माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७


शुभेच्छांची सप्तपदी...!!!

आयुष्याच्या नवीन वळणावर टाका पहिलं पाऊल,
एकमेकांवरील विश्वासाचं वचन देऊन...
संकटातही आयुष्य कायम आनंदात जगा,
विश्वासानं हे जोडीचं नवं नातं जोडून...


पहिलं पाऊल स्थिरावत टाका दुसरं पाऊल,
एकमेकांमधल्या संवादाचं वचन देऊन...
गुंफला जाईल मनाचा कोमल धागा,
नवीन नात्यात जुनाच संवाद सुरू करून...


संवादातल्या विश्वासाने टाका तिसरं पाऊल,
एकमेकांचा आदर राखण्याचं वचन देऊन...
देऊन ह्रदयात ती हक्काची जागा,
आपुलकी वाढत नातं होत जाईन घट्ट होऊन...


आपुलकीने एकमेकांच्या टाका चौथं पाऊल,
एकमेकांची सोबत देण्याचं वचन देऊन...
साथीने परस्परांच्या चालत रहा आयुष्याची वाट,
सोबतीने हा प्रवास जाईन सुकर होऊन...


सोबतीने एकमेकांच्या टाका पाचवं पाऊल,
एकमेकांवरच प्रेम कायम ठेवण्याचं वचन देऊन...
प्रेमानं निभावत सभोवतालची प्रत्येक नाती,
ऋणानुबंध परस्परांचे जातील घट्ट होऊन...


प्रेमानं परस्परांच्या टाका सहावं पाऊल,
एकमेकांना समजून घ्यायचं वचन देऊन...
समजून उमजून घेत जा एकमेकांना,
सुंदर होतात नाती आयुष्याची मजा घेऊन...


विश्वासाचा हात हाती घेऊन टाका शेवटचं पाऊल,
एकमेकानां आधार द्यायचं वचन देऊन...
सांभाळून एकमेकांना आयुष्याचा आनंद घेत रहा,
जगायचा धडाही आता जाईन आयुष्यच शिकवून...

गणेशदादा शितोळे
(२९ नोव्हेंबर २०१७)



लग्नाच्या शुभेच्छा...!!!



आपल्या माणसांच्या साक्षीने,
जुळत आहेत नाती नवी...
तुम्ही दोघांनी एकमेकांना,
आयुष्यभर अशीच साथ द्यावी...



साखरपुड्याने सुरवात झालेली नवी नाती,
साखरेसारखाच गोडपणा घेऊन यावी...
हळदीच्या पिवळाई सोबत,
नात्याची अतुटता वाढत जावी...



पडलेल्या अक्षता माथ्यावरी,
नात्याचा रेशमी गोफ गुंफत जावी...
सुरवात झाली या नव्या प्रवासाला,
साथीने परस्परांच्या आयुष्याची वाट चालावी...



बांधून गाठ घेऊन हातामधे हात,
सोबतीने एकमेकांच्या सप्तपदीची पाऊलं टाकावी...
देऊन आयुष्याची वचनं पावलोपावली,
सभोवतालची प्रत्येक नाती तुम्ही प्रेमानं निभाववी...



लग्नाला उपस्थित आहोत या आनंदाच्या क्षणी,
वाटलं तुम्हाला लग्नाची भेट द्यावी..
उधारीचे दोन शब्द लिहिले आहेत,
शब्दफुलांची कविता भेट म्हणून स्विकारावी...



गणेशदादा शितोळे
(२९ नोव्हेंबर २०१७)


शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७


लिहीणार्‍या हातांमधे...!!!


लिहीणार्‍या हातांमधे,
बळ असतं विचारांचं....
समोरच्याच्या मनामधे,
पडणार्‍या ठिणगीचं...

तेवत रहाते मशाल,
जळण असतं शब्दांचं...
विझण्याची नसते चिंता,
मन जडलेले असतं वार्‍याचं...

उसळत असतो डोंब,
ठिणगीनं मन जळत वाचणाराचं...
रागावतं, कावतं अन हसतं,
मनातल्या मनात स्वतःचं...

अन येते अचानक कुठून नेम हुकलेली गोळी,
लक्ष भेदतं लेखकाच्या काळजाचं...
लेखक मरतो पण विचार तसाच रहातो,
मोल कळत नसतं त्याला फोफावणार्‍या शब्दांचं...

गणेशदादा शितोळे
(११ नोव्हेंबर २०१७)



इच्छा...!!!


भोवताली ढीगभर गर्दी असूनही,
आस असते कुणातरी एकाची...
कितीही इच्छा पूर्ण झाल्या तरी,
प्रत्येक वेळी नवीन इच्छा असते मनाची...

साद घालणारे असतात हजारो,
वाट बघत असतो त्या एका हाकेची,
एक इच्छा पूर्ण करण्यासाठी,
तयारी असते आयुष्यभर थांबण्याची...

अनेक जण भेटवेले असतात,
आतुरता असते एका भेटीची...
तगमग अन घालमेल होते नुसती,
मिठीत सामावून घेण्याची...

आठवणी सांगणारे असतात अनेक क्षण,
ओढ असते त्या एकाच क्षणाची...
डोळे मिटून अन डोळे भरून,
त्या एकाच क्षणाला डोळ्यात साठवण्याची...

शेवटी काय तर हेच असते,
इच्छेचीही हीच इच्छा असते....
आयुष्य जगता जगता
सर्व इच्छा पूर्ण करण्याची...


गणेशदादा शितोळे
(११ नोव्हेंबर २०१७)



एका मध्यरात्री...!!!


मध्यरात्री दुचाकीवर बाहेर पडलो की,
भोवताली असतात सुनसान रस्ते...
कुठूनतरी येणारा कुत्र्यांचा भूंकण्याचा आवाज,
तरीही मन मनातल्या बोलत असते...

शहारणारा गारवा हळूच अंगाला चाटून जातो,
बेभान होऊन जाताना कशाचीही चिंता नसते...
मनातल्या विचारांसोबत,
अंतर फक्त मागे पडत असते...

कुठे जायचं अन कुठं थांबायचं,
काहीही माहिती नसते...
अन अचानक एका शेकोटी दिसली की,
पिळलेली मुठ थांबते अन तळवा खाली दाबते...

उडणार्‍या ज्वाला पाहूनही, 
मन मनातल्या मनात बोलतंच असते...
शरीराला उब घ्यावशी वाटते अन,
मन शब्दांची उब घेत बसते...

हळूच एक ठिणगी हाताला चाटून गेली की,
मन कुठे भानावर येते....
स्वतःलाच काय अन कुठे प्रश्न विचारत,
किक देत घराकडे घेऊन जाते...


गणेशदादा शितोळे
(११ नोव्हेंबर २०१७)



नदीकाठी...!!!


नदीकाठी पाण्यात दगड मारताना,
उडणार्‍या तुषारांना पाहून  मन प्रफुल्लित होते...
एक दोन तीन वेळा उडले की,
मन स्वतःच स्वतःशी हसत बसते...

एकटक लावून संथ वाहत्या पाण्याकडं बघताना,
मनात काही काही नसते....
नव्या कोर्‍या वहीसारखं,
मनंही कोरे कोरे असते...

सळसळत पळणारा मासा पाहून,
किंचित स्मित करत असते...
माशासारखंच मनंही,
खोल डोहात पोहत बसते...

हाती घेऊन ओंजळभर पाणी,
वेड्यासारखं निरखून पहात असते...
ओघळणारा थेंब थेंब पाहून,
सुटत चालणारं आयुष्य मोजत बसते...



गणेशदादा शितोळे
(११ नोव्हेंबर २०१७)