माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८


मला भेटलेला आनंदयात्री – अनिकेत पटने...!!!


साधना विद्यालय, हडपसर


                              शाळा आणि शाळेतले दिवस हा तसा प्रत्येकाचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय. ते शाळेतले दिवस आठवले की हसू रडू दोन्ही येतं. शाळेतील शिक्षकांना सतावण्यासाठीचे केलेले प्रयत्न, मित्रांबरोबर मजा करण्यात घालवलेला वेळ, क्लासेस, अभ्यास, परीक्षा आणि परीक्षेनंतरची सुट्टी अशा विविध टप्प्यात आफण कधी हरवून जातो कळत नाही. पण यापैकी कशाशीही माझ्या आठवणी जुळेलेल्या नाहीत. पाचवी-सहावीच्या कोवळ्या वयात गावाकडून साधना शाळेत प्रवेश घेतला. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना सतावण्यासाठीचे केलेले प्रयत्न, मित्रांबरोबर मजा करण्यात घालवलेला वेळ असण्याचा प्रश्नंच नव्हता. शिक्षकांनी डोळे वटारून पाहिले तरी स्मशान शांतता पसरायची तिथे सतावणे कोसो दूर. क्लास, अभ्यास, परीक्षा अन सुट्टी याच्याशीही फारशा आठवणी नाहीतंच.
                              शाळा सोडून आचा १४-१५ वर्षे झाली. शाळा सुटली तसे शाळेतले मित्रही सुटले. मला आजही आठवतं की शाळा सोडताना उर किती भरून आला होता. पाणावलेल्या डोळ्यांनी शाळेचा निरोप घेतला खरा. पण शाळेच्या असंख्य आठवणी मनात कोरल्या होत्या. मित्र परिवार, शिक्षक-शिक्षिका यांचे टेलिफोन क्रमांक एका छोट्या डायरीत सांभाळून घेतंच मी आठवणींचा निरोप घेतला होता. मोबाईलचा तेव्हा जमाना नव्हता. माझ्याकडे तर २००७ ला म्हणजे बर्‍याच उशीरा आला. त्यामुळे आजच्या सारखे फेसबुक, व्हाटसअपचा तो काळ नव्हता. तरीही आठवणी विस्तिर्ण संकिर्ण साठलेल्या होत्या मनातल्या कोपऱ्यात.
                              शाळेतील असे मित्र, शिक्षक, बाकावर कोरलेली नावे, मधल्या सुट्टीत मित्रांसोबत एकत्र खाल्लेला डब्बा, एकमेकांच्या काढलेल्या खोडय़ा. शाळेचे हे दिवस सरले तरीही त्या आठवणी मात्र मनाच्या कोपऱ्यात अजूनही जागा करून आहेत. आता बरीच वर्षे उलटल्यानंतर आपले मित्र कसे दिसत असतील, कोठे असतील असे अनेक प्रश्न मनात नाहीत, याबद्द्ल सोशल नेटवर्किंग साईड्सचं खरंतर अभिनंदन करायला हवं. कारण पुन्हा एकदा शाळेचे दिवस अनुभवण्यासाठी शाळेच्या बाकावर बसून वर्गातील मज्जा लुटण्यासाठी सर्व मित्रांनी पुन्हा एकदा आठवणींचे धडे गिरवावेत म्हणूनंच व्हाट्सअप ग्रुपची निर्माण करण्यात आला असावा.
                              मी सहावी संपल्यावर अचानक पुण्यातून गावी गेलो. त्याला बरीच वर्षे झाली. त्यामुळे शाळेतील मित्रांपासून दूरच होतो. पण, आज त्याच मित्रांशी जुळलेला धागा टिकून आहे तो सोशल मिडियामुळे. फेसबुक आणि व्हाट्‌सॲपवरील ग्रुपमुळे आम्ही मित्र अजूनही संपर्कात आहोत. आम्ही एकमेकांशी दूर असलो तरी व्हॉट्‌सॲपने आम्हाला जोडून ठेवले आहे. आजच्या या फेसबुक, व्हाटसअपच्या आजच्या जमान्यात माणसं माणसापासून तुटत आहेत अशी कितीही ओरड असली तरी त्याच फेसबुक, व्हाटसअपने मला साधना शाळेतील मित्रांची पुन्हा भेट करून दिली.
                              मैत्री हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर प्रथम येते ती आपली खरी मैत्री. आपल्या आयुष्यात अनेक मित्र येतात पण त्यात असे काही मित्र असतात जे आपण कधीच विसरू शकत नाही ते म्हणजे आपले शाळेतले मित्र. खरतरं मित्र ही संकल्पनाच आपल्याला शाळेत गेल्यावर समज ते.शाळेपासूनच आपण मित्र बनवायला शिकतो. त्यामुळे ते मित्र आपण कधीच विसरू शकत नाही. असाच माझाही एक खरा मित्र, मला भेटलेला आनंदयात्री म्हणजे अनिकेत पटने. पाचवीला असताना त्याची अन माझी पहिल्यांदा भेट झाली. भल्या थंडीत आमची शाळा सकाळीची असायची. अशा थंडीत एक गोरंगुमटं गोंडस बाळ लाल रंगाचं स्वेटर घालून शाळेत पहिल्या बाकावर बसायचं. लाल रंग त्याला खूप आवडत असावा बहुतेक.
                              आम्ही गावकडून आलेलो. त्यामुळे सहाजिकंच पहिल्या बाकावर बसण्याचं धाडस नव्हतं. त्यात हे गोंडस बाळ आमच्या वर्गाचं मॉनिटर होतं. त्यामुळे थोडं काही झालं की फळ्यावर नाव यायचं म्हणून मी त्याच्यापासून लांबच रहायचो. आज जसा आमच्यात जमिन असामानाचा फरक आहे अगदी तसाच फरक तेव्हाही होताच. पण तरीही आमची मैत्री का झाली मला माहिती नाही. हा एक कारण होतं की आमच्यात वर्गात पहिला क्रमांकाकरता कायम स्पर्धा होती. बहुधा तेच कारण असावे आमच्यात मैत्री होण्याचं. परीक्षा, अभ्यास, ग्रहपाठ यातून आमचा संबध वाढत राहिला अन आमच्या मैत्रीची रेशीमगाठ विणत गेली. खरंतर आमची मैत्री इयत्ता पाचवीमध्ये सुरू झाली आणि त्यानंतर सहावीत तो माझा बेस्ट फ्रेंडस् झाला. सर्वात जास्त चांगली मैत्री असते ती शाळकरी मुलांमध्ये. तशीच माझी आणि अनिकेतची मैत्री होती.
                              पाचवीत तर कधी आम्हीला एकत्र बसता आलं नाहीच पण सहीवीत गेल्यावर मी प्रयत्न केला. अनिकेत आणि सागर लडकत हे सोबत बसत असल्याने ती संधी तर गेली. पण मी मागच्या बाकावरून दुसऱ्या क्रमांकाच्या बाकावर बसण्याकरता जंग पछाडल्यांच आजही आठवतंय. अक्षय निंबाळकर अन सुतार दोघं बसत असलेल्या बाकावरून सुतारला मागे बसायला लावत ती जागा मी बळकावली होती. अनिकेत अन माझ्यात तसं अभ्यासाव्यतिरिक्त काहीच साम्य नव्हतं. अभ्यासात मी त्याच्या तोडीचा असलो तरी आमचं हस्ताक्षर म्हणजे भलतीच वळणं घेणारा महामार्ग होता. पण अनिकेतचं अक्षर इतकं वळणदार होतं की प्रत्येक ग्रहपाठाला नऊ, दहा गूण मिळायचे. मी त्याबाबतीत कमनशिबी होतो. सात अन लयीच मजल मारली तर आठवर गाडी पोहचायची. सहाजिकंच त्यामुळे माझ्या मनात मत्सर तयार झाला होता. इंग्रजीला आम्हाला कवडे नावाच्या शिक्षिका होत्या. त्यांना अक्षर खुप सुबक लागायचं. त्यामुळे सहाजिकंच अनिकेतला दहा गुण निश्चित होते. आमच्या मनातल्या मत्सराने मग कल्पना काढली, अन मित्रामित्रांनीच एकमेकांच्या वह्या तपासून नऊ, दहा गुण दिले. पण शेवटी त्याची किंमत मोजायला लागलीचं. माझ्या वहीत एक बरोबर इंग्रजी शब्द चूकीचा दाखवून, चूकीचा शब्द बरोबर कराय़ला लावला. कवडे मॅडमच्या नजरेतून हे सुटलं नाही. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच शेकलं. एकंदरीत अनिकेत विषयी प्रेमही होते अन मत्सरही. पण असं असूनही शाळा सुटली तरीही अभ्यासातला पहिला क्रमांक माझ्या हातून सुटला नाही.
                              काटे सर आम्हाला हिदी शिकवत. शिस्तीने फार कडक नसले तरी एका मुलाला सर्वांसमोर चोपल्याने मी मात्र जाम टरकून राहायचो त्यांना. अभ्यासातला पहिला क्रमांक असला तरी अनिकेत आणि काटे सर यांच कायमच चांगलं जमायचं. त्यामुळे मला अनिकेत सोबतच्या मैत्रीने एक आधार वाटण्यामागचं हेही कारण होतंच. शाळा म्हटले की बाई ह्या आल्याच. कुंभार बाई आम्हाला गणित शिकवायच्या. माझ्यात अन अनिकेतमधे पहिल्यांदा गणित कोण सोडवतंय जशी काय टस्सलंच होती. पण मी त्यात मागं पडायचो. समाजशास्त्र हा माझा आवडता विषय. इतिहासाच्या तासाला आम्ही दोघं गवते बाईंचे दोन आवडते विद्यार्थी. या दोन शिक्षिकांचा विशेष लाडका विद्यार्थी होतो मी. सावंत बाई आम्हाला शिकवायला नसल्या तरी माझी आणि त्यांची ओळख चांगली होती. त्याला गावाकडून शहरात आलो असण्याची एक किनारही होती. अन माझा मधल्या सुट्टीतल्या डब्यात असणारी भेळ पाहूनही त्यांना वाईट वाटल्याचं मला अनेकदा जाणवलं. त्यामुळे त्या शाळेतल्या मित्रांना एकत्र जेवण्याचा आग्रह का करायच्या हे मला नंतर उमजलं. शाळेतल्या बाई ह्या घराबाहेरच्या आईच्या भूमिकेत होत्या याची ती पोचपावती होती.
                              साधना शाळेची देण म्हटलं तर मी क्रमाने अनिकेत, रोहन आणि या दोन्ही शिक्षिकांचीच नावं घेईल. शाळेतलं माझं विश्व या चार व्यक्तिंपर्यंत मर्यादीत होतं. पाचवी सहावीचा तो असा काळ की खिशात दोन चार रूपयाच्या पुढे काही नसायचं. त्यामुळे शाळा सोडताना निरोप समारंभ हा प्रकाराला मी मुकलोच. पण मला याची पूर्व कल्पना असल्याने खाऊच्या पैशातून ५० रूपये राखून ठेवत मी चार फोटो फ्रेम आणल्या होत्या. शाळेचा निरोप घेताना माझ्या या जवळच्या व्यक्तिंना देण्याकरता. शाळेचा शेवटचा दिवस नाही आठवत आता. परंतू अनिकेत सारख्या मित्राशी उद्यापासून भेट होणार नाही म्हणून डोळ्याच्या कडा पानवल्या होत्या. नव्या शाळेत दाखल झाल्यानंतर मी अनेकदा माझ्या या आपल्या माणसांच्या आठवणीमुळे त्या डायरीतल्या फोन क्रमांकवर फोन करण्याचा प्रयत्न केला. पण कधी संपर्क झालाच नाही.
                              अनिकेत शाळेतील माझा सर्वात खास मित्र, पण शाळा संपल्यानंतर त्याच्याबद्दल मला काहीच माहीती नव्हती. तेव्हा लहान असल्याने घर माहित असण्याचा प्रश्नच नव्हता. साधना शाळा सोडल्यावर अनेकदा पुण्याला आलो तरी भेटणं दुरापस्तंच होतं. त्यात डायरीतील फोन क्रमांकही तिच्यासारखेच जीर्ण झाले होते. त्यामुळे अनिकेत कुठे आहे सध्या असा प्रश्न अनेकदा पडला. मग माझ्या आवडत्या मित्राबद्दल मला माहीत नाही हे कबूल करत स्वत:च स्वत:ची लाज वाटायची. अन तसेही मी तरी कुठे त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला. आता या फेसबूक-व्हाटस्अपच्या जमान्यात ते सहज शक्य झाले हा वेगळा भाग. दुरावलेल्या नात्यांमध्ये नेहमी समोरून पाऊल उचलले जायची वाट आपण का बघतो हा प्रश्न मला आजही सतावतोच. फेसबुकवर भेटण्यापूर्वी मनात अनेकदा यायचं की त्यालाही माझ्याबद्दल इथून तिथूनच असंच वाटत असणार आणि तो ही आज माझ्याबद्दल असाच विचार करत असणार, जसे आज मी त्याच्याबद्दल करत होतो. हा प्रश्न नंतर अनुत्तरित होता तसांच अडगळीत पडून राहीला.
                              मी अचानक पुण्यातून गावी गेलो. त्यामुळे आम्ही तसे एकमेकांपासून दूरच. पुन्हा भेटलोच नाही अजून. गेल्या ६-७ वर्षात फेसबुकने काहीच नसलेला कॉन्टॅक्ट पुन्हा झाला. मला आजही आठवतंय, पूर्वी ऑर्कूट होते, तेव्हा शाळेच्या मित्रांना शोधण्याकरता किती अट्टहास केला होता तो. पण तेव्हा ॲण्ड्रॉईड मोबाईल नव्हता. शाळा संपल्यानंतर आम्ही अजूनही कधीच भेटलो नाही. पण पाच सहा वर्षापूर्वी फेसबुकवर त्याची प्रोफाइल सापडली. फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली तर हा ओळखेल ना हाही प्रश्नंच होता. कारण दहा वर्षात खूप काही बदललं होतं. मग मी एक वैयक्तिक संदेश पाठवला. त्यात शाळा, शिक्षक आणि आमच्यातल्या मैत्रीची दास्तान त्याला सांगितली. महिना-दोन महिन्यांनी त्याला प्रतिसाद आला आणि आम्ही संपर्कात पुन्हा आलो. पुन्हा आमची मैत्री वाढली. आजही असे मित्र खरंतर वास्तवातल्या अंतरानेही फारसे दूर नाहीत. पण मनातली अंतरे नात्यांची वीण ठरवतात. अंतर वाढत जाईल तसं गाठी सुटतात. मी मनातच खिन्नपणे हसलो आणि स्वत:शीच विचार करू लागलो,  नाही, मित्र कधीच हरवत नाहीत. हरवते ती मैत्री. जी आमची कधी हरवली होती असं वाटलं. त्टाची जाणीवही झाली. पण आमच्या भेटी होत नसल्या तरीही मनातलं अंतर गेल्या ५-६ वर्षात पहिल्यासारखं पुन्हा झालं आहे. शाळेसारखी मैत्री हरवली तरी मैत्री आहे हेच सुख मनाला आनंदून टाकतं. थोडसं मागे वळून पाहिलं की खूप मस्त वाटतं आपल्या मित्रांबद्दल विचार करताना आणि कळत नकळत त्यांच्याविषयी आदर वाटून जातो.

मित्रांशिवाय दिवस उगवतही नाही अन मावळत नर नाहीच नाही...

आपण शाळेत असताना असात सेल्फी घेतला असता....

                              मला मैत्रीच्या निखळ आणि निस्वार्थ नात्याचा पहिल्यांदा आनंद घ्यायला शिकवण्याचं श्रेय जातं ते अनिकेतला. मैत्री म्हणजे काय हे माहिती नसतानाच्या शालेय जीवनापासूनच आमचा हा प्रवास सुरू झाला अन मधेच थांबला. उज्ज्वल भविष्यासाठीची वाटचाल करताना आमची ताटातूट झाली. दुरावलो म्हटलो तरी वावगं ठरणार नाही. कदातिच फेसबुक सारखं सोशल मिडीयाचं माध्यम नसतंच तर आम्ही एकत्र येणे फार कठीण होते. मोबाइलमुळे संवादाचा वेग प्रचंड वाढलाय. आता आठवण आली की 'की पॅड'वर टकटक करत 'हायकिंवा 'मिस यूटाइप करावं. दुसऱ्या क्षणी फॉरवर्ड आणि तिसऱ्या सेकंदाला समोरच्याला भावना पोहोचतात. आजही आमचे शाळेचे दिवस आठवले कीती दोन वर्षे डोळ्यांसमोर तराळून जातात. आम्ही आता वाट पाहतोय ती एका भेटीची! तो योग कधी जुळून येतोय माहीती नही. पण आज यानिमित्ताने पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आता त्यानंतर भेटीगाठीचे सिलसिले सुरू करायचं हे ठरवलंय. कुंभार बाई, गवते बाई अन सावंत बाईंनाही भेटायचंय. बघू आता वेळ कधी अन कशी साधतेय.


जुग जुग जियो यार.....!!!

                              आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही. पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. आपली मैत्री ही त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण का म्हणेना. हा क्षण माझ्या मनाला जसं एक वेगळ समाधान देतो तसंच तुलाही देईलच याची खात्री आहे. काही माणसं स्वभावाने कशी आहेत हे माहीत नसतं पण मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात हे अल्पावधीतंच कळंत. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तू ! म्हणूनचतुझ्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुर्तास माझ्या शाळेतल्या मैत्रीची शान असलेल्या मित्रा, वाढदिवसाच्या तुला मनापासून भरभरून शुभेच्छा. शाळेतला गोंडस अजूनही अगदी तसांच आहेस. हा आता दाढीमिशा आल्यात हा भाग वेगळा. पण त्याही तुझ्या लाल स्वेटरसारख्या तुला शोभून दिसतात. 

संतोष जुवेकरंच भाग्यंच म्हणायला लागेल.....आमचे सेलिब्रिटी मित्र

ही दोस्ती तुटायची नाय......!!!
आणि मित्राला वाढदिवसाच्या या अशा शुभेच्छा देणे हा माझा नाइलाजाचा भाग असू शकतो. पण सुगंधी फुलांचा गुच्छआईस केक आणि त्यानंतर मस्त पार्टी झोडल्याशिवाय वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फिल येत नाही असा काही नियम नाही. हा पण म्हणूनच त्यासाठी अजूनही भेटीगाठीचे कट्टे अमर आहेत ! 



गणेश सुवर्णा तुकाराम
२७ सप्टेंबर २०१८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा