मला आवडलेला चित्रपट मुंबई पुणे मुंबई - भाग २
नुकताच एक चित्रपट पाहिला. खरंतर खूप अगोदर बघायचा होता पण वेळ मिळाला नाही. आजवर नातेसंबंधावर भाष्य करणारा मी पाहिलेल्या चित्रपटांपैकी मला आवडलेला सर्वोत्तम चित्रपट वाटला. नात्यांचा प्रवास ओळख, मैत्री, प्रेम अन शेवटी लग्न हा असा असावा प्रत्येकाला वाटतं अन तो तसाच असावा. पण प्रेम ते लग्न या फेजमधून जाताना अनेकांचा गोंधळ उडतो. काहींचा लग्नापूर्वी तर काहींचा लग्नानंतर. पण या दोन्ही वेगवेगळ्या काळात एक साम्य हेच की दोन्ही वेळेस एक प्रश्न कायम मनात येतो. किंवा आपल्याला विचारला जातो. बहुतेक वेळा मलींकडूनच मुलांना हा टोमणा मारला जातो. "तू आता पूर्वीसारखा राहिला नाहीस खूप बदललास. "
खरंतर माणसाचा स्वभाव कधी बदलत नाही. तो तसाच असतो. फरक इतकाच की परिस्थिती नुरूप त्या स्वभावाचे विविध कंगोरे उलगडू लागले की ते आपल्याला माहीत नसल्याने रूचत नाहीत. कितीही वर्षे सहवास लाभला तरी कोणतीही व्यक्ती आपल्या जोडीदाराला संपूर्णपणे ओळखू शकत नाही. अन ते शक्य पण नाही. आपण कितीही म्हणत असलो मी तूला चांगले ओळखतो तरी आपण त्या व्यक्तीचे काहीच पदर माहिती करून घेत असतो. त्यामुळेच मग हे असे बदलला असल्याचे प्रश्न पडतात. वास्तविक आपण एकमेकांना समजून घ्यायला तितका वेळ देतही नाही अन घेतही नाही. आपल्याला इथे मात्र फार घाई असते. कधी एकदा रिलेशनशिप स्टेटस बदलतेय याची भलतीच ओढ असते. याला मीच काय कोणीही चूकत नाही. या चित्रपटात पहिल्या भागात हेच दाखवलेले आहे.
नाते कोणतेही असो, त्यात कमिटमेंटला खुप महत्व असते. आपण एखाद्या व्यक्तीला कमिट करतो म्हणजे आपण ते पाळायलाही हवे. तरच त्या कमिटमेंटला अर्थ असतो. नाहीतर एखादी गोष्ट ठरवायची अन आपणच त्याला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला तर नात्यातील विश्वासाहर्ता कमी होते. अनेकदा कमिटमेंट करताना आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे माहीत नसल्याने त्याचा विचार पण मनात येत नाही. त्यामुळेच एखाद्या महत्वाच्या कामाने आपल्या कडून कमिटमेंट पाळले जात नाही. त्यावेळी आपण निश्चित करायचं असतं कशाला किती महत्व द्यायचे अन प्रायरोटीज द्यायच्या. कदाचित काहीदा याचा अंदाज येत नाही अन खटकले जाते. अनेक नाती तुटतात ती याच कारणासाठी. आपण प्रायरोटीज जपतानाही समोरच्या व्यक्तीला थोडा वेळ निश्चित द्यायला हवा. एखाद्या वेळी तो देता आला नाही तर ते ठीक आहे. कारण तेव्हा ते टॉलरेट होतं. पण प्रत्येक वेळी होईलच असं नाही. त्यामुळे कमिटमेंट देताना त्या पाळण्यासही प्राधान्य द्यायला हवे. चित्रपटाचा पूर्वाध खरंतर हेच वारंवार सांगत असतो.
नाती जपण्यासाठी कमिटमेंट पाळण्याइतकाच समजूदारपणाही हवा. नात्यांच्या रेशीमगाठीत बांधलेल्या व्यक्तींमधे समजूदारपणा असेल तर या रेशीमगाठी अजून चांगल्या पद्धतीने गुंफल्या जातात. झी मराठीची जुळून येती रेशीमगाठी सिरियलचा एकंदरीत परिपाक हाच होता. आदित्य मेघना घराघरात पोहोचले त्यामागच खरं रहस्य हेच होते की सिरियलच्या माध्यमातून त्यांनी नात्यातील उत्तम ट्युनिंग दाखवलं. त्यामुळेच नात्यात कमिटमेंट पाळण्याइतकाच समजूदारपणाही हवा. समोरच्या व्यक्तीलाही मन नावाचा प्रकार असतो अन त्यालाही त्याची मतं, प्रायरोटीज, अडचणी असू शकतात फक्त एवढं समजून विचार केला अन वागलं की सगळं सहज सुंदर होऊन जातं हेच चित्रपटाच्या दुसर्या भागात दाखवलेलं आहे. शेवटी चित्रपटाचा अपेक्षित शेवट हा गोड असतो आणि होतो. पण या चित्रपटातून नात्यांच्या अंतर्मनातल्या काही गोष्टी उलगडल्या समजल्या याचा जास्त आनंद होतो. नात्यांची नवीन परिभाषा समजून घ्यायला मदत झाली एवढं मात्र नक्की.
गणेशदादा शितोळे
(६ मार्च २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा