माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०१५

हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...


आठवतोय तो कॉलेजचा पहिला दिवस,
चिखलातून वाट काढत केलेला तो प्रवास...
पहिल्या लेक्चर नंतचा तो मोकळा श्वास,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतेय ती सबमिशनच्यावेळी झालेली ओळख,
अन काही दिवसात जुळलेली घट्ट मैत्री...
आणि तो तयार झालेला जीवलग मित्रांचा ग्रुप,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

कॅन्टीनशेजारचा तो आमचा हक्काचा कट्टा,
लेक्चर बुडवून त्यावर बसून मारलेल्या गप्पा...
अन मस्तीत केलेली एकमेकांची खेचाखेची,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

कोण जायचं फार्मसीच्या मुलींना पहायला,
तर कोणाची लाईन मॅडमवरच होती...
अन कोणी मुलींना फलटणचा टॉन्ट मारायचं
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणं,
कधी सिद्धटेक तर कधी शिर्डी,
कधी मोरगाव तर कधी भुलेश्वरला जाणं...
आठवतात पळवलेल्या गाड्या अन उडवलेली धूळ,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतं कधी तोंडावर केक फेकून मारणं,
तर कधी केक लावता लावता पाण्यात पडणं...
विडंबनाचं गीत म्हणत वाढदिवस साजरे करणं,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

मैदानावरचे क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉलचे खेळ,
मधेच घातलेले वाद अन केलेला तो राडा...
आठवतात ती भांडणं अन कॅन्टीनवर खालेल्ला वडा,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय तो न चूकवलेला,
दरवर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा...
गडकोटांचा दऱ्याखोऱ्यातला प्रवास,
अन दीव दमणच्या ट्रीपची धमाल....
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय गोपाळवाडीची भेळ अन रुचिराचा चहा,
कधी योगराजचा नाश्ता तर कधी कावेरीला पार्टी...
कारण असो वा नसो चहा, नाश्ता, पार्टी मात्र होणारच,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय मित्राची गर्लफ्रेण्ड होण्याआधी ग्रुपच्या वहीनी,
कुणी पांढऱ्या बुटावरून लक्षात ठेवलेली...
कुणी होती नुसती नजरेत साठवलेली,
तर कुणी डिप्लोमालाच पटवलेली...
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय


आठवतेय कॅम्पला केलेली धमाल मस्ती,
गॅदरींगच्या मैदानात जिंकलेली कुस्ती...
जिएस वरून झालेलं वेगळंच राजकारण,
अन मिळवलेलं हक्काचं सेक्रेटरी पद....
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय तो अंतरंगमधला बे जुबान परफॉर्मन्स,
खुद को तेरे चं ड्युएट अन फॅशन शोचा दरारा...
बक्षीसांचा पाऊस अन जमलेला एकत्र ग्रुप,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतेय गोव्याची अविस्मरणीय ट्रिप,
कोलंगुटला घेतलेला समुद्रकिनाऱ्याचा आनंद...
चर्च, किल्ला, क्रुज अन पाहिलेला मावळतीचा सूर्य,
अन आयुष्यात जगलेलो काही भन्नाट दिवस...
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय इपिटॉमचा पहिला वहिला इव्हेन्ट,
रोबोकॉनचा ट्रॅकवर रंगलेला खेळ...
झालेली तारांबळ अन प्रयत्नांचा फसलेला मेळ,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय तो सेण्डॉफचा मंतरलेला दिवस,
भेट देण्यात आलेली आगळीवेगळी गिफ्ट...
सांगितलेले अनुभव अन कॉलेजचा घेतलेला निरोप,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

गणेशदादा शितोळे
(२५ ऑगस्ट २०१५)


रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

कविता सुचतील अशा मुली आहेतच कुठे...?

मित्रांच्या कमेंट वाचताना मुंबई पुणे मुंबई मधला एक खास डायलॉग आठवला...

त्यात मुक्ता बर्वे म्हणते : मला ना हे आजकाल असले  गर्लफ्रेंडसाठी कविता वगैरे करणारे मुले नाही सापडत..

त्यावर स्वप्निल जोशीने दिलेलं उत्तर मला आजही मान्य आहे...
हल्ली  कविता सुचतील अशा मुली आहेतच कुठे...

हे खरंय की आयुष्यात आम्हीही कित्येकांना जीव लावला...
पण ती माणसं क्लोज फ्रेन्ड्स मधून बेस्ट फ्रेंड कडे जाण्याऐवजी फ्रेन्ड्स मधे गेली...
खरंतर मैत्री मधे क्लासिफिकेशन नसतं पण सायन्स चा एक रूल आहे...
त्यानुसार आपल्या नात्यात ऑरबीट असतात...
पातळ्या असतात...
एक, दोन, तीन नाही म्हणणार मी पण अगदी जवळ, जवळ, थोडं दूर, दूर, अगदी दूर काहीशा अशाच...
व्यक्ती मधल्या स्पेशालिटी मुळे तिचा या पातळीवर प्रवास सुरू होतो...
इतर सर्व मित्रांमधे एखादी व्यक्ती जवळची वाटणे हे यातूनच पुढे येतं...
तसंच काहीसं माझ्या आयुष्यात झाले...
आजपर्यंत मित्र मैत्रिणी भरपूर कमावले...
काहींचा प्रवास क्लोज फ्रेन्ड्स पर्यंत झाला पण अजूनही कोणी मनातलं ओळखेल अशी बेस्ट फ्रेंड व्यक्ती भेटली नाही....
आयुष्याचा प्रवास सुरू आहे...
त्या व्यक्तींची भेट होईल अशी अपेक्षा ठेवत आपलं काम छंद सुरू ठेवायचा...

कवितेच्या बाबतीत म्हणायचे तर प्रेमकविता लिहिण्यासाठी प्रेमातच पडावे असंही काही नसतं.
कदाचित प्रेमात पडल्यावर त्या कविता सुंदर होतील असंही असू शकते..
अन कोणी कविता वाचूनही प्रेमात पडू शकते...

बघू मग अशा कवितेची वाट...

 काळजात  खोल  खोल  रूतले  काही...

 ओठी  शब्द  ते  केव्हाच  फुटत  नाही...

 आयष्य  हे  जगायचे  आशेवर  काही....

 भेट  होईल  कुणाची  मन  आशा  ठेवून  राही...

गणेश दादा शितोळे
(१६ ऑगस्ट २०१५)





एकटा मी, एकटाच, एकांतात आहे...


अडखळला श्वासही भोवतालच्या गर्दीतही,
गुंतला श्वास माझा तोही शांत आहे...
वाराही गेला वाट बदलत शोधात होतो मी,
आता माझाच श्वासही माझा उरलेला नाही...

गातो मी ते गीत आवडीचे शब्दांच्या साथीला,
आवाजही गोठला गीत एकटाच मी गात आहे...
तोच होता ओळखीचा हरवला कोणत्या गर्तेत,
आता माझाच आवाजही माझा उरलेला नाही...

मिळाले इथे प्रत्येकाला हक्काचे सर्वकाही,
मलाच थोड्या सुखाची भ्रांत का आहे...
चेहराही विसरला आता हसण्यालाही,
आता हसण्यालाही तो माझा उरलेला नाही...

वादळात भरकटलेले आयुष्य माझे,
वाट पहात कोणाची ते चिंताक्रांत थांबलेले आहे...
शीण आला या अशांत जगाचा घ्यावा निरोप जीवाचा,
आता शांतता देणारा तोही माझा उरलेला नाही...

एकटा मी एकटाच एकांतात आहे,
जगतो गर्दीत तरी एकटाच मी आहे...
भोवतालच्या जगात कोणी माझा नाही,
आता एकटेपणाही माझा उरलेला नाही...

वादळी आयुष्यात सरत चालले,
वाटते मज मना जे ते लिहतो आहे...
जाळतो शब्द मला माझाच तो मनाला,
आता उतरलेला शब्दही माझा उरलेला नाही...

थांबला श्वास घेतला निरोप त्याने,
केव्हढा चालला त्याचा आकांत पहात मी आहे...
गेला घेऊन माझ्या मलाच सर्वांगाने तो,
आता माझा मीही माझा उरलेला नाही...



गणेश सुवर्णा तुकाराम
१६ ऑगस्ट २०१५


शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५


आयुष्याच्या वाटेवर शोध अजून संपला नाही...

होता आयुष्याचा रस्ता खडतर
अन वाट वळणावळणांची तरी
चालताना वाटांवरून मी
कधीच माघारी फिरलो नाही...


गेलो कधी खाच खळग्यांतून
पडलो अनेकदा खड्ड्यात तरी
प्रत्येक पुढचं पाऊल टाकताना
मी कधी डगमगलो नाही...


वाटांवरून चालताना आली
संकटे सामोरी ढीगभर तरी,
संकटांना भूतासारखे मानगुटीवर
मी कधी बसू दिलं नाही...


लढलो जिंकण्यासाठीच
केला संकटांचा सामनाही स्तब्धतेने,
किंचितशा अडचणीलाही
मी कधी कमी लेखलं नाही...


चालत होते पुढे मागे
कित्येक जण ओळखी अनोळखी तरी,
आयुष्याचा हा प्रवास
मी कधी मध्यांतरी थांबवला नाही...


भेट होत राहिली हक्काच्या माणसांची
वळणावळणावरच्या थांब्यावर तरी,
कोणीतरी मला आपलं हक्काचं समजेल म्हणून
मी कधी थांबलो नाही... 


वाट चालतच आहे मी माझी
कोणी भेटेल मलाही आपलं म्हणणारं या प्रवासात,
म्हणून आयुष्य पुढे सरकले तरी
माझा शोध अजून संपला नाही...


चालायचं आहे मला पुढेच
गाठायची आहेत शिखरेही अनेक,
पण म्हणून मला आज
क्षणभर विश्रांतीला थांबायचं असं नाही...


गणेशदादा शितोळे
१४ ऑगस्ट २०१५



बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

आयुष्यात आपली माणसं निवडण्यात,
खरंच माझी चुक झाली...




चांगली की वाईट माहिती नाही,
पण एखाद्यावर चटकन विश्वास ठेवण्याची,
अजब सवय मला जडली...
अन आयुष्याची गाडी घसरत गेली...

वाटलं काही काळ हीच आपली माणसे,
आयुष्य जगायचं फक्त त्यांच्याच साथीने,
अन अचानक विश्वासाचे दोर सुटू लागले,
आपली माणसंच परकं करून जात गेली....

पारख कशी करायची असते आपल्या माणसांची,
उत्तरे मला अजून नाही उलगडली...
काळाच्या पडद्याआड जाताच प्रश्न,
आपली माणसंच उत्तरं देत गेली...

आयुष्याची वाट अशीच चालत राहिली..
प्रत्येक वळणावर जूनीच गणिते समोर आली...
उत्तरं कळत होती पण गणिते नाही सुटली...
मात्र चालता चालता आपली माणसं सुटत गेली...

म्हणून आज,
आज वाटतयं,
आयुष्यात आपली माणसं निवडण्यात,
खरंच माझी चुक झाली...


गणेश दादा शितोळे
(०५ ऑगस्ट २०१५)