचाच मी शोध घेत होतो. अनेकांशी नविन ओळखी करून त्याचे लवकरच मैत्रीत रूपांतर करून टाकायला मी आतूर झालो होतो. पुढचे लेक्चर्स नसल्याने या सगळ्या नवीन मित्रपरीवाराला दुसऱ्या दिवशी येण्याचं आश्वासन देत मी कॉलजचा निरोप घेतला. एकंदरीत कॉलेजचा पहिला दिवस चांगला गेला.





गणेश दादा शितोळे
(१९ मार्च २०१७)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा