कॉलेजकट्याचे अंतरंग
(भाग ४)
पुण्यात झालेली फजिती अन मित्रमैत्रीणींची भेट...
कॉलेज सुरू होऊन महीना उलटला होता. नव्या नवलाईचे
दिवस संपून आता नव्या लढाईचे दिवस आले होते. दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीची परीक्षा
महिनाभरावर आली होती. पण अजूनही पुस्तकांचा थांगपत्ता लागला नव्हता. कॉलेजच्या अॅडमिशन
प्रोसेस पासून पुस्तकाचं नाव काढलं की पुणे आठवायचं. पुस्तकं आणायला पुण्याला जायचं
होतं त्यानिमित्ताने पुन्हा जून्या मित्रमैत्रीणींना भेटायची मनातून खूप इच्छा होती.
एका रविवारच्या सुट्टीला पुण्यात जायचं निश्चित
करून मी घराबाहेर पडलो होतो. तसं पुणं मला नवं नव्हतं. मी ५ वी ६वीला हडपसरलाच साधनामधे शाळेत होतो. पण आता त्याला बरीच वर्ष उलटली होती. अॅडमिशनपूर्वी मित्रांसोबत कॉलेज पहायला म्हणून
पुण्यात हिंडलो होतो. पण आता रस्ते सगळे विसरायला झाले होते. फक्त कॉलेजची नावं लक्षात
रहायली होती. नंदूचं कॉलेजला मी पूर्वी कधी गेलो नव्हतो. संतोष आणि स्वप्निलचं कॉलेज
ऐकून होतो. अबोली आणि प्राची सिंहगडला आहेत एवढंच माहिती होतं. पण नेमक्या कोणत्या
कॉलेजला याची माहिती नव्हती. आरतीही सिंहगडच्या कोंढव्यामधल्या कॉलेजला होती. महेश
अन प्रचेता पुण्याच्या जरा बाहेरच वाघोलीला होते. त्यामुळे त्यांच्याकडं जाण तसं शक्य
नव्हतं. पण दोन दिवसात जेवढ्यांना भेटता येईल तेवढ्यांना भेटू म्हणून म्हणत मी पुण्याला
आलो होतो.
रविवारचा आत्याच्या घरचा मुक्काम आवरून मी हडपसरवरून
मनपाच्या दिशाने निघालो होतो. मनपापासून सगळीकडे बस मिळतात हे मित्राकडून ऐकलं होतं.
चिंचोळे रस्ते, कशीही कुठनही येणारी ट्रॅफिक अन
बोलण्यातील पुणेरी बाणा यामुळे पुण्यात पोहचल्यावर कोणाला विचारायचीही भीती वाटत होती.
एकतर पुण्यातील काहीही माहिती नाही. हडपसर, मगरपट्टा आणि निगडी
या व्यतिरिक्त बाकी सगळंच अनोळखी. या अनोळखी पुण्यात कशीतरी मनपाला जाणारी बस धरली.
कंडक्टरला मनपाचं तिकीट मागितलं आणि पैसे सोपावले. कशीतरी दोन चार स्टॉपनंतर कुठं टेकायला
जागा मिळाली.
मनपाला बस स्टॅण्डला काहीही कळत नव्हतं. तब्बल
अर्धातास थांबल्यावर वडगावला जाणारी १६५ क्रमांकाची बस आली. वडगाव नेमकं कुठे माहीत
नव्हतं. पण मित्रांसोबत फिरताना सिंहगड कॉलेजला जाताना नाव ऐकलं होतं म्हणून पटकन ती
बस पकडली. तशी गर्दी होती पण बसायला जागा मिळाली
होती. तिकीट वगैरे काढल्यावर मस्तपैकी हेडफोन कानाला टाकून माझा प्रवास सुरू झाला होता.
गाडी सुरू झाली तशी माझी मनातली धडधड वाढत होती.
आपण चूकीच्या बसने तर चाललो नाही ना हा एकच प्रश्न सतत सतावत होता. पण विचारायचं कोणाला...? शेवटच्या स्टॉपला विचारू म्हटलं पण मधेच कुंभारवाड्याजवळ बस थांबली अन काही
प्रवाशी खाली उतरत होते. शेवटी न रहावून मी कंडक्टरला वडगावच्या सिंहगड कॉलेजविषयी
विचारल्यावर त्यांनी मला बस चूकल्याचे सांगितले. मी वडगाव बुद्रक च्या ऐवजी वडगाव शेरीच्या
बसमधे बसलो होतो. या अनोळखी शहारात का वाढून ठेवलंय या चिंतेत असणाऱ्या मला अजूनच एक
टेन्शन आलं. कंटक्टरने मला एकतर मनपाला परत जाण्यचा सल्ला दिला नाहीतर कसबा पोलिस चौकीजवळून
वडगाव बुद्रुकला जाणारी बस मिळेल सांगितलं. मी तसेच हेडफोन कानात घालून चालत कुंभारवाड्यापासून
कसबा पोलिस चौकीपर्यंत गेलो.
काही वेळा नंतर ५४ क्रमांकाची मनपा वरून सुटलेली
वेणुताई चव्हाण बस आली. ही बस सिंहगडला जात असल्याचे कंडक्टरने सांगितले होतेच तरीही
मी पुन्हा खात्री करून घेत घाबरतच बस मधे चढलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. अबोलीला
येत असल्याचा फोन केला होता. एकेक स्टॉप करत बस पुढे जात होती. मी खिडकीतून सभोवार
पहात होतो. एकीकडे पुणे प्रगतीकडे झेपावत असताना आलेला बकालपणा काही केल्या लपून रहात
नव्हता. बसने वेणूताई चव्हाण कॉलेजचा पायथा ओलांडला आणि समोर दिसू लागलं हिरवेगार गवतानी
सजलेलं सिंहगड कॉलेजचं क्रिकेटचं मैदान. कॉलेज सुरू असल्याने फारशी गर्दी नव्हती. पण
मी तर मैदान बघूनच प्रेमात पडलो होतो. बाकी काही नसले तरी चालेल पण असं मैदान असेल
तर अशा कॉलेजला निश्चित प्रवेश घ्यायलाच हवा असंच मनातल्या मनात वाटत होतं. मी मनातल्या
मनात परिक्रमाला कोसत होतो. मला सिंहगड कॉलेजला पोहचायला दुपार होऊन गेली होती अडीच
तीन वाजले होते.
सिंहगड कॉलेज कॅम्पस मधे प्रवेश केल्यावर पहिला
फरक जाणवला की इथं मुलंमुली सर्वसामान्यपणे एकत्र बसू, बोलू शकतात. कॉलेजला जिथं सावलीत मोकळी जागा सापडेल तिथे असे मुलामुलींचे ग्रुप
गप्पा मारताना दिसत होते. मी एका झाडाखाली अबोलीची वाट पहात थांबलो होतो. काही वेळात
अबोली आणि प्राची भेटल्यानंतर आम्ही जवळच्याच आईसक्रीम पार्लरमधे गेलो. कॉलेजच्या,
इकडच्या तिकडच्या, एकमेकांची विचारपुस करणाऱ्या
गप्पा चालूच होत्या. दोघींना भेटून दोन तीन महिने झाले होते. एक्सेलला भेटलो ते शेवटचेच.
ऑनलाईन फॉर्म संदर्भात चर्चा करायला जमलो होतो तेव्हा. त्यानंतर सगळा संवाद फोनवरूनच.
दोघींशी गप्पा मारता मारता कधी पाच वाजून गेले कळलंच नाही. तिथेच एका बुक स्टॉलवर पुस्तकं
घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघून गेलो.
संध्याकाळी मावशी कडे थांबलो होतो. नेहमीसारखंच
बसच्या प्रवासानं वैतागत मी शेवटी साडेसात आठला निगडीला पोहचलो. फरक इतकाच की सगळ्या
प्रवासादरम्यान चारदा बसची खात्री करून घेत बसत होतो. दुसऱ्या दिवशी आरती आणि नंदूची
भेट घेऊन घरी जायचं होतं. दिवसभराचा बसचा गोंधळ आणि झालेला उशीर मला स्वप्निल आणि संतोषची
भेट टाळून गेला.
सकाळी लवकरच मनपाला भेटलो होतो. कोंढव्याला जाणाऱ्या
बसचे क्रमांकच पाठ करून आलो होतो. कालसारखी पुनरावृत्ती नको म्हणून सगळा खटाटोप. १९
क्र. बसने मी खडीमशीन चौकात उतरलो. तिथून कॉलेज एक किमी दूर असल्याने पोहचेपर्यंत घाम
निघला. कॅन्टीनला नंदू आणि आरती भेटले. नाष्टा करत करत आमच्या गप्पा सुरू झाल्या. बारीक
अजून तशीच छोटीच होती. नंदू पुण्यात येऊन चांगलाच पुणेरी झाला होता. एकंदरीत दोघांना
भेटून बरं वाटलं. नंदूचं कॉलज तिथून जवळच होतं, ट्रिनीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग. पण मला घरी जायचं असल्याने आरतीच्या कॉलजवरच
दोघांना भेटून मी घराकडे निघालो.
गेले दोन दिवस मित्रमैत्रीणांना भेटून मन एकदम
प्रसन्न झालं होतं. मनाचा सगळा ताण हलका झाला होता. एम थ्री ची भिती, महिनावर आलेली परीक्षा सगळं काही कुठे दूर पळून गेल्यासारखंच वाटलं. दोन्ही
कॉलेज कॅम्पस इतके मनात भरले होते की वाटत होते उगाच परिक्रमाला अॅडमिशन घेतले. मनातल्या
मनात वाटत होतं की एवढे चांगले मार्क्स असूनही आपण पुण्यात अॅडमिशन घेतलं नाही. कोणत्या
ना कोणत्या कॉलेजला प्रवेश मिळाला असताच नक्की. डिप्लोमाच्या त्या सगळ्या जुन्या मित्रांची
सोबत राहिली असती. आरती, अबोली, प्राची
अन नंदूला भेटल्यावर मी अधिकच भावूक झालो होतो. एसटी ने घरी जाताना मनात सगळे हेच विचार
चालू होते. अनोळखी पुण्यात अशी ओळखीची माणसं कायम असल्याने पुण्याबद्दलची एक वेगळीच
ओढ आणि आस मनाच्या कोपऱ्यात निर्माण झाली होता.
पुण्याला गेल्यामुळे दोन दिवसांच कॉलेज बुडलं होतं.
त्यामुळे कॉलेजला गेल्यावर आता नवीन चाललेलं काहीही कळणार नव्हतं. महिनाभरावर परीक्षा
आली होती. त्यातच आणलेली पुस्तकांची थापी बघूनच अभ्यासाचं टेन्शन वाटत होतं. पण काहीही
करून अभ्यास करणे भागच होते. राहून राहून संतोषची आठवण येत होती. डिप्लोमाला आम्ही
सोबतच अभ्यास करायचो. रात्री जागून काढायचो. पण आता तसं कुणीही सोबतीला नव्हतं. त्यात
सगळंच नवीन. कोणाला काही विचारायची सोय नव्हती. आधाराला असं कोणीच नव्हतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा