माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, २३ जुलै, २०१५

तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....

आठवणींच्या जगात जायला निघतो...
तेव्हा शब्द येतात मज भेटायला...
लेखणीतून कागदावर उतरायला...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....

बोलायचं असतं खरंतर मनातून खूप काही....
पण ओठ बोलायचं सोडून देतात...
अन शब्द मनातच खोलवर रूतून जातात....
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....

ऐकावी वाटतात कधी गाणी सुमधूर. ..
ताल सुर करतात बेधुंद एकांतात मन...
डोळ्यांत उभे राहतात गाण्यातल्या वर्णनाचे क्षण...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....

कधी सुरू असतो एकट्याने प्रवास बाईकवरून...
रस्ता घेत असतो वळणाहून वळण...
मन मात्र विचारात गुंग होतं एक क्षण...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....

येते कधी जवळच्या माणसाची आठवण दाटून..
आसवे नयनांची जाती साथ सोडून..
जणू मृग विसरतो बरसायचं नभ असून...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....

 गणेश दादा शितोळे
(२३ जुलै २०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा