माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

कविता म्हणजे नेमकं काय....?

                         कविता म्हणजे नेमकं काय किंवा कविता माझ्यासाठी काय आहे असा प्रश्न मला कुणी विचारला तर दुसर्‍या क्षणी ओठांवर येतं. कविता म्हणजे काय तर कविता म्हणजे सर्वस्व. कविता म्हणजे मला आनंद देणारी गोष्ट. हो कारण असा प्रश्न पडला की डोळ्यासमोर कविता आणि अनुभवलेली तिची अनेक रूप उभी रहातात. कविता कधी प्रेमातून साद घालणारी प्रेयसी भासते तर कधी आनंदाची ओळख करून देणारी पायवाट भासते. कविता कधी दुःखाच्या संवेदनांची जाण करून देते तर कधी चुकलेल्या आयुष्यात दिशा दाखवणारी गुरू वाटते.

                           कविता आणि त्यामागच्या भूमिका ह्या माझ्या मते असणार्‍या आहेत. त्या सगळ्यांनाच पटतील असं नाही. आजवर माझी ओळख एक व्यक्ती, मित्र, नेतृत्व करणारा अशीच झाली आहे.  कवी, लेखक ही नव्याने लागलेली बिरूदं असली तरी आयुष्यात न भेटलेली अनेक माणसं मात्र याच कारणासाठी ओळखतात. नुकतेच अशाच एका नवीन ठिकाणी लोकांना कवी म्हणूनच ओळख झाली. त्यावेळी अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. पण त्या वेगळ्या कारणासाठी. त्या भोवताली असणार्‍या लोकांमधील अनेकांना कविता लिहणं म्हणजे काय तर फालतूपणा वाटत होता. एक जण बोलूनही गेला. कविता म्हणजे काय तर ते बोअर रटाळ रडगाणं. दुसरा म्हणाला की कविता काय गोष्ट आहे का. फालतूपणा आहे आम्ही शाळेत असताना लहानपणी करायचो. खरंतर तेव्हा थोडंसं वाईट वाटलं. पण त्याच वेळी असंही वाटलं की हा आपलाच दोष आहे. हो म्हणजे या आपला मधे सर्वच कवी, लेखक मोडतात. आजवर अनेक उत्तम लेखक कवी घडले. पण आजही आपण लोकांना कवितेमागच्या आनंदाची ओळख करून देऊ शकलो नाही. किंवा फक्त थोडक्याच लोकांना समजावून सांगू शकलो.

                        आजच्या काळात कविता, लेखन हे फालतूपणा वाटतात याचं कारण आजच्या पिढीला पैशाव्यतिरिक्त दुसर्‍या कोणत्याही गोष्टीत आनंद आहे हेच माहीत नाही. पैशाहून अधिक आनंद कविता, लेख वाचनातून मिळतो याबाबतीत ते अनभिज्ञ आहेत. पैसा करीअर यापलिकडे विचार करण्याची त्यांची मानसिकता नसल्याने ते या गोष्टींचा आनंद घेऊ शकत नाहीत. पैसा ऐश्वर्य आणि शारीरिक दृष्टीने सुख मिळवून देईल आनंद देईल पण मानसिक दृष्ट्या आनंदाची ओळख वाङ्मय वाचनच देत असते.

                           व्हाटसअप फेसबुकवर फिरणार्‍या एका पोस्टनेही मला विचार करायला लावला. "छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही. अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात. पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो..."

                         मला हे कधीच पटत नाही. मला कायम वाटतं छापलेली पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते फरक इतकाच की ते कित्येकदा ते आपल्याशी संबंधित नसल्याने मनाला पटत नाही. जेव्हा छापील पुस्तकातील गोष्टी अनुसरून आपल्याला त्याचा अनुभव येतो तेव्हा छापील पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते..

                            त्या प्रसंगाचं फारसं काही वाटलं नाही. कारण माझे विचार, लेखन यामुळे बदलणार नव्हते ना थांबणार होते. फक्त वाईट इतकच वाटते की कविता/लेखन यामागचा आनंद समजून घेऊन प्रोत्साहन देणारी माणसं आयुष्यात फार थोडी भेटली. त्यामुळे नवीन असं काही लिहण्याचा हुरूप यायला जरा वेळ द्यायला लागतो आहे. आपल्याला काय लिहिता येते अन ते समोरच्याला किती भावते किंवा विचार करायला लावते याची कविता, लेखनाची निंदा करणारांना बहुतेक जाणीव नसते. असो माझा लेखन प्रवास सुरू होता, आहे आणि असाच राहिल.

गणेशदादा शितोळे
(१३ ऑगस्ट २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा