माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

नुकताच क्लास जॉईन केला आहे. पाचव्या मजल्यावर असल्याने रोजच जाण्यायेण्यासाठी सर्रासपणे लिफ्टचा वापर करतो. याच लिफ्टमधल्या प्रवासात सुचलेली कविता. 

लिफ्टमधला शब्दांचा प्रवास

लिफ्टमध्ये टाकताच सकाळचं पहिलं पाऊल,
माझ्या शब्दांना उगाचच उसणं अवसान येतं....
ध्यानीमनी नसतानाही मग अलगद,
दोन चार शब्दसरींना बरासावसं वाटतं...

जसा जसा लिफ्टमधला प्रवास सुरू होत जातो,
तसं तसं मनातल्या भावनांना दाटून आल्यासारखं होतं...
बदलत्या मजल दरमजलेसोबत मग,
त्यांचंही बदलत येणं जाणं सुरू होतं...

लिफ्टच्या काचेतून दिसणारं तेचतेच जुनंच बघत,
सकाळच्या एकांतात मनाला काहीतरी नवीन भासतं...
अगदी रोज ऐकून कंटाळवाणं वाटणारं संगीतही मग,
नकळत गुणगुणण्या पलिकडंचं सुमधूर वाटतं...

थांबली लिफ्ट अन घडीचा प्रवास संपला की,
शब्दासरींच येणंजाणं आठवणीतच रहातं...
अन पुन्हा एकदा लांबूनच ऑफिसचा बोर्ड पाहिला की,
मुक्या भावनांचं येणं जाणंही मनाच्या पडद्याआड दडून जातं....


गणेश दादा शितोळे
( २५ मार्च २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा