माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, १ जानेवारी, २०१८

मला भेटलेला आनंदयात्री - आशिष पाटील 

मला भेटलेला आनंदयात्री - आशिष पाटील 















                   वर्षामागून वर्षे जात असतात. अनेक माणसं भेटतात. अनेक हात सुटतांतही. नवी नाती जुळतात आणि काही अनोळखी माणसं आपली होऊन जातात. अशा माणसांच्या भाऊगर्दीत आपण आपले राहून जात नाही. माझ्या आसपासची ही माणसं मला आयुष्याच्या या प्रवासात खळखळून निखळ आनंद देत आहेत. 
                   जेव्हा आपण कामानिमित्ताने एखाद्या क्षेत्रात प्रवेश करता तेव्हा अनेक व्यावसायिक सहकारी मिळतात. काही अनुभवी असतात. काही शून्यातून जग निर्माण करणारे असतात. काही फक्त व्यावसायिकता जपणारे असतात. यातील बहुतांश मंडळींना प्रसिद्धी, पैसा, समृद्धी याच्या हव्यासापोटी एक वेगळी गुर्मी चढलेली असते. आणि ह्या गुर्मीतूनच अशी मंडळी कायम आपल्या सहकाऱ्यांना दाबून आपली भरारी घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण आजही अशी काही माणंस आहेत जी प्रसिद्धी, पैसा, समृद्धी या पलिकडची आहेत. जी कायमंच सहकाऱ्यांना प्रेरणास्त्रोत म्हणून काम करत असतात. म्हणूनंच काही अशा प्रतिक्रियाही येतात. हे त्या माणसांच मोठेपण असतं.
                   मला पुण्यात येऊन आता दोन वर्षे झाली. एस ए पी या वेगळ्या विश्वात पाऊल टाकूनही दीड वर्ष झालं. एस ए पी ह्या विश्वात काम करताना अनेक सहकारी भेटले, भेटत आहे अन भेटत रहातील. मला भेटलेला हा आनंदयात्री हा माझ्या सारख्या अनेकांना प्रेरणा देणाराच आहे. तशी तर प्रत्येक व्यक्तिमत्वात काहीतरी अशी गोष्ट असते की सर्वांना ती आकर्षित करते. तशीच मला भेटलेल्या या आनंदात्री व्यक्तिमत्वात ठासून भरलेली नम्रता, विनयता, चेहऱ्यावरची प्रसन्नता अन समोरच्यालाही लाजेवल असा उत्साह असं बरंचकाही आहे. व्यसन म्हणजे एखादी गोष्ट चढणं. हे चढणं शरीराला अपायकारक असेल, तर तसं होऊ न देणंच चांगलं. पण काही माणसं असं ‌मानत नाहीत कारण त्यांची चांगुलपणाची ही व्यसनंच अशी असतात की ती अनेक अपायकारक मनांना सुधारतात. या व्यक्तीने काम करताना अनेकांना प्रेरणा दिली. माझ्याकरता तो महागुरूच. असा मला भेटलेला आनंदयात्री असणारी व्यक्ती म्हणजे आशिष पाटील सर.
                   आमची पहिली भेट अजूनही आठवते. मी प्रायमसच्या कर्वेरोड शाखेत शिकवायला होतो. तेव्हा सेल्स मधे कोणी आशिष पाटील आहेत हे ऐकून होतो. पण एकदा मिटींगच्या निमित्ताने अजय भोसले सरांनी आशिष सरांसोबत सर्वांची भेट घालून दिली. तीच सरांशी पहिली भेट. सरांची भेट होईपर्यंत सरांची डोळ्यासमोर एक बंधिस्त प्रतिमा होती. संपूर्ण सेल्स संभाळणारा हा माणूस म्हणजे थ्रीपीस घातलेलं व्यक्तिमत्व असेल. ज्याच्या चेहऱ्यावर फक्त कामाचा तणाव ठासून भरलेला असेल. अशा बंधिस्त प्रतिमेला  त्या पहिल्या भेटीतंच एकदम तोडून टाकलं. त्यावेळी नक्की काय शिकवत होतो माहिती नाही. पण सरांनी तोच भाग स्वत: समजावून सांगायला सुरवात केली. आणि त्यांच्यातला शिक्षक स्पष्ट जाणवला. मी नेमून दिलेलं काम करत शिक्षक झालो होतो अन सर स्वत:हून शिकवत होते. एकंदरीत त्या अर्धातासात तिथे बसलेल्या प्रत्येकाला या अवलिया माणसाने जिंकले होते.

                   मगरपट्टा ऑफिसला आल्यानंतर सुरवातीला सरांशी फारसा संबंध आला नाही. पण मी जेव्हा माझ्या जेष्ठ सहकाऱ्यांकडून आशिष सरांविषंयी जे भरभरून ऐकलं त्यातील प्रत्येकाची हीच प्रतिक्रिया हीच होती. आमच्यापैकी कुणीही कधीही त्यांना कोणाशी भांडताना पाहिलेलं नाही. इतकंच नाही, तर साधा आवाज चढवून बोलताना पाहिलं नाही. कारण कायम त्यांची विनम्रता आणि कामंच बोलतं. म्हणून तर त्यांना मीच काय आमच्यापैकी सगळेच सौजन्यमूर्ती म्हणतात. 
                   अनेकदा काम करत असताना काही गोष्टींची उत्तरं सापडत नसतात.  भोवतालची माणसं आपल्या क्षमतेवर अविश्वास दाखवत असतात. तेव्हा खरंतर मनात खूप चीड आलेली असते. पण पुढच्याच क्षणी आहे तसाच थांबतो. आयुष्याने दिलेला अनुभव डोळ्यासमोर उभा रहातो. आणि त्यात हा आनंदयात्री डोळ्यासमोर दिसतो. मग आपण आपल्या परीने उत्तरं शोधायची. ही प्रेरणा आहे. अन नाहीच सापडलं तर आशिष सर आहेत ना. आपला बापमाणूस सोबत आहे ना. मग चिंता नाही.
                   जिएसटीच्या काळात कुठे थोडी अडचण आली की सरांना फोन फिरवला जात होता. कारण आमचा शेवटचा पर्याय तिथेच येऊन थांबत होता. मुंबईला रॅप्टाकॉसला असताना अनेकदा आशिष सरांना अगदी क्षुल्लक कारणांकरता फोन केल्याचे आज आठवल्यावर माझे मला हसायला येते. आपल्याला इतकंही माहीत नाही. पण हा अनुभवंच एक आत्मविश्वास देऊन जातो. माझ्यासाठी एस ए पी या क्षेत्रात काम करताना ‘आनंद’ हा शब्द ‘आशिष सरांच्या प्रत्येक उत्तरां’नं रिप्लेस केला.. आणि मी पुढे काम करू लागलो.

                   ६ जूलै २०१७ ला टायफॉईड झाल्याने मी मुंबईवरून कामावरून घरी आलो होतो. जिएसटीच्या त्या अटतटीच्या काळात आजारी पडल्याने मी घरी आलो तसाच दवाखान्यात दाखल झालो. आयुष्यात पहिल्यांदा सलाईनवर जगण्याचा तो काळ. तोंडाची इतकी बिकट अवस्था की आरशात बघून तोंडाचा कर्करोग झाला की काय असा विचार कित्येकदा मनात आला. खाण्याची कितीही इच्छा असली तरी उपाशी रहाण्याचा तो काळ.  दिवसभर दवाखा्यातल्या खोलीतला तो फिरता पंखा बघत सलाईनची टीपटीप मोजत होतो.
                   तो काळ हा माझ्याकरता अतिशय निराशा देणारा होता. भेटायला येणारा जाणारा एस ए पी च्या कामाला शिव्या देत सोडायचा सल्ला देत होता. त्याचा इतका वाईट परिणाम झाला की राजीनामापत्राचा मसुदा पाठवायला तयार होता. त्यात राज्यसेवा परीक्षेकरता तयारी करणारी मंडळी भेटल्यावर तर मनाने राजीनाम्याची तयारीच केली होती. थोडं बरं वाटल्यानंतर दवाखान्यातून बाहेर पडून घरी आल्यावर दिवसभर एमपीएएसी आणि युपीएससी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती, यजुर्वेंद्र महाजनांची भाषणं आणि अभ्यास कसा करावा याच्या चित्रफिती पहाण्यात दिवस जात होते. मनात एस ए पी सोडून राज्यसेवा परीक्षेची तयारी करण्याचा निश्चयंच जवळपास होत आला होता.
                   १५ दिवसांनंतर जरा बरं वाटल्याने कामावर जाण्याकरता घरचे आग्रह करत होते. तेव्हा ऑफिसमधल्या फोन केल्यानंतर जेव्हा आशिष सरांच्या अपघाताची बातमी कळली तेव्हा धक्काच बसला. पण पुढच्याच क्षणी अपघात होऊनही सर दुखऱ्या पायाला घेऊन काम करण्याकरता पुणे-जळगाव-अहमदाबाद असा प्रवास करत आहेत. ही या माणसाची कामावरती असणारी निष्टा पाहून तेव्हा माझीच मला लाज वाटली. तो क्षण मला जगण्याची, लढण्याची प्रेरणा देऊन गेली. दुसऱ्याच दिवशी मी पुणे नाही तर मुंबईला जाण्याची तयारी करूनच घराबाहेर पडलो. जाताना राजीनामापत्राचा मसुदा पहिल्यांदा काढून टाकला. मनात एस ए पी सोडून राज्यसेवा परीक्षेची तयारी करण्याचा विचार कुठल्याकुठे पळून गेला होता. 

                   जिएसटीच्या धामधुमीत स्वत:च्या पायाला जखम झाली असतानाही कामाप्रती निष्टा दाखवत ज्या जिद्दीने जैन एरिगेशनचं काम पूर्णत्वाकडे नेलं ती जिद्द नक्कीच आमच्या संपूर्ण टीमला प्रेरणा देणारी होती आहे अन रहाणार. 
                   नुकताच आशिष सरांसोबत साताऱ्याला जाण्याचा योग आला. संपूर्ण प्रवासात एखाद्या माणसातील विविधांगी पैलू कसे असतात याचाच प्रत्यय आला. माझ्यासारखीच सरांनाही राजकारण ह्या विषयाची सखोल माहिती. एकूण प्रवासात राजकारणातील विविधप्रश्नांवर चर्चा झाल्यावर हेच  लक्षात आले की हा माणूस फक्त एस ए पी मधेच बाप माणूस नाही तर या विविधांगी क्षेत्रातही बापच आहे. सरांसोबतच्या प्रयोगशिल शेती ते राजकारणातील विविध भूमिका मांडण्यासोबत चार अनुभवाच्या गोष्टी बरंच काही शिकवून गेल्या. असा एक विलक्षण उत्साहाचा प्रवाह आयुष्यात मिळल्यानंतर एस ए पी सारख्या विश्वात इतर गोष्टींचा ताळमेळ बांधत आनंद घेण्याचं कसंबच शिकवतो. 
                   माझ्या फेसबुक अन व्हाट्सअपवरच्या स्टेटसवर समंजसपणे हसून दाद देणारे फार कमी माणसं भेटतात. त्यातील आशिष सर एक. खरं तर वयानं माझ्यापेक्षा मोठे. भेटल्या भेटल्या एक स्मितहास्य देत दूरूनच दोन्ही हात जो़डून नमस्कार. पण चेष्टेने का होईना त्यांचा दिवसंच जात नाही कधी मला ‘अहो-जाहो’ केल्या शिवाय. असं का, याचं उत्तर माझ्याकडे नाही.
                   पण आशिष पाटील या नावाभोवती आता मनात एक  वलय तयार झालेलं आहे. कारण सोबतच्या प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या अवलिया माणसानं असं काही स्थान तयार केलं आहे की सोबतच्या सहकाऱ्यांची आयुष्य वळणदार होत आहेत. अगदी सरांच्या अक्षरासारखीच. आज हा मला भेटलेला आनंदयात्री लेख लिहीताना आशिष सरांच्या ते निर्व्याज, खळखळून हसण्याइतकंच त्यांचतली विनम्रता आणि सहकार्याची भावना डोळ्यासमोर दिसेतेय. असा बापमाणूस मला आनंदयात्री म्हणून भेटल्याचा खूप खूप आनंद वाटतो.

























































गणेशदादा शितोळे
(०१ जानेवारी २०१८)


1 टिप्पणी:

  1. खूप मस्त गणेशदादा....तुमच्या आनंदयात्री प्रमाणे प्रत्येकाला आयुष्यात असाच आनंदयात्री मिळावा...

    उत्तर द्याहटवा