माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

मराठी भाषा दिन







                                         २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन. मराठीच्या सेवेला वाहून घेणाऱ्या कुसुमाग्रजांचा जन्मदिनच मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. संतांची परंपरा लाभलेली, शतकानुशतके सुरू असलेल्या प्रवासात भेटलेल्या अनेक भाषांना आपलेसे करत विकसित झालेली आणि आधुनिक युगातही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या १० भाषांत स्थान पटकावणारी अशी ‘माझी बोली मराठीया’.एखाद्या भाषेतील साहित्यिकाच्या जन्मदिनी त्या भाषेचा उत्सव साजरा व्हावा, असे हे जगभरातील एकमेव उदाहरण असावे. आपल्या माय मराठीला स्वप्रतिभेच्या बळावर उत्तुंग शिखरावर पोहोचवणारे कुसुमाग्रज या मायबोलीचे अमृतपुत्र ठरले आहेत. 

                                         इतर कुठल्या सणाला जेवढे एकत्र आले नसतील तेवढे आज अभिजातमराठी साठी सर्व एकत्र येतायेत हे पाहून खुप आनंद होतोय. मराठी ही माझी फक्त मातृभाषा नाही तर आईच आहे. माझं तिच्यावर माझ्या कुटूंबाइतकंच प्रेम आहे. आजवर तिनेच मला घडवल.वाढवलं अन मोठं केलं. आईला कायमच लेकरावर प्रेमच असतं. पण लेकराला आईवरचं प्रेम कितीही व्यक्त केलं तरी रितं उरणारंच ठरतं. अशी मायमराठीच्या जागराचा आजचा दिवस. 

                                         लहाणपणी ओठांवर आलेल्या पहिल्या "आई" शब्दापासून ती माय झाली. पुढे शाळेतल्या अ आ इ ई पासून तिच्यावर प्रेम कराला सुरवात झाली. मग बाराखडी सोबत अजून ओढ वाढली. मग बालकवींनी या बाळांनो या म्हणत साद घातली. आण्णा भाऊंनी स्मशाणातलं सोनं दाखवलं. कुसुमाग्रजांनी कणा ताठ केला. तिचा जस जसा उलगडा होत गेला तसंतसं तिचं सौंदर्य भावलं. मग भेटले मराठी कवितेचे आजोबा. सांग सांग भोलेनाथ, जिप्सी, करत करत मंगेश पाडगावकरांनी प्रेमाची व्याख्या शिकवली. सुशिंनी दुनियादारी जगवली अन बोकिलांनी पुन्हा शाळा भरवली. ती जेव्हा जेव्हा भेटली तेव्हा तेव्हा नवनवीन रूपात मनापासून आवडली. अन एक दिस उजाडला. तिनं कागदावर शब्द लिहीण्याची ताकद दिली. स्वत:चे. मग सुरू झाला प्रवास शब्दांच्या मोरपिसांचा. शोधत तिच्या आठवणीत हरवेलेली मोरपिसं शोधण्याचा. जसा या रस्त्याने चाललो तसतशी वाट अजून हवीहवीशी वाटायला लागली. अन एके दिवशी लागला एक विश्रांचीचा थांबा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड. दोन मिनिटाच्या काळात आपले शब्द आपल्यासारख्याच थांबलेल्या वाटसरूंना देण्याची. त्या थांब्याने उर्मी दिली नवीन जगण्याची अन साकारायला सुरवात झाली मला भेटलेला आनंदयात्रीची. हे सगळं काही फक्त तिच्यामुळेच. माय मराठीमुळेच. तिचं उपकार न फिटणारेच आहेत.


                                         खरंतर आज तिच्यावर अन तिच्याकरता कृतज्ञतेचे दोन शब्द व्यक्त करण्याचा दिवस. पण तिच्या पूर्वसंधेला एक गीत कानावर पडलं अन डोक्याची शीर उभा राहिली. अमीर खान सारख्या हिंदी कलाकाराने पाणी फौंडेशनच गाणं मराठी मध्ये गायलं. पण आमचे महाराष्ट्राचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री असलेल्या माणासाने नद्यांकरता हिंदी भाषेतून गाणं गाऊन मराठी विषयी आकस दाखवून दिला.  नेमकं मराठीदिनाच्या पूर्वसंध्येला हे गाणं प्रदर्शित मुद्दाम करणाऱ्या सरकारला मराठीचा साधा मान पण ठेवता येत नाही त्यांच्याकडून या माय मराठीला अभिजात भाषा मिळणेबाबत कोणती अपेक्षा ठेवता येईल. "उत्तर भारतीयांनी मुंबईला महान बनविले" असे व्यक्तव्य करून मुंबईचा आणि सतत हिंदी बोलून मराठीचा अपमान करणारा मुख्यमंत्री असणं हेच आपलं दुर्दैव म्हणूनच मराठीला. कदाचित नागपूरचे असल्याने मराठीला सवतीसारखं वागवत हिंदी आवडायला लागली असेल. पण मराठी राज्याच्या प्रमुखाला मराठीत बोलायला सांगायला लागणे यासारखी शरमेची बाबा नाही. गेली पंधरा दिवस विनंत्या केल्या मिन्नकवाऱ्या केल्या पण हे महाशय सोशल मिडायावर सरळसरळ वाघिणीचं दूध ओकल्यासारखं वागतात. ज्याला आईच्या दूधाची किंमत नसावी त्याला काय मराठीची कौतुकं वाटणार. 
"रेवा, वरदा, कृष्ण कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा...!"
                                         कुणीतरी शिकवा त्या नदीगीत आळवणा-या हिंदाळलेल्यांना असंच म्हणायची वेळ आली आहे.  बाकी राजकीय पुढाऱ्यांकडून अपेक्षा करणंच सोडून दिलं आहे. मी आजवर मराठीत बोलतो. वागतो. सोशल मिडीयानं आईचं दूधाऐवजी पावडरच्या दूधाची सवय लागून अडाणी करून टाकलंय. पण मी गेली पाच वर्षे झाली मायमराठीत सोशल मिडीया वापरतो. काही फरक पडला नाही. उलट इतर भाषेपेक्षा मराठीवर प्रभूत्व मिळावयाला सुरवात झाली. 
                                         मराठी भाषा खरोखरच समर्थ व्हायची असेल तर तिच्याविषयीचा मराठीभाषक समाजाचा दृष्टिकोन मुळातून बदलायला हवा. मराठी भाषेवरचे आपले प्रेम प्रतिक्रियात्मक, सापेक्ष आणि नकारात्मक असता कामा नये. उद्याच्या जबाबदारीसाठी ती समृद्ध कशी होईल याचा स्वच्छ विचार व्हायला हवा. 
                                       मराठी ही माझी मातृभाषा आहे माझं तिच्यावर माझ्या कुटूंबाइतकच प्रेम आहे.येणाऱ्या प्रत्येक दिवशी मी बोलताना माझ्याच भाषेचा वापर करील व स्वकियांनाही करायला लावील. माझ्या मुलांच शिक्षण हे मातृभाषेतुनच सुरू होईल. एवढाच निश्चय प्रत्येकाने केला तर अभिजातमराठी दर्जा आपोआप प्राप्त होईल.

मी मराठी
होय मराठी
माय मराठी
अभिजात मराठी

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांची ही एक कविता आठवली.


माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दर्याखोर्यातील शिळा

हिच्या कुशीत जन्मले
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने
केली मृत्यूवरी मात

नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे
कधी लवली न मान

हिच्या गगनात घुमे
आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूत
आहे समतेची ग्वाही

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील
मायदेशांतील शिळा

- कुसूमाग्रज



अशा या मायमराठीचा अभिमान व्यक्त करणारं सुरेशभटांचं गीत ऐकलं की मायमराठीचं स्पुरंण चढते.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी


आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कवी - सुरेश भट

गणेशदादा शितोळे
२७ फेब्रुवारी २०१८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा