आयुष्य जसं उलगडतं तसं मला जगायला आवडतं...!!!
काल सकाळपासून एका वेगळ्याच भावविश्वात हरवल्याची जाणीव होत होती. त्याला
जशी परिस्थितीजन्य कारणं होती तशीच काही भावनिक कारणंही होती. अन ह्याचीच जाणीव
होऊन रात्री लॅपटॉप चाळत बसलो होतो. सापडलं एक मित्राचं नाटक. ‘ऱ्हिदम ऑफ लव्ह’. तशी नाटकात काय ह्याची पूर्ण
कल्पना. दहा वर्षापूर्वी अहमदनगर चषकावेळी ह्या क्षेत्रात घालवला असल्याने
पडद्यामागच्या भूमिका समजायला फारसा वेळ लागत नाहीच कधी.
‘ऱ्हिदम ऑफ लव्ह’ नावावरूनचं ही प्रेमाची
काहीतरी गोष्ट असेल हे कळतंच. पण मला अर्नव-स्वराच्या ह्या प्रेमाच्या
गोष्टीपेक्षा स्वराने सांगितलेली वेगळी जगण्याची गोष्ट आवडली. स्वरा अन अर्नव
मधल्या प्रश्नोत्तरांच्या खेळात अर्नव स्वराला एक प्रश्न विचारतो.
“तुझं आयुष्यातलं धेय्य काय आहे? म्हणजे पुढे
जाऊन तुला काय करायचेय काय नाही याबद्दल काहीतरी असेल?”
यावर स्वराने दिलेलं अत्तर मला मनापासून
आवडलं.
“हो म्हणजे भविष्यातील दूरवरचा विचार वगैरे, नाही
असं काहीच नाही.”
“म्हणजे?”
“म्हणजे, म्हणजे फार सोपंय. मी इतक्या पुढचा
नाही विचार करंत. आयुष्य जसं उलगडतं तसं मला जगायला आवडतं. आश्चर्यचकीत करणाऱ्या
गोष्टींनी भरभरून असल्यासारखं. एकदम मनापासून.”
“ऐकायला खूप चांगलं वाटतंय. पण मला वाटतं आयुष्यात धेय्य असावीत. म्हणजे ती
इतकी महत्वाची नसतात. कारण एक वळणावर आपण धेय्यपूर्ती केली की ती संपतात. महत्वाचा
असतो तो त्यांच्यासोबत केलेला प्रवास. धेय्य पूर्ण
करण्याच्या नादात ती आपल्याला अडचणींशी लढायला शिकवतात.”
“पण धेय्य न ठेवताही आपण अडचणींशी लढातोच की.”
“हो पण धेय्य आपल्याला अडचणींशी लढा द्यायला शिकवत माणूस म्हणून घडवतात.”
“विचार चांगला आहे. पण मला समोर आलेल्या क्षणाला पूर्णपणे जगायला आवडतं. तू
बघ रात्रीच्या काळोखात कित्येकदा गाडी चालवली असशील. तू एकटाच आहेस. रस्त्यावर
पथदिवे नाहीयेत. गाडीच्या पुढच्या दिव्याचा प्रकाश जेवढ्या दूरवर जाईल तितकंच तू
पाहू शकतोस. जेमतेम शंभर फुट. तरीही तू गाडी चालवतोसंच. निर्धास्तपणे. विश्वास
ठेऊन की पुढे रस्ता आहे. अन तोही पूर्ण आहे. मला ना तसं आयुष्य जगायला आवडतं.
आयुष्यावर विश्वास ठेऊन की आयुष्य सुंदरंच आहे. मग ते पुढच्या दिव्याच्या प्रकाशात
शंभर फुट दिसले ना तरी चालेल. फक्त ते तसं जगता आलं पाहिजे. आयुष्यानं दिलेली
जगण्याची संधी आपल्याला घेता आली पाहीजे.”
स्वराने सांगितलेली ही गोष्ट मला
मनापासून आवडली. कारण माझ्या अन स्वराच्या भूमिकेत किंचितसा फरक जाणवत नाही. अगदी
मी म्हणजे ती असंच. म्हणजे मला आयुष्याबद्दल जे जे वाटतं ते ते तिन अगदी सुंदर
शब्दात मांडली. पुढे काय चिंता नाहीच मुळी. आत्ता काय हाच एकमेव प्रश्न. उत्तरं
अनेक अन समाधान देणारी भावना एक. आयुष्य जगायचं. पाण्यात मीठ विरघळावं तसं. म्हणजे
मीठ विरघळणार आहे हे माहिती आहे. पण तरीही चमचानं ढवळून आपण ते एकजीव करण्याचा
उगाचच अट्टहास करत असतो. आयुष्याच्या बाबतीतही आपण असंच करतो. आनंद दु:खाचं मीठ
आपण वारंवार ढवळत जातो. पण ह्या सगळ्यात महत्वाचं असतं ते प्रमाण. म्हणजे
आनंदाशिवाय आयुष्याला महत्व नाही. अगदी चवीला मीठ हवं तसं. पण ते प्रमाणात. ते
जास्त झालं तर आयुष्याची किंमत उरत नाही. कारण सहजपणे मिळालेल्या गोष्टीची माणसाला
किंमत उरत नाही. त्यामुळे थोडं दु:ख अन मग किंचितसा आनंद दिला तरी आयुष्य खूप
सुंदर वाटतं.
गणेशदादा शितोळे
(२१ फेब्रुवारी २०१८)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा