वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा पाटील...!
मित्र म्हणजे कोण असतं असं म्हणण्यापेक्षा
मित्र कोण नसतो हे विचारायला पाहिजे. मित्र
म्हणजे आयुष्यातील असं रक्ताचं नसलेलं
नातं की जे आयुष्यातील सगळ्या भूमिका यशस्वीपणे पार पाडतो. आयुष्यात
असे सच्चे मित्र लाभणे म्हणजे परिसासारखी दूर्मिळ गोष्ट नसली तरी परीसाइतकी
मौल्यवान नक्कीच असते.
आयुष्याच्या एका महत्वपूर्ण टप्पातून जाताना
आयुष्याला निर्णायक वळण मिळताना अशाच एका
दूर्मिळ परीसाची भेट झाली अन अभियांत्रिकीच्या पहिल्या दिवसाच्या पूर्वसंधेला
पडलेल्या प्रमुख प्रश्नांपैकी एक असणारा प्रश्न म्हणजे मित्रांच्या लवाजम्यात
वावरणाऱ्या मला या वळणावर पदविका अभ्यासक्रमासारखेच जिवलग मित्र भेटतील का....?
याचं उत्तर मिळालं. श्रीकांत अशोक नागवडे उर्फ
मित्र परिवारात प्रसिद्ध असलेले "पाटील".
मी अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्यांदा
जेव्हा नागवडे हे नाव ऐकलं तेव्हाच वाटलं होतं की याच्याशी आपलं केव्हाच पटणार
नाही. कारण नागवडे म्हणजे श्रीगोंद्याच्या राजकारणातील आमची विरोधी बाकावरची
माणसं. तशी आमची पहिली भेट कशी झाली अन
आमच्यात कशी मैत्री झाली हे आजवर न उलगडलेले कोडेच आहे पण आता ते सोडवण्याचीही
इच्छा नाही. आमच्यात जीवाभावाची मैत्री आहे एवढंच या
कोड्याला उत्तर पूरं झालं.
माझ्या आयुष्यात सर्वात जवळचा असणाऱ्या
मित्राचं नाव श्रीकांत पाटील. पदविका अभ्यासक्रमाच्या अगदी शेवटी महाविद्यालय
सोडताना आमची ताटातूट झाली. एका अपघातात श्रीकांतने या जगाचा निरोप घेतला. पण आजही
तो आठवणीत तसाट आहे. अभियांत्रिकीला जेव्हा या श्रीकांतची भेट झाली आणि काही
दिवसात कळालं की हे पाटील वांगदरीचे नाहीत. त्यावेळी खरंतर मनाला खूप बरं वाटलं.
इतकं की परत त्याच श्रीकांत पाटीलची भेट झाल्यासारखंच वाटलं अन माझ्याशी बंधिस्त
श्रीकांत नावची रेघ कधीच तुटली गेली नाही.
अभियांत्रिकीच्या दरम्यान आमचा जमलेला १०....२०...३०...४० नक्की किती
जणांचा मित्रपरिवार म्हणावा हा प्रश्न असला तरी ज्या काही जणांचा मिळून असणाऱ्या
मित्र परिवारात पाटील हे नाव उठून दिसणारे. घरंदाज. नावासारखे तब्बेतीनेही घरंदाज व्यक्तिमत्व. गुणवैशिष्ट
म्हणजे मैत्रीकरता कोणतीही गोष्ट करण्याची तयारी. मग
कोणाच्या डोक्यात नारळ फोडणे असो की अर्ध्या रात्री मित्राच्या मदतीला धावणे असो
किंवा अनपेक्षितपणे मित्राच्या वाढदिवसादिवशी केक फेकून मारणे असो. विविधतेने
नटलेले व्यक्तिमत्व. ओंजळीत सामावलेला अगणित मित्रपरिवार हीच त्याच्या
गुणवैशिष्टांची ओळख.
पण तब्बेतीने घरंदाज असणारे हे व्यक्तिमत्व आपल्या मनातील भावना
बोलताना जरासं माघारतं याचं गणित काही कळलं नाही. महाविद्यालयीन आयुष्य म्हणजे
मैत्रीसोबत प्रेम हे आलंच. मित्रांइतक्या मैत्रीणी कदाचित आमच्यासारख्या पाटलांनाही
नव्हत्याच. त्याबाबतीत आम्ही सगळे एका पट्टीतले. पण कोणत्या मुलीशी मनातील भावना
बोलण्याची संधी कधीच साधता आली नाही. आणि त्या भावना मनातल्या मनात तशाच कोमजून
गेल्या.
नागवडे पाटलांबातीत अजून एक गोष्ट म्हणजे
गांभिर्य नावाच्या प्रकाराची यांना आयुष्यात कधी लागण व्हायची ती होवो. कोणताही
प्रसंग असो पाटील कधीच धीरगंभीर होत नाहीत. मग समोरची व्यक्ती रागात बोलतेय की
हसून याचं काहीही घेणदेणं नाही. पण आयुष्यात काही गोष्टी गांभिर्याने घ्यायच्या
असतात याचा त्याला विसर पडल्याचंच जाणवतं. आख्या महाविद्यालयीन कारकीर्दीत
त्याच्याबाबतीत गांभिर्य हा विषय कधी निघालाय असं झालंच नाही. कदाचित त्याने
त्याचाच एकदा तरी विचार केला तर त्याला स्वत:लाच उत्तर मिळेल.
अभियांत्रिकीच्यादरम्यानचं अंतरंग हे सगळ्याच
बाबतीने लक्षात राहिले असले तरी पाटलांनी त्याची एक वेगळी आठवण मनात जपायला लावली.
स्नेहसंमेलन आणि वाद यापलिकडे जाऊन स्नेहसंमेलन आणि पाटील ही जोडी माझ्यासोबतच
इतरांच्याही लक्षात राहिली. स्नेहसंमेलनाची महिला प्रतिनिधीची निवड करण्यामागची
भूमिका साध्य करता आली नाही याचं आजही वाईट वाटतं. दुसरं म्हणजे अंतरंग मधे
नाटकाच्या माध्यमातून आम्हाला आमचे रंग दाखवण्याची संधी राहून गेली. केवळ
पाटलांच्या आग्रहाखातर लिहिलेले नाटक आजही तसेच आठवण म्हणून जतन करून ठेवलेले
आहे.
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पाटलांच्यातील
लपलेला कवीही परिचयाला आला. त्याच्या सात कविता आजही तशीच जपून आहेत. मित्र असो की
जगावं स्वत:साठी प्रत्येक कविता मानसात लपलेल्या लेखकाची, कवीची आठवण करून देतात. आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीकांतच्या एक कविता इथे मांडतो आहे.
अशा जिवाभावाच्या मित्राबद्दल मी लिहीत बसलो
तर माझं हे लिहिणं संपणार नाही हे नक्की. त्याच्याविषयी असं बंधनात लिहिणे मला कितपत शक्य होईल याबद्दल
शंकाच आहे. पण आमच्या या मैत्रीबद्दल, मित्राच्या
दुनियादारीबद्दल त्याच्याच वाढदिवसादिवशी एवढ्या सुंदर विषयावर माझं मत मांडण्याची
संधी मिळाली याचं हायसं वाटलं.
आमच्या मैत्रीच्या अंतरंगापैकी एक रंग
आईवडीलांच्या आशिर्वादासह मित्रपरिवाराच्या शुभेच्छांनी आज आयुष्याच्या पुढच्या
वर्षात पाऊल टाकतो आहे याचा आनंद आहे. आम्हाला पाटलांसारखं केक तोंडावर फेकून
सादरीकरण करायला नाही जमलं. त्यामुळे आमचं हे शब्दफेकीचं सादरीकरण शुभेच्छा म्हणून
स्विकारव्यात हीच सदिच्छा.
गणेश दादा शितोळे
(०७ एप्रिल २०१७)