तुझी नव्हती का कोणी गर्लफ्रेंड...
आजच्या दुपारच्या लंच टाईम नंतर सगळ्या मित्रांचा टाईमपास म्हणून असाच विषय सुरू होता. अन याच विषयावरून गर्लफ्रेंड वर गाडी घसरली. "तुला ही ट्राय करायला हरकत नसावी" असं म्हणत उगाचंच मला चिडवण्याचा एक प्रयत्न सुरू होता अन मी फक्त एक स्मितहास्य देऊन तो विषय वरच्या वरच परतावत होतो. कारण जुन्या जखमांना फुंकर घालून पुन्हा एकदा जाग्या करायच्या नव्हता. मी बर्याचदा असे करत राहिलो अन शेवटी लंच टाईम संपलाच. आता तरी हा विषय संपेल अशी अपेक्षा ठेवून मी कामाला सुरुवात केली पण पुन्हा एकदा एक मित्र तिथेच आला. पुन्हा तोच विषय अन विचार. भावाने एकेक फोटो दाखवत सरळ मुद्द्यालाच हात घातला.
"ही डिग्री फस्ट यीअरला असतानाची, ही अकरावी-बारावीच्या वेळी असणारी, ही बघ अजून एक फस्ट यीअरला दोन दोन गर्लफ्रेंड होत्या. सध्या हिच्या सोबत चालू आहे. पण आपल्याला हिच्याशी लग्न करायला आवडेल. जरा घराचा प्रॉब्लेम आहे. हाय लेव्हल स्टेटस आहे, अमक्याची पुतणी आहे, उगाच मार खायला लागायचा. तुझी नव्हती का कोणी गर्लफ्रेंड...?"
फोटो दाखवत घसरली ना गाडी माझ्यावर.
"गर्लफ्रेंड असं नाही म्हणणार मी, पण हो मैत्रीणी म्हणायच्या तर मला भरपूर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. आमच्या ग्रुपमधे अनेक अफेअर झाली अन तुमच्यासारखीच मोडली सुद्धा. पण माझ्या बाबतीत बोलायचं तर अजून कुणी कुणाला प्रपोज वगैरे करण्याचा प्रश्नच आला नाही. हा कोणी भेटली तरी आम्ही दोघंही निश्चत वेळ निर्णय घेऊ. "
माझ्या या मतावर भाऊ खुश झाला ना. त्याला आश्चर्य वाटले सहा वर्षे एकत्र असल्याचे. नंतर मग हळूहळू तो विषय मागे पडला अन आम्ही कामाकडे वळालो. पण हा विचार डोक्यातून जाणार तो विचार कसला. भुंगा लागल्यासारखा चिकटून बसला. इतका की संध्याकाळी परतीच्या प्रवासात बाईकवर दुसरं काही डोक्यातच नाही. म्हणून हा लेखाचा खटाटोप.
खरंतर जेव्हा मित्र म्हणाला ना की आपली आजवर अमुक इतकी अफेअर झाली अन इतक्या जणींवर प्रेम होतं तिथंच आपल्याला त्याच्या मनात असणारी प्रेमाची व्याख्या खटकली. प्रेम ही काही औषधी गुणधर्म असणारी गोष्ट नव्हे की ज्याला काही एक्सपायरी डेट वगैरे असते. किंवा आत्ता खाल्ली की सहा महिने त्याचा उपयोग मग पुन्हा सहा महिन्यांनी डोस घ्यायचा..?
आपण फक्त म्हणत असतो की मी अमुक एका व्यक्तीच्या प्रेमात आहे. किंबहुना ती व्यक्ती आवडते. आता आवडणार्या सार्याच गोष्टींच्या आपण प्रेमात पडतो असेही होत नाही अन प्रेम करतो असंही होत नाही. मग प्रेम म्हणजे नक्की काय...?
कधी समजावं आपण प्रेमात पडलोय...?
अनेक जण अगदी मोठे लेखकही म्हणतात की मला लव्ह अॅट फस्ट साईट झाले आहे. पण मला वाटतं नाही की असं कधी होत असेल. अगदी पहिल्या नजरेत कोणावर आपले प्रेम जडेल. आकर्षण असणार हे नक्की. पण प्रेम म्हणता तर त्यावर शंका आहे. आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो म्हणजे नेमकं काय होतं तर ती व्यक्ती आपल्याला आवडते. हळूहळू त्या व्यक्तीचे आकर्षण वाढत जाते. आता हे आकर्षण पण वेगवेगळ्या प्रकारचे असते. म्हणजे काहींना शारीरिक आकर्षण असते. लव्ह अॅट फस्ट साईट प्रकार यातलाच. काही व्यक्तींचे विचार आपल्याला आवडले की आपण त्या व्यक्तीकडे खेचलो जातो. काही वेळा आपल्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते अन ती भरून काढण्याचा प्रयत्न करणारी एखादी व्यक्ती आपल्याला भेटते अन आपण तिच्या कडं आकर्षित होत जातो. या तिन्ही आकर्षणाने निर्माण झालेली भावनाच आपण प्रेम समजतो. पण वास्तविक पाहता ते फक्त आकर्षण असते. एका विशिष्ट काळापुरतेच. त्यामुळे अशा आकर्षणातून निर्माण झालेली किंवा आपण समजणारी प्रेम ही भावना ही काही काळापुरतीच मर्यादित रहाते. कालांतराने ती संपून जाते. प्रेम संपत नाही तर आकर्षण संपते. आकर्षण संपले की ओढ अन ओढ संपली की आपोआपच नात्यांच्या र्हसाला सुरुवात झालेली असते. ब्रेकअप नावाचं फॅड याच आकर्षणातून जन्माला आलेले आहे. ब्रेकअप म्हणजे प्रेमाचा शेवट हे आपण दिलेले चूकीचं संबोधन आहे. वास्तविक ब्रेकअप म्हणजे आकर्षणातून निर्माण झालेली ओढ संपून जाणे. प्रेम नव्हे. ज्या नात्यात कधी प्रेमच नव्हते त्याला प्रेम म्हणणेही चूक अन ब्रेकअप म्हणजे अपराध.
आपण प्रेमात पडतो म्हणजे आपण कोणाकडे तरी आकर्षित होतो हे नक्की. पण ही आकर्षण भावनिक अन मानसिक असेल तर आणि तरच प्रेम नावाची भावना जन्म घेते. भावनिक आकर्षण वाढलं की आपण परस्परांच्या भावनांचा विचार करू लागतो अन त्यातून फुलते ते प्रेम. मानसिक आकर्षण वाढत गेले की मनात असणारी आपल्या कोणाची तरी पोकळी भरून निघली जाते अन मनाची सांध प्रेम नावाची भावना मिटून टाकते. इथे ना प्रेमाचा कधी शेवट होतो. ना र्हास. आपण एखाद्याच्या प्रेमात तेव्हाच पडतो जेव्हा आपल्या मनातील असणारा आपलाच मी समोरच्या व्यक्तीच्या मी शी जुळून येत असतो. जुळून येती रेशीमगाठी उगाच म्हणत नाही. तर त्याचा अर्थ हा असा लागतो.
गणेशदादा शितोळे
(३० मार्च २०१६)