त्यादिवशी लिहायचे आयुष्याला
निरोपाचे प्रेमपत्र...!!!
एसएपीत
आल्यापासून एक गोष्ट मला कळत गेली की मी ज्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा प्रयत्न
करतो आहे त्या क्षेत्राचं 'इंग्रजी संभाषण' हे अविभाज्य अंग आहे. अन नेमकं मला तेच पचवणं खूप अवघड गेलं. कारण तुम्ही
मराठी माध्यामात शिकला असाल तर तुम्हाला इतर भाषेत संभाषण कशाला लागतं असं मला
वाटायचं. पण या क्षेत्रात असं नाहीये.
इथे तुम्ही
एक्टिव असलं पाहिजे, तुम्ही सतत नवनवीन शिकत असलं पाहिजे,
तुमचं इंग्लिश चांगलंच असलं पाहिजे, तुमची
पर्सनॅलिटी चांगली असली पाहिजे, तुमची वेशभूषा अॅट्रॅक्टीव्ह
असली पाहिजे. आणि यातली कुठलीही गोष्ट माझ्याजवळ नव्हती, आजही
बहुतेक नाहीच. कारण या सगळ्यात तुमच्या बाहेरच्या ब्रॅंडवरून तुमची ओळख ठरते.
अन मी नेमकं ब्रॅंड नसणाऱ्याच गोष्टी वापरण्याचा अट्टहास करतो नव्हे
तर पाळतोही.
कुणाचं लक्ष
वेधून घेण्याकरता नव्हे तर शरीर झाकण्याकरता वेशभूषा असते. त्यावर ब्रॅंडच्या
नावाखाली फुकटाचा पैसा खर्च करण्यात मला कधीच स्वारस्य वाटलं नाही. तुमचं इंग्लिश चांगलंच असलं पाहिजे अस असेलंही पण मला मात्र कायमच मराठी भाषाच
चांगली येणार. कारण ती माझी मायमराठी आहे. अन आईहून सुंदर दुसरं कुणीच असू शकत
नाही. तुमची पर्सनॅलिटी चांगली असण्याइतकंच विचार चांगले
असणे खूप महत्वाचे. कारण तेच खोलवर मुरलेले असतात.
मी
मध्यमवर्गीय, काळा-सावळाच दिसणारा मुलगा, मला कुणी गॉडफादर नाही, अन ते आवश्यक पण नाही. मी
मराठी शाळेत शिकलेलो. त्यामुळे सफाईदार इंग्लिश येत नाही याची अजिबात खंत नाही. या
क्षेत्रात आलो तेव्हा खरंच गोंधळून गेलो की आता काय करायचं ? असंही वाटायला लागलं की हे सगळं आपल्याकडून नाही होणार कदाचित. पण निर्णय
ठाम होता की स्वतःला सिद्ध करायचं. मग त्या दिशेने हळूहळू कामं सुरू झालं अन आज
इथे आहे.
आयुष्याच्या
एका वळणावर अशी काही चांगली माणसं भेटली की त्यानंतर माझ्या आयुष्यात बर्यापैकी
सकारात्मक गोष्टी घडत गेल्या. मला इथे असा मित्रवर्ग मिळाला की जो लहानशा गावातून
येतोय आणि स्ट्रगल करतोय.
दरम्यानच्या
मुंबई प्रवासात मी फार कम्फर्टेबल नव्हतोच. कारण मला ते खूप मेकॅनिकल वाटायला
लागलं. रोजंच्या चीडचीड होण्यात मी काहीतरी गमावत होतो.
म्हणूनच त्यापेक्षा आपले सहकाऱ्यांसह आपल्याला सामावून घेत कामं असतील तर ती काम
करणंही आपल्याला जरा आनंददायक असतं असं पुण्यात आल्यावर जाणवलं.
आता सगळंच
गंमतीशीर वाटतं. आज जेव्हा मी त्या सगळ्याचा विचार करतो तेव्हा असं वाटतं की मी
त्या सगळ्यातून बरंच काही शिकलो. मुंबईत आजारी पडल्यानंतर आशिष सरांच्या त्या
कामाप्रती झोकून देणं ऐकल्यावर मला बर्यापैकी प्रगल्भ बनवलं.
आपण स्ट्रगल
करतोय असं त्या काळात वाटत होतं, पण तो काळ निघून गेल्यावर
असं वाटतं की अरे आपल्याला पॉलिश्ड व्हायचं होतं म्हणून तो मधला काळ होता. असं
झाल्यावर पुढे मिळणारं यश छान ऐन्जॉय करता येतं हेही अनुभवलंच. सगळंच सहज मिळालं
ना तर आपल्याला ते फारसं भावत नाही.
परिस्थिती खूप काही शिकवून जाते माणसाला एसएपीत
मी आलो तेव्हा मलाच स्वतःला सावरायचं होतं, स्वतःचा
आधार व्हायचं होतं. त्यामुळे मी खूप कणखर झालो. मला वेळेची किंमत कळली, पैशांची किंमत कळली. माझ्यात निर्णयक्षमता आली. मागचे दोन-चार महिने मी
कामाचा खूप छानप्रकारे आनंद लुटला हे आता जाणवतंय.
मला जाणवत
होतं की माझ्याकडे दाखवण्यासारखं तसं काहीच नाहीये, चेहरा,
कपडे अन ब्रॅण्ड नाहीये; पण मला माझ्याकडूनच
जोपर्यंत समाधानाची पावती मिळतेय तोपर्यंत हा प्रवास असाच सुरू राहिल. आयुष्याच्या
इतक्या मोठ्या कॅनव्हासवर मी आजवर प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्याचं फळही इतकं
चांगलं मिळालं. अजून एसएपीचा हँगओव्हर उतरला नाहीये.
मला ज्या
प्रकारचं काम करायचं आहे तसे हे क्षेत्र नव्हते. मला माझे छंद पुढे घेऊन जाता
येणारं काम करायचं आहे. अन यात मी कधीच कामामधे कॉम्प्रमाईज केलं नाही. कारण
माझ्यासाठी मी इथे आलोच नव्हतो, मला कामच करायचं होतं पण
माझ्या छंदांना सोबत घेऊन. त्यामुळे यापुढेही माझा विचार हाच राहील की मला छंदांना
सोबत घेऊन जगण्याच्या कॉम्प्रमाईज, अॅड्जस्टमेंट्स करायच्या
नाहीत.
मला एसएपीत
चांगलंच काम करायचं आहे. पण मी वाट बघतोय, माझ्या छंदांना
जपून कसं अन काय करता येईल. सध्या तरी दोघांचा सोबत विचार चालू आहे. पण अजून तसं
फायनल काहीच नाहीये. ज्या दिवशी वाटेल आता बस्सं. आयुष्याला लिहायचे निरोपाचे
प्रेमपत्र. एसएपीतून छंदांसाठी वेळ द्यायला जमतोय का? हा
शेवटचा प्रश्न असेल.
गणेशदादा शितोळे
(२२ जूलै २०१८)