माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८


 मला भेटलेली आनंदयात्री – कविता महाजन



“आज माझी प्रतिष्ठा निराळी आहे. मला असं काही कसं करता येईल ? शिकणं, सुसंस्कृत होणं; या गोष्टीचे परिणाम असे होणार असतीलआपण अधिक भेकड, अधिक भाकड होणार असूतर खरंच पुनर्विचार केला पाहिजे ना अशा गोष्टींचा…’’
कविता महाजन (ब्र)

“सगळ्यांत महत्वाचं म्हणजे, कविता हा आयुष्याच्या सगळ्या धबडग्यातून मिळालेला मोकळा श्वास आहे.”
- कविता महाजन!

" बाकी गोष्टी कृत्रिम श्वासोच्छवासासारख्या! प्रेम-प्रतिष्ठा- प्रसिद्धी- पैसा- इत्यादी काहीही कवितेमुळे मिळत नसलं तरी मी तिच्या ऑक्सिजनमुळेच तर जिवंत आहे. "- कविता महाजन...

                     काल अचानक हा कवितेचा श्वास गुदमरला हे अनपेक्षित अन धक्का देणारंय. एक स्त्री आहे म्हणून तिच्यातला माणूस मागे पडला नाही आणि माणूसपणाला जागत स्त्रीत्व नाकारण्याचा वेडेपणाही तिने कधीच केला नाही. कदाचित म्हणूनच कवयित्रींच्या लिखाणाविषयीच्या सगळ्या ठोकताळ्यांना मोडीत काढत तिची कविता अनेकांच्या आयुष्याला अनेक अंगाना सहज स्पर्श करुन गेली, अंतर्मुख बनवत गेली. भावना खूप सहज अन सुट्या, स्वतंत्र मांडण्यात आणि तरीही त्यांतील उत्कटता अबाधित ठेवत मांडण्यात ती कमालीच्या यशस्वी झाली. कविता ताईच्या कविता क्लिष्ट आणि दुर्बोध नसल्या तरी त्यांनी विलक्षण खोली होती.
                     तिच्या काही कविता स्वतःबाहेर फारशा जात नाहीत पण तरीही त्या बंदिस्त वाटत नाहीत. स्वतःतच एक आसमंत मोकळा झालाय त्यांच्यासाठी एक जग आहे. खूप एकटं तरी खूप परिचित अशा जगाची सफर करुन येतो आपण. कविता ताईच्या कवितेतून अर्थात स्वतःच्याच आत एक फेरी मारुन येतो आपण. त्यात प्रत्येकाला काही ना काही समान सापडेल हे नक्की....
                     आत्यंतिक निराशेच्या आणि एकाकीपणाच्या अनुभूतीदेखील रोजच्या जगण्यातील साध्या वर्णनातून कविता ताई असं जग समोर उभं करत की पुस्तक अन पापण्या मिटल्यावरही त्या अनुभूती मनभर व्यापून रहील. मरणाविषयी तिने अखेरीस ज्या बर्‍याच कविता लिहिल्यात त्यात अनेकानेक अंगांनी भावना मांडल्या आणि त्यातूनही राखेतल्या कोंबासारखा आशावाद डोकावत होता हेच कविता ताईचं वैशिष्ठ होतं.
                     कविताताईची प्रत्येक कविता म्हणजे रंगाचा सुरेख, घाटदार फटकाराच होता. घोटवलेल्या तानेसारखा, अस्सल, लखलखीत! स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व जपणारा. आणि हे सगळं मिळून तयार होणारं जे चित्रं असतं ते आपलंच असतं. आपलीच प्रतिमा. किंवा आपल्या मनाची. अ‍ॅब्स्ट्रॅक्टंच तरीही खूप समजणारी....
                     तिच्यातला बंडखोरपणा कोणाला कितीही डाचत असला तरी मरणपंथावरच्या एडसग्रस्त मुलाला दत्तक घेण्याचं तिचं धाडस नक्कीच दाद देण्याजोगं आहे....
कोणालाही पटकन मदत करण्याची तिची वृत्ती, हातचं राखून न ठेवता स्पष्टवक्तेपणा जपण्याचं धैर्य, सतत कष्ट करण्याचा आणि सर्वच क्षेत्रातला अभ्यास ठेवण्याचा चिवटपणा अशा अनेक गोष्टी शिकता मला आल्या...
                     छोट्या छोट्या गोष्टींतून, शब्दांतून,वाक्यातून तिने असंख्य माणसांच्या मनात निर्माण केलेली आपलुकी आज डोळ्यात पाणी आणून गेली....

“नवी जागा अजून मानवत नाहीये. ताप उलटून आला, तो जोमदारपणे. भ्रम भासावळी घेऊन आला. घरात माणसं फिरताना दिसू लागली आणि अजून काय काय. ग्लानीत किती काय बडबडले हे लेकच जाणे. काल संध्याकाळी जरा उठून बसले आणि पाहते तर लेकीला तसाच ताप.  पुन्हा डॉक्टरचं दार गाठलं.थोडं काम केलं उठतबसत, पण डोकं चालत नाहीये. ताप उतरावेत आणि लवकर सुरू व्हावं रुटीन. कामं वाट पाहताहेत.”

                     तुझे अखेरचे शब्द. आम्ही पण तुझं रूटीण सुरू होण्याचीच वाट पहात होतो. पण तू रूटीणंच बदलंलगं. काम वाट पहातंय...नव्हता अर्थ कळला. जगणं अन मरणंही असं मांडशील खरंच वाटलं नाही. तुझं हे जाणं अचानक जाणं खूप धक्कादायक आहे. तू आठवणीत राहाशीलंच गं कायम. त्याशिवाय माझा ब्र नाहीच निघणार. आता मी पुन्हा ढ झालो लिहायला.....
                     पाडगावकर आजोबानंतर तू माझ्यासारख्या अनेक चिखलाच्या गोळ्यांचा माठ करत होती. सर्वच राहीलं. आज रडू येत नाहीच. कारण तूच. कणखर स्त्री बद्दल कणखर रहा. तुझ्या स्वत्वःशी लढाया कशा विसरतील टीपे गाळायला. आता आयुष्यभर सारं आठवतंचयंच.

“माणसं गेली की, उत्सुकतेने ढीगभर  काव्यात्म श्रद्धांजल्या वाहणारे आपण जी माणसं हयात आहेत त्यांच्यासाठी कधी, कुठे आणि किती असतो?
उत्सुकतेचं भाषिक कवच काढून फेकलं तर आत काय सापडतं? दुटप्पीपणा सापडला तर आपण स्वत:चं काय करतो?
शेवटचे हेही शब्द मुसकाडीत हाणायलाच होते.
                     तुझ्या भेटीचा योग दोनदाच आला. मात्र फोनवर संवाद होत राहिला. अनेक आठवणी आहेत, मात्र आज अजून लिहिण्याची ताकद नाही. लिहीन कधीतरी. अखेर आता आठवणीच शिल्लक आहेत.

“तुझी सगळी तगमग
मुरवून घेईन मी तनामनात
आणि मग
तुझ्या मुठीतून निसटून जाईन
हळूहळू वाळूसारखी
ओघळेन तुझ्या डोळ्यातून नकळत
वाहणा-या पाण्यासारखी
मी जाण्यापूर्वी हसतमुख
एक क्षणभर समोर उभा रहा माझ्या
निरोप दे
चिमूटभर शांततेचं बोट
माझ्या कपाळावर टेकव.”

                     तुही नुकतीच पुण्यात आलेली. मीही पुण्यातंच गेल्या दोन वर्षापासून. एकाच शहरात असूनही आपली भेट होऊ नये....?
ताई मी पुण्याच्या घरी यायला विसरलो. हा पण तू जाशील तिथे येणार म्हटलो होतो. येणारंय नक्की.

“३ कागदी कविता अन समोर एक जिवंत कविता होती.”
तेव्हीही हेच बोललो होतो ना मी...?

                     तेव्हाही तू हेच बोलली की, “खऱ्या जिवंत रहातात कागदावरच्याच कविता मी काय एक दिवस जाणारं. माणूस आहे मी.” तो एक दिवस कालचा अनपेक्षित होता. आपल्या शेवटच्या भेटीलाही दीड एक वर्ष झालं तरीही अशा अनेक कविता तुला दाखवायच्या होत्या. कविता माझा छंद असला तरीही नाही गं कधी तुझ्या सहजतेनं कधी मुक्तछंद लिहीता आलं. आपण पुन्हा भेटू तेव्हा नक्की मुक्तछंद सोबत असेल...
पण भेटणार कुठे...?
एवढी कणखर अन स्पष्टवक्ती तू,
मग जायच्या आधी बोलली नाही...?
                     मनात हिंसक विचार येत असताना नाकतोड्याचं चित्र काढावं हे उत्तम. निदान नाक तोडल्याची कल्पना करता येते. पण भावना दाटून आल्यावर काय...? कॅनव्हास कुठंय...?
संपवून टाकला तू..?
आता कुठे रेखाटू...?
मनावर अधिराज्य केलंय....
इतक्यात थांबशील...?
नाही वाटत...
आपल्यात तेच साम्य...
बंडखोरपणा...

तुझ्या शब्दात बोलायचं तर सोपी ओळख आहे माझी...
ज्ञानी माणसाचा आव आणून राजकीय पोस्ट्स लिहीणारा...ह
कितीतरी वेळा सांगितले असेल तू मला...
नको लिहू....
“शिकल्या सवरलेला तू स्क्रीन वरच्या शब्दांतल्या राजकारण्यावर कसा आंधळा विश्वास ठेवतो..?
तू तुझं मन अन तुझं मत कलुषित झालंय का..?
ते काल एकमेकांसमोर उभे रहाणार अन आज बोट धरून राजकारण शिकणार असेत...”
                     पण नाही ऐकलं मी तुझं. उगाच तुला समजावत राहिलो. मी वैयक्तिक, सामाजिक, भावनिक कसा आहे अन राजकीय कसा आहे हे...! शेवटी ऐकायचंच नाही हेही तुझ्याच कृपेने. पण त्यामुळेच आपली व्यक्तिगत मैत्री, आपल्या आवडीच्या क्षेत्रातील माणसाबद्दलचा आदर किंचितसाही कमी झाला नाही. शेवटी आपण एकाच वाटेने चालणारे सहप्रवासी. तू लवकर वळण 

गाठलं अन विसावा घेतलाय...
मी चालतोय ती प्रकाशवाट...
एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे...
माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जगण्याच्या दिशेने....
थांबलो नाही तर वहावत राहील....
आजच्या दिवशी ओघळतो फक्त...

कुठेही असशील तरी काळजी घे...
कागदावरच्या कवितांमधून तू मनं जिवंत केली..
म्हणून तुझं नाव सत्कारणी लागलं..

तू म्हणजे माझ्या विचारांचा आरसा, जेव्हा जेव्हा वाटेल की या आरशात पहावं तेव्हा या वाटेवरचं विव्हळणारं रक्त दिसेल मलाच माझ्याच चुकांच....

                     नुकतीच कविता ताई गेली. अगदी घरातलंच कुणी गेल्यासारखं झालं. कविता ताईच्या अनेक आठवणी आहेतंच. त्यामुळे मनात जे जे आलं ते ते लिहिले. मन भरभरून वाहीलंच. माझ्या मित्रमैत्रीणींच्या यादीतील अनेकांना कविता महाजन ही व्यक्ती माहिती नाहीच. त्यामुळे सहाजिकच अनेकांना हे लिहिलेले प्रश्न विचारून गेलं.काहींनी वैयक्तिक मेसेज करून विचारलंही. त्यातीलंच एकाचा आक्षेप होता की खरंच कविता महाजन तुझ्या इतक्या जवळची होती. घरातली असल्यासारखी. एकदम आरंतुरं बोलतोय. खरंतर त्याच्या या प्रश्नावर दुपारीच खूप बोलायचं होतं. पण आता बोलतो. हो कविता महाजन घरचीच होती. मी लिहीतो, वाचतो अन विचार मांडतो. अन यात मला अनेक आप्तस्वकीय भेटलेत. मीच त्यांच्या साहित्य कुटुंबाचा भाग बनलो म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. आजवर साहित्य क्षेत्रातील अनेकांना भेटीगाठी झाल्यात. अनेकांची पुस्तक वाचली. काहींची आवडली. काहींची डोक्याला भिनली. अन काही नसनसात उतरले. कविता महाजन त्यापैकी एक.
                     बंडखोरपणा अन स्पष्टवक्तेपणा नसानसात उतरलाय. मुळातंच मला जी व्यक्ती भेटते अन भावते तीची माझ्या मनात एक वेगळी जागा असते. अन म्हणूनच मला माझ्या आपल्या माणसांना आवजावं नाही करता येत. त्या आरंतुरं करण्यात मला आपलेपणाची उब येते. कविता ताई असो की पाडगावकर आजोबा, पानसरे आण्णा प्रत्येकाबद्दल मला आपलापणा आहे....
जो मला भेटलेला,  भावला तो माझा आपला. मला भेटलेला आनंदयात्रीं. बाकी कुणी काय म्हणतंय याची फिकीर मी तेव्हाही केला नाही अन आताही करत नाही. कविता ताईच्या जाण्याने मी काय गमावलंय तर मी माझा आरसा गमावला आहे. आता जेव्हा कधी स्वतःच्याच विचारांवर प्रश्न उभा राहिला तेव्हा ता तपासायला कुणी आपला उरला नाही इतकंच. बाकी मित्र मैत्रीणींनो एकमेकांना कायम साथ द्या. एकटेपणाशी माणूस झुंज देऊ शकतो. पण विजय...?
नक्कीच नाही.
                     आयुष्यात कुणाला एकटं पाडू नका, सोडू नका. एक होऊन जगा. एकत्र येऊन जगा. प्रसिद्धी, संपत्ती सारं काही कमवाल पैसा फेकून. माणसं कमवा. आयुष्याभर साथ देणारी. अन असेच भेटत रहा एकमेकांना आनंदयात्री बनून...

भारतातील पुरुषांना माणूस बनवण्यासाठी लेखणीची पताका निर्भयपणे उंचवणाऱ्या बंडखोर लेखिका कविता महाजन यांना विनम्र अभिवादन...



गणेश सुवर्णा तुकाराम
२९ सप्टेंबर २०१८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा