प्रेम ही संकल्पना
मुळात प्रेम ही संकल्पना चांगली आहे. त्याला वय, जात, धर्म अशा कोणत्याही गोष्टीची खरंतर बंधने नसतात. प्रेम ही विकृती नसते प्रेमाची परिभाषाच समजून न घेता फक्त आपला शारीरिक आनंदाची सोय म्हणून प्रेमाच्या नावाखाली जे काही घडतं त्याला प्रेम म्हणावं का यावरच शंका आहे. हे प्रेम असू शकत नाही. मान्य आहे काही चित्रपटातून प्रेमाच्या परिभाषेची ओळख चूकीची नक्की करून देण्यात आली आहे. प्रेम म्हणजे लैंगिक शोषण ही व्याख्या आपल्या मनात रुजवण्यात काही अंशी असे चित्रपट यशस्वी झाले आहेत. आज प्रेम म्हणजे औत्सुक्याची आणि ओढीची गोष्ट झाली आहे. पण त्यामागची भूमिका आडवयात आपली लैंगिक गरज भागवणे एवढीच भूमिका दिसून येते. कधी एकदा प्रेमात पडतो आहे आणि लैंगिक भूक पूर्ण करतोय ही मानसिकता प्रेमाला बदनाम करण्यास कारणीभूत आहे. समाजातील, पालक आणि पाल्यातील ही मानसिकता बदलायला हवी आहे. प्रेम आजही तसेच पवित्र आहे. जसे पूर्वी होते. फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. आपण दुसर्याकडे सहज एक बोट दाखवतो परंतु त्यावेळी हे लक्षात घेत नाही की ते बोट दाखवणारा हात आपला असून आपल्याकडेही उरलेली बोटं दाखवत असतो. त्यामुळे नक्की दोषी कोण लक्षात घ्यायला हवे. आपल्या दृष्टीने चूकीची वाटणारी गोष्ट चूक आहे असे नसते. आपल्याला वास्तविक भूमिका तपासायला हवी.
फॅन्ड्री चित्रपट अनेकांनी पाहिला परंतू त्यातून जर लहान मुलांवर प्रेम आणि लैंगिक शोषणाचे धडे मिळतात असं कोणी म्हणत असेल तर त्याला चित्रपट किती समजला उमजला यावरच प्रश्न आहे. मुळात फॅन्ड्री चित्रपट म्हणजे आपल्या समाजाला एक सणसणीत चपराक आहे. जब्ब्याने उगारलेला दगड तो समाजाला उगारलेला आहे. आपला समाज आजही किती जातीयवादी आहे आणि किती हीन वागणूक देतो हेच दाखवण्याचा प्रयत्न करत नागराजने उत्तम केला आहे. शालू या उच्च जातीच्या मुलीवर एक दलीत तरूण जब्ब्या एकतर्फी प्रेम करत असतो. तिच्या नजरेत आपली डुक्कर पकडतो ही ओळख येऊ न देण्याचा त्याचा प्रयत्न असतो परंतु जेव्हा पोटाचा प्रश्न येतो तेव्हा त्याला तिच्या समोरच नव्हे तर गावासमोर हे गलिच्छ काम करायला लागते. यातील कोणत्या प्रसंगातून नेमकं प्रेम म्हणजे लैंगिक शोषण ही व्याख्या गेली माहिती नाही. तसंच काहीसं रवी जाधवच्या टाईमपास आणि शाळा चित्रपटा बाबतही म्हणता येईल. दोन्ही चित्रपट वास्तवाची जाणीवच करून देतात.
सैराट चित्रपट देखील आपल्या समाज व्यवस्थेचंच प्रतिनिधीत्व करतो. आजही आपल्या समाजात "ऑनर किलींग प्रकार आहे. प्रेम ही सुंदर भावना आहे. प्रेम कोणत्याही दोन व्यक्तींमधे होऊ शकते. मग मुळात फालतू जातीचा/धर्माचा अभिमान बाळगून ऑनर किलींग का होते उमजत नाही. आई वडिलांनीही जातीयवादातून बाहेर पडून विचार करण्याची गरज आहे. ज्या दोन व्यक्तींना आयुष्य एकत्र घालवायचे आहे त्यांना त्या आयुष्याचे निर्णय घेण्याची मोकळीक द्यायला हवी. प्रेमात आकर्षित करणे वगैरे काही नसते. मुळात आकर्षण प्रेम नाही हे कधी लक्षात घेणार आहोत आपण. आपल्याला एखाद्या व्यक्तीचे विचार आवडले की आपण त्याच्या कडे आकर्षित होतो. पण प्रेम कितीजण विचार करून करतात यावर प्रश्नचिन्ह आहे. आणि प्रेमाला जातीय, धार्मिक रंग न देता सदभावनेने स्वीकारले पाहिजे. आपण शिक्षीत झालो तरी सुशिक्षित कधी होणार..?
जात, धर्म, पंथ, प्रांत या पलिकडे जाऊन विचार करायला हवा. नाहीतर जाती धर्माच्या जळमटांनी सगळेच वाईट भासते...
गणेशदादा शितोळे
(१६ मे २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा