ती सध्या काय करतेय...!!!
काल रात्री ती सध्या काय करते चित्रपट पाहिला. दोन सव्वादोन तास एक वेगळं आयुष्य जगलो. मस्त वाटलं. खरंतर चित्रपट यासाठीच तर असतात. विरंगुळा देण्यासाठी. आनंद देण्यासाठी. चित्रपट पाहताना एक वेगळं आयुष्यंच जगलो. हा झाला चित्रपटाचा भाग. पण खरंतर मला एक वेगळीच गोष्ट सांगायची आहे. खुप दिवसांपासून सांगेल असं वाटत होतं. पण प्रत्येक वेळी राहूनच गेलं. या चित्कपटाच्या निमित्ताने त्याला हे लिहीलेले पत्र.
"प्रिय मित्रा,"
काल ती सध्या काय करते चित्रपट पाहिला. घरी येताना गाडीवर चित्रपटासंदर्भातील विचारांनी मनात थैमान मांडला होता. आणि याच विचारात या चित्रपटातील ती आठवली. तन्वी. खरंतर चित्रपटाअगोदर हे नाव ऐकण्याचा योग फक्त तुझ्याकडूनच आला होता. त्यामुळे आपसूकच एका सेकंदात पूर्ण चित्रपट डोळ्यासमोर उभा राहिला आणि अंकुश चौधरी च्या ठिकाणी मित्रा तूच दिसला. दोन्ही ठिकाणी साम्य एकच की होते ते म्हणजे तन्वी. आता मी तुझ्या तन्वी ला पाहिले नसल्याने डोळ्यासमोरच्या चित्रपटात फक्त नायक बदलून तू दिसत होता. नायिकेच्या नावातच मी गृहीत धरले होते की तुझी तन्वी सुद्धा अशीच असेल. आणि मग सुरवातीपासून शेवटपर्यंत हेच इमॅजिनेशन पाहिले. फरक इतकाच की यात अंजली कोणीच दिसली नाही. ना कोणी मोहिनी असल्याचे जाणवले. हा एक प्रश्न मात्र कायम तसाच राहिला. ती सध्या काय करते..?
खरंतर हा प्रश्नच मला मुळात बुचकळ्यात टाकणारा होता. कारण पुढच्या क्षणी दुसरा प्रश्न पडला की ती सध्या काय करते..? हे कदाचित माहीत होणारच नाही. पण तो सध्या काय करतोय..? या इथून सुरू झालेल्या तुझ्या विचाराने मला कॉलेजमधे झालेल्या पहिल्या भेटीपासून शेवटच्या दिवशी गाडीवर बसून काढलेल्या फोटोपर्यंतचा प्रवास आठवत गेला. एका ओळखीचा कॉलेजमधील तरूण ते क्लासमेट आणि क्लासमेट ते एक जवळचा मित्र. जवळचा मित्र यासाठी की तू या जवळचा मित्राला तुझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. हा असा प्रवास कॉलेजच्या शेवटच्या टप्प्यात अचानक का बिनसला याचं उत्तर मला अजूनही माहिती झाले नाहीच.
रोज रात्री न चुकता बोलणारे आपण एका टप्प्यावर येऊन अचानक असे थांबलो की संपूर्ण संवादाच संपला की काय असे वाटलं. अनेकदा मला वाटले की हा कॉलेज संपून मोठे झाल्याचा दुष्परिणाम असावा. पण तरीही अनेक वेळा तुला विचारायचं होतं की नेमके असे काय झाले. पण माझा स्वभाव मुळातच हा असा. मुखवटा असल्यासारखा. सामान्यत: मी समोरच्या व्यक्तीला जसा दिसतो तसा फारसा नाहीच. म्हणजे स्पष्ट मनात असेल ते उघडपणे बोलणारा. माझ्या मनात अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे अजून इतर काय खुद्द मीही पोहचलो नाही. असे काही चित्रपट येतात की जे थेट मनातील अशा साठवलेल्या भावनांना वाट करून देतात. आणि इतके दिवस जे बोलायचे राहून गेलं होतं ते ओठावर घेऊन येतात.
Thanks for that amazing movie...!!!
माझ्याशी बोल किंवा नको बोलू. पण हा ही मुव्ही नक्की बघं. एक वेगळं आयुष्य जगशील. वाट पाहतोय दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळण्यासोबतच हा आपला संवाद का थांबला असावा हे जाणून घेण्याची...?
ती सध्या काय करतेय हे जरी सांगितले नाही तरी तो सध्या काय करतोय याची आतुरतेने वाट बघतोय. आणि हो भलेही हा चित्रपट अनुराग आणि तन्वी चा असेल पण माझ्यासाठी लक्षात राहिल तो तुझ्याकरता आणि तुझ्या तन्वी करताच.
Thanks for being my friend.
काळजी घे.
You are one the strongest person who I met in my life....!!!
(प्रतिसादाची वाट बघतोय.)
(फोन केला तर फारसं या विषयावर बोलता येणार नाही. पण तोंडाने न बोलता येणाऱ्या अनेक गोष्टी चॅटिंग मधे नक्की बोलता येतात. व्हाटसअप वर वाट बघतोय. उत्तराची. )
गणेश दादा शितोळे
(२९ जानेवारी २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा