फादर्स डे - बाप नावाच्या बाप माणसाचा दिवस
काल फादर्स डे होऊन गेला. माझ्या मते फादर्स डे म्हणजे बाप नावाच्या बाप माणसाचा दिवस…
खूप दिवसापासून ठरवतोय काहीतरी लिहायचं पण ऑफिसचं शेड्यल आणि नंतर घरी आल्यानंतरची मनस्थिती काही सुचूनच देत नव्हती. आजवर प्रेम, भावना ,निसर्ग, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, मित्र -मैत्रिण या सगळ्याबद्दल लिहिले. पण ज्यांच्या शिवाय माझे खरंतर अस्तित्वच नाही अशा बाबांविषयी लिहिण्याचा योग आज "फादर्स डे" च्या निमित्ताने जुळून आला.
खरंतर माझी ही पोस्ट पाहून अनेक मित्रांच्या भुवया उंचावतील. काहींना माझ्यातील हा बदल कदाचित रूचणारही नाही. संस्कृती / धर्म / जात रक्षणाचा आव आणणाऱ्या काही संस्था संघटनांचा सक्रीय कार्यकर्ता असताना माझेही विचार त्याच पठडीतील होते. परकीय संस्कृती म्हणून फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाईन डे अशा विविध दिवसांना साजरे केल्याने भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होण्याची भिती वाटत असल्याने मग त्याला विरोध करण्यात संघटनेचा सदस्य असल्याने अग्रेसर होतोच. मग त्या ओघानं त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया देणेही आले. त्यावेळी हे अनेकांना न रूचणारे होते. काळ गेला. संस्था, संघटना आणि त्यांची संकुचित विचारसरणी बाजूला सारून जेव्हा आपल्या विचारांचा वास्वववादी विचार केला. तेव्हा या सगळ्यातून बाहेर पडून आपली विचारसरणी तयार करण्याचा निर्णय झाला. आपल्या मनाला पटेल ते आपण स्विकारायचे. मनाने कधी बंधने घालून घेतली नाहीत, त्यामुळे आपण बंधने घालून घेण्याला अर्थच नव्हता. त्यामुळे आता संस्कृती मग ती देशी की परदेशी असा वादविवाद येण्याचा प्रश्न उरत नाही. संस्कृती कोणती आहे यापेक्षा आपल्याला काय पटते आहे हे स्विकारले की सगळी सोपे होते. कोणाला काय वाटते याची चिंता करण्याची आवश्यकताच नाही. लोकांना काय दोन्ही बाजूत वाईटच दिसते. असो.
फादर्स डे. गेल्या काही दिवसापासूनच मी ‘फादर्स डे’चा विचार करत होतो आणि नकळत मनात विचारचक्र सुरू झालं अन शब्द आठवायला लागले. ‘फादर्स डे’. बाप नावाच्या बाप माणसाचा दिवस. खरंतर बाप हा शब्द अलंकारीक वाटण्यापेक्षा अहंकारीक वाटतो. त्या तुलनात वडील अधिक मृदू भासतो. शब्द कोणता का असेना पण या शब्दात सामावलेला माणूस एकच आहे. पण मी यापलिकडे जाऊन "दादा" म्हणतो. माझ्या नावासोबत तो जितका चिकटलेला वाटतो तसाच माझा बाबा म्हणजे दादा पाठिशी कायम उभा आहेत. हा शब्द मनात जरी आला तरी जणू आजवरच्या दादांसोबतची आठवण प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती. पण मनाने विचार केला तर जाणवतं की या बाबांला आठवण्याकरीता खरंच कुठल्या ‘फादर्स डे’ची गरज नाही. पण तरीही या स्पेशल दिवशी हक्काने आठवण येते म्हणून तो ‘फादर्स डे’.
माझ्यासाठी बाबा म्हणजे माझे दादा काय हा प्रश्न मनाला विचारला तर एकच उत्तर येते. कायम गप्प रहाणारा, स्वत:च कुढत रहाणारा अन भावन कधीही व्यक्त न करणारी आईनंतरची एकमेव व्यक्ती म्हणजे दादा. खरंतर आपली अपूर्ण स्वप्न आपल्या मुलांमध्ये बघणारा, त्यांच्या यशात आनंदी होणारा अन खचलेल्या मनाला उभारी देणारा हात म्हणजेच बाबा असतो. दादांना लहानपणी घरच्या परिस्थितीमुळे हुशार असुनही दहावीनंतर शाळेचा निरोप घ्यावा लागला. शिकण्याचेच ते अपूर्ण स्वप्न दादांना आमच्या चार भावंडाकडून पुर्ण करण्याकरता कायम पुढाकर घेतला. आज आम्ही चारही भावंडे उच्च शिक्षित आहोत यामागे हिमालयासारखा उभे राहिले ते म्हणजे आमचे दादा. आई माया लावते तर बाप शिस्त लावतो, असं म्हणतात ते वावगं नाही. आजही मी जो घडलो आहे त्याला आईच्या मायेइतकीच दादांचा आदरयुक्त दराराही होता. लहानपणी मारलेली एक चपराक आयुष्याला वळण देणारी ठरली.
आजवर आयुष्यात दादांना फारसे हसण्याचे क्षण मी काही देऊ शकलो नाही. पण दादांनी कधी तक्रार केली नाही. एक मुलगा म्हणून त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा असणं सहाजिकच होतं. काही अपेक्षा मी पूर्ण केल्या तर काही करत आहोत. पण लहानपणीचा एक प्रसंग मात्र त्यांना अनपेक्षित होता. दहावीला असतानाही त्यांच्या माझ्याकडून फारश्या अपेक्षा नव्हत्या. कारण लहानपणापासूनच हुशार असल्याने पास होण्याची चिंता त्यांना कधीच वाटली नाही. पण माझा दहावीचा निकाल त्यांना अनपेक्षीत धक्का देणारा ठरला होता. वर्गात पहिला येणं त्यांना नवीन नव्हतं. मात्र शाळेत दुसरा येणं त्यांना अनपेक्षित आनंद देऊन गेलं. दहावीनंतरच्या एके दिवशी घरी निरोप आला. दहावीत भूमिती, भूगोल विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवल्याने एका समारंभाकरता मला बोलवण्यात आलं होतं. दहावीनंतर मी डिप्लोमाला गेल्याने शाळेतील कार्यक्रमाला उपस्थित रहाता आलं नव्हतं. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहुन मला मिळालेले पारितोषिक स्विकारतानाचा त्यांचा आनंद पाहायला मी मुकलो. पण मुलाचा अभिमान वाटणारी ती एक गोष्ट त्यांना आनंद देणारी ठरली. तेव्हा फोन करून दादांनी केलेल्या कौतुकाचे शब्द त्या पारितोषिकापेक्षा मोठे होते. शेवटी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात कोण किती मोठा आहे हे सांगण्याचा मापदंड बापच असतो. कारण एखाद्या कर्तबगार माणसाला आपण ‘बापमाणूस’च म्हणतो ना...
शिक्षणापलिकडच्या अनेक आवडीनिवडी त्यांना खटकणाऱ्या होत्या. मित्रांसोबत कट्ट्यावर बसणे त्यांना कधीच आवडले नाही. काहीवेळा मी सांगितलेले त्यांना पटले तर काहीवेळा त्यांच्या कठोर शब्दांचाही सामना करावा लागला. आजही कुठे फिरायला निघाले की पहिल्यांदा त्यांना दहावेळा समजावावेच लागते. आम्हा चार भावंडांच्यासाठी त्यांनी जे काही केले त्याला कशाचेच मोल नाही. पण आमच्या वाढत्या वयाबरोबर आमच्यात आणि त्यांच्यात जनरेशन गॅप निर्माण होत गेला. आम्ही कधी त्यांच्या वयात जाऊन विचार केला नाही. प्रत्येकवेळी त्यांच्या कडून समजून घेण्याची अपेक्षा केली अन ते हळूहळू बदलतही आहेत. माझ्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या शिक्षणातलं त्यांना फारसं काही कळत नसलं तरी त्यातील अनेक बाबींचं प्रॅक्टिकल नॉलेज त्यांनी मला वेळोवेळी दिलं.
आज या क्षणी विचार केला की जाणवतं, दादांनी आमच्यासाठी काय काय केले आहे. मागेल ती वस्तु आणून दिली, कधी कोणत्याही गोष्टीला नाही म्हणाले नाहीत. त्यांच्या कडून उशीर झाला असेल पण नकारही होकारत बदलला. पण त्याबदल्यात त्यांना आज काय मिळाले. त्यांचाच मुलगा अनेकदा त्यांचं ऐकत नाही. 'बाबा मला कधी समजूनच घेत नाही,' अशीच त्याची तक्रार असते. या गोष्टीचा विचार करायला आणि मला माझी चुक लक्षात यायला जरा वेळच गेला. आज जरासं काही समजत आहे दादा का म्हणत होते की," तू बाप झाला की समजेल मी काय म्हणतोय." पण मी त्यांच्यासाठी आता खूप स्वप्ने पाहिली आहेत. आज मी जो काही आहे तो फक्त त्यांच्यामुळेच आणि त्यांच्यासाठीच. दादांनी आयुष्यभर जी काही मेहनत केली आहे ती त्यांना माझ्या नोकरीनंतर करावी लागणार नाही हे मी आधीच ठरवले होते आणि आज मी त्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करत आहे. त्याच्यासाठी काही काळ माझ्या स्वच्छंदी जगण्याला आळा घालायला लागेल बस्स्सं. आयुष्य पुढे खूप पडलंय जग फिरायला. ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्याकरता जगायला काय हरकत आहे. त्यानंतर जगू की आपल्यासाठी, आपल्या स्वप्नांसाठी.
खरं तर लिहायला हात शिवत आहेत. पण तितकासा वेळ मिळत नाही. पाहू जसा वेळ मिळेल तसे लिहूच. पण या फादर्स डेच्या निमित्ताने एक मात्र चांगलं लक्षाल आलं की माझ्या लिहिण्याच्या या सवयीला मात्र त्यांचा विरोध कधीच झाला नाही. उलट मी आणलेली अन वाचलेली अनेक पुस्तकं फावल्या वेळेत ते वाचत असतात. फादर्स डे च्या निमित्ताने बस्सं इतकंच....
गणेशदादा शितोळे
(१८ जून २०१८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा