मैत्रीदिनाच्या
लाख लाख शुभेच्छा...!!!
गेल्या
काही दिवसांपासून मैत्री दिवसानिमित्ताने काही राहून गेलेलं लिहीण्यासाठी जंगी
तयारी चाललेली होती.
बाहेर फ्रेंडशिप बॅंडपासून गिफ्टपर्यंतच्या वस्तूंनी दुकाने ओसंडून
वाहताना पाहिल्यावर मैत्री दिवस साजरा करण्याची खरोखरच गरज आहे काय़ असा प्रश्नही
पडला. मैत्री एकाच दिवसाचीच आणि फ्रेंडशिप बँडच्या
किमतीएवढीच आहे का असं राहून राहून वाटलं. मैत्री ढोलताशे पिटून वा कापडं गुंडाळून
व्यक्त करण्याची बाब नाही, तर ती मनातून जोडली जाते. पहिल्या पावसानंतर येणार्या मातीच्या सुगंधासारखी धुंद व हळुवार वार्याच्या
स्पर्शासारखी सुखद जाणीव देणारी असते. अशा या नात्याला
पैशांत तोलणे म्हणजे या निर्मळ व पवित्र संबंधाचा अपमान नव्हे काय अशा विचाराचा मी
आज त्याच एका दिवसाकरता लिहीताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पण मी
आजही मैत्री ही काही एक दिवस साजरा करण्याचीही बाब नाही याच विचाराचा आहे. अजूनही मला वाटतं की जीवनातील प्रत्येक क्षणी मैत्रीचा सोहळा साजरा करायला
हवा. हे वाटण्यामागची भावनाच मुळात त्यातून आली आहे कारण
सध्या तसं काहीच आपल्या आयुष्यात घडत नाही. आजच्या झकपक, दिखाऊ
जीवनशैलीत माणूस पैशाच्या मागे धावणाऱ्या रोबट सारखा झाल्याने मैत्रीचा अर्थ पार
हरवल्यागत झाला आहे. म्हणूनच हा दिवस साजरा करण्याची गरज
भासायला लागली आहे.
मैत्री.
तसा इतर शब्दांसारखाच एक शब्द. पण विचार करायचाच ठरवला तर अनेकांना संशोधन करून
पदव्या देईल असं शब्दाचं विद्यापीठ म्हणजे मैत्रीच ठरेल. ‘मैत्री’ हे खरेतर केवळ दोनच शब्द पण अवघं ब्रम्हांड कवेत घेण्याचं ज्यात सामर्थ्य
आहे असे ते शब्द. मैत्रीची निश्चित व्याख्या सांगणं किंवा
नेमक्या शब्दांत वर्णन करणं महाकठीण. मैत्री अंत:करणातून जोडली जाते. मैत्री ही निरंतर वाहणाऱ्या
निर्झरासमान निर्मळ व तितकीच हळवी असते. वर्षा ऋतूच्या आगमनानंतर
येणार्या मातीच्या सुगंधासारखी, शीतल हवेच्या
झुळूकासारखी व मनाला उभारी देणारी असते.
शरदाचं
चांदणं,
वसंताचा बहर, श्रावणाची पालवी या सर्वांहून
अधिक मनमोहक आकर्षक कोण?, असा प्रश्न विचारला असता तर मैत्री
हेच शब्द कानावर पडतील. असं बरंचस लहानपणापासून ऐकत आलो आहे
आपण. पण हे सगळं खरंच तसं आहे का ते अनुभवल्याशिवाय कळत नाही. कारण मैत्री रोपटं जमिनीत
पूर्णपणे रुजलं त्याचा गाभा शोधणं केवळ अशक्य असतं. मैत्री कशी असते, कधी होते
कोणासोबत आणि का होते? हे कोणालाच कधीही कळत नाही. मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज कशाचंच बंधन राहत नाही. मला विचारलं तर मी मैत्री म्हणजे माणूस असण्याची सुरवात समजतो. म म्हणजे
एक तर मैत्री अन दुसरं माणूस.
जन्माला
आल्यावर पाळ्यात असतानाचा खुळखुळा आपला पहिला मित्र. त्याच्या सहवासाने आपण आनंदून
जायचो असा मित्र. नंतर आपण पहिल्यांदा जेव्हा शाळेत जातो, तेथे
आलेल्या आपल्यासारखे इतरांना पाहतो. त्यांच्यातील ठराविक
मुला-मुलींशी आपण बोलतो, शाळेच्या
मधल्या सुटीत डबा खातो, मस्ती करतो, खिदळतो
बस्स तेव्हापासून व्यक्तिच्या जीवनात अधिकृतपणे 'मित्र'
नावाच्या पात्राची 'एंट्री' होते.
आई
आणि मुलगा या नात्यानंतर सर्वात विश्वसनीय आणि प्रेमाचे नाते म्हणजे मैत्री. मैत्री
म्हणजे खांद्यावर हात आणि सदैव साथ. खरे मित्र जीवनाच्या
वाटेवर साथ सोबत करतात, प्रसंगी रागवतात, समजूत काढतात, यशापयशाच्या गणिताचे मूक साक्षीदार
बनतात. आजच्या या युगात आणि मुक्त विचारधारेत मैत्रीची
व्याख्या बदलली आहे. काही वर्षांपूर्वी आई-वडील व मुलांमध्ये एक दुरावा होता. मुले आई-वडिलांसमोर स्वत:चे विचार मुक्तपणे मांडायला घाबरत
होती, पण आज त्यांच्यामध्ये मैत्रीच्या नात्याची जोड झालेली
आहे. हा बदल एका दृष्टीने चांगला आहे.
कोणतीही
गोष्ट समजायला उमजायला आवश्यक असतो तो त्याचा नाद असणे. मला मैत्रीचा नाद लहानपणीच
जडला. म्हणजे तसा तो प्रत्येकालाच जडतो.
मैत्रीचा नाद. कायम मित्रांच्या घोळक्यात रहायची सवय असल्याने आजही एकटा असलो की
माझा जीव घुटमळतो. शाळा. महाविद्यालय जस जशी बदलत गेलो तसतशी आसपासची माणसं बदलत
गेली. एकाची जागी दुसऱ्याने घेत गेली. पण मैत्रीचं नातं तसंच ठेवून नवी नाती
रूजली. वय वाढत गेले तसे तसा मित्रांचा घरचा वावर वाढायला लागला. सोबत चार टाळकी
दिसली तरी घरी चिंता करणे सुरू व्हायचे. नेमके याचे मित्र किती...? अनेकदा चारंच
पण चांगले मित्र असावेत या सल्ल्याची पारायणंही झाली. पण मी मात्र मित्र जसेच्या
तसे स्विकारले. त्यांच चिंता करणंही तसं स्वाभाविक होतं. कारण माझ्या
मित्रमंडळीमधे जेवढे शिकलेले तेवढेच उनाडक्या करणारे हुकलेलेही होतेच. मी असाच
त्यांच्यासोबत रहायला लागलो तर कसं व्हायचं असा भला मोठा प्रश्न. एक काळ होता की
मित्र घरी येणार म्हटले की घरी सुरूंग लागल्यासारखाच धमाका व्हायचा. त्यात आसपासची
फुकटात सल्ला देणारी मंडळी होतीच की. हे पोरगं वाया जाणार असा सिद्धांत
मांडल्यासारखा आव आणूत असायचे. पण मैत्री हे असे एक रसायन आहे की ज्यात आपण
कोणताही रंग मिसळला तरी त्याचा रंग बदलतो अन आपणच मिसळलो तर एक होऊन जातो.
यारा
यारा, फ्रेंडशीपचा खेळ सारा असं म्हणत महाविद्यालयीन जीवनात दुनियादारी पूर्ण
केली. भांडणतंटे, खुन्नशी, प्रेमप्रकरणं, मारझोड काहीही चूकलं नाही. फरक इतकाच
होता की श्रेयाची भूमिका वठवण्याऐवजी दिग्याच संचारत राहिला. ही दुनियादारी करीत
असताना मैत्री नात्याला अनन्यसाधारण महत्त्व येत गेलं. कारण
मैत्री हे दोन शब्द उच्चारताच हृदयाच्या कोंदनामध्ये, आठवणींच्या
मखमली कापड्याने गुंडाळेली एक प्रतिमा उभा रहात गेली. १७
मित्रांची प्रेमप्रकरण आज एकत्र नांदत आहेत कारण दिग्या कायम श्रेयस सारख्यांना
शिरीण मिळवून देण्याकरता झटला. आजही अनेक मित्र हक्काने मदत मागत असतात.
प्रेमप्रकरण त्यांची, रूसवेफुगवे त्यांचे अन समजूत काढायला चार शब्द लिहून द्यायला
मी असतोच. मध्यांतरी असाच एका मित्राचा फोन आला की दादा मैत्री अन प्रेम या मधल्या
अंतरावर काहीतरी लिहून द्या की माझ्या भावना पोहचतील.
अनेकदा
असंही झालं ती एकदा काम झालं की कोण दादा अन कोण काय. साधा फोन करायलाही महाग होऊन
बसतो. असं असलं तरीही मैत्री टिकवण्यात बेस्ट कोण मुली की मुलं? असा प्रश्न विचारला तर दोस्ती के मामले में
मुलंच बेस्ट आहेत असंच मी म्हणेल. मुली-मुली बेस्ट फ्रेंड्स असतील, त्यांची मैत्री जगावेगळी असेलही, मैत्रिणी
एकमेकींसोबत अनोखं बाँडिंगही शेअर करत असतील हे सगळं खरं असलं तरी आयुष्यभराच्या
मैत्रीसाठी दोस्तंलोकच हवेतंच. मित्रांच्या गरजेला धावून
येणारे, मित्रांच्या आनंदासाठी आपला आनंद बाजूला ठेवणारी
पोरंच असतात हे जाणवतं. एकदा मैत्री झाली की झाली. ती
आयुष्यभर टिकवायची. मुलांचा हाच बाणा असतो. गरजेच्या वेळी तुमचा दोस्त हजर असलाच पाहिजे. मुलं
मैत्रीचं मोल मुलींपेक्षा थोडं जास्त जाणतात. संकटातून
सोडवण्यासाक्ष अर्थातच दोस्तावर सहज विश्वास टाकता येतो. मुलीही
मैत्रीला जागतात. पण दोस्तासाठी एक पाऊल पुढे टाकताना पोरं
मागे-पुढे पहात नाहीत हे नक्की.
मैत्री
हे नाते रक्ताचे नसले तरीही त्या नात्याला श्वासाइतके महत्त्व आहे. कारण
या नात्यामध्ये असणारा आपलेपणा, विश्वास, आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संकटसमयी धावून येण्याची जिद्द
हेच होय. या शुध्द भावनांच्या आधारावर असणारी मैत्री ही
कोणाबरोबर असावी याचा काही नियम नाही. मैत्री ही लहानांची
मोठ्याशी, मुलाची मुलीशी तर संकट समयी धावून येणा-या प्रत्येक व्यक्तीशी आपली मैत्री असते. या
मैत्रीला कोणत्याही भेदभावाचा डाग नाही. त्यामुळेच या
नात्याचे महत्त्व रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे आहे. आम्ही मित्र
एकमेकांशी भावाप्रमाणेच वागतो. या मैत्रीला काही नियम आणि
कायदे असतात अन हे नियम आयुष्यभर पाळलेही जातात. मित्रांचा
ग्रुप एकमेकांना स्पेस देतो. प्रत्येक गोष्ट शेअर करायलाच
पाहिजे, असं काही त्यांच्यात गरजेचं नसतं. आपल्या मित्रांकडून त्यांच्या फारशा अपेक्षा नसतात. असल्या
तरी त्या वास्तववादी असतात.
मैत्रीचं
नातं हे विश्वासावर टिकत असतं. तसेच मैत्रीत भावनांना खूप
महत्त्व असते. आपल्या मित्राच्या भावना दुखणार नाहीत,
याची काळजी घ्यावी लागत असते. परंतु कधी कधी
या भावनांच्या गोंधळात मैत्रीला तडा जाते आणि सुरवातीला 'ही
दोस्ती तुटायची नाय' म्हणणारे सहज दोस्ती तोडून मोकळे होतात.
कुणीतरी
म्हणून ठेवलंय, ”The language of friendship is not words but meanings” खरंच मैत्री ही निरपेक्ष असते, एकमेकांच्या सुख-दु:खात लोण्यासारखी मुलायम व उर्जा देणारी असते.
मैत्री ही ठरवुन होत नाही, तिचे कसलेच नियम
नसतात, अपेक्षा आणि उपेक्षा तर मुळीच नाही. मित्र हा विविध भूमिकेत असतो. कधी सुख-दु:ख वाटणारा तर कधी संकट प्रसंगी मदतीला धावणारा, कधी विवाहाच्या दिवशी
मिरवणुकीत खांद्यावर घेऊन नाचणारा तर आयुष्याच्या संध्याकाळी तिरडीला खांदा देत
स्मशानापर्यंत साथ देणाराही असतो.
मित्र
म्हणजे मी कुठलीही गोष्ट त्याच्याशी शेअर करू शकतो किंवा कुठलीही गोष्ट तो हक्काने
मला बोलू शकतो एवढं घट्ट नातं. काही माणसे असतात
ज्यांच्यासमोर आपल्याला काही सिद्ध करावे लागत नाही असे व्यक्तिमत्त्व म्हणजे मित्र. खरंतर माझ्या आयुष्यात अशी मंडळी तशी फार कमी आहेच. आमचे फारसे भेटणे होत
नाही. पण जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा फारच गप्पा मारतो.
काही चुकीचे वाटले तर तेवढय़ाच हक्काने एकमेकांना सांगतो. आजवर आम्ही खूप गोष्टी एकमेकांसोबत शेअर करत गेलो. आमच्या
प्रत्येकाच्या पुढच्या संपूर्ण वाटचालीमध्ये तो काय करतोय कसे करतोय, त्याच्या काय समस्या आहेत, हे सगळे आम्ही एकमेकांशी
चर्चा करतो. त्याचे काही चुकीचे वाटले असेल तर हे तुझे फारसे
बरे झाले नाही असा सल्लाही देतो. मैत्रीत असतो ना एवढा हक्क
त्याला आणि तिला. अशीच असते ही मैत्री, जी जीवनाच्या प्रत्येक उंबरठ्यावर प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या मदतीला
धावते. तर सुखाचे क्षण व्दिगुणित करून दु:खाच्या समयाला विश्वासाचा आधार देते.
शेवटी
शुभेच्छांचा समारोप माझ्या सर्व मित्रमैत्रीणांचे आभार मानून इतकं नक्कीच सांगेल
की, हे आयुष्य म्हटले तर तुमचे आहे. अन एका कापडाच्या चिंधीत मावेल अशी आपली
मैत्रीही नाही. आपण माझ्याकरता कोण आहात हे शब्दात नाही सांगू शकत अन सांगायचेही
नाही. पण एका गोष्टीचं कायम वाईट वाटत रहातं की इतक्या मोठ्या मित्रमैत्रिणींच्या
गोतावळ्यात बहुसंख्य मित्रमैत्रिणी माझ्या कविता, लेख, स्टेटस कधी वाचत नाहीत. खूप
पकवतो मी असं तोंडावर सांगतात. पण शेवटी एकच विनंती आहे की काही चूकत असेल, पटत
नसेल तर जरूर सांगा. बदल घडेल. आजवरता बदल ही तुमचीच कृपा आहे. एक गोष्ट नक्की
सांगतो, भले मी ब्रॅंडेड गोष्टी वापरणारा नसेल पण मित्रपरिवार असा कमावला आहे की
कोणताच ब्रॅंड त्याची किंमत मोजू शकत नाही. तुमच्या साथीने आजवर जगलो याचा आनंदच
आहे. आयुष्याच्या प्रवासात अशा मित्र, मैत्रिणींची तर पावलोपावली
व्यक्तीला मित्राची गरज ही भासत असते. त्यामुळे आपल्या
आयुष्यातील प्रत्येक दिवस हा 'फ्रेंडशिप डे' म्हणून साजरा करा. मैत्री केवळ एका दिवसापूरती
मर्यादित न ठेवता युगांतरापर्यंत असीम, अमर्यादित ठेवून
तिच्यात ओतप्रोत प्रेमभावना सतत जागृत ठेवूया. आजचा मैत्री
दिन ही शपथ घेऊनच साजरा करूया. मित्र केले पाहिजे, मैत्रिणी केल्या पाहिजेत.
अशाच
या मैत्रीचा गौरव करणा-या फ्रेंडशीप डे साठी सर्व मित्रमैत्रीणींना
हार्दिक शुभेच्छा...
यारा...यारा...फ्रेंडशीपचा खेळ सारा....
गणेशदादा शितोळे
५ ऑगस्ट २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा