माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ११ मार्च, २०१७




मला भेटलेली आनंदयात्री - प्राची ठुबे - पठारे

"विश्वासाच्या रेशीमगाठीत घट्ट बांधलेलं भावाबहीणीतलं मैत्रीचं नातं....!"



                               आयुष्यात प्रत्येक वळणावर माणसं भेटत रहातात. काही आपलीशी होतात तर काही अनोळखीच रहातात. या अशा आपल्याशा झालेल्या माणसांशी जुळतात ती आपली जिवाभावाची नाती. कधी ती रक्ताची असतात तर कधी विश्वासाच्या कोमल धाग्याची. कोण त्याला मैत्री म्हणतं तर कोण त्याला याराना, दोस्ताना संबोधतं. कुणाकरता ती फ्रेण्डशीप असते तर कुणाकरता अजून बरंचकाही. भाषा बदलली तशी या नात्याला नावं बदलली असतील कदाचित पण मुळात असणारा गाभा हा तोच असतो. विश्वासाचा. याच विश्वासावर मुहुर्तमेढ रोवलेली नाती कधी खांद्यावर हात ठेवून आधार देणार्‍या मित्राच्या रूपातून भेटतात तर कधी मनसोक्त रडण्याकरता खांदा देणार्‍या मैत्रीणीत दिसतात. कधी आनंदात सहभागी होताना तर कधी दुःख विसरताना. एक विश्वासाचा आपला हात कधी पाठीवर तर कधी हातात असतो. क्षितिजापलिकडचीही स्वप्न पूर्ण करण्यासाठीची प्रेरणा घेऊन.

                               ही अशीच काहीशी माणसं माझ्याही आयुष्यात एका वळणावर भेटली अन मी कृतकृत्य झालो. आजही कितीही विचार केला तरी आमची मैत्री का झाली असावी याची पुसटशी अनुत्तरेच दिसतात मनाच्या उंउंबरठ्यावर. हो सगळं अनुत्तरीत. मैत्री कशी होते आणि का होते याची निश्चित कारणं शोधण्याचा प्रयत्न करूनही सगळं काही अनुत्तरीत सापडतं.

                               शासकीय तंत्रजनिकेतन, अहमदनगर येथे पदविका अभ्यासक्रमाला असताना द्वितीय वर्षात आमची भेट झाली. निमित्त होते ते आमचा एक सामाईक मित्र. सागर भगत. सागरमुळे आयुष्यातील त्या वळणावर एक वेगळी भासणारी माणसं भेटली. राहुल गिर्‍हे, संतोष गाढवे, नंदकिशोर मोरे, महेश आडेप आणि स्वप्नील कोकाटे. हॅकर्स ग्रुप. आज हे नाव अगदी सार्थ वाटतं मला. कारण मित्रांच्या मनाला हॅक करण्याचं तंत्रज्ञान त्यांच्या इतकं कुणालाही जमलं नाहीच मुळी. आमची ओळख झाली, मैत्री झाली. ओघानं रोजच्या भेटी व्हायला लागल्या. दरम्यानच्या काळात वरच्या मजल्यावर त्यांचा वर्ग असल्याने लवकर वर्ग सुटला की महाविद्यालयात नियमित त्यांच्या वर्गात येजा होत असायची. 

                               याच दरम्यान अबोली पाटील, आरती दळवी, प्रचेता गवारे आणि प्राची ठुबे या व्हायरस ग्रुपशी ओळख झाली. ती ओळख मैत्रीत कशी बदलली माहिती नाही. पण गेल्या सात वर्षांपासून ती कायम आहे हे नक्की. या मित्रमैत्रीणीतील एक म्हणजे आमची बहीण प्राची. आमचं नातं रक्ताचं नसलं तरी कधी तसं जाणवलं नाही. आणि काही नातीच अशी असतात की जी रक्ताची नसली तरी आपलीशी भासतात. तिच्याशी भेटल्यापासून ती अजूनही 'भाई' शिवाय कधी बोलल्याचं आठवत नाही. काल खूप दिवसांनी तिचा एक मेसेज आला आणि मनाला खूप बरं वाटलं. अगदी पदविका अभ्यासक्रमादरम्यानची ती थोडीशी अल्लड पण तितकीच समंजस असणारी प्राचीची आठवण झाली.  मेसेजेस मधील तिची भाषा अगदी तेव्हा होती तशीच. तिच्या त्या मेसेजेस मुळे ऑफिमधे कंटाळवाणा गेलेल्या दिवसाचा एकदम नूरच पालटून गेला अन मी भूतकाळाकडे लोटला गेलो. 

                               मला आजही आमची पहिली भेट का आणि कशी झाली आठवत नाही. आमच्यात मैत्री कशी झाली हेही माहीती नाही. पण आमच्यात मैत्री आहे हे तितकेच खरे. पदविका अभ्यासक्रम संपल्यावर तीच्याशी एकदाच भेट झाली. ती सिंहगड महाविद्यालयात. मी पुण्यात फिरता फिरता भेटलो होतो तीच आमची शेवटची भेट. माझ्या या सगळ्या मित्रमैत्रीणींच्या परिवारात लग्न करण्यात लहान असूनही पहिला क्रमांक लावला तोही तिनेच. निखिल आणि प्राचि यांच्या लग्नाचं निमंत्रण सहा महिने अगोदर मिळालं होतं. तिच्या लग्नाला खरंतर तिला भेटायचं होतं. पण लग्नाला हजेरी न लावताच दारातूनच पुढे औरंगाबादला लग्नाला निघून गेल्याने तिच्याशी भेट व्हायची राहिलीच. 

विवाहबंधनाच्या या सुवर्णक्षणाला मुकलो...(निखिल सह प्राची ११ मे २०१४)

मित्रमैत्रीणींसह विवाहसोहळ्याच्या या फोटोमधे यायची संधी हुकली...(संभाजीसरांसह एक्सेल मित्रपरिवार ११ मे २०१४)


सागर आणि राहुलच्या लग्नादरम्यानही ती बंगलोरला असल्याने भेट झाली नाहीच. पण त्यानंतरही आमचा संवाद तो अधूनमधून मेसेज द्वारेच. अनेकदा म्हटलं जातं की नात्यात संवाद असावा. पण आमच्या नात्यात तसा फारसा संवाद नव्हताच कधी. पण हेही तितकेच खरे की नात्यात एकवेळ संवाद नसला तरी चालेल पण विसंवाद असू नये. आणि आमच्या बाबतीतही असंच आहे.

                               कालचा तिचा मेसेजेस वाचून हेच जाणवलं. न बोलता ही आमच्यातील बहीण भावाचं, मैत्रीचं नातं जवळ जवळंच राहिलं होतं आणि आहे. अनेकदा चिडून माझी लहान बहीणी मला म्हणत असते की आमच्या पेक्षा जास्त जवळची बहीण आहे का..? तेव्हा हसायला येतं. काही नातीच अशी असतात की ती न बोलताही अशी जुळतात की रक्तालाही हेवा वाटवी की आपण यातला दूवा का नसावा. कालच्या तिच्या एका मेसेजेस मुळे मन एकदम प्रसन्न झालं. आणि एकदम कंटाळा निघून गेला. ती कायम बोलत असते...
"भाई तुझ्या विषयी अजून काय बोलू...! यू आर अमेझिंग..."
आता तिला हे सांगायचंय की, 
"अमेझिंग बहीणीचा भाऊ अमेझिंगच असणार ना...!"
                               मला माहिती आहे की तिला खरंतर खूप बोलायचं असतं पण तिला मनातलं कधी व्यक्त करताच येत नाही. पण असो मला फक्त बाकी काही म्हणणे अपेक्षित नाही.

                              
फक्त तिने स्वतःची काळजी घेत असेच कायम आनंदात असावे हीच इच्छा आहे.
बाकी मला पदवी अभ्यासक्रमादरम्यान नावापुढे दादा असल्याने दादा म्हणणार्‍याही भरपूर बहीणी आहेत आणि रक्ताचं नातं असणार्‍या सगळ्या बहीणी भाऊच म्हणतात. भाई म्हणणारी तू एकमेव आहे. अगदी वेगळी अन वैशिष्ट्यपूर्ण...

"विश्वासाच्या रेशीमगाठीत घट्ट बांधलेलं भावाबहीणीतलं मैत्रीचं नातं....!"

"दूर होने से भाई बहन का प्यार कम नही होता"


गणेश दादा शितोळे
(११ मार्च २०१७)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा