माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १ जून, २०१८

मला भेटलेला आनंदयात्री - मंगेश बारवकर 



“ तो अन मी
नक्की आमचं नातं काय..?
असे अनेक प्रश्न मनाला कायम पडतात...
पण तो सोबत असला की,
अनुत्तरित प्रश्नांची उत्तरंही उमजत जातात...

“ जेव्हा खऱ्या भेटीच इतक्या अनमोल असतात 
तेव्हा खोट्या भेटवस्तूंची आवश्यकता पडत नाही 
आणि तो म्हणजे मला मिळालेली भेटंच.

एक अनोळखी माणूस चांगला मित्र होणे हे तितकेच सोपे असते जितके एखाद्या माणसाशी चार गोड शब्द बोलता येतात. मला भेटलेला आनंदयात्री. आनंदयात्रीचं. एका वेगळ्या धाटणीचा. वेगळ्या वर्गात मोडणारा. म्हणजे असा की मी ज्या क्षेत्रात काम करतो आणि मला ज्या क्षेत्राची आवड आहे हे खरंतर यात एकदम विरोधाभास. त्यामुळे आजवर माझ्या या दोन्ही क्षेत्रात असणारा तसा तो एकमेव सहकारी.
आजवर मी लिहीतो याची बऱ्याचं अंशी टिंगलंच झाली. मला आजही आठवते मागे आंतरवासियता प्रशिक्षण काळात असताना एका चर्चेदरम्यान मला विचारण्यात आलं होतं की तुम्हाला छंद काय...? त्यावर मी दिलेलं उत्तर त्यावेळीच्या शिक्षकांना फारसं रूचलं नव्हतं. मी म्हटलं होतं लिहीणे. मला वाटतं त्या विषयावर कविता, चारोळी, लेख लिहीणे मला आवडतं. त्यावर ते महाशय मला म्हटलं की काय फालतू छंद आहे या गोष्टी आम्ही शाळेत असताना करत होतो. 
हा केवळ एक प्रसंग नाही. असे अनेकदा झालं. म्हणजे लेखन करणे ही किती दुय्यम गोष्ट आहे आणि त्यातली त्यात मराठीत हे वारंवार घसा कोरडा करून सांगणारे भेटत राहिले. हा त्याचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही हा वेगळा भाग. कारण तसंही मी कायमंच मला काय अन कसं वाटतं यावर जगणं ठरवत असतो. बाकी दुनिया काय नावं ठेवण्याकरताच असते. आणि अशा मंडळींकडे लक्ष न देण्याकरता माझ्या लेखनाला प्रोत्साहन देणारी मंडळीही भेटतेच की. अनेक मित्र आहे जे आजही आठवणीने दाद देत असतात. ह्या आनंदयात्रीचीच गोष्ट झाली तर माझे महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. विनोद तोडकरी. ह्या माणसाने मला कायमंच प्रेरणा दिली आहे. हा लेख लिहीताना देखील सकाळी त्यांचा संदेश आला होता. 
महेश वारे जो माणूस अनेकादा कौतुक करत असतो. मध्यांतरी त्यानेही त्याचे अनुभव लिहायला सुरवात केली हेही माझ्याकरता लक्ष वेधणारी गोष्ट आहेच. आमच्या अजित जगतापला स्पर्धा परीक्षेमुळे जमल नसलं तरी अधून मधून त्याचंही असतंच की. आमचा रोहीत (गोट्या) मला अनेकदा चांगल्य पुस्तकांचीं आठवण करून देत असतो. एकंदरीत मी वाचायला हवे, लिहीले पाहिजे याची आठवण करून देणारी मंडळी भरपूर आहे. आणि याच मंडळीत गेल्या वर्षभरापासून एक नाव सामाविष्ट झाले आहे. मंगेश बारवकर. तो माझ्यापेक्षा २ - ३ वर्षांनी मोठा असेल पण मला माझ्याच वायाचा वाटतो.
मी गंमतीने म्हणालेलो, “ मंगेश नावाची माणसंच मला आनंद देण्याकरता जन्मलेली आहेत... ” ते उगाच नव्हतं हेच वर्षभरापासून अनुभवतोय. खरंतर त्याची अन माझी पहिली भेट कशी झाले हे फारसं आठवत नाही. पण त्याच्या पुसटशा आठवणी आहेत. मी आंतरवासियता प्रशिक्षण काळात असताना तो एकदा कर्वेरोडच्या ऑफिसमधे कामानिमित्ताने आला होता. तेव्हा मित्र असणाऱ्या ऋषिकेश जगताप आणि त्याची ओळख असल्याने आम्ही खाली कर्वे पुतळ्याशेजारच्या चहाच्या टपरीजवळ भेटलो. तेव्हा माझी आणि त्याची पहिली आणि औपचारिक  ओळख झाली होती. काहीजणांशी आपली गट्टी पहिल्या भेटीतच जुळते आणि काहीजणांशी आयुष्याच्या शेवटपर्यंत जुळत नाही असं म्हणतात. पण तो या दोन्हीमधला होता. कारण त्यानंतर चारपाच महिन्यातं मगरपट्ट्यात गेल्यापासून आमची रोज भेट होत राहिली आणि आता एकदम चांगला दोस्त बनला तो माझा. वपू काळेंच्या भाषेत बोलायचं झालं तर मित्र या शब्दापेक्षा मला दोस्त हा शब्दंच जास्त आपुलकीचा वाटतो. अन त्याच्या भाषेत बोलायचं तर आयुष्याचा 'गुलमोहर' या पार्टनर अन दोस्त लोकांमुळेच बहरतो.
भारतात करप्रणाली बदलून माल सेवा कर (जी एस टी) करप्रणाली एक जूलै २०१७ पासून लागू होणार होती. त्यामुळे मगरपट्टाच्या ऑफिसमधे आल्यावर त्याच्यासोबत फारसं काम करता आलं नाही. लगेचंच मुंबईला जावं लागलं. एकतर नव्या कामाची सवय नव्हती. त्यात नवीन कर प्रणाली सगळ्यांच नवीन. अन नवीन शहरात. काय होईल अन कसं होईल यासारख्या असंख्य प्रश्नांनी मी चिंताक्रांत होतो. पण मुंबईत असताना जेव्हा जेव्हा मला मदत लागली, महत्वाचा निर्णय घ्यायचा होता तेव्हा तेव्हा पहिला फोन त्यालाच जात होता. कारण तो होता त्याच्याविषयी वाटणारा विश्वास, आपलेपणा. जी एस टीचं काम संपल्यानंतर युरोपा लॉक्स या प्रोजेक्टवर त्याच्यासोबत काम करण्याची खरी संधी मिळाली. त्याच्या सोबत काम करण्याच्या आठवणी काढताना, त्या लिहीताना, कशा पद्धतीने मांडाव्यात हेच समजत नाही. कारण पुन्हा त्या आठवणींचं पुन्हा त्याच नजरेने विश्लेषण कसं करावं असाच प्रश्न पडतो. पण एवढं नक्की की ज्या क्षेत्रात आवड नाही तर निवड म्हणून स्विकारलं त्या क्षेत्रात काम करताना आनंद घ्यायला शिकलो तो त्याच्यामुळेच.
जी एस टीचं काम संपल्यानंतर मला ऑफिसमधे दुसऱ्या पार्टीशन मधे जागा मिळाली होती. त्यामुळे त्याजागीच दिवसभर काम सुरू होतं. रोजच्या त्याच त्याच कामाने कधी कंटाळा आला तरी पर्याय नव्हता. माझंही काम संपत आलं होतं आणि त्याचाही प्रोजेक्ट संपल्याने युरोपा लॉक्सला काम करण्याची संधी मिळाली आणि आम्ही एकत्र काम केलं.
परिस्थिती बदलणारे आपण कोण ? गृहीत धरायची शक्ति एवढ्यासाठीच वाढवायची,
त्यामुळे 'मन' नावाची एक दुर्मिळ वस्तू सुरक्षित राहते...
तो जसा भेटलाय तसं प्रत्येक वेळी मी त्याला गृहीतच धरलंय...तो आहे ना मग बघून घेऊ...
तो एक दीड महीन्याचा काळ म्हणजे फक्त धावपळ होती. दरम्यान त्याने अनेकदा विचारलेल्या प्रश्नांची मी कित्येकदा उलटसुलट उत्तरंही दिली. आणि त्याच विचारसंक्रमणातून शेवटी दिलेल्या वेळेत युरोपा लॉक्सचा प्रोजक्टही पार पडला. तनावाखाली आपलं मानसिक संतूलन ढासळून न देता काम करायला त्याच्यासोबत काम केलेच पाहिजे असा तो अनुभव होता.
पण या ऑफिसच्या कामाच्या पलिकडे त्याच्यामधील माणूस अधिक आनंदयात्री म्हणून भावतो. माझा लिखाण वाचना सारखांच त्यालाही छंद आहे म्हणून का होईना. पण बऱ्याचअंशी असणारी साधर्म्यता माणसाला एकत्र आणते अगदी काहीसं तसंच आमच्या दोघांच्या बाबतीतही असावं. मी सुरवातीला पदविका अभ्यासक्रमात तरूणाईचा जोश संघटना, राजकीय पक्ष अन विचारधारा जपत निवडक प्रामुख्याने ऐतिहासिक पुस्तकांच वाचन केलं, कारण इतिहासावर वादविवाद करता ते उपयोगी पडत होतं. पण ह्यातूनच वाचन वाढलं आणि मी बाहेर पडलो. सोबतची साथ बदलत गेली अन मग ह्या एस ए पी क्षेत्रात प्रवेश झाला. मी लिहायला सुरवात करून आता आठ नऊ वर्षे होऊन गेली. त्यामुळे दरम्यानच्या काळात अनेक पुस्तकं वाचली. पण माझं वाचन सोबतच्या माणसांसारखं कायम बदलत गेलं. त्यामुळे अनेक चांगल्या पुस्तकांना अजूनही मुकलो आहे. हे लक्षात आलं याचं श्रेयही मंगेशलाच. आम्ही अनेकदा या विषयांवर बोलत असतोच. रोजच्या जगण्यातही वेळ काढून नेमकं काय वाचता येईल याबदद्दल त्याची उत्सुकता असते. मध्यंतरी मेहताला गेला अन तिथेच बैठक मारून पुस्तकाचा फडशा.  
विषय कोणताही असो, आम्हाला त्यावर आमची मतं आहेत आणि ती आम्ही मांडतोचं. अगदी राजकीय असो की सामाजिक. राजकारण तसा आमचा आवडीचा विषय, रोज काय घडेल याचं आम्हाला विशेष कौतुक. तो म्हणजे आत्मविश्वास, तो म्हणजे मनमोकळ्या गप्पा. हा पण माणूस म्हटल्यावर आमच्यातही फरक आहेचकी. तो तसा स्पष्टवक्ता. मला ती वेळ साधता येत नाही. माझं प्राधान्य कायमच लिखाणावर असतं.
अनेकदा असं वाटत रहातं की आपण एकटेच. म्हणजे आपल्याला भाऊ नाही याची खंत वाटत रहाते. पण तेव्हा एकदा मनाच्या गाभाऱ्यात डोकावून पाहिलं की लक्षात येतं की आपल्याला एवढे मित्र आहेत की त्याची जागा कधी कोणी घेईल कळणार नाही. कारण मोठा भाऊ कायम मार्गदर्शक म्हणून आपल्या पाठीशी असतो. मंगेशची जागा अन भूमिका अगदी तशीच राहिली आहे. कामानिमित्ताने बाहेर राहिल्यावर गावकडचे कायम काळजी करत असतात आणि अनेकदा विषय काढून काढून सांगतात की आपले मित्रमैत्रीणी चांगले असले पाहिजेत. संगत चांगली पाहिजे. वगैरे वगैरे, अन त्यांच्या व्याख्येत बसणारं असं व्यक्तिमत्व त्यांनी घरी आल्यावर पाहिलंच.
किती लिहीणार अन काय काय लिहीणार, त्याच्याविषयी बोलायचं, लिहायचं म्हटलं कि नेहमीच माझं मन द्विधा अवस्थेत जातं. कारण बोलायला अन लिहायला कायमचं शब्दांची बंधन येत असतात. तरीही त्याच्या एकूण अष्टपैलुत्वावर लिहीणं शक्य नाहीच. कारण काही माणसं अगदी पुस्तकासारखी असतात. प्रत्येकवेळा वाचाल तेव्हा वेगळीच अनुभूती. पण तरीही काही अशा गोष्टी राहतातंच की त्यावर लिहीलेच पाहिजे. त्याला कोणत्याही गोष्टीमधली अचुकता लागते. अगदी बोलण्यातही. हजरजवाबीपणा म्हणजे प्रतिक्रियावाद नसतो. तर अचूक शब्दाने वेळ साधणे. त्यामुळेच अनेकदा बोलण्यात त्याचा कुणी हात धरणार नाही असं कानावर पडतं.
 तो त्याची स्वप्न आणि त्याची झेप घेण्याकरता असणारे प्रयत्न यावर मी बोलण्यात काय शब्दातही मांडू शकत नाही. मुक्त आकाशी झेप घ्यावी अशी जगभ्रमंतीची इच्छाशक्ती, रोज काही नवीन शिकण्याची धडपड आणि आपली स्वप्न पूर्ण करण्याकरता सावध अन जपून टाकायची पावलं इतकंच. आज त्याचा वाढदिवस. दरवर्षी येणारा प्रत्येक वाढदिवस हा स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने मुक्त आकाशी झेप घ्यायाला लागणारं पुढचं पाऊल असेल. वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा, मंगेश.

बारवकर ही जोडी अन गाडी अशीच पुढे चालत राहू द्या....


“ फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...
काही कमी पडत नाही...
आणि फरक तर अजिबात पडत नाही..


“ लेखनातून तुझ्या लक्षात राहावा 
एवढा छान लेखक नाही मी,
परंतु पुस्तकरूपी भेटीतून 
तुझ्या आठवणीत चिरतरुण राहील 
असा वाचक नक्की आहे मी...




गणेशदादा शितोळे
०१ जून २०१८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा