सैराट समजून घेणे आवश्यक...!!!
महाराष्ट्राचे मंत्री म्हणतात सैराटमुळे तरूणपिढी बिघडली. पण खरंतर चित्रपट पाहिल्याने तरूण पिढी बिघडत तर नाही पण सुधारत तर नाहीच नाही. चित्रपट हा मनोरंजनाचे काम करतो सोबत सैराट सारख्या चित्रपटातून सामाजिक प्रश्नांना वाचाही फोडण्यात येते. खरंतर तरूणांना बिघडण्यामागचं खरं कारण राजकीय पक्ष आहेत. स्वतःची दुकानदारी चालवण्याकरता पक्ष काढायचे आणि धर्म/जात/प्रांत या फालतु विषयावर माथी भडकवणाऱ्या विचारांचा मारा करायचा आणि त्यातून धार्मिक द्वेष वाढवायचा एवढेच एकमात्र धंदा राजकीय पक्षांनी मांडला आहे. आणि यात भरडला जातो सामान्य तरूण.
राजकीय पक्षांच्या धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या विचारसरणीतूनच मग दंगे, मारामारीच्या घटना घडल्या जातात आणि या राजकीय पक्षांच्या नेतृत्वाकरता आपली मान तलवारीच्या तोंडाला देण्यास प्रवृत्त केले जाते. उद्या हेच एकमेकांच्या विरोधात गरळ ओकणारे हे पुढारी गळ्यात गळे घालून हिंडतात आणि बिचारे हे तरूण दंगलीचे मारहाणीच्या गुन्ह्याखाली पोलीस स्टेशनच्या फेर्या मारत बसतात. महाराष्ट्रातील बहुसंख्य तरूणाईला या पाक्षिक राजकारणाने वेठीस धरले आहे.
राहिला विषय सैराटचा तर मुळात हा चित्रपट समाजातील जातीयवाद, आंतरजातीय विवाह यावर भाष्य करणारा आहे. परंतु अनेकांच्या बुडाखालचा जातीयवादाचा अंधार समोर यायला लागल्याने सैराटचे यश बघवेना. आणि समाजातील जातीयवाद संपवण्यासाठी खरंच सैराट चित्रपट पाहून आंतरजातीय विवाह करून बिघडायला पाहिजे. आणि जातीयवादाचा बुरखा घातलेल्यांच्या बुडाखालचा अंधार नष्ट व्हायला हवा.
सैराट म्हणजे मुक्तछंद. पण काही लोकांना आपल्या बुद्धीवरच आक्षेप असल्याने सैराट म्हणजे दुसर्या जातीच्या मुला/मुलीसोबत पळून जावून लग्न करणे असे भलतेच अर्थ लावून तरूणाईच्या बिघडण्याची चिंता लागते. पण वास्तविक सैराट चित्रपट पाहून अनेक झोपलेवे पालक मुलांच्या बाबतीत अधिक जागृत झाले आहेत. अगोदर स्वतः सैराट समजून घेणे आवश्यक आहे. मग दुसर्याला सल्ले देण्याची आवश्यकता आहे.
गणेश दादा शितोळे
(२९ मे २०१६)
(२९ मे २०१६)