माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १६ ऑगस्ट, २०१५



एकटा मी, एकटाच, एकांतात आहे...


अडखळला श्वासही भोवतालच्या गर्दीतही,
गुंतला श्वास माझा तोही शांत आहे...
वाराही गेला वाट बदलत शोधात होतो मी,
आता माझाच श्वासही माझा उरलेला नाही...

गातो मी ते गीत आवडीचे शब्दांच्या साथीला,
आवाजही गोठला गीत एकटाच मी गात आहे...
तोच होता ओळखीचा हरवला कोणत्या गर्तेत,
आता माझाच आवाजही माझा उरलेला नाही...

मिळाले इथे प्रत्येकाला हक्काचे सर्वकाही,
मलाच थोड्या सुखाची भ्रांत का आहे...
चेहराही विसरला आता हसण्यालाही,
आता हसण्यालाही तो माझा उरलेला नाही...

वादळात भरकटलेले आयुष्य माझे,
वाट पहात कोणाची ते चिंताक्रांत थांबलेले आहे...
शीण आला या अशांत जगाचा घ्यावा निरोप जीवाचा,
आता शांतता देणारा तोही माझा उरलेला नाही...

एकटा मी एकटाच एकांतात आहे,
जगतो गर्दीत तरी एकटाच मी आहे...
भोवतालच्या जगात कोणी माझा नाही,
आता एकटेपणाही माझा उरलेला नाही...

वादळी आयुष्यात सरत चालले,
वाटते मज मना जे ते लिहतो आहे...
जाळतो शब्द मला माझाच तो मनाला,
आता उतरलेला शब्दही माझा उरलेला नाही...

थांबला श्वास घेतला निरोप त्याने,
केव्हढा चालला त्याचा आकांत पहात मी आहे...
गेला घेऊन माझ्या मलाच सर्वांगाने तो,
आता माझा मीही माझा उरलेला नाही...



गणेश सुवर्णा तुकाराम
१६ ऑगस्ट २०१५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा