✍✍✍ दिवाळे काढणाऱ्या कोणत्याही गोष्टी ✍✍✍
माणुसकीचे दिवाळे काढणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी माझा माणूस म्हणून कोणताही संबंध नाही. ना याचा आनंद ना सुख शांती.
माझा मेळघाट अन्नावाचून उपाशी पोटी झोपतोय अन मी इथे त्या आनंदात फटाके फोडून तृप्त होतोय हे शक्य नाही. त्या माझ्या बांधवांना दोन वेळचं अन्न मिळेल त्यादिवशी खरी दिवाळी. बाकी प्रथा परंपरा केवळ निरर्थक. ज्या दिवशी घराचा उद्धार करणार्या लक्ष्मीला गुलामाप्रमाणे वागवणार्या पुरूष प्रधान संस्कृतीची होळी होईल आणि घराघरात मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यात येईल त्यादिवशी खरे लक्ष्मीपुजन. बळी राजाला पातळात (या गोष्टीवर विश्वास नाही. परंतु असे घडलेच असेल तर) घातले त्याच दिवशी राजा असणारा शेतकरी गुलाम झाला. बळीला पर्यायाने शेतकऱ्यांना आत्महत्येच्या पातळात ढकलणार्या प्रवृत्ती संपून हा शेतकरी ज्या दिवशी राजा होईल अन खरंच बळीच राज्य येईल तोच दिवस खरी बालप्रतिपदा. ज्या दिवशी स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू न समजता मानाने सन्मानाने माझ्या प्रत्येक भगीनीला सुरक्षिततेने जगता येईल तीच खरी भाऊबीज. तोपर्यंत माणुसकीचे दिवाळे काढणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी माझा माणूस म्हणून कोणताही संबंध नाही. ना याचा आनंद ना सुख शांती.
माणुसकीचे दिवाळे काढणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी माणसाचा संबंध नाही. माझ्या बांधवांकडे शरीराला झाकण्याइतपत कपडे नाहीत म्हणून मला सुटाबुटात रहाण्याचा अधिकार नाही म्हणून केवळ पंचा गुंडाळून राहणारे असा गांधीबाबा होणे आपल्याला शक्य नाही. माझ्या बांधवांना दोन वेळचं अन्न मिळत नसताना मला तृप्तीचा ढेकर देण्याचा अधिकार नाही म्हणत एकवेळ जेवण करणारा भीमराव होणे आपल्याला शक्य नाही. परंतु या महामानवांचे विचार घेऊन जगणे सहज शक्य आहे.
एक दिवा माणुसकीकरता...
एक दिवा माणूस होण्याकरता.
स्वतःमधला माणूस तसाच तळपत ठेवा.
गणेशदादा शितोळे
(३१ ऑक्टोबर २०१६)