माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७



खरंच आपण स्वतंत्र आहोत का..?








 
                      आज भारताचा स्वातंत्र्यदिन. दरवेळीसारखाच भारतभर मोठ्या धडक्यात साजरा केला जाईल. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं दिमाखदार भाषणही होईलं. राजपथवर सैन्याचं संचलन सुद्धा नेत्रदीपक होईल. देशाच्या संस्कृतीचं दर्शन घडेल. पण या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक प्रश्न उभा राहतो.खरंच आपण स्वतंत्र आहोत का..?


                      काही या प्रश्नावर मला वेड्यात सुद्धा काढतील. मग काय मौज म्हणून स्वातंत्र्यदिन साजरा करतो का..?

                      त्यांचंही खरंच आहे. त्यांनी कधी याबाबतचा विचारच केला नाही. पण खरंच विचार केला तर प्रत्येकाच्या मनात हा विचार नक्की जन्म घेईल. खरंच आपण स्वतंत्र आहोत..? माझं तर उत्तर आहे नाही. हो नक्कीच नाही. आजही आम्ही गुलामगिरीत आहोत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रज भारत सोडून अधिकृतपणे निघून गेले याचा आनंद म्हणजे १५ ऑगस्ट. यापलिकडे मला तरी दुसरी गोष्ट वाटत नाही. इंग्रज येण्याअगोदरपासूनच आपला देश गुलामगिरीतच निपचित पडला होता आणि आजतागायत तसाच गाढ झोपेत आहे. कुंभकर्णाच्या ऐकीव दंतकथेसारखा सहा महीने झोपलेला नव्हे तर अजून झोपच झाली नाही असा आहे का आमचा देश. हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारायला पाहिजे.

                      जाती धर्माच्या जोखडात अडकलेला. जातीयवाद, धर्मवादाच्या जळमटांनी गुलाम होऊन बसलेला. अंधश्रध्देला कवटाळून बसलेला गुलाम. आमची संस्कृती जन्माला आली आणि सोबत जात, धर्म, पंथ, वर्ण असे सगळे वादही सोबत घेऊन आली. याला स्वतःला श्रेष्ठ समजाणारे जितके कारणीभूत होते आणि आहेत तितकेच ते मान्य करत लादून घेणारे आपणही कारणीभूत होतो आणि आहोतच.

                      हे आमचं सदभाग्य होतं की सुरवातीला सम्राट अशोक मधल्या काळात शहाजीराजे, राजमाता जिजाऊ,  छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि इंग्रज काळातील महात्मा फुले, राजर्षी शाहू, न्या.रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी,  बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांनी आपापल्या परीने त्या त्या काळात व्यापक लढा दिला. आणि काही अंशी या वादांना खिंडार पाडलं. इंग्रज आले आणि जात, धर्म, पंथ, वर्ण या वादांसोबत अंधश्रध्देने निपचित पडलेला हा देश अजूनच झोपेच्या खाईत लोटला. या खाईतून बाहेर काढण्याकरताच अनेकांना बलिदान द्यावे लागले. आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी नवीन सुर्याची पहाट दिसली.

                      जगाला दाखवण्याकरता तरी धर्मनिरपेक्ष भारताचा जन्म झाला. परंतु वास्तवात तेव्हा पासून धर्मवाद आणि जातीयवाद अजूनच बोकाळला. ज्या दिवशी या देशाने राजकीय व्यवस्था स्विकारली आणि राजकीय पक्ष जन्माला आले. त्या दिवशी पुन्हा एकदा झोपण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. नुकताच एक चित्रपट येऊन गेला. क्रांतिकारकांवरच आधारित होता. त्यातील किशोर कदम यांचा डायलॉग या राजकीय पक्षांच्या करता अगदी योग्य वाटतो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी काय झाले तर फक्त परके गोरे इंग्रज जाऊन आपले काळेसावळे इंग्रजच आले.
सोबत या राजकीय पक्षांसोबत धार्मिक आणि जातीयवादी संघटनांना पेवच फुटले. आणि आमचे हेच महापुरुष सुद्धा वाटून घेतले गेले. परिणामी आमचा देश पुन्हा एकदा गुलामगिरीतून अजून खोलीकडे वाटचाल करीत आहे.

                      ज्या संस्कृतीचा मोठा तोरा आम्ही मिरवतो त्याच संस्कृतीने आम्हाला पुरूष प्राधान्यता दिली. आणि आम्हाला जन्माला घालणारी स्त्री कायमची बंधिस्त करून टाकली. स्त्री म्हणजे केवळ उपभोगाची वस्तू या मानसिकतेची देण आमच्या संस्कृती ने दिली आहे. याच मानसिकतेचा बुरखा फाडण्याचे काम सतत समाजसुधारकांकडून केले गेले तरी आजही आमच्या समाजात त्याचे मुळ तसेच आहे.

                      अंधश्रध्देचा तर सुपिक भाग म्हणजे आमचा देश. कोणत्याही गोष्टीकरता इथे अंधश्रद्धा , अंधविश्वास ठेवण्याचा प्रयत्न सर्रासपणे केला गेला. त्यातून मग नरबळी, लैंगिक शोषण,  मारझोड, असे प्रकार वाढले गेले. प्राण्यांचाही छळ सुरू आहे. थोतांडंचं तांडव सुरू आहे. याला काही भल्या माणसांनी सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. काही अंशी त्यांना यश आले देखील. पण धर्मवाद, जातीयवादाने पोखरलेल्या लोकांना ते मानवेना. आणि या भल्या लोकांनाही बलिदान द्यायला लागले.

                      इथं माणसं अगोदर जातीची मग धर्माची आणि नंतर कुळाची असतात. प्रतिज्ञा फक्त घोकंपट्टी असते. त्या प्रतिज्ञेतील पहिली दोन वाक्ये समजून घेतली तर आपण कोण हा प्रश्न कधीच पडणार नाही. हाच माणुसकीचा अर्थ सांगणाऱ्या माणसांनाही या घडीच्या निर्लज्ज माणसांनी वाटून घेतले.

                      जोतिबा फुले यांनी सांगितलेला गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी सत्यशोधकी मार्ग समजला नाही पण जोतिबा फुले यांची जात कळून घेतली. शिवाजी महाराजांचे धर्मनिरपेक्षतेचे विचार समजून घेतले नाहीत पण उलट शिवाजी महाराजांचा धर्म कोणता कळवून घेतला आणि त्याभोवती कायमचं बंदिस्त करून टाकलं. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका आणि संघटित होण्याचा मंत्र दिला पण तो समजून घेण्याऐवजी बाबासाहेबंना जातीधर्मात गुंतून टाकले. आणि सरतेशेवटी ही माणसं फक्त अमुक जातीपुरती, धर्मापुरती अन जयंती पुण्यतिथीपुरत्या आठवणार्‍या एका पुतळ्यापुरतीच उरली.

                      महान विचारवंताचे विचार घेणे दूरच पण आजच्या या पिढीने उलट त्यांच्यावरच जातीधर्माच्या जोखडात डांबले. परंतू आजही या जोखडातून मुक्त होत हे विचारवंत श्वास घेत आहेत आणि याच बुरसटलेल्या लोकातही माणुसकी आणि माणूसपण जपणार्‍या माणसांच्या विचारात जिवंत आहेत. या लोकांची एकमेव ओळख आहे अन ती म्हणजे माणूस.

                      अमुक जातीचे धर्माचे होण्याऐवजी माणूस व्हा. ही माणसं विभागणारी जोखडं जळमटं सोडून माणुसकीला जवळ करा. आज स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आपला देश तसाच आहे. झोपलेला. ज्या दिवशी धर्म, जात, प्रांत,  अंधश्रद्धा  ही जोखडातून आपला देश मुक्त होईल ती असेल खर्‍या अर्थाने स्वतंत्र भारताची सुवर्ण पहाट. त्यावेळी इथे नांदेल माणूसकी नावाचा एक धर्म. माणूस नावाची एकमेव ओळख.







गणेश दादा शितोळे
(१५ ऑगस्ट २०१७)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा