माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

✍✍✍ राष्ट्रीय एकता दिवस ✍✍✍


आज राष्ट्रीय एकता दिवस. आजच्या दिवशी अनेकांना आपण सगळे बांधव असल्याचे पार उचंबळून येईल. रोज प्रतिज्ञा म्हणून आम्हाला फरक पडला पडला नाही तर एका दिवसाने काय फरक पडणार आहे. पण याचा मला फरक पडतो. आम्ही बांधवच होतो आहोत आणि रहाणार. आमच्या सर्वांच्या शरीरात रक्त आहे आणि त्याच रक्ताने आम्ही बांधव आहोत. (हे बरंय की अजून रक्ताने तरी रंग बदलला नाही. भगवा, हिरवा निळा पांढरा या गर्दीत न जाता लालपणा टिकवून आहे.) परंतु वर्ण, जात, धर्म, पंथ, प्रांत या सारख्या अनेक गोष्टींनी आम्ही आमच्याच बांधवांना दूर लोटले आणि आमची प्रतिज्ञा केवळ म्हणण्यापुरती उरली. मुखातून जन्मलो म्हणून अमक्या वर्णाचा, अजून अमूक तमूक म्हणून अमक्या वर्णाचा याचा शोध लावणारांना खरंतर नोबेलहून अधिक मोठं बक्षीस मिळायले हवे होते. पण आमच्या सारख्या बुद्धीप्रामाण्यवाद अन वैज्ञानिक दृष्टिकोन मानणार्‍यांना मात्र हे पटूच शकत नाही. प्रत्येक माणूस आईच्या पोटी जन्म घेतो. प्रत्येकाला शरीर असते, अवयव असतात, ज्ञानेंद्रीय असतात. अमुक वर्णात जन्माला आलो, तमक्या धर्मात जातीत जन्माला आल्याने तोंडाऐवजी दुसरीकडून खाण्याची सोय आहे असं काही नाही. वर्ण, जात, धर्म, पंथ, प्रांत या सारख्या अनेक गोष्टी फक्त माणसाला गुलाम करण्याची सोय म्हणून करण्यात आलेल्या उठाठेवी आहेत. रस्त्यावर अपघातात तडफणारी व्यक्ती बघून माझ्यातला माणूस जागा होत नसेल तर माझ्या माणूस असण्याला अर्थ नाही. कारण माणूस होण्याकरता अडसर येतो तो याच गोष्टीचा. वर्ण, जात, धर्म, पंथ, प्रांत. या माणसात भेद करणार्‍या प्रत्येक जळमटांना झुगारून झटकून माणूस व्हा. त्याच दिवशी आम्ही सगळे बांधव असल्याची भावना मनात जन्माला येईल.

माणूस व्हा अन माणूस म्हणून जगा.



गणेशदादा शितोळे
(३१ ऑक्टोबर २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा