आमचं भाषाविषयी पुतना मावशीचं प्रेम
नुकताच भारताच्या परराष्ट्र धोरणावर एक लेख वाचणात आला. त्यातील हा एक परिच्छेद होता...
दहा वर्षांपूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये कार्यरत असताना मला एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या भाग म्हणून इस्रायलच्या दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली होती. आमचा दौरा अमेरिकन ज्युईश कमिटीने आखलेला होता , त्यामुळे ज्यू धर्मगुरूंपासून वरिष्ठ मंत्र्यांपर्यंत विविध स्तरातील महत्त्वाच्या व्यक्तींना भेटता आले. किबुत्झला भेटी देताना इस्रायलच्या शेतीविषयक प्रगतीचे दर्शन घडले. गोलान हाईट्स असो किंवा पॅलेस्टाईनलगतचे रस्ते सर्वत्र युद्धसज्ज सैनिक भेटले, जेरुसलेमच्या 'पवित्र भिंती'जवळ मंत्रपाठ करत उभे असलेले कट्टर श्रद्धाळू पहिले, तर विद्यापीठात ज्ञानसाधनेत डुंबलेले प्राध्यापक- विद्यार्थी दिसले. ठिकठिकाणी दिसणारी त्यांची कार्यनिष्ठा , चिवटवृत्ती , कडवटपणा आणि अभ्यासूवृत्ती त्यांच्या देशाच्या विकासामध्ये प्रतिबिंबित होताना पाहणे हा एक वेगळा अनुभव होता. हैफा विद्यापीठात आम्ही रसायनशास्त्राच्या विभाग प्रमुखांशी बोलत होतो. माझा त्यांना प्रश्न होता क , हिब्रू ही भाषा जवळ-जवळ मृतप्राय झालेली होती, तिचे तुम्ही फक्त पुनरुज्जीवन नाही केले तर तिला आधुनिक शास्त्रांची ज्ञानभाषा सुद्धा केली, हे सगळे कसे शक्य झाले ? यावर प्राध्यापकांनी दिलेले उत्तर फारच मार्मिक होते, ' ते म्हणाले , आम्ही आमच्या मायबोलीवर खूप प्रेम करतो, त्यामुळे आमचे सगळे व्यवहार त्याच भाषेत व्हावे असा आमचा प्रयत्न असतो. माझ्या आधी जेव्हढे प्राध्यापक या विभागात होऊन गेले त्यांनी आपल्या कामासोबत , भाषिक विकासावरदेखील लक्ष केंद्रित केले होते, त्यामुळे आज आम्ही आधुनिक शास्त्रसुद्धा हिब्रूमधूनच शिकू शकतो. "
हे वाचून प्रश्न पडला की परदेशी लोक आपल्या भाषिक विकासाकरता प्रयत्न करताना दिसतात मग आम्ही मराठीच्या बाबतीत इतके उदासीन का...? साहित्यिक अन मराठी भाषाप्रेमी वाचकांपुरतेच ते प्रयत्न का थांबावेत. मी जेव्हा पासून नोकरीला लागलो आहे तेव्हा पासून न चूकता प्रत्येक पगारातून एक पुस्तक विकत घेतो. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचतो. मा ज्या ज्या इलेक्ट्रीक वस्तू वापरतो त्यात प्राधान्याने मराठी वापरतो. मोबाईल असो की लॅपटॉप. सोशल नेटवर्कींग साईट्स मराठीतून वापरतो. काहीही फरक पडत नाही. अनेकदा माझ्या सहकर्यांच्या चेष्टेचा तो विषयही झाला. पण म्हणून मी मराठीचा वापर करणे सोडले नाही. कारण मी मराठी असं फक्त २७ फेब्रवारी अन १ मेला बोंबलून काही होत नाही. त्याकरता प्रयत्नही करावे लागतात.
मध्यांतरी नातेवाईक असणाऱ्या एक व्यक्तीच्या घरी गेलो होतो. त्यांचा चिमुरडा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २री इयत्तेत होता. आमच्या गप्पादरम्याने त्यांनी कौतुकाने सांगितले की मी आमच्या याचा अभ्यास घेण्याकरता इंग्रजी माध्यामाच्या शाळेचे पालकांकरता असणारे कोचिंग क्लास लावलेत. त्यावर मुलाच्या मराठी भाषेवर बोलायला गेलो तर म्हणे आम्हाला त्याला झोपडपट्टी सारखं भांडायला शिकवायचं नाही. एकूण त्यांच्या या बोलण्यातून मला काय समजायचे ते समजून गेलो.
आपल्या सभोवतालच्या अशा अनेक प्रसंगातून हेच लक्षात येतं की आम्ही आजवर कायमंच प्रथम भाषा असणाऱ्या मराठीची गळचेपी करून इतर भाषांचा बाऊ करत डोक्यावर घेतलं आहे. मग ते घराच इंग्रजी भाषेत भिंतीफलक असतील नाहीतर एकूण संवाद. मुळातंच आम्हाला कायमंच भासवण्यात आलंय की मराठी ही वाईट भाषा आहे. त्यातूनंच आम्ही इंग्रजीचं आग्यामोहळ चावल्यासारखे करतो.
आम्हाला आई अन बाई तला फरक कळत नाही कारण मुळात मराठीच नीट कळत नाही तर इंग्रजी दूर राहीली. ते लहान पोर मॉम म्हणतंय का वुमन म्हणतंय याच्यापेक्षा ते इंग्रजी बोलतंय याचंच कौतुक. मग घरात पाहूणे आले की सर्कशीतल्या प्राण्यांसारखं घरातला रिंगमास्टर पाहूण्यांसमोर इंग्रजीचे सोहळे म्हणून घेतो. त्याकरता मग लहानग्यांना मारझोड करताना मी माझ्या नातेवाईकांनाही पाहिलंय. तेव्हा मी चिडून त्यांना अनेकदा म्हणतो. मी माझी मुल सरकारी जिल्हा परिषेदेच्या शाळेत घालणार आहे. निदान ती शाळा त्यांना आईवर प्रेम करायला तरी शिकवेल. ही आई म्हणजे फक्त माणूस न्हवे तर माझी मायबोली मराठीसुद्धा आईच अन धनधान्य देणारी काळी माती सुद्धा आईच.
गणेशदादा शितोळे
२९ एप्रिल २०१८