मला कवी होण्याची घाई नाही.
गेले काही दिवस बरंतसं काही लिहिण्याचं राहून गेलं. म्हणजे हे मला वाटत नाही तर माझ्या अनेक मित्रांची आता ही नेहमीची तक्रार झालीए की, "दादा आजकाल काही लिहीत नाही का... ?, आजवर कोणाचं कॉपी पेस्ट होतं का...? संपलं का कवी लेखक असणं...? " असे प्रश्न विचारल्यावर मलाही कधी कधी असा प्रश्न पडतो की खरंच आपण लिहायचं थांबवलंय का...? याच प्रश्नावर विचार करताना हा लेख लिहायला घेतला.
.
कवी सौमित्र म्हणतो ते आता मला पटतंय...
.मी तर कविता लिहितोच आहे. आता माझा दुसरा कवितासंग्रह येत आहे. बाउल नावाचा. हा आता तो दहा वर्षांनी येतोय हे खरंय. पण आपल्याकडे दरवर्षी एका कवीचा एखादा कवितासंग्रह प्रकाशित झाल्याशिवाय तो कवी आहे असे समजतंच नाहीत. मी एका पुस्तकाने सर्वांना बऱ्यापैकी माहित झालो आहे. कवी होता येत नाही. कवी असतो किंवा नसतो. मला कवी होण्याची घाई नाही.
गेल्या काही काळापासून विविध अंगाच्या कविता, वेगवेगळ्या आशयाचे लेख मी लिहितोय. त्यामुळे मित्रपरिवाराच्या , वाचकांच्या अपेक्षा वाढतात हे काही चुकीचं नाही. पण कविता लिहिण्यावरच प्रश्नचिन्ह उभा रहावं म्हणजे हे जरा अती होतं. कविता म्हणजे काय कोणाचं वाचलं आणि पाहून लिहिणे हा प्रकार नसतो.काहींना तर कविता म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे असं वाटतं की शाळेत निबंध लिहावा. मध्यंतरी मला एक प्राध्यापकांनी विचारले की तुझा छंद कोणता...? मी उत्तर दिले, लिखाण. कविता, लेख लिहिणे. त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती. कविता...? अरे हे तर आम्ही शाळेतच लिहायचो. " एकंदरीत त्याचा म्हणण्याचा आवाका कविता लिहिणे म्हणजे फालतुपणा आहे की जो शाळेत असताना केला जायचा. आणि त्यातून तितकासा पैसा मिळत नाही हा दुसरा उद्देश. कदाचित शाळेत कविता फालतुपणा म्हणून लिहितही असावेत. पण मला कविता ही तितकीशी सोपी वाटत नाही.
.
कविता म्हणजे काय ही मला अजूनही न उमगलेलं रहस्य आहे. मंगश पाडगावकरांच्या कविता वाचल्या की वाटतं कविता म्हणजे अगदी सुलभ आहे. विंदा, इंदिरा संत, अरुणा ढोरे यांच्या कविता म्हणजे कवितेचं वेगळं अलंकारिक रूपडं. नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्या की अनेकांची नाकं मुरडतात. पण त्यातील तळमळ हा कवितेचा आत्मा भासतो. अलिकडच्या काळातील म्हणायचं झालं तर संदिप खरे, किशोर कदम (सौमित्र), गुरू ठाकुर, स्पृहा जोशी यांच्या कविता म्हणजे मनावर विर्विवाद गाजवलेलं वर्चस्व. नागराज मंजुळेचं उन्हाच्या कटाविरूद्ध म्हणजे एकदम सहज अन सोप्या भाषेतील साज. दासू वैद्य, इंद्रजित भालेराव यांच्या कविता म्हणजे अस्सल ग्रामीण शैलीतलं लेखन. अशा विविधअंगी कविंच्या कवितांमधून उमजलेले कवितचं रहस्य, कवितेची व्याख्या आणि आपण मनात ग्रह करून ठेवलेली व्याख्या तपासली की नक्की कवितेची महती समजते अन फालतुपणाची व्याख्याही समजते.
.
दुसरी गोष्ट ही की आयुष्यात पैसा सोडून अनेक गोष्टी आहे. पैसा शारीरिक सुख देईन. पण आयुष्यात जोपासलेले हे छंदच मानसिक सुख, आनंद देणारे ठरतात. आनंदाची व्याख्या नेमकी काय हे जगातील कोणताही माणूस छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण ती व्यक्तीनुरूप बदलते. बाबा आमटे यांना आनंदवनातील कुष्टरोग्यांच्या सेवेत गवसलेला आनंद समजून घ्यायला पैसा, स्वार्थिपणा सोडायला लागतो. महामानव उगाच घडत नाही.
नुकतीच युटुबवर स्पृहा जोशीची "कल्याण वेध" मधील मुलाखत पाहिली. कॉलेजमधे कविता लिहीताना तीला तिच्या शिक्षकेने सांगितेलेली एक गोष्ट नक्कीच मनाला पटणारी आहे. "स्पृहा, आता लिहणं थांबव, वाचायला सुरवात कर. वाचन वाढवं. त्यातून तुझ्या अधिक अधिक सुंदर लिखाणाला वाव मिळेल. " त्याची फलनिश्पती आपण आज पहातोच. लोपमुद्रा नंतरही स्पृहाच्या दर्जेदार कविता प्रकाशित होतंच आहेत .'किती सांगायचंय मला' सारख्या काही कविता चित्रपटात गाणी म्हणूनही गायली गेल्या.
.
सध्या हीच वाचन वाढवण्याची गोष्ट मनावर घेतली. आहे. कामाच्या व्यापात तितकासा वेळ मिळत नसला तरी जो काही वेळ मिळतो त्यातून पुस्तकं वाचतोच. काही ब्लॉगवरच्या कविता पोस्ट नक्कीच विचार करायला लावणाऱ्या असतात. ट्विटरवासीयांच्या मराठी चळवळीने देखील यात अजूनच भर पडते आहे. लिखाण पुर्णपणे थांबवलं असंही नाही. परंतु आता संख्येने जास्त नको तर वैशिष्टपूर्ण असं काही लिहिण्यावर भर आहे. तसंही कविता म्हणजे उगाच ओढून ताणून लिहिण्याची गोष्ट नाही. शब्द सुजले की कविता सहजतेने होते. त्याला थोडा वेळ द्यायला लागतो. काहीकाळ मनातील विचार कुठे एका जागी स्थिर करावे लागतात. लहाणपणी शाळेच एक धडा होता. लेखक आठवत नाहीत. पण त्यामधील गृहस्थाला दाढी करायला बसले की काही नवीन आठवायचे आणि कविता तयार व्हायची. पण म्हणून तो कविता लिहायची म्हणून दिवसदिवस दाढी करत बसत नव्हता. मीही गाडीवर एकट्याने प्रवास करत असलो की नकळत ओठांवर काहीना काही गुणगुणत रहातो. मग ओघाने कधी त्या गुणगुणण्याची चारोळी कविता होऊन जाते तेच समजत नाही.
.
काही महिन्यांपूर्वी व्हाटसअप ग्रुपवर आलेला एक छानसा लेख मी फॉरवर्ड केला होता. नेहमी माझ्या पोस्ट कडे दुर्लक्ष म्हणणयापेक्षा हेटाळणी करत न वाचताच सोडून देणाऱ्या मित्रांचे नेमके त्यादिवशी वेळ काढून फोन आले. प्रत्येकजण त्या लेखाचं कौतुक करत होते. भलेही ती मी लिहिलेला नव्हता तरीही. त्या एका लेखाने अनेक मनांना विचार करायला लावला. त्याचवेळी एक मित्राने सोबत अशीही प्रतिक्रिया दिली की, "दादा, लेख नक्कीच छान होता. पण जरा लहानशा पोस्टमधे लिहिता आला असता ना. पुढच्या वेळी पासून तरी प्रयत्न करा. नाही, खुप मोठे मेसेजस वाचणे टाळायला लागतो. " मीही त्यावेळी होकारात होकार मिळवला. पण मला आजवर हा प्रयत्नही जमला नाही. कारण कविता असो किंवा लेख संपुरण लेखनालाच शाळाकॉलेजसारखं अमुक ओळीत लिहा, तमुक शब्दात लिहा असं बंधन घालून घेणे कधी जमलंच नाही. लेखन म्हणजे मला मुक्तछंद वाटतं. मुक्त म्हणजे स्वैर निश्चित नाही. पण बंधनात अडकेल असंही नाही. कविता लिहायची म्हणजे मग उगाचाच काहीही आशय नसलेले शब्द जोडून यमक करण्याचा प्रयत्न करणे हा अट्टहासच चूकीचा आहे. नागराज मंजुळेच्या कविता वाचल्या तर कुठे यमकांची आवश्यकता पडलली दिसत नाही. नामदेव ढसाळांच्या कविता म्हणजे सरळ सोपी. त्यामुळे मुक्तपणे लिहिण्यच्या प्रयत्नातून काही चांगले लिहिले जाईल.
.
काही गोष्टींवर लिखाण सुरू आहे. काही मित्राकडून संग्रहीकरण सुरू आहे.
शासकीय तंत्रनिकेन महाविद्यालय, अहमदनगर मधील दिवसांवर आधारित कॉलेजच्या कट्ट्यावर...
हॅकर्स च्या सोबतच्या आठवणींवर आधारित वेगळ्या वाटेवरचे मित्र...
मा. ना. श्री बबनरावजी पाचपुते ट्रस्टचे परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय, काष्टी मधील दिवसांवर आधारित अंतरंग...
गणेशदादा शितोळे
(१२ फेब्रुवारी २०१७)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा