प्रो कबड्डी पर्व ३ रे
महाराष्ट्राच्या हा रांगड्या खेळाने जगात एक वेगळा ठसा निर्माण करण्याबरोबरच क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांच्या ह्रदयात क्रिकेट सोबतच तोडीची जागा निश्चित केली. नुकताच प्रो कबड्डीचा तिसरा सिझन यशस्वीपणे पार पडला. भारताच्या पूर्व भागातील "पटना पायरईट्स" संघाने विजेतेपद मिळविले याचा आनंद आहे. खरंतर महाराष्ट्राच्या पुणे आणि मुंबई या दोन्ही संघांनी सेमी फायनल मधे धडक दिली तेव्हा मनात एकच इच्छा होती की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीतच विजेतेपद राहिल. पण सेमीफायनलला पुण्याच्या संघाने जो एकतर्फी पराभव स्वीकारत पटना पुढे हात टेकले तेव्हाच मनात फायनलच्याबाबत धडकी भरली होती. पण शांत आणि आक्रमक पवित्रा घेऊन खेळ करत अनुप कुमार पुन्हा एकदा यु मुंबाला विजेतेपद मिळवून देईल याची खात्री वाटत होती.
पण पटना ने फायनलमधे आपला आक्रमक आणि नेत्रदीपक कामगिरीचा आलेख कायम ठेवत पुर्वाधात वर्चस्व गाजवले तरीही माझ्या सारख्याच यु मुंबाच्या प्रेक्षक वर्गाला पिछाडीवरूनही अनुप कुमार विजयरथावर नेईल आशा होती. उत्तरार्धात अनुपने शब्बीर बापूच्या साथीने अप्रतिम चढाया करत आणि त्याला मोहित चिल्लर व सुरिंदर नाडाने यशस्वी पकडी करत शेवटच्या काही मिनिटांच्या खेळात बरोबरी केली. शेवटच्या मिनिटाला एक क्षणी यु मुंबाचा विजय निश्चित वाटत होता. पण दिपक नरवालची यशस्वी चढाई यु मुंबाच्या तोंडातला घास खेचून पटना पायरेईट्सला विजेतेपद मिळवून देणारी ठरली.
दोन क्षण यु मुंबा पराभूत झाल्याने वाईट वाटलं पण दुसर्याच वेळी अप्रतिम खेळाचा आनंद झाला. शेवटी हा खेळ होता अन कोणी एक हरल्याशिवाय दुसरा जिंकत नसतो. मैदानावर खेळलेला संघच शेवटी विजय मिळवत असतो. आणि पटनाने सर्वोत्तम कामगिरी करत विजेतेपद मिळविले. अनुमकुमारनेही खिलाडीवृत्तीचं दर्शन देत पराभवही आनंदात स्विकारला. पटनाच्या खेळाडूंनीही विजयाचा उन्माद न करता सामन्यातील बाचाबाची चढाओढ तिथेच सोडून दिली. मनप्रित सिंगने रिशांकला दिलेली शाबासकी याचंच प्रतिक होतं. प्रो कबड्डीचा पहिला सिझनची फायनल आठवली की त्यावेळीस झालेला यु मुंबाचा पराभव लक्षात रहाण्यापेक्षा जयपूरच्या संघाचा विजयी उन्माद, यु मुंबाच्या खेळाडूंवर केलेली टिप्पणी लक्षात रहाते. ती आणि या सिझनची फायनल परस्पर विरोधी वाटते. त्याच जयपूर च्या संघाची या सिझनची कामगिरी हेच सांगत आहे. विजयानंतर जयपूरचे तारे जमिनीवर यायला दोन सिझन लागले. या उलट मुंबईच्या संघाने विजय पराजया दोन्ही मधे आपले पाय जमिनीवर ठेवले. त्याचाच परिपाक म्हणून सलग तीन फायनल खेळता आल्या.
यंदाचा सिझन जरी संपला असला तरी रोज संध्याकाळी आठ वाजता कबड्डी अन यु मुंबाची आठवण होणार हे नक्की. मी क्रिकेट, कुस्ती अन कबड्डीचा खेळ मी फक्त प्रेक्षक म्हणून कधीच पाहिला नाही. तो माझ्या रक्तातच भिनलेला असल्याने त्यात इतकं अडकून जातो की एकदा पराभव सुतकासारखाच वाटतो. पण यंदाच्या सिझनमधला यु मुंबाचा पराभव विजयाइतकाच आनंद देऊन गेला.
आता प्रतिक्षा 25 जूनची.
प्रो कबड्डीच्या नव्या सिझनची.
सोबत जुन्याच अंदाजात नव्याने यु मुंबाचा खेळ पहाण्याची.
त्यावेळेस आनंदाची दोन वेगळी निमित्तंही असतील.
भारत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक पुन्हा एकदा जिंकलेला असेल.
अन हिटमॅन रोहित शर्मा च्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघ आयपीएलचं सलग तिसरं विजेतेपद मिळवेल.
TeamIndia
MumbaiIndians
UMumba
गणेशदादा शितोळे
(५ मार्च २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा