कॉलेजकट्याचे अंतरंग
(भाग १)
कॉलेजची अॅडमिशन प्रोसेस
डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाचा निकाल लागून पंधरा दिवस होऊन
गेले होते. डायरेक्ट सेकंड इअरची अॅडमिशनची प्रोसेस इंटरनेटद्वारे करण्यात आल्याने
सुरवातीला जरासा ताण वाटत होता. कारण ही संपूर्ण प्रक्रियाच गोंधळात टाकणारी होती.
परंतु मागिल वर्षी डिप्लोमाच्या प्रवेशाकरता नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या
इंटरनेटद्वारे अॅडमिशनच्या प्रोसेसचे मित्रांसोबत सुट्टीत अर्ज भरले असल्याने सगळं
हलंकसं वाटत होतं. एकंदरीत गेल्या तीन महिन्यापासून निकाल लागेपर्यंत दिवस फक्त
फिरण्यात गेल्याने फारसं कंटाळवाणं वाटलं नाही.
सुट्टी पुण्यात मित्रांसोबत घालवली होती. पुण्यातील जवळपास
सगळी कॉलेजेस पाहून झाली होती. सिंहगडच्या शाखा असो की मराठवाडा मित्र मंडळ
कर्वेनगर असो, वाघोलीच्या जेसपीएम पासून ताथवडेच्या शाहू कॉलेजपर्यंत अन हडपसरच्या आवटे कॉलेजपासून
अवसारीच्या इंजिनिअरींग कॉलेजपर्यंत सगळी कॉलेजेस पालथी घालून झाली होती. मी मला अॅडमिशन
घ्यायला फिरत नव्हतो. सर्वच मित्रांना अॅडमिशन घ्यायचं होतं म्हणून अशीही सुट्टीच
होती म्हणून पाहू म्हटलं कॉलेज म्हणून पाहिली. तसं मला इच्छा होती पुण्यातील कॉलेजलाच
अॅडमिशन घ्यायचं. पण घराजवळच काष्टीला परिक्रमा इंजिनिअरींग कॉलेज होते. इतके दिवस
बाहेरगावी राहून आता कंटाळा आला होता. थोडे दिवस गावी घरच्यांसह असावे असं वाटत
होते आणि घरचेही इतके दिवस घराजवळ शिकण्याचा आग्रह करत असल्यानेच पसंतीक्रमात परिक्रमा
नंतर फारसे पर्याय भरलेलेच नव्हते. सोबत परिक्रमाला अॅडमिशन घेतल्यावर लॅपटॉप
मिळतो हे वेगळं आकर्षण होतंच.
७ सप्टेंबरला एकदाची कॉलेज प्रवेशाकरता जाहीर झाल्याची बातमी
धडकली अन मी उसासा सोडला. दिवसभर याला त्याला फोन करून कोणाला कोणतं कॉलेज मिळालं
या चौकशा करण्यातच गेला. सागर इंजिनिअरींग करणारच नव्हता. संतोष आणि स्वप्निलचा
नंबर मराठवाडा मित्र मंडळच्या कर्वेनगरच्या कॉलेजला, नंदुचा ट्रिनीटी कॉलेजला,
महेश आणि प्रचेता यांचा वाघोलीच्या कॉलेजला, आरतीचा
कोंढव्याच्या सिंहगडला तर अबोली आणि प्राचीचा सिंहगडच्याच काशिबाई नवले कॉलेजला
नंबर लागला होता. राहुलचा इंदापुरच्या कॉलेजला नंबर लागला होता. माझा
अपेक्षेप्रमाणे परिक्रमा हा एकमेव पसंतीक्रम असल्याने तिथेच लागला होता. मी आणि
राहुल सोडून सगळा मित्रपरिवार पुण्यातील नामांकीत कॉलेजला जाणार होते.
कॉलेजच्या प्रवेशाची धावपळ, धांदल संपली मला वेध
लागले कॉलेज सुरू होण्याचे. दुसऱ्याच दिवशी दादांना सोबत जाऊन अॅडमिशन घ्यायचं
मनाशी नक्की केलं होत. त्या रात्री खरंतर मला झोपंच आली नव्हती. डिप्लोमाच्या पहिल्या
दिवसापासून ५ मे ला अहमदनगर रेल्वे स्टेशनला सागर, राहुल,
संतोष, नंदु, स्वप्निल
आणि महेशचा घेतलेला निरोप सगळं क्षणभरात डोळ्यासमोरून तराळून गेलं. पाणावलेले
डोळ्याने या जीवलग मित्रांचा निरोप रेल्वे प्रवासात सलील कुलकर्णीच्या “हे भलते
अवघड असते” गीतच्या प्रत्येक शब्दासोबत डोळ्यातून वहात होता. मैत्री, आपुलकी, आणि बंधुप्रेम सर्वाची आठवण न विसरणारीच
होती. राहुलच्या हातातून सुटलेला हात मला किंचितसा पाठीवर जाणवलाही. पदविका
अभ्यासक्रमाची तीन वर्षे या मित्रांसह कशी गेली कळालंही नाही. अगदी त्यांच्या पहिल्या
भेटी पासून प्रत्येक प्रसंग मनाच्या तैलचित्रावर उमटत होता. संदीप ठाणगेसोबत
भांडणं झाली तेव्हा राहुलने माझ्यावरचा झेललेला फटका
अन बहिरा झालेला कान नकळत तोंडतून हुंकार सोडून गेला.
डिप्लोमा कॉलेज आणि मित्रपिवार जोडणारा अजून एक दुवा होता तो
म्हणजे क्रिकेट. प्रसन्ना,
अविनाश, नाना, सागर गडकर,
रायकर, राहुल काकडे, गाढवे
ब्रदर्स, परिक्षीत, सचिन, प्रशांत अशी बरीचशी टीम, त्यांच्यासोबत खेळलेल्या मॅचेस,
सुरवातीला बॅट वरून केलेली दादागिरी, “डेव्हिड
शेफर्ड” म्हणून कमावलेली पदवी, खुन्नसवर खेळलेल्या मॅचेस,
साळी सर, चव्हाण सर, इढं,
गुरव सर, शिंदे सर, जाधव
सर यांच्या स्टाफ टीम सोबत खेळलेल्या मॅचेस, साजन ने
प्रत्येक सिक्सला वडपाव म्हणून केलेली
शतकी खेळी सगळं काही आठवून मन भरून आलं होतं. २००९ ची सुरवात आणि २००८ च्या
शेवटच्या दिवशी सागर गडकरसोबत मनोज होलम आणि आम्ही केलेली करामत आठवून खळखळून
हसलो. "महाराज" शब्द तर कानात भिनला होता.
शेवटच्या वर्षी सागरला विद्यार्थी प्रतिनिधी करण्याकरता केलेला
आटापिटा अन अबोलीला विद्यार्थी प्रतिनिधी केल्यानंतर आमचंच राजकारण प्राचार्य
केरकळ सरांनी सागर आणि
आमच्यावर उलटवल्याचा अनुभव संमिश्र
प्रतिक्रिया देणारा होता. "तुमची अक्कल म्हणजे आमचा शहाणपणा " असा संदेश
प्राचार्यांपर्यंत पोहचवण्याकरता काळ्या टी शर्टवर छापलेले " Your
Intelligence is Our Commonsense." ची घोषवाक्य, सिव्हिलला क्रिकेट सामन्यात हरवल्यानंतरची कवायत आणि "एकच दवंडी कोला
गवंडी" म्हणत ठोकलेली आरोळी नकळत अंगात तोच जोश घेऊन आली होती. आरतीने गायलेलं
"कजरा मोहब्बतवाला", नंदुने गायलेलं
"गणदैवताय", आठवलं. मन्या आणि मोहन्याने साडी
घालून केलेला अप्रतिम डान्स पुन्हा एकदा हसवून गेला.
कॉलेजचा प्रवास संपता संपता रात्री जागून केलेला अभ्यास, "ढॅण्डटॅढॅन"
मुळं कंटाळवाण वाटणारं मॅनेजमेंट संतोषने शिकवलेल्या पद्धतीसह पुन्हा आठवले.
संतोषच्या चारोळ्या, कविता, आणि गाणी
विशेषत: “हा चंद्र तुझ्यासाठी” सगळं काही आठवत होतं. शेवटच्या दिवशी हॉस्टेलवर
मनसोक्त केलेला डान्स पण न विसरणारा होता. अन जाता जाता शेवटच्या काही दिवसात
भरलेली एकमेकांची स्लॅमबुक आठवली अन एकेका स्लॅमबुक भरतानाचे किस्से आठवायला
सुरवात झाली. अगदी स्वत:च्या नावासोबत कॉलेजमधे एकतर्फी प्रेम केलेल्या मुलींची
नावं टाकणयापर्यंत बरंच काही होतं त्यात. काहींची लाबंलचक यादी नको म्हणूनही सांगायला
लागलं होतं.
डिप्लोमाच्या या सगळ्या आठवणींसोबत उशी कधी ओली झाली होती
कळंलंही नाही. या सगळ्या संस्मरणीय आठवणींना मनात साठवून मनात अनेक प्रश्न उभा राहिले
होते. मी आणि राहुल सोडून सगळा मित्रपरिवार पुण्यातील नामांकीत कॉलेजला जाणार
होते. राहुलही इंदापुरला म्हणजे तसा माझ्यापासून लांबच. जीवाला जीव देणारे सगळे
मित्र दुरावल्याची खरी जाणीव तेव्हा झाली. अचानक मी एकटा पडल्याच जाणवलं. मनात
प्रश्नांची वादळं उठतंच होती. नवीन कॉलेजला कसे शिकवतील, तिथलं वातावरण कसे
असेल. आपण तिथं रूळून जावू का या असल्या प्रश्नांची चिंता कॉलेज घरापाशी अन तेही
घरचेच असल्याने नव्हतीच.
खरी चिंता वेगळीच होती. मनाला कायम राहून राहून एकच प्रश्न
पडायाचा.
"आयला, आपल्याला असं
मित्रांच्या लवाजम्यात राहयची सवय. आता सगळे मित्र आपापल्या कॉलेजला निघून गेले.
त्या जिवलग मित्रांसारखे मित्र भेटतील....?"
हा एकच प्रश्न सारखा सारखा सतावत होता. माझी घालमेल सुरू होती.
राहून राहून मीच माझ्या मनाला आधार देत होतो.
"अरे किती दूर गेल्यात रे..? एक फोन केला तर तासात राहुल काष्टीत हजर. सागरला फक्त फोन करायचा उशीर.
इथं तर आहेत सगळे तासाभराच्या अंतरावर. पुण्यात एक्सप्रेस मधे बसलं तर दीड तासात
पुण्यात. इथं तर आहेत सगळे. आणि फोन नंबर आहे की, डोकोमोचा
बॅलन्स असाही येतोच की ७०० मिनिटं महिन्याला. "
नकळत माझं लक्ष त्यानिमित्ताने फोन कडं गेलं. खरंतर वाटत होतं
राहुल, सागर, संतोष, नंदु एकेकाला फोन
करावा. पण वेळ पाहिली तर पहाटेचे चार वाजून गेले होते. खुप उशीर झाला असल्याने
सकाळ फोन करू म्हणत मोबाईल दूर सारून दिला. पंख्याच्या फिरत्या पात्यासोबत मनात
विचारांचं वादळ घोंघावतच होतं. डिप्लोमाला अॅडमिशन घेताना अनेक स्वप्न पाहिली
होती. कारण डिप्लोमा कॉलेजला जाण्यापुर्वी कॉलेज जीवन पाहिलं ते चित्रपटातूनच. ‘मोहबत्ते,
जो जीता वही सिकंदर, मै हु ना, कुछ कुछ होता है’ मधून पाहिलेलं कॉलेज जीवन म्हणजे फक्त मजामस्ती. गाडीवर
पाठीमागे बसायला एखादी मुलगी, कट्ट्यावर दादागिरी करायला मित्रमंडळींचा
फौजफाटा अशा अनेक गोष्टी करण्याचा विचार करूनच पदविका अभ्यासक्रमा कॉलेजला अॅडमिशन
केला होता. नंतर कळलं की चित्रपटात जे असतं तसं प्रत्यक्षात नसतं.
तीन वर्षाच्या या प्रवासात ही स्वप्न कुठल्या कुठे निघून गेली.
अन न पाहिलेली अनेक स्वप्न साकार झाली. जीवाला जीव देणारे मित्र मिळाले. त्यांच्या
साथीने जगलेला एक सुंदर आयुष्याचा टप्पा कधीही स्वप्नवत नव्हता. केवळ प्रेम
करणाऱ्याच मुली मिळण्याची स्वप्न ही स्वप्नच रहातात. अनेक मुली भेटल्या. कोणीही
त्या प्रकारातील भेटली नाही अन वाटलीही नाही. काहींशी चांगली मैत्री झाली.
"हॅकर्स" आणि "व्हायरस" च्या साथीने मित्र भेटले, मैत्रीणी
भेटल्या. आरती, प्रचेता, अबोली,
पुजा यांच्यासारख्या मैत्रीणी मिळाल्या.
आयुष्यात सागर, महेश सारखे मोठे भाऊ मिळाले. समजून सांगणारा संतोष
सारखा पाठिराखा मिळाला. राहुल सारखा जीव ओवाळून टाकावासा दोस्त मिळाला. अन हसतमुख
चेहऱ्याने कायम आनंद देणारा नंदुसारखा मित्र भेटला. स्वप्निलसारखा लहान भाऊ
मिळाला. भाई भाई म्हणणारी प्राचीसारखी बहिण लाभली. अनपेक्षित स्वप्नांची पुर्ती
करणारा डिप्लोमाचा हा प्रवास इंजिनिअरींग कॉलेजला अॅडमिशन घेताना अनेक स्वप्न
जन्माला घालणारा ठरला.
खरंतर विद्यार्थी प्रतिनिधी हा काय प्रकार असतो हे मला
जोपर्यंत सागरला विद्यार्थी प्रतिनिधी करण्याकरता कॉलेजमधे सगळ्या मित्रांनी
प्रयत्न केले तोपर्यंत मला माहितही नव्हते. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे सर्व
विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात
स्टेजवर बसणारी व्यक्ती. सागर तर विद्यार्थी प्रतिनिधी झाला नाही. परंतु त्यामुळे
माझ्या मनात इंजिनिअरींग कॉलेजला जाऊन विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची इर्शा जन्माला
आली. इंजिनिअरींग कॉलेजला अॅडमिशन घेऊन काय करायचं तर पहिलं स्वप्न होतं ते म्हणजे
विद्यार्थी प्रतिनिधी होण्याचं. इंजिनिअरींग कॉलेजला अॅडमिशन घेऊन सागर सारखं होण्याचं
स्वप्न होतं. एखादा ग्रुप स्थापन करून मोठा मित्र परिवार बनवून कॉलेजमधे नेतृत्व
करण्याची इच्छा घेऊनच मी परिक्रमाला अॅडमिशन घेण्याचा निर्णय घेतला होता. डिप्लोमाला
कॉलेज गाजवायचे राहून गेले होते. त्याची पुर्तता आता इंजिनिअरींग कॉलेजला करायची
होती. एकप्रकारे ‘दादा’ होण्याचीच स्वप्न घेऊन मी पसंतीक्रमात परिक्रमा एकमेव नाव
टाकले होते. पहाटेच्या चार पासून सकाळी आठ वाजता आईने हाक मारे पर्यंत हाच
स्वप्नरंजनाचा कार्यक्रम सुरू होता.
कॉलेज प्रवेशाकरता जाहीर होण्याची तारीख अगोदरंच माहित होती
आणि विशिष्ठ मुदतीत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने प्रवेशाची पूर्ण
तयारी अगोदरपासूनच करून ठेवली होती. पैशाची व्यवस्था करून ठेवलेली होती. मी या अगोदर
कधीही परिक्रमा पहिलं नव्हतं. जातायेता फक्त गेट पहायचो. पण नवीन कॉलेज असलं तरी डिप्लोमा
इतकी चिंता वाटत नव्हती. एकटेपणा नव्हता. कॉलेजच्या गेटमधून आता आलो. अॅडमिशन प्रोसेस
तळमजल्यावरच असल्याने जिना चढण्याचा त्रास वाचला. मुख्य इमारतीत इंजिनिअरींगच्या
कार्यकारी कामकाजाच्या विभागात पोहचलो. सोबत वडील आलेलेच होते. कॉलेजला गर्दीही
कमी होती. कॉलेज प्रवेशाकरता जाहीर झाल्यानंतर पाच दिवसाची मुदत असल्याने गर्दी
नावाचा प्रकार नव्हतांच. शेवटच्या विभागामधे कॉलेज अॅलॉट झाल्याचा कागद दाखवला. सोबत
कागदपत्रे जमा केली. पंधरा वीस मिनिटात पैसे भरून अॅडमिशन प्रोसेस पूर्ण झाली.
मी पावत्यांची जमवाजमव करत लॅपटॉपची चौकशी करत तिथेच थांबलो
होतो. तितक्यात अॅडमिशन प्रोसेस पूर्ण एक मुलगा वडीलांसह आला होता. काही वेळ मी
त्याला न्याहाळत होतो. तो अॅडमिशन प्रोसेस पूर्ण करण्याकरता शेवटच्या विभागामधे
गेला. मी नोटीसबोर्डजवळ यंत्र इंजिनिअरींगला असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी वाचत
होतो. काही नावं ओळखीची होती. वैभव कोकटे, रोहित जाधव ही त्यापैकीच दोन.
दोघेही माझ्या शाळेतील मित्र. रोहित आणि मी एका बाकावर बसायचो.
वैभव माझा शाळेतील स्पर्धक असायचा. पहिल्या तीन क्रमांकवर आम्ही तिघे असायचो.
त्यामुळे दोघांची नावं वाचल्यावर हायसं वाटलं. याव्यतिरिक्त बाकी यादीतही अनेक
नावं ओळखीची होती. अभिजीत पाचपुते, सोनल गवते, अतुल पवार ही
शाळेतील मित्रमंडळी कॉलेजमधे होती. त्यामुळे मित्रांचा ताण तर निघून गेला. सोबतंच
माझ्यासोबत डिप्लोमाच्या काही मित्रांनाही परिक्रमा कॉलेज मिळाले होते.
प्रशांत पाचपुते, हरिभाऊ पांडुळे, उमेश निंबाळकर
ही हॉस्टेलवरची मंडळी बऱ्यीपैकी ओळखीची होती. ते वगळता बाकी ओळखीचा असा किरण मोरे
उर्फ पांगे होता. विकास कासर, संदीप सोलट, भूषण ही मला सिनिअर असणारी मंडळीही होती. अजून एक मेकॅनिकल इंजिनिअरींगचाच
मुलगा परिक्रमाला अॅडमिशन घेणार होता. अमोल भालसिंग. डिप्लोमाला अ तुकडीत होता. हॉस्टेलवरच्या
विक्रमचा मित्र म्हणून त्याच्याशी ओळख होती. पण डिप्लोमाला एका प्रसंगावरून
त्याच्याशी बिनसलं ते कायचंच. तसा त्याच्याशी फारसा संबंध आला नाहीच.
माझ्यानंतर आलेला मुलगा पैसे भरून अॅडमिशन प्रोसेस पूर्ण करून
बाहेर आला होता. तोही नोटीसबोर्डवरची मेकॅनिकल इंजिनिअरींगची यादी वाचत होता.
थोड्या वेळ पाहून न पाहिल्यासारखं करून शेवटी मी बोलायला सुरवात केली.
"झाले का अॅडमिशन....?"
"झाले की,"
"कोणतं डिपार्टमेंट...?"
"मेकॅनिकल इंजिनिअरींग...!”
मी मान हलवून फक्त होकार दिला.
"तुझं...?"
"मेकॅनिकल इंजिनिअरींगच"
"म्हणजे आपण एकाच वर्गात...!”
"हो"
"कोणत्या कॉलेजला केला डिप्लोमा....?"
"गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, अहमदनगर"
मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक म्हणजे जणू लयं मोठं असल्यासारखं
उगीचचा अहमपणा दाखवत उत्तर दिलं.
"मी जेएसपीएम वाघोली"
"बरं चल निघतो. नाव काय म्हटला तुझं...?"
"रोहित ननावरे"
"गणेश शितोळे"
"चल येतो, भेटू
सोमवारी...!”
"कधी पासून सुरू होतंय...?"
"माहित नाही, पण मी
येतोय सोमवार पासून...!”
"ठीक आहे, पहातो मी
पण येईल सोमवार पासून...!”
"बरं चल बाय, भेटू
सोमवारी...!”
मी त्या मुलाचा निरोप घेऊन कॉलेजबाहेर पडलो. गावात कॉलेजकरता
काही खरेदी करायची होती. गावात रस्त्यालाच रोहितच्या घरी चक्कर मारून मी खरेदीला
निघून गेलो.
एकंदरीत अॅडमिशन प्रोसेस पूर्ण झाली होती आणि माझा अधिकृतरित्या परिक्रमात
अॅडमिशन झाला होता. कॉलेजमधे बराचसा जुना मित्रपरिवार असल्याने आता एकटेपणाचं ताण
नव्हता. अॅडमिशन घेतल्याचं सगळ्या मित्रपरिवाराला कळवून मी घरी परतलो.
गणेश दादा शितोळे
(२५ फेब्रुवारी २०१७)
(२५ फेब्रुवारी २०१७)







