माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २५ जून, २०१६


 


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राहुल...!


 




मैत्री म्हणजे असतं तरी काय......?

मैत्री म्हणजे निरभ्र आभाळ,
मैत्री म्हणजे अथांग समुद्र,
मैत्री म्हणजे श्रावणसर,
मैत्री म्हणजे टिपूर चांदणं....

मैत्री म्हणजे परिजातकाचा सडा,
मोगर्‍याचा दरवळ,
मनी उमटणारी लकेर,
एकमेकांच्या साथीने समृद्ध होत जाणं हीच तर मैत्री !
 
                     
             मैत्री आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट. सोबत नसताही आपण सोबतच असतो, अनेकदा शब्दांविनाही मनं ओळखता येतात, कोणीतरी आपलं ही भावना मैत्रीतूनच येते, आणि ती खूप सुखावणारी असते.
                                   या मैत्रीच्या प्रत्येक व्याख्येत सामावणार्‍या प्रिय राहुल यास.
                                   खरंतर प्रिय राज असंच लिहायचं होतं पण पुन्हा नको ते कन्फ्युजन. तुला राहुल म्हटलं काय आणि राज म्हटलं काय तू तर तोच रहाणार आहे. खूप दिवसांपासून लिहू लिहू म्हणत होतो. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने ते राहून जायचं. आपल्या कॉलेज लाईफ वर बरंचस लिहायचे राहिलेच. पुस्तक लिहायला सुरुवात केली होती पण ते अर्धवट राहिले ते तसेच मनातल्या अडगळीत पडलेल्या आठवणीं सारखं पडून राहिले. असो या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना पण उधारीच्या आठवणींचं लिहणं आलंच.

                                   मी एकुलता एक असल्याने भावाची उणीव कायम भासली. पण ज्या दिवशी तुझ्या सारखा मित्र लाभला त्यादिवसापासून भावाची कमी कधीच जाणवली नाही.

                                   मी फारसं कोणाशी मन मोकळं करत नाही. परंतु कधी इच्छा झाली तरी आता तो आधाराचा खांदा आहे याची जाणीव आहे.
                                   आपल्या शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर मधील त्या तीन वर्षांना मनाच्या कोपऱ्यातील आठवणींना कितीही ताण देऊन विचारलं तरी आपली नेमकी भेट कधी झाली आणि कशी झाली याची अचूक उत्तरं मिळत नाहीत. हो आपण पहिल्यांदा कधी भेटलो नाही आठवत आता. परंतु एक नक्की आठवतं की ज्या दिवशी भेटलो त्या दिवशी आपल्या मधे काहीतरी भांडण झालं होतं. हा तो माझा चांगला की वाईट माहीत नाही पण गुण आहे की आयुष्यात ज्या व्यक्तीशी सुरवातीला माझं खटकतं त्याच व्यक्तीशी जवळचं नातं जुळतं. मैत्री होते.

                                   तुझ्या बाबतीत पण तसंच काहीसं झालं. डिप्लोमाच्या त्या तीन वर्षांचा हिशोब केला तर सुरवातीच्या दीड वर्षात आणि नंतरच्या दीड वर्षात खूप तफावत जाणवते. सुरवातीच्या दीड वर्षात एकेकटा रहाणारा मी तुझ्या भेटीनंतर मात्र सभोवतालीच्या जगात इतका मिसळून गेलो की परत मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. *माझ्या आयुष्यातील या बदलाचं श्रेय तुला आणि तुझ्या मैत्रीला जातं. सोबतीला हॅकर्स होतेच.
                                   तशी आपल्या मैत्रीला बरीच वर्षे लोटली. परंतू डिप्लोमाच्या त्या काळात घडलेल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी आपण सोबतीने अनुभवल्या. आजही कधी चहाच्या टपरीवर चहा घेत उभा राहिलो तर शेजारी तू जाणवत रहातो. तुमचा हॅकर्स ग्रुपचा मला कायम हेवा वाटत राहिलाय. अनेक प्रसंग आले आणि तुम्ही यशस्वी निभावून नेले. मागे एकदा तुझं फेसबुकवरील एक स्टेटस अपडेट वाचून काही काळ धक्का बसला. पण खात्री होती की हे ग्रुपचं जोडणं तोडणं काही होणार नाही. असो. त्यावर मी बोललो होतो. पण ही तुमच्या ग्रुप ची मैत्री पाहून कायम इच्छा रहायची.

            "CAN I PARTICIPATE IN HACKER'S....?"

                                   पण ऑफिसिअली मी कधी या ग्रुपचा भाग झालो नाही. पण तुम्ही सगळे माझ्या ग्रुपचा भाग होता. त्या शेवटच्या काही महिन्यांत तुमची इतकी सवय झाली की डिग्रीचे एक वर्ष खूप अवघड गेलं.
                                   राहुल आणि प्रेम हा विषय आपल्या या दीड वर्षाच्या काळात खूप चर्चेत होता. FINALLY YOU GET BEST FRIEND AS LIFE PARTNER. याचा आनंद आहे. डिप्लोमा पासूनच आमची तशीच इच्छा होती. लवकरच तुम्ही विवाह बंधनात अडकत आहात.
                                   खूप दिवसांपासून तुला भेटायचंय पण आपली भेट या ना त्या कारणाने होईना.
                       असो.
                               म्हणून सध्याच्या डिजीटल जमान्यात पत्र लिहिण्याच्या फंदात कोणी पडत नाही. म्हणून म्हटलं सोशल नेटवर्किंग साईट  तर आहेत ना मग त्यावर लिहू पत्र म्हणून हे सगळं.                        फारसं काही लिहीत नाही. कारण मला सारांशात काही मांडण्याची सवय नाही. या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढ्याच शुभेच्छा की भावी आयुष्य आनंदाची उधळण करत एकमेकांच्या साथीने जगा.
वाढदिवसाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा राहुल.








गणेश दादा शितोळे
(२४ जून २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा