पैसा आयुष्य आणि माणूस...!!!
माणूस शिकतो, सावरतो अन मोठाही होतो. पण त्याची प्रगती होतेच नाही. प्रगतीचं नेमका
मापदंड काय हा प्रश्न आजच्या युगात विचारला तर एकच उत्तर बहुतेकांकडून येतं. पैसा, संपत्ती अन त्यातून आलेला मोठेपणा...
खरंतर प्रगतीचा तसा कोणताही मापदंड
ठरवण्याइतका मी मोठा नक्कीच नाही. हा पण मी प्रगतीला या मापात बघतंच नाही. माणसाची
प्रगती म्हणजे तो आयुष्याच्या प्रवासात कुठपर्यंत पोहचला....?
आयुष्याचं मोजमाप म्हणजेच खऱ्या अर्थाने
प्रगतीचे मधुर फळ. आयुष्य म्हणजे प्रगतीच्या शिड्या चढत चढत एकेक पायरी वर चढणेंच. संकटं घेऊन य़ेणारा
पुढचा प्रत्येक रस्ताच आयुष्य कसं घडवायचं, वाढवायचं
की अडवायचं ते ठरवतो !
आजकाल पैशाच्या मागे धावणारी माणसं बघून ती
प्रगत आहेत की चावी दिलेली बुजगावणी हा प्रश्नच पडतो. लाखोंची संपत्ती असणारा
उद्योगपती प्रगत की तितकीच संपत्ती असणारा राजकारणी....?
अंबानी, अदानी
हे प्रगतीचे आदर्श की मिसाईल मॅन अब्दुल कलाम..?
तंत्रज्ञानातला जपान प्रगत की निसर्ग जपत
आलेला भूतान...?
महासत्ता म्हणवणारा अमेरिका प्रगत की शांत
असणारा आईसलॅण्ड...?
खरंतर कुणीचं अगदी ठाम उत्तर देऊ शकणार नाहीच
याचं. मीही. परंतू एक मात्र खरं आहे की पैसा म्हणजे प्रगती नाही तर तंत्रज्ञान
म्हणजे प्रगती. तंत्रज्ञानातील प्रगतीचा
आयुष्याला फायदा असेल तर ती प्रगती ठरते. आयुष्य उध्वस्त करणारी तंत्रज्ञानं देखील
मग माणसाला मागेच नेऊन ठेवतात.
शिक्षण म्हणजेच प्रगती का हीच आपल्या धोरणांची
यशस्विता का ? तर नाही. माणूस म्हणून
असणारी अंगभूत गुणवत्ता वाढली म्हणजे खऱ्या अर्थाने प्रगती. पैशामागे धावत रहाणे
म्हणजे आपणंच आपल्या आयुष्याची करून ठेवलेली वेठबिगारी. आयुष्य जगण्याकरता पैसा
आवश्यक असेलही, पण पैशाकरता आयुष्य खर्ची घालताय त्याचं
काय...?
आयुष्याचा कधी हिशोब केलाच तर आपण किती
कमावण्याकरता किती आयुष्य व्यर्थ खर्ची घालतो ते समजेल. आयुष्य म्हणजे आपली
मालमत्ता आहे. मालमत्ता वापरून जरूर कमाववे. पण तिचे अवमुल्यन कमाईपेक्षा अधिक होत
असेल तर ती कमाई काय कामाची.
माणुस पैसा मिळवण्यासाठी पळतो, धडपडतो अन आरोग्य, सुख समाधान गमावतो. अन पुन्हा
उतारवयात तेच परत मिळवण्यासाठी पैसा खर्च करतो. प्रगतीचा आलेख जसा चढतो तसाच उतरत
संपतो देखील. आपल्याला आयुष्यात करियर, यश, पैसा हे सगळं हवं असतं.पण चांगलं आयुष्य मिळण्यासाठी आरोग्य,तणावरहीत आनंदही आवश्यक असतो. आजच्या जीवनशैलीत भरपूर पैसा मिळवण्याच्या
खटपटीत खरंच आपण सुख समाधानाचं आयुष्य जगतो का ?
खुप पैसे मिळवण्याच्या नादात सुखासमाधानाची
आणि आनंदाची किंमत गहान टाकतो. आयुष्यात करीयरची पुस्तके घेऊनंच भविष्यात यश आणि
जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या शर्यतीत उतरतो. पण पैसा-आडका, घरदार, गाडी, कपडे इत्यादी
मिळवण्याच्या कैफात आपण आपल्यालाच विसरून जातो.
एकविसाव्या शतकाच्या आपण गप्पा मारताना आपण
सोयीस्कर विसरतो की आपण असे किती शोध लावले, ज्याने
जगाच्या वर्तनाची दिशाच बदलवून टाकली. जगात प्रगतीच्या दिशेने कुणी कुठे काही नवे
शोधले की, हे तर आमच्याकडे आधीच आहे,पुराणात
सांगितलेय. शोधून पहा, असे समर्थन करत सुटतो. जर खरंच आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती,
ग्रहताऱ्यांचे ज्ञान अवगत होते. विमाने पण होती म्हणायचे. मग असे
असेल तर अनेक दशके आपण बैलगाड्या, गाढव-घोडे का वापरत होतो
? आम्ही प्रगत होतो मग आम्ही आमच्याच आयाबहीणांना इतके दिवस घरात
डांबून का ठेवत होतो. सती सारख्या नालायक प्रथा पोसत होतो.
प्रगती म्हणजे जगणं सुकर करणारी प्रत्येक
गोष्ट. साधी सुई हेही प्रगतीचंच उदाहरण आहे. ज्यांच्या मागे पद, पैसा, प्रतिष्ठेचे वलय आहे, ते
प्रगत हा निव्वळ गैरसमज आहे. कारण ज्यांच्याकडे
काहीच नाही, तेही
परिस्थितीशी दोन हात करीत उभे आहेत. उद्याच्या उज्ज्वल भविष्याच्या शोधात.
करत आहेत प्रगती.
पैसा आला, तंत्रज्ञान आलं. पण आपलं सामाजिक
व्यवस्थेतील अन मनातीलंही कुपोषण दूर करणं गरजेचं आहे. आपले आयुष्याचे प्रत्येक
पाऊल हे काळाच्या ओघाने आणि प्रगतीच्या दिशेने बदलणारे असावे. पैशामागे धावणाऱ्या जगात प्रगतीची संपन्नता
शोधणारे लोक आपल्या समाजात काही कमी नाहीत. फक्त त्यांच्यातील प्रगती आपल्या
बेगड्या नजरेला दिसत नाही एवढेच. आयुष्यातील
प्रगती मागून अथवा लादून कधीही मिळत नसते. त्यासाठी प्रयत्नच करावे लागतात.
स्वकर्तृत्वाने स्वत:हून मोठे व्हावे लागते. आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न
पहाताना अगोदर आकाशाशी हितगुज करणाऱ्या शिखरांचा शोध घेता यायला हवाच.
नाहीतर पद, पैसा, संपत्ती अन प्रतिष्ठेचे वलय म्हणजेच प्रगती ही
व्याख्या चालत आली आहेच अन राहिलंही. आपण फक्त लहानमोठी गोणपाटं हाती घेऊन
पैशाच्या मागे पळायचं. आपलं आयुष्यही त्यातंच खर्च होत रहाणार अन जसे जन्माला आलो
तसेच मरण पावणार. आयुष्याचा विकत घेतलेला
प्रगतीचा आलेख शिखरं गाठायची दूर उंचावट्यावरंच संपून जाणार. जगाच्या दूर माणूस
म्हणून स्वत:च्या प्रगतीच्या आलेखातही आपलं पुसटसं नावंही शिलकीला उरणार नाही.
गणेशदादा शितोळे
(१५ जूलै २०१८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा