मुंबई - स्वप्नांच्या नगरीतील एक प्रवास
मुंबईला येऊन आता तीन चार महिने उलटले. मुंबई. भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर. त्यामुळे गर्दी असणार हे नक्की होतंच. आणि मुंबई पुणे मुंबई चित्रपटामुळे ऐकलंही होतंच. या अशा गर्दीच्या मुंबईत आपलं काय होणार आहे आणि कसे दिवस जाणार हे कोड्यात टाकणारं होतंच.
मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा अभिषेकने चेंबूरला सोडल्यावर कलीना मिलिटरी कॅम्पला जाईपर्यंतची मनातली कालवाकालव आणि चिंता आज आठवली की हायसं वाटतं. कारण त्यावेळी असंख्य असणारी प्रश्नचिन्ह आज नाहीशी झाली आहेत. पण तरीही पुण्यात आल्यानंतर झालेल्या घालमेलीपेक्षा मुंबईत आल्यानंतरचा मनाचा गोंधळ आणि आता परतीच्या प्रवासाला लागेपर्यंत मिळालेलं समाधान नक्की जास्त आहे. ऑफिसच्या कामाची चिंता मी कधीच केली नाही. काय होईल अन कसं होईल याची भीती वाटत नव्हती असं काहीच नव्हतं. नोकरीला लागल्यानंतर सुरवातीला भिती ही असतेच आणि मला होती. पण चिंता नव्हती. कारण सोबतीला असणारी माणसं निभावून नेणार हे नक्की होतं.
विकास कोरगावकर हे व्यक्तिमत्व इतरांच्या ऐकण्यातून कसं आहे यापेक्षा त्यांच्या सोबत काम करताना कसं आहे यात फरक नक्कीच जाणवला. त्यामुळेच कामादरम्यान त्यांचा ओरडाही खाल्लाच आणि हसण्याचाही आनंद घेतला. कपिल नगराळे यांच्या हिंदी ने कामाचा ताण हलका होण्यास नक्की मदत झाली. प्रसाद म्हापुसकर च्या शांततेतही कामं व्यवस्थित पार पडली. अजून पूर्णपणे झाली नसली तरी मुंबईचा या क्षणाला निरोप घेण्याइतकी पुरेशी नक्की झाली.
ऑफीसच्या कामच्या ताणतणावात खाण्यापिण्याकडं अन झोपेकडं मध्यंतरी दूर्लक्ष झालं आणि त्याचे दुष्परिणाम पण भोगून झाले. आयुष्यात पहिल्यांदा सलाईनवरचं जगणं काय असतं हेही अनुभवलं. भात खाऊनही माणूस राहू शकतो हेही कळलं. पंधरा वीस दिवसांच्या आजारपणाने ऑफिसाचं काम तर राहून गेलं ते वेगळेच. पण दोन गोष्टी वाईट झाल्या. एक तर रोज भात आणि तांदळाचे पदार्थ खाऊन आता नकोसे झालेत. आणि दुसरं म्हणजे तांबड्या रश्श्याची काही दिवसांकरता बंदी. त्यातली त्यात मटन, चिकन, अंडी अन मासे काही दिवस बंद म्हणजे ही माझ्यासाठी शिक्षाच ठरली. एक बरं झालं की या दिवसांत वजनाचा काटा खाली आला.
आजारपणाच्या निमित्ताने आता वजनाचा काटा असाच खाली आणावा असं वाटलं तरी निदान. नाहीतर आजवर अनेकांनी माझ्या पुढे डोकी फोडली. पण परिणाम शुन्य. घरचे, पैपाहूणे, मित्रमंडळी होतेच. पण अनेकदा मैत्रिणींनीही टोमणे दिले, आजकाल तू ओळखूच येत नाही. पण फरक शुन्य. गाजरं देण्याचा प्रकार मुळातच माझ्याकडे नव्हता. एस ए पी मुळे क्लायंटला अनेकदा काम पूर्ण करण्याचं आश्वासन द्यावं लागलं तरी वास्तविक आयुष्यात ती सवय अजून तरी चार हात लांबच आहे.
मुंबईतल्या या चार महिन्यांच्या प्रवासात मात्र कामच्या घाईगडबडीत म्हणून असो की रोजच्या कंटाळून गेलेल्या दिवसांनी असो छंदांना कात्री लागली हे नक्की. वाचन तर पुर्ण ठप्पच झाले. म्हणजे मागे मी कोणतं पुस्तक वाचत होतो आणि कोणतं वाचून झाले हेही आठवत नाही. रोजच्या प्रसंगानुसार अधूनमधून लिहीणं चालं राहिल्याने अजून अक्षरं विसरली नाहीत. पण वाचनाकडं दूर्लक्ष झाले हे नक्की. म्हणजे आजही आठवतंय की नोकरीचा पहिला पगार मिळला तेव्हा पहिलं पुस्तक विकत घेताना ठरवलं होतं की प्रत्येक पगारात एक पुस्तक नवीन घ्यायचं आणि महिन्यात वाचून पूर्ण करायचं. सुरवातीला हे जमलं पण मुंबईला आल्यापासून यात खंड पडत गेला. पगार होत राहिले पण पुस्तकं ना वाचून झाली ना विकत घेऊन झाली. श्रीमानयोगी वाचायला घेतलं होतं एवढंच माहिती आहे. अधूनमधून प्रवासात वाचायला घेतलं की कुठे येऊन थांबलो होतो लक्षात येत नाही. मधेच पाच सहाशे पाने पलटायची अन सुरवात करायची हे अनेकदा घडलं. पण वाचन थांबलं तरी लिखाण चालूच होतं आणि आहे. या चार महिन्यांत राहून गेलेल्या अन मनात साचलेल्या मुंबईच्या काही आठवणी नक्की लिहाव्यात म्हणून आज लिहायला बसलो.
I am not alone, Loneliness always with me. असं कितीही म्हटलं तरी शेवटी आयुष्यातील ती जागा रिती होती हे लपून रहाणारं नव्हतं. जगाशी कितीही खोटं बोलता येतं, खोटं हसतांही येतं अन खोटं रहाताही येतं. पण स्वतःशी काय खोटं बोलणार अन रहाणार. बाहेरच्या जगासाठीचा मी अन मन यात अंतर असेलही. पण माझ्यातला मी आणि मन हे वेगळे नसतातच मुळी. त्यामुळे ती जोडपी पाहून होणारा जळफळाट भानावर आणणारा होता. आणि मग आपण तरी समुद्रकिनारी एकटे बसून काय करणार होतो म्हणत शेवटी मनाची समजूत काढत अनेकदा नजर दुसरीकडे वळवली होती.
दुसरा मराठी टॅक्सी चालक भेटला होता. तो भरपावसात रात्री उशिरा जाताना कोणतीही टॅक्सी मिळत नसताना. एकनाथ गिते. मुळचे अहमदनगर जिल्हा, पाथर्डी तालुक्यातील. मुंबईत पसंतीस वर्षापासून. मुंबईत गेल्यानंतरचा एक बदल म्हणजे भाषा. कुणीही भेटलं तर बहुतेक वेळा हिंदी भाषेतून संवाद सुरू होतो. मग ती माणसं मराठी असतील तरी. आमचंही तसंच झालं. पण नंतर दोघंही अहमदनगर जिल्ह्यातील म्हटल्यावर आपलेपणा आला. त्यानंतर पुर्ण प्रवासात गितेकाकांनी आपली आयुष्याची गोष्टच सांगितली. त्या विचारात टॅक्सी मधे जुनी छत्री विसरली. त्या छत्रीच्या आठवणी तर वेगळ्याच. पण मुंबईत अशी काही वेगळी माणसंही भेटली.
 |
| मुद्दामहून विसरलेली लहानपणीची छत्री... |
अजून एक माणूस भेटला होता. सज्जन मिया. लोकलने प्रवास करत असताना सुमधूर गाणं कानावर पडलं आणि मोहम्मद रफी गात असल्याचा भास झाला. सज्जन मिया अंध. पण त्याच्या आवाजात जादू होती. तासभर प्रवासात त्याने अनेक जुनी गाणी गायली. जेव्हा त्यांची दुखरी नस ऐकली तेव्हा लक्षात आलं की माणसाला योग्य संधी मिळाली नाही तर काय होऊ शकतं.
 |
| सज्जन मियॉं |
मुंबईत कामाच्या ठिकाणी भेटलेली माणसंही वैशिष्ट्यपूर्ण होती. सचिन करंगुटकर. अवलिया व्यक्तिमत्व. त्यांच्यामुळे रोज नविन नविन गोष्टी शिकायला मिळाल्या. उत्तम परब, मंगेश राजवाडे आणि अनंथकृष्नन ही सगळ्या रॅप्टाकाॅसची टीमचं सहकार्य लाभल्याने हा मुंबईचा प्रवास अधिक सुखकर झाला.
सगळ्यात शेवटी महत्वाचे म्हणजे मुंबईत इतके दिवस ज्यांच्यासोबत एकत्र रहात होतो ते फ्लॅटवरील सगळे जेष्ठ आणि कनिष्ठ सहकारी. सुनिल कुदळे, निलेश कोतेलवार, विशाल बोराडे, नवनाथ उभे, अमोल भावड, प्रसाद म्हापुसकर, श्रीकांत थोरात, योगेश चव्हाण, बिपीन गांधी, अभिषेक पिसोळकर आणि कपिल नगराळे. रोजच्या गप्पा आणि त्यातली त्यात मराठवाडा विरोधात पश्चिम महाराष्ट्र हा वादविवाद यात अनेक रात्री मजेत गेल्या. शेवटी कोल्हापूर कर मागेच पडले. अमोलची कितीही बाजू मांडायचा प्रयत्न केला तरी बोराडे साहेबांपुढे काय बोलणार. पवारांना शिव्या घालणारांत अजून दोघांची भर पडली तरी साहेबांचं योगदान नाकारून चालणार नाहीच. शेवटी काय तर रात्र खूप झाली सकाळी लवकर जायचंय म्हणत झोपणे उत्तम.
एकंदरीत मुंबईच्या या प्रवासात आठवणींचा खजिना होताच. काही मांडल्या. अनेक मनात तशाच आहेत.
 |
| गिरगाव चौपाटी |
 |
| वानखेडे मैदान |
 |
| नवीन मंत्रालय |
 |
| मुंबईतील घरचं जेवन - मनोरा उपहारगृह |
 |
| ६० रूपयांचा भूर्दंड करणारी वरळी सी लिंक |
 |
| विधानभवन |
 |
| मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गातील बोगदा |
 |
| गिरगाव चौपाटीवरील एक सूर्यास्त |
 |
| वायफट खर्चाची अंबानीची अॅंटालिया |
 |
| पेनिनसुला टॉवर |
 |
| हाजी अली |
 |
| मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग |
 |
| छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स (व्हिक्टोरिया टर्मिनन्स) |
 |
| वानखेडे स्टेडीअम |
तूर्तास इतकेच. पुन्हा आलाच कधी मुंबईचा योग तर आहेच पुन्हा. नाहीतर मरीन ड्राईव्ह वर बसायला यायचंच आहे. पण ते एकटं नाही.
गणेशदादा शितोळे
(२४ ऑगस्ट २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा