माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

 

काय असते नेमकी यात्रा जत्रा...!!!


                     उन्हाळा सुरू झाला की ग्रामीण भागात जिकडे तिकडे यात्रा, जत्रा प्रकार सुरू होतात. दुष्काळ असो की अजून कोणतही संकट या यात्रा/जत्रा दणक्यात साजर्‍या झाल्या पाहिजेत याचं नियोजन करण्याचं काम गावोगावी असणार्‍या यात्राजत्रा कमिटीचे सदस्य करतात. नुकतीच गावच्या यात्रेची यात्रा कमिटी वर्गणीची पावती देऊन गेली. दीड हजार रुपये फक्त. आता ती द्यायचा नाही द्यायचा हा नंतरचा भाग. पण त्या निमित्ताने या यात्रा जत्रा संस्कृतीवर प्रकाशझोत टाकण्याची संधी मिळाली.
काय असते नेमकी यात्रा जत्रा संस्कृती...?
                    लहानपणी ह्या यात्राजत्रा म्हणजे मौज मजा वाटायची. तेव्हा फारसं कळत नव्हतं. उंचच उंच पाळण्यात बसण्याचा आनंद काही न्याराच होता. आता समजदार होण्याच्या वयात मात्र अगणित प्रश्न पडतात आणि उत्तरही मिळतात. पूर्वी यात्रा जत्रा कशा होत्या माहिती नाही. पण आता ह्या यात्रा जत्रा म्हणजे केवळ पैशाची नासाडी. यात्रा जत्रा आल्या की वर्गण्या वसूल करायच्या. देव, देवळं सजवण्याच्या नावाखाली पैसे खर्च करायचे. गुलाल उधळायचा, छबिन्याच्या मिरवणुकीत ओंगळवाणा नाच करायचा, शोभेची दारू उडवायची. मनोरंजनाच्या नावाखाली भलतेच काहीतरी ओंगळवाणे तमाशे, नवीनच आलेला ऑर्केस्ट्रा असले प्रकार आणून त्यावर पैसे उधळायचे. यातून सगळं सुरळीत पार पडत नाही तोवर जुन्या कुरापती काढून हाणामाऱ्या करायच्या या एकूण प्रकारचं सोज्ज्वळ नाव म्हणजे यात्रा जत्रा. या सगळ्या उठाठेवीकरता या यात्रा कमिटीला वर्गणी द्यायची.
                    कुस्तीचा आखाडा सोडला तर यातून फायदा लांबच राहिला. नुसती उधळपट्टीच. आणि कुस्तीचा आखाडय़ापेक्षा राजकारणाचा आखाडाच अधिक जोरात असल्याने सरासरी दोन अडीच लाख रुपयांची नासाडी करण्याच काम सर्रासपणे चालू असतं... नुकताच शेजारच्या गावात दरवर्षी प्रमाणे यंदाही या यात्राजत्रा प्रकारात जुन्या कुरापतीतून वाद विकोपाला गेले आणि अनेक तरूण न्यायालयीन कोठडीची हवा खात आहेत. आणि यातील बबहुतेक नाव शिकल्या सावरलेल्या उच्च शिक्षित तरूणांची आहेत.

                    या रकमेच्या नासाडीपेक्षा गावोगावी एकत्रित येऊन सुधारणा करण्यासाठी ही रक्कम वापरली गेली तर सर्वांच्या समाधानाची आणि उपयोगाची बाब ठरेल. मागील वर्षी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण आणि संवर्धनाचे काम केलेल्या गावांनी या यात्राजत्रा प्रथापरंपरांना फाटा देत गावाच्या विकासासाठी वर्गणीतील रक्कमा दिल्या तो आदर्श बाकी गावं कधी घेणार...?  
                    शिकल्या सवरलेल्या तरूणांनी राजकारणात प्रवेश घेऊनही असे पैसे उधळण्याचे प्रकार सुरूच रहाणार असतील तर नक्कीच चिंताजनक बाब आहे.





गणेश दादा शितोळे
(२२ एप्रिल २०१७)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा