माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७


प्रेम दिवस...


 
                            आज व्हॅलेन्टाईन डे म्हणजे प्रेम दिवस. कुणाला होकार तर कुणाला नकार मिळाला असेल. पण हा दिवस आला की संस्कृती रक्षणाच्या नावाखाली विरोध करणाऱ्या पिलावळी डोकं वर काढतात.  आपली संस्कृती म्हणजे काय याचा अनेकादा प्रश्नच पडतो. संस्कृती, अमुक, तमुक या फंदात मला मुळीच पडायचंच नाही. प्रेम हे प्रेम आहे आणि ते तसंच असावं. संस्कृतीच्या नको त्या बंधनात ते अडकवू नये. रोमिओ ज्युलियट, लैला मजनू हेच फक्त प्रेम आहे असंही काही नाही.
                            पाडगावकर उगाच म्हणत नाहीत की प्रेम हे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. प्रेम हे प्रेमच असते. तुमच्यात माझ्यात तिच्यात त्याच्यात मनाच्या कुठल्याशा कोपर्‍यात असणारं. मैत्री, जिव्हाळा, आनंद, समाधान याहून वेगळं प्रेम काय असतं. एखाद्या व्यक्तीचा सहवास मैत्री, जिव्हाळा, आनंद, समाधान देत असेल तर प्रेमापलिकडे ते काय असते. मुलगा मुलगी अन नवरा बायको पलिकडेही प्रेमाची परिभाषा आहेच की. केवळ मुलाने मुलीच्या प्रेमात पडणे किंवा मुलीला मुलगा आवडणे हेच फक्त प्रेम आहे असंही नाही. आज अनेकांची दर्दभरी स्टेटस वाचायला मिळाली. लग्न झालेल्या मित्रांच्या नशीबवान असल्याचे परावेही मिळाले अन सल्लेही दिले गेले. व्हॅलेंटाईन डे आणि तोही एकट्याने साजरा करणे म्हणजे मोठा गुन्हा असल्यासारखे अनेकांना आज वाटल्याचंही जाणवलं. फिलींग सॅड ड्यु टू सिंगल. अमुक तमुक बरेच स्टेटस होते. ही मंडळी नाराज का तर व्हॅलेन्टाईन डे साजरा करायला कुणी मिळालं नाही. मग प्रश्न पडतो की यांच्या आयुष्यात अशी एकही व्यक्ती नाही की जिचा सहवास मैत्री, जिव्हाळा, आनंद, समाधान देतो.
                            दुसर्‍या बाजूला अशीही माणसं पहायला मिळाली की ज्यांनी आपला व्हॅलेन्टाईन डे आपल्या वेगळ्या गोष्टींसोबत साजरा केला. एक कवीमित्राने आज त्याच्या भावनांना वाट करून देत आपल्या मित्रपरिवाराला त्यांच्या आयुष्यात व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यासाठी व्यक्ती मिळावी याकरता कविता लिहून दिल्या. अधूनमधून माझ्या बाबतीतही हे असेच घडले आहे. आजवर सतरा जणांनी माझ्या कवितांचा, लेखांचा वापर आपली नाती घट्ट करण्याकरता वापरल्या. काहीजण आजही फोन करून अर्थ नात्यांचा विचारत असतात.
माझ्या आयुष्यातही जसा माझा मित्र परिवार आहे तसाच पुस्तक, साहित्य परिवार आहे. शब्दांशी माझी घट्ट मैत्री आहे. त्यांच्या सानिध्यात मला आनंद,सुख, समाधान मिळते. आज व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने ह्या साहित्य परिवाराच्या सानिध्यात येण्याची संधी मिळाली.


गणेश दादा शितोळे
(१४ फेब्रुवारी २०१७)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा