माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७


नदीकाठी...!!!


नदीकाठी पाण्यात दगड मारताना,
उडणार्‍या तुषारांना पाहून  मन प्रफुल्लित होते...
एक दोन तीन वेळा उडले की,
मन स्वतःच स्वतःशी हसत बसते...

एकटक लावून संथ वाहत्या पाण्याकडं बघताना,
मनात काही काही नसते....
नव्या कोर्‍या वहीसारखं,
मनंही कोरे कोरे असते...

सळसळत पळणारा मासा पाहून,
किंचित स्मित करत असते...
माशासारखंच मनंही,
खोल डोहात पोहत बसते...

हाती घेऊन ओंजळभर पाणी,
वेड्यासारखं निरखून पहात असते...
ओघळणारा थेंब थेंब पाहून,
सुटत चालणारं आयुष्य मोजत बसते...



गणेशदादा शितोळे
(११ नोव्हेंबर २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा