माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १५ जुलै, २०१८


आयुष्याच्या पुस्तकातलं एक कुरमजलेलं पान..


आज खूप दिवसांनी काहीतरी नविन लिहीत आहे. तसं पत्रच. हल्लीच्या या व्हाटसअप आणि चॅट अॅप्लिकेशनमुळे ना संवाद इतका वाढलाय असं वरवरं भासतं अन शंकाच येते की नात्यांमधला संवादच संपून गेलाय की काय. म्हणजे तो एकमेकांमधलाही आणि स्वत:शीही असणारा. स्वत:शी अशासाठी म्हटलं की कुणालाही पूर्वी पत्र लिहितांना आपोआपच घटनांची उजळणी व्हायची. म्हणजे तसा संवादच व्हायचा की स्वत:शी सुध्दा एका अर्थाने. आमच्या अगोदरची पिढी तशी शेवटचीच. कारण आमच्या बालपणात फोनची डबे घरी बसलेले होते. त्यामुळे फारसा पत्र लिहीण्याचा प्रसंग शाळेत आणि तेही विशेषकरून परीक्षेतच. पत्र लिहीताना पहिलं वाक्य मात्र ठरलेलं असायचं पत्र लिहिण्यास कारण की.?? खरंतर आता गंमत वाटतेय जूनं सगळंच आठवले की. कारण पत्र म्हणजे तसे ठरवलेला मजकूर असायचा. सुरवातीला आशिर्वादअभिंदनशुभेच्छा मध्यावर विषयाची मांडणी आणि शेवटाला आभार. या व्हाटसअप आणि चॅट अॅप्लिकेशनमधे असा कसलाच ठरीव प्रकार उरलेला नाही. तरीही या सगळ्यातून वेगळं असं काही लिहावसं वाटलं. आपल्या कोणा जीवलग माणसाविषयी. मनातल्या मनात कुढंत राहिलं की मनातच दुरावा जाणवत जातो. मनाचा मनाशीच होणारा संवाद थांबला कीआपणच आपल्याला त्रास देत रहातो. आयुष्याच्या पुस्तकातील मन मोकळी करणारी अशी कुरमजलेलं पान लिहीली जातात नव्हे तर ओघवतातंच.

प्रिय श्री
                     मला माहीतेय तुला हे प्रिय कधीच आवडत नाही. कारण ते लिहीले म्हणून कुणी प्रिय होत नाही अन नाही लिहीले म्हणून अप्रिय. तरीही. तू मला कायमच प्रिय आहे म्हणून. तुला आठवतंय तू मला दिलेलं पहिलं पत्रं ? हाहा तेच वहीतून दिलेलंकुणी वाचकाने तुला पाठवलं होतं. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतांना मैत्र पुरवणीकरता आपण लिहीताना ? मला आजही आठवतेय तुझे ते सदर अर्थ नात्यांचा. तुझ्या ह्याच सदरातील लेखांमधून तर आपली ओळख झाली होती. लिहीताना वेडयासारखं वाहवत जाणं कसं जमतं हे स्वत: अनुभवल्याशिवाय कळत नाहीचतुझं हे व्यवहारी वागणंपाय रोवुन उभं रहाणंच मला आवडायचं. 
तुही लिहायचास की पण खरं सांगु मला तुझं सामर्थ्य तुझ्या लिहिण्यापेक्षा तुझ्या वागण्यात जाणवायचं. तुझी एक कविता दिली होती आजही आठवतेय मलाकुठल्याशा एका स्पर्धेत तू हारल्यावर मला वाचायला दिलेली.  किती बळ दिलं त्या कवितेने मला नाही सांगू शकत. माझं हे लिहीणंही कदाचित त्यामुळेच वाढीस लागलं असेलकिती वेगळं असायचं तुझं लिखाणहळुवारपणा असायचाचपण नकळत समोरच्या माणसाच्या मनात घर करून जाणारं वास्तव शब्दात मांडलेलं असायचं.
                    मला अजूनही नाही जमत रे तुझ्यासारखं लिहायलाहा पण तुझ्या त्यावेळच्या कविता खुप आवडायच्या. तुझ्या अनेक आठवणी आहेतमनातल्या तुझ्याच कप्प्यात अन तुझ्या हिशोबाच्या वह्यांखालीतुझ्या आठवणीच इतक्या हळव्या आहेत ना की तुझ्यातलं माणुसकीचं झाड आपोआप पाखर घालीत रहातं दुसऱ्यांवर. आपलं जगायचं राहून गेलेलं सगळं आत्ता भासमय जगलो आपण. पण काही अर्थ नाही रे यात. सगळं केव्हांच सुटून गेलंय हातातून. 
                    दहा वर्षे झाली आपल्या पहिल्या भेटीला. नंतरची दोन वर्षे केवळ मला कलाटणी देणारीच होती. कॉलेज संपलं अन आपल्या नाही माझी वाट वेगळी झाली. मी छंद सोडून करीअर नावाच्या गोंडस वाटेने गेलो. पण तू छंद जपत तुझ्याच वाटेने निघून गेलास. खूप दूरवर. सगळं अगदी चुटकीसरशी उधळून. तुझा शोध का थांबवलाय आज माहितेय कारण आज खात्री झाली की आपली पुन्हा भेट नाहीच. मी हताश झालो म्हणून तुझा शोध थांबवला नाही की मला जे हवं ते सापडलं म्हणूनही नाही ? इतके दिवस मी स्वत:लाच फसवत होतो कोसळून पडू नये म्हणून. मी शोधत राहिलो कारणं खूप प्रयत्न केला सुख शोधायचा. अगदी अवघ्या आयुष्यावरंच आसुसलेपण चाल करून यावं इतका. तडफडत राहिलो मीच माझ्या आपल्या वर्तुळात एकटाच.
                    तू एकटाच गेलास कारण मित्र म्हणून तेवढा अधिकार तुला होतामला तेवढाही अधिकार नाही. होय ते स्टेशनवर सोडायला आला तेव्हा आपले हात सुटत गेले अन मुठीतल्या वाळुसारखे अलगद दुरावत गेलेनाही रे! आजही ताकद हरवून बसलो नाही सगळी. अगदी समजण्याची उमजण्याची सुध्दा. रिता होउन गेलो पुरता तरीही मधली सगळी वर्षं वाहून गेली. परत नव्याने काही घडतंय अन मलाच सगळं विचारुन माझाच अर्थ नव्याने समजावतंय. नव्याने सोडवतोय आता माझ्यातलं मी पण.
                    तुझी जुनीच सवय हीस्वत:ला हवी असलेली वाटच फक्त मोकळी ठेवायची.  मलाही सवय लावलीए तू हक्कानेबोट दाखवलेल्या वाटेवर चालायची. म्हणूनच लिहीतोयअविरत. माझेच गुज अन माझीच शब्दांची मोरपिसं. बाकी काय काय बदललंय माझ्यात गेल्या चार वर्षात मलाही नाही माहीत. पण टिकून आहे तोच पारदर्शी चेहेरा. तुझ्यासारखाचआत बाहेर सारखाच. जगण्याच्या विविध रंगछटा जपून ठेवणारा. मैत्री जीव तोडून जपायचं म्हणतो मी नेहमीच ते ठीक आहे. पण आता सगळेच मित्र हातभर अंतर राखून वाटते रे.  
                   तुझं हे असं समजल्यावर या सगळ्यातून बाहेर येतांना खूप कुतरओढ झाली माझी. मनातली दाटलेली सगळी उचंबळ गिळून टाकत सारं आसुसलेपण गोठवायला तुच शिकवल्यानं तरी जरा धीर आला. बंधनाचे सगळेच दोर तोडून टाकून स्वत:बरोबरच जगणं आजकाल चालू आहे. थोडक्यात काय तर स्वत:ला प्रॅक्टिकल बनवणं हेच हल्ली चालू आहे. लवकरंच तुझ्या वाटेने चालायचंय पुन्हा. आहे हे सगळं इथे जसंच्या तसं सोडून. जगायचं राहून गेलेलं सगळं आत्ता त्याच वाटेने. कशातच काही अर्थ नाही असं सगळंच काही निरर्थक वाटायला लागण्याअगोदर खरंतर. आयुष्य जाणीव न जाणीवेच्या धूसर सीमारेषेवर असतानाच मला माझं मीपण टिकवायचंय. 
                    सध्या मनात नुसती प्रश्नचिन्हंच नाचतायत माझ्याच प्रश्नांना प्रतिप्रश्नं विचारणारी. मी शोधतोय त्या माझ्याच प्रश्नांची उत्तरं. सापडली की या वाटेवरचा प्रवास संपला. माझ्या जगण्याचे बदलेल्या संदर्भांची जाणीव होतेय हळूहळू. पूर्वीची वेगळी वाट काहीनाही साधं अन सरळ पण वळण घेणार हे नक्की.

तुझाच मित्र.
नाव सांगायची गरज नाही. तु वाचलं की समजून जाशील खात्री आहे.

(श्री ला भेटून तशी आता सातआठ वर्ष उलटली. कॉलेज संपलं अन आमची पुन्हा भेट झालीच नाही. तो त्याच्या वाटेने सरळ तसाच चालत राहिला. मी पुढचं शिक्षण घ्यायला माझ्या वाटेने निघून गेलो अन तिथंच आमचा सोबतचा प्रवास संपला. होत संपलाच. काही दिवसांपूर्वी नगरला एका मैत्रिणीच्या लग्नानिमित्ताने गेलो होतो. खरंतर लग्न हा प्रकारचं मला मुळीत न रूचणारा. तेव्हा परत येताना श्री च्या त्या घराच्या जवळ चक्कर झाली. आम्ही वेगळ्या वाटेने गेलो त्यानंतर महिनाभरातंच त्याने आपलं घर बदलून अकोल्याच्या पलिकडं हरिचंद्रगडाच्या पायथ्याला गाठलं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रवास कुणालाही माहित नव्हता. वर्तमानपत्रात तो गेल्याची बातमी वाचल्यावरंच शेजाऱ्यांना माहित झालं. मला जवळपास वर्षभरांनी ते समजलं. तोपर्यंत माझा शोध चालूच होता. त्याची अन माझी मैत्री ही शब्दात मांडण्यापलिकडची होती. अशा एका मित्राची परत भेट झाली नाहीच. तो गेलाय असं अजूनही मी मानत नाहीच. लिहीत भटकत असेल सह्याद्रीच्या कुशीत कुठेतरी. कदाचित पुन्हा भेट घेण्याकरता...)
गणेशदादा शितोळे

(१५ जुलै २०१८)






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा