माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

झी मराठी दिवाळी अंक २०१७ करता लिहीलेला ऋणानुंबधाचा लेख.....

प्रिय झी मराठी,

                            गेली १८ वर्षे झाली तू आमच्या मनावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. सुरवातीला अल्फा मराठी म्हणून आलेली तू २००५ मधे नव्या नावात नव्या रूपात आली. पण तू ते आपलेपणं तसंच कायम ठेवलं. आजवर तू न थकता न दमता केवळ आमचं मनोरंजन करत राहिली. कधी दु:खात तू गालावर फु बाई फू मधून हसू फुटवलं. तर कधी जुळून येती रेशीमगाठी मधून गोड गोड रडवलं. खरंतर याबद्दल तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आभाळमाया, वादळवाट पासूनचा तुझा प्रवास एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, फु बाई फु, एका पेक्षा एक, सा रे ग म पा, तू तिथे मी, होणार सून मी द्या घरची, असे हे कन्यादान, जुळून येती रेशीमगाठी, उंच माझा झोका, चला हवा येऊ द्या करत  करत दिल दोस्ती दुनियादारी आणि आता तुझ्यात जीव रंगला पर्यंत आला आहे. खरंतर थांबला म्हणणार होतो. पण थांबणार ती तू कशी. तू सदैव आमचं मनोरंजन करत रहाणार. म्हणून तर तुझ्यात खरंच जीव रंगला आहे. 

                               येत्या दिवाळी निमित्ताने तू मी मराठी झी मराठी स्पर्धा - दिवाळी अंक २०१७ स्पर्धा घेतेय. आणि विषय ठेवलाय, आवडत्या मालिकेविषयी लेख. कसं लिहिणार. कोणत्याही एकाट मालिकेवर. आजवर तू एवढ्या चांगल्या मालिका दिल्या की प्रत्येकीवर एकेक लेख लिहीला जाईल. त्यात अजून एक अट ५०० शब्द. तुझं कौतुक फक्त ५०० शब्दांत पुर्ण होईल का. मला तरी अशक्य वाटतंय. पण करणार काय स्पर्धा आहे. नियम व अटी पाळल्याच पाहिजेत. स्पर्धा झाली की वेळ काढून तुझी कोडकौतुकं करेल नक्की. 


जुळून येती रेशीमगाठी....

                                   जवळपास ४ वर्षे लोटत आली असतील. खरंतर त्यावेळी मी आभियांत्रिकीचं शिक्षण घेत होतं. उनाड वय. त्यामुळे मालिका पहाण्याचा विषयच नव्हता. पण जुळून येती रेशीमगाठी हे प्रमोतील गाणं ऐकलं आणि त्या दिवशीच बाकी कोणती नाही पण ही मालिका पहायचीच हे ठरवलं. २५ नोव्हेंबरला पहिला भाग पाहिला. सुरवात बाबांजीपासून झाल्यावर जरा खटकलंच. पण नंतरचा प्रवास एकदम भन्नाट असाच. प्रत्येक घराघरात सुरू असलेली गोष्टच मांडली जात होती प्रत्येक भागातून.
                                    पंचवीशी ओलांडल्यावर घरचे जेव्हा स्थळं पहायला लागतात तेव्हाची आदित्यची अवस्था मी आज अनुभवतोय. मनातून लग्न करायचं म्हणून कितीही आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरीही एखाद्या मुलीला पहायला जाताना अवघडल्यासारखं होतं. वधूपरीक्षा ही जूनी झाली हे स्पष्ट जाणवले. तीन बहीणींची लग्न झाली. त्यामुळे अनेकदा हा कार्यक्रम जवळून पाहिला. पण स्वत:चा अनुभव हा वेगळाच असतो. आणि त्यातूनच मालिका पाहून घरच्या वडीलधाऱ्यांच्यात बदल घडला. आज लग्न जमवताना मला काय वाटतं हे निदान विचारात घ्यायला लागले तरी. माईची व्यक्तिरेखा पाहून आदित्यची माई आणि माझी आई एकच आहे हे आता लक्षात यायला लागलंय.
                                आदित्य मेघनाची पहिली भेट ते लग्न आणि लग्नानंतर लपवून ठेवलेलं गुपित घरच्यांना सांगण्यापर्यंत सगळा प्रवास थक्क करणाराच होता. म्हणजे ठरवून लग्न केलेल्या जोडप्यांकरता आदर्श अशी मालिका आहेच. पण प्रेमविवाह करणारांनाही बरंच काही शिकवून जाणारी मालिका आहे. दोन अनोळखी व्यक्ति जेव्हा पहिल्यांदा भेटतात आणि लग्न या बंधनात अडकल्यानंतर आलेला अवघडलेपणा काय असतो आणि तो दूर कसा करायचा याचं उत्तम चित्रण म्हणजे आदित्य मेघनाचं नातं. त्यात जसं अवघडलेपण होतं. तसं परस्परांकरता समर्पणही होतं. तसाच विश्वासही होता.
लग्नानंतर पहिल्या रात्री आपल्या आयुष्याची जोडीदार जेव्हा आपल्याऐवजी दुसरं कोणावर प्रेम करते हे ऐकून माथं फिरवून वेगळा निर्णय घेण्याऐवजी तिच्या भावना समजून घेत विचार करून मार्ग कसा काढावा हे या मालिकेने शिकवले.
                                      लग्न करणे म्हणजे नक्की काय हे लग्न होण्याअगोदरच आदित्य मेघनाने शिकवलं. एक नवीन नातं जोडताना जिथे खरंतर दोन वेगळ्या व्यक्ती असतात, पण जीव एक असतो इतकी समरुपता असते. तिथे विश्वास असतो, तिथे प्रेम असते, तिथे आपुलकी असते, तिथे प्रामाणिकपणा असतो अन तिथे जीवाला लागणारी ओढ असते. अशा नात्यात तुम्ही आपले असूनही आपले नसता म्हणजे लग्न होय.
                                    समोरच्या व्यक्तीमधील प्रामाणिकपणा, त्याचं एक किंचितसं स्मितहास्य आणि डोळे पाहून आयुष्याचा जोडीदार निवडण्याची कला आदित्यने शिकवली. समोरची व्यक्ती आणि प्रामाणिक असेल तरंच नात्यांची ही रेशीमगाठ गुंफली जाऊ शकते. प्रेम म्हणजे रेशीमगाठ असते, नाजूक पण तूटणारी, न सुटणारी.
                                       नातं कोणतंही असो त्यात प्रेम असेल तरंच ते टिकतं. मला प्रेम करायला शिकवलं आदित्यनेच. पण प्रेम म्हणजे तरी काय असतं...? प्रेम म्हणजे असतं प्रामाणिकपणा,समर्पण आणि जीवाला लागणारी ओढ. एकमेकांकरता समर्पण असेल तर एकमेकांच्यात प्रेम निर्माण होतं. प्रेमात असतो विश्वास. एकमेकांकरता समर्पण देण्याची कमिटमेंट,एकमेकांमधला संवाद यातून जीवाला लागणारी ओढ निर्माण होतेच.  प्रेमात माणूस हतबल होतो, हरवून जातो. त्यामुळेच मी प्रेमावर अनेक कविता लिहील्या. कारण मनातल्या भावनंपुढे मी हतबलंच झालो होतो. मी स्वत:ला व्यक्त होण्यापासून रोखून ठेऊ शकलो नाही. अनेकदा रात्री मी असंच लिहीताना कित्येकदा स्वप्नांमधल्या तिच्यात हरवून गेलो,हरखून गेलो.
                                          आज आयुष्याच्या एका वळणावर प्रेमाची चाहूल लागली अन मी पुन्हा व्यक्त झालो. माणसाला एकदा प्रेम सापडलं ना की प्रेम असह्य होऊन जातं. कारण प्रेम म्हणजे मनातून उसळून येणारा आनंद असतो. आजवर राखून ठेवलेलं प्रेम द्यायला आपल्या आयुष्यात कोणीतरी येतंय म्हणत आणि आयुष्यात प्रेमाची चाहूल लागली अन मला गुरफटून जायला झालंय. 
                                        माझ्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती माझ्या सगळ्यात जवळची मित्र असणार हे नक्की. मैत्रीची तीच तर गंम्मत आहे. मैत्रीतंच आपण केवळ आपण राहू शकतो. खरेखुरे.इतर नात्यातील अपेक्षा अन जबाबदाऱ्या मैत्रीत पण असतात. पण त्या पूर्णपणे वेगळ्या रूपात असतात. त्यांचं ओझं नाही होत कधी.
                                      आदित्य मेघना आणि संपूर्ण देसाई कुटुंबाची एवढी सवय होऊन गेली होती की शेवटचा भाग झाला तेव्हा पासून संध्याकाळचा टिव्ही सुटलाच. जेवण मीठीशिवाय अळणी वाटते तशी संध्याकाळ अळणीच झाली. कारण जूळून येती रेशीमगाठी मालिकेने आपलं वेगळपण जपलं होतं. रटाळ आणि रडक्या मालिकांपेक्षा अशा मालिका कायम प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान टिकून ठेवतात. एका अर्थाने वेळीच मालिका संपवल्याचा आनंदही वाटतो. कारण विनाकारण लांबवन लावून मालिकेचे भाग वाढवण्यापेक्षा हसत हसत सुरू झालेला आदित्य मेघनाच्या साथीचा प्रवास हसत हसतच संपला हे चांगलंच झालं. पण आजही डोळे पाणवतात हे नक्की.
                                         आदित्य मेघना खेरीज नाना आणि माई यांची भूमिका म्हणजे अनेक आईवडीलांच्या डोळ्य़ात अंजन घालणारी आहे. आपल्या मुलामुलीवर आपले विचार न लादता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा आदर ठेवून घर एक ठेवण्याचा सुंदर विचार नाना माईंनी मांडला आहे. बहुतेक म्हणूनच आता आईबाबा तुला योग्य वाटणाऱ्या व्यक्तीशी लग्न कर म्हणू लागलेत. याचं श्रेय नाना माईंना द्यावंच लागेल. आर्चू सारखी माझीही बहीण आहेच की. एकंदरीत देसाई कुटुंब म्हणजे कोणी घरचे असल्यासारखंच वाटतं. आजही कित्येकदा यु ट्युबवरचे व्हिडियो वारंवार बघतो. नुसता आवज ऐकूनही आनंद मिळतो. होणाऱ्या बायकोला बाकी काही नाही पण पहिली भेटवस्तू म्हणून आदित्य मेघनाच्या जूळून आलेल्या रेशीमगाठी दाखवणार हे नक्की. कारण देसाई कुटुंबाशी आमच्या कुटुंबाच्याही रेशीमगाठी जुळूनच आल्यात.

कितीही लिहीले तरी अपुरेच आहे. शेवटी एवढंच...

मुक्याने बोलले…
गीत ते जाहले…
स्वप्न साकारले…
पहाटे पाहिले…

नाव नात्याला काय नवे…
वेगळे मांडले सोहळे…तुजसाठी…
हो हो…
मिळावे तुझे तुला…
आस ही ओठी …
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी…
जुळून येती रेशीमगाठी…
आपुल्या रेशीमगाठी....



तुझा एक निस्सिम प्रेक्षक

गणेशदादा शितोळे.
(३० ऑगस्ट २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा