माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, ८ मार्च, २०१७



जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!


                                 आज जागतिक महिला दिन. आयुष्यातील प्रत्येक वळणावर कधी आई, कधी बहिण, कधी मैत्रीण, कधी शिक्षिका तर कधी बायको अशा विविध रुपांत आपल्या पाठीशी उभा रहाणाऱ्या स्त्री सन्मानाचा दिवस. 


                                 माझ्याही आयुष्यातील प्रत्येक वळणावर अनेक रुपात स्त्री भेटत राहिली. फक्त भेटलीच नाही तर माझ्या चढणघडणीत महत्वाची भूमिकाही बजावली. माझ्या आयुष्यातील प्राधान्याने सर्वात महत्वाची स्त्री म्हणजे माझी आई. कारण आज मी जो आहे यात तिचा स्रवात महत्वाचा वाटा आहे. अगदी जेव्हा मी शाळेत जायला लागलो तेव्हापासून आठवायचं झालं तर मी सुरवातीचे काही दिवस शाळेबाहेरच्या झेंड्याच्या खांबाजवळ बसून रहात. तेव्हा शाळेच्या वर्गात माझं पहिलं पाऊल टाकणारी ती होती. ती फारशी शिकली नसली तरी ती शिक्षणाची महती जाणून होती. आज मी पदवीधर म्हणून जे मिरवतो ते तिच्या त्या पहिल्या पावलामुळे. अगदी आजही मी एसएपी नावाच्या नव्या विश्वात प्रवेश केला आहे तोही तिच्याच मुळे.
                                 मुळात मला एसएपी मधे कसलाही रस नव्हताच. मला माझं गाव, माझं महाविद्यालय आणि तिथेच घराजवळ नोकरी करण्याची इच्छा होती. पण तिच्या आग्राखातर केवळ मी एसएपी च्या विश्वात पाऊल टाकलं आणि आज समाधानाने वर्षपुर्ती करत आहे. खरंतर आजच्या पिढीतील स्त्रीला अशा महिलादिनाबाबत माहिती आहे. पण माझी आईला त्याची माहिती असण्याचा मागमुसही नाही. तिच्याकरता तोच सन्मान ज्या दिवशी तिच्या मुलानं तिचं नाव उंचावत झेप घ्यावी अशी तिची भोळी भाबडी आशा आणि त्याकरताच प्रयत्न करणे, झटणे एवढंच तिला माहीती. अशा आयुष्यात प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभ्या रहाणाऱ्या आईच्या सन्मानाचा दिवस म्हणजे आजचा दिवस. जागतिक महिला दिन.
                                  एक काळ होता की साधना विद्यालयात असताना काही कारणास्तव माझं अभ्यासातील लक्ष विचलीत झालं होतं. फारसं वय नव्हत माझं. सहावीतच होता. जेमतेम अकरा - बारा वर्षाचा असेन.  शाळेभोवतालच्या मुलांच्या भांडणाचा, माझ्या काही वैयक्तिक कारणांनी अभ्यास पुर्णत: ठप्प व्हायला लागला होता. त्यातच खेळायला आलेल्या मित्राचा डोळ्यादेखत पाहिलेला अपघात मन हेलावून टाकणारा होता. पण शाळेतील दोन तीन शिक्षिकांनी ती परिस्थिती ओळखली आणि माझ्या आयुष्याला वळण देण्याच महत्वपूर्ण भूमिका बजावली. कित्येकदा मला न चुकती जेवनाचा डब्बा पोहचवला.  भूगोल शिकवणाऱ्या प्रतिभा रामचंद्र गवते बाई, विज्ञान शिकवणाऱ्या कुंभार बाई आणि त्यांच्या सहकारी सावंत बाई. सभोवताली घडलेल्या घटनांनी मला शाळा सोडावी लागली अन या त्रिमुर्तीची शेवटची भेट घ्यायची राहून गेली ती तशीच. या अशा आयुष्याला नवं वळण देणाऱ्या शिक्षिकांच्या सन्मानाचा दिवस म्हणजे आजचा दिवस. जागतिक महिला दिन.
                                   साधना विद्यालयातून मी गावी जनता विद्यालयात दाखल झालो.  माझ्यासह बहीनीही त्याच शाळेत होत्या. त्यातल्या त्यात मोठी बहिण अभ्यासात हुशार असल्याने माझ्यावर नको तो दबाव असायचा शिक्षकांचा. पण  आपलं गावं आणि आपली शाळी. त्यामुळे दंगामस्ती, मारामारी अन अभ्यास सगळं आलंच. पण ज्यावेळी माझी मोठी बहीण तालुक्यात नंबरात येऊन बारावी पास झाली. तेव्हापासून आमच्या मागं अभ्यासांच भूत खऱ्या अर्थानं लागलं. तिच्या प्रेरणेतूनच माझी दहावी घडली.  आम्ही चारही भावंड याच प्रेरणेतून आज पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करू शकलो.  या अशा प्रेरणा देणाऱ्या बहीणींच्या सन्मानाचा दिवस म्हणजे आजचा दिवस. जागतिक महिला दिन.
                                    खरंतर माझा आणि लेखनाचा अन वाचनाचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता. मला कायम गणित, भूमिती विषय आवडायचे. त्यामुळे मराठी सारखा विषय रटाळ अन कंटाळवाणाच होता. शाळेत अनेकदा मास्तरांची आणि आमची डुलकी पहिल्या बाकावर बसूनही सोबतंच व्हायची. पण तरीही अशा कंटाळवाण्या आणि रटाळ विषयाची गोडी लागली यामागेही एक स्त्रीच आहे. पदविका अभ्यासक्रमाचं द्वितीय वर्ष होतं ते. दिवाळीच्या सुट्टीला जाण्यासाठीचा माझा अहमदनगर कडून दौंड कडचा प्रवास सुरू होता. अन याच प्रवासादरम्यान एका व्यकि्तमत्वाची ओळख झाली. श्री. अशोक बाळासाहेब पाटील सर. रयत मधे मराठीचे प्राध्यापक असणारा हा अविलिया भेटला आणि माझा मराठीचा प्रवास सुरू झाला. जवळपास तीन तासांच्या प्रवास पाटील सरांनी माझी मराठीबाबत असणारी मरगळ झटकन काढून टाकली. आमची ओळख झाली ती अशी.
                                    दिवाळीच्या सुट्टीनंतर त्यांची अहमदनगरला पुन्हा भेट झाली अन वरचेवर आमच्या भेटीगाठी होत राहिल्या. संपूर्ण कुटुंबाला मराठीची जाम आवड. म्हणजे इतकी की त्यांच्या घरच्या संवादात इंग्रजी अपवादालाच सापडायचं. त्यांचा मुलगा श्रीकांत हा माझा जवळच्या मित्रांपैकी एक. प्रिया पाटील. पाटील सरांच धाकटं कन्यारत्न. एका खाजगी वर्तमानपत्रात लिखाण करायची. आम्ही जवळपास एकाच वयाचे. पण दोन टोकाची व्यक्तिमत्व. एकाला मराठीत काढीचाही रस नसणारा, आणि दुसरी ती मराठी आपला वेगळा ठसा निर्माण करण्याकरता लहानपणापासून झटणारी. अनेकदा मी तिचे लेख वर्तमानपत्राच वाचलेलेही. त्यामुळे तिच्या एकंदरीत लेखनकौशल्याबद्दल मी जाणून होतो. सरांच्या घरी येणे जाणे असल्याने माझाही मराढीकडे हळूहळू कल वाढत होता. मी श्रीकांत आणि प्रिया अगदी पैजेवर पुस्तक वाचायला लागलो इतपत मराठी कडे कल वाढला होता. यात भर पाडली ती प्रियाने. दर महिन्याला, जेव्हा भेट होईल तेव्हा नवीन पुस्तक वाचायला देणार हे नक्की. त्यातून माझं वाचन वाढलं. वाचनासोबत मग लिखाणही आलंच. आणि त्याची सखोल तपासणी करायला सुरवातीला प्रिया आणि नंतर पाटील सरांसारखे पर्यवेक्षक होतेच. पण माझं वर्तमानपत्राकरता लिहिले जावे इतपत कधीही लिखाण सुधारलं नाही. त्यामुळे हा गुण माझ्या महाविद्यायातील मित्रांपासून लपून राहिला. पण प्रियाच्या त्या सुरवातीपासून मला लिहिण्याची, वाचणाची अन सोबत व्यक्त होण्याची सवय जडली. मी अनेकदा समोर तोंडावर बोलू शकलो नाही अशा अनेक बाबी मनात कुढंत कधी वहीवर तर कधी मोबाईलच्या इनबॉक्समधे व्यक्त करत राहिलो आणि त्याचा हा परिपाक आज छंद म्हणून का होईना लिखाणाचा मी विचार करू शकलो.  हे असे चांगले छंद जपायला शिकवणाऱ्या मैत्रीणीच्या सन्मानाचा दिवस म्हणजे आजचा दिवस. जागतिक महिला दिन.
                                    या अशा निवडक व्यक्तींसह काही व्यक्तींचा उल्लेख करावाच लागेल. आईसारखीच जीव लावणारी माझी माऊशी, माझ्या महाविद्यालयीन जीवनात भेटलेल्या मैत्रीणी. विशेषत: आरती दळवी, अबोली पाटील-गिऱ्हे, प्रचेता गवारे, आमची बहीण प्राची ठुबे-पठारे. माझ्या आयुष्यातील विविध वळणांवर भेटलेल्या या प्रत्येक स्त्री शक्तीच्या सन्मानाचा दिवस म्हणजे आजचा दिवस. जागतिक महिला दिन.




गणेश दादा शितोळे
(०८ मार्च २०१७)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा