शाळेची पहिली घंटा...!!!
काल सकाळी मॉर्निंग वॉक ला जाताना रस्त्यात चौकात खुप गर्दी होती. काल शाळेची पहिली घंटा वाजली अन चिमुकली पावले शाळेत निघलेली होती. कुणी रडतखडत तर कुणी हत बागडत आपापल्या पालकांसोबत बसची वाट बघत होते. तेव्हा नकळत बालपण आठवले. आपलीही परिस्थिती शाळेच्या पहिल्या दिवशी याहून काही वेगळी नव्हती, फक्त फरक इतकाच की आजवरच्या शिक्षण पूर्ण होईपर्यंत कधी पालक माझ्या शाळा कॉलेज पर्यंत सोडायला आले नाहीत किंवा त्यांना तशी गरजच पडली नाही. हे जाणवल्यावर मात्र माझं मलाच किंचितसं मनातल्या मनात हसू आलं. खरंच किती छान दिवस होते ते. सकाळी सूर्य डोळ्यावर चमकेपर्यंत मनसोक्त झोपायचं. मग राजेशाही थाटात अंघोळ करून शाळेला जायची तयारी सुरू व्हायची. जणू शाळेत निघताना रोज वडीलधार्यांकडून "एक रूपया द्या तरच शाळेत जाणार"असा शाळेत जातो म्हणजे घरच्यांवर उपकारच करत असल्याचा आव असायचा. पण त्यावेळी त्या एक रूपया मिळाल्यावरच्या आनंदाची सर आजच्या पाकीटातील पैशांना पाहून होणाऱ्या आनंदाला येत नाही. समोर एक चिमुकला जोरात रडत होता. जणू त्याला शाळा तुरुंग वाटत असावा आणि घरचे बळजबरीने त्यात कैदी म्हणून पाठवत होते. मला माझी शाळेची सुरवातीची वर्षे आठवली. माझीही लहानपणीची परिस्थिती या चिमुकल्याहून वेगळी नव्हती. माझ्या आयुष्यात बालवाडी पहिली दुसरी हा प्रकारच कधी आला नाही. आला नाही म्हणजे मी कधी त्या वर्गात बसलोच नाही. सुरवातीला दोन वर्षे तर शाळेबाहेरच्या झेंड्यावरच माझी बालवाडी अन पहिली झाली. बालवाडीच्या मॅडम आणि पहिलीचे सर मुलांना छडीने शिक्षा करताना एकदा पाहिले आणि माझा त्या वर्गाशी संबंधच संपला. दिवस दिवस मी झेंड्यावरच बसून असायचो. पण अभ्यासात जरा हुशार असल्याने शिक्षक त्याकडे लक्ष देत नव्हते. दुसरीलाही याच कारणाने दुसरीचीच्याही वर्गात गेलोच नाही. फरक इतकाच पडला की झेंडा सोडून मी निदान वर्गात बसत होतो. पण ते तिसरीच्या. मामा तिसरीला असल्याने मग त्याच्यासोबतच बसायचो. हे आठवले आणि स्वतःवरच हसायला आले. "आपण असे होतो...!"
समोरचा चिमुकला आईला ओरडून सांगत होता की आजच्या दिवस खेळू दे उद्या पासून जातो ना शाळेत. पण आई बळजबरीने ओढत त्याला बसमधे सोडायला आली होती. उन्हाळा आणि दिवाळीची सुट्टी म्हणजे लहानपणी पर्वणीच असायची. पण मला सुट्टी कधीही आवडली नाहीच. सुरवातीला शाळेची भिती वाटली पण नंतर ती हवीहवीशीच झाली. माझी शाळा म्हणजे शाळा वाटतच नव्हती. कायम खेळणे बागडणेच असायचे. कारण दिवसात दोन अडीच तास वर्गात अन उरलेले चार तास मैदानात असायचो. शिक्षकच आमच्या सोबत असायचे. सकाळी दहाच्या घंटेला शाळा भरली की कशीबशी साडे अकरा पर्यंत वर्गात बसायचं. त्यातही निम्मा वेळ प्रार्थना आणि परिपाठातच जायचा. साडे अकराला टोल पडला की सगळे एकसाथ मैदानावर. अगदी दोन्ही शिक्षकही. दोन टीम पडणार. एकेक सर एकेका टीम मधे. नारळाच्या फांदीची बॅट आणि प्लॅस्टिक बाॅलवर क्रिकेटचा डाव सुरू. दुपारी भूक लागत नाही तोपर्यंत थांबायचं नाव नाही. दुपारी जेवणानंतर तासभर वर्गात आणि पुन्हा एकदा मॅच सुरू. ते थेट पाचचा टोल पडे पर्यंत. ही असली शाळा असल्यामुळे कधी नकोशी वाटलीच नाही. उलट सुट्टी मधे सगळे मित्र आपापल्या आजोळी गेल्याने नकोसं व्हायचं. त्यामुळे कायम शाळा हवीहवीशी वाटली.
सकाळी सकाळी शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मनाला बरं वाटलं. पण पुढच्या क्षणी दिवसभराचं रूटीन आठवलं की मात्र सगळ्यावर पाणी. खरंच जुने दिवस आठवले की आजचं वेळेत बंदिस्त होणारं आयुष्य नकोसंच वाटतं. मनात हे विचारचक्र सुरू असताना पावलांचा प्रवास सुरू होताच. शाळेच्या आठवणी पुन्हा नव्याने मनात भरून मी घराकडे परतलो.
गणेश दादा शितोळे
(१४ जून २०१६)
(१४ जून २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा