माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८


मसान ची जादू….
 

खूप दिवसानंतर आज कुठला चित्रपट पाहिला. अनेक दिवसांपासून मित्राने चांगला चित्रपट आहे म्हणून सांगून ठेवलेल्या मसान ची जादू आज अनुभवली. अगदी साधा अन सामान्य वाटणारा असाच. कुठलीही भव्यता, मारझोड शिवाय साकारलेला एक चांगला चित्रपट सर्वांत उंचावर आणि सर्वांत तळाशी समजल्या जाणार्‍या या तरूण भारताचा आपापल्या आयुष्याशी चाललेला संघर्ष मसानअतिशय संवेदनशीलतेने आपल्याला दाखवतो. मसान जरी गंभीर प्रकारचा चित्रपट असला तरी फ्रेश आहे. काहीतरी नवी, भावजाणिवा समृद्ध करणारी कलाकृती पाहिल्याचं समाधान देणारा आहे. मसानही तुमच्याआमच्या आजच्या आधुनिक पण सर्वसामान्य आयुष्यात कधीही येऊ शकणार्‍या दु:खाची वास्तववादी कहाणी आहे.

चित्रपटाचा शेवट एक अंधुक आशा सोडून जातो पण स्पष्ट काही सांगत नाही. त्यामुळे ती एक शोकात्मिका असली तरी शोकांतिका नाही. 'मसान' हा काही पॉप्युलर सिनेमा नाही. त्यात आजचे आघाडीचे समजले गेलेले कलावंत नाहीत. त्यात मुळात फारशी गाणी नाहीत आणि लोकप्रिय होतील अशी तर नाहीच नाही. तरीही एकदा चित्रपट सुरू झाला की, तो जबरदस्त वेगानं आपल्याला मूळ कथावस्तूकडे खेचून घेतो इतकी विलक्षण ताकद त्याच्यात आहे. मसान पाहिल्यावक एक जबरदस्त अनुभव आपल्यावर कोसळतो आणि त्यामुळे आपण अधिकच अंतर्मुख होतो.

काही चित्रपट कळण्यास कठीण असतात म्हणून नव्हे तर त्या चित्रपटात बुडी मारल्यावर समोर जे काही दिसतंय- त्यातून जे जाणवतंय- ते शब्दांत नेमकं पकडणे अधिकच त्रासाचं असतं. या चित्रपटातील चित्र बोलतात, दृश्य बोलतात, संवाद बोलले जातात, अतिशय हृद्य कथा असते, एकूण चित्रपटही काही ठाम विधान करतो पण एखाद्या डोंगरावर फिरताना भोवतालच्या ढगांतून चालावं, नी हळूहळू पूर्ण चिंब व्हावं पण नक्की कसे नी कधी भिजलो हे शब्दांत सांगता येऊ नये तशी आज माझी स्थिती 'मसान' हा चित्रपट बघून झाली आहे. मसानहा चित्रपट भारतीय माणसांवरील संस्कार, संस्कृती, समाज आणि रूढी-परंपरा यांच्या जोखडातून मुक्त होऊ पाहणाऱ्या तरुण मनांचा हुंकार आहे.

गंगेच्या तीरावरच्या दोन गोष्टी. एक गोष्ट संस्कृत पंडिताच्या घरातली (देवी) तर दुसरी डोम/खालच्या जातीतल्या घरातला (दीपक). दोन तीरावरच्या दोन गोष्टी. दोन समांतर चालणारे धागे. आणि यांना जोडणारी दुसऱ्या गोष्टीतील तो लहान मुलगा यावेळी ती ट्रिक दाखवतो. पहिल्या गोष्टीमधली अंगठी तो पाण्यातून शोधून काढतो आणि दुसऱ्या गोष्टीतील गरजू बापाला आणून देतो. अप्रत्यक्षपणे या दोन गोष्ठी जोडल्या जातात. अगदीच साधेपणाने तो प्रसंग खूप मोठा परिणाम करून जातो.

तू किसी रेल से अप्रतिम गाणं स्वानंद किरकिरेंना साकारलंय. अजून एक आवडलेली गोष्ट: "मसान" मध्ये "आई" हे पात्र जवळपास नाही. म्हणजे दोघंही पोरके नाहीयेत अजिबात, पण त्या दोघांचं आपापल्या वडिलांबरोबरच नातं इतकं सुंदर मांडलंय कि आई या पात्राची गरजंच भासली नाहीये. केवळ मूख्य पात्रंच नाही तर देवीच्या ऑफिस मधला सहकारी पण सांगतो "हम अकेले नही रेहते पिताजी के साथ रेहते है". लहानपणापासून चित्रपटात 'आई' या पात्राचे Trump Card वापरलेलं बघायची सवय लागून गेलीये, त्यामुळे "मसान"मध्ये वडील-मुलगा/वडील-मुलगी यामधील नातं बघणं खूप वेगळा, चांगला आणि आश्वासक अनुभव आहे.

चित्रपटाचा शेवट तर अप्रतिमच ! कस्तुरीच्या शोधासारखं ती दोघं भटकत असतात. जणू एकत्र येण्यासाठीच.आणि शेवटी गंगेच्या तीरावरच्या या दोन गोष्टी, दीपक आणि देवी, संगमावरच एकमेकांना भेटतात. पाण्यामधून ती होडी हळूहळू जाते. तो पाण्याचा आवाज, मागे वाजणारं गाणं, होडीचे पाण्यावर उठणारे तरंग. दोन मनांच्या आयुष्यांच्या संगमात एका आश्वासक उद्याची आशा अस्पष्टपणे जाणवते मसान मधून. प्राप्त परिस्थितीवर मात करून, तिच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जायलाच हवं, ह्याचं भान देवी आणि दीपक देऊन गेले. 'आयुष्य' आपल्याला जिथे नेतं, तिथे आपल्याला जावंच लागतं. त्या त्या ठिकाणी जाणं आणि तिथलंच होणं, हे जमवण्याची ज्याच्यात हिंमत असते, तो हा अनिश्चित प्रवाससुद्धा एक सोहळा बनवू शकतो.
"मसान" ची जादू या अशा लहान लहान गोष्टींमध्ये आहे. जिथे जीवनाचा शेवट होतो तिथे त्यांच्या जगण्याचा प्रारंभ होतो म्हणजे मसान. जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये असलेलं आयुष्य साजरं करायला विसरू नकाअशी टॅगलाइन देऊन गेला 'मसान'. मृत्यू ही एक सुरुवात असते. मागे राहिलेल्यांसाठी एकाच जन्मातली दुसरी आणि निघुन गेलेल्यासाठी नव्या जन्माची. सुरेश भट साहेबांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

'तू किसी रेलसी गुजरती है, मैं किसी पूलसा थरथराता हू' या मानवी भावना व्यक्त करणाऱ्या हिंदी कवी दुष्यंत कुमार यांच्या ओळी अन 'मसान'ची ओळख झाली आहे आयुष्यभराकरता.....


गणेशदादा शितोळे
०६ ऑगस्ट २०१८




रविवार, ५ ऑगस्ट, २०१८


माझ्या पहिल्या पुस्तकाची प्रस्तावना...

सलामत रहे दोस्ताना हमारा...!

प्रिय मित्रमैत्रिणींनो
          थँक यू. पुस्तकाची सुरवात थँक यू ने कधीच होत नसते हे खरं आहे. पण पुस्तक लिहिण्याच्या वेळी मी विचार केला तर मला या शिवाय दुसरी योग्य सुरवात सापडलीच नाही. मी तुमच्यासारखाच कॉलेजचा तरुण मुलगा. पण तुम्ही माझ्यासाठी लाखातून एक 'द स्पेशल वन' म्हणतात ना तसे आहात. कारणही तसंच आहे. आपल्या पहिल्या भेटीपासून ते इंजिनिअरिंगपर्यंतच्या प्रवासापर्यंत ही साथ कायम राहिली आहे. आईवडील नेहमी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत याकरीता धडपडत असतात. माझ्याही आईवडीलांनीही तेच केलं. आईवडीलांच्या उपदेशाचा या वयात रागच येतो. पण त्याच वेळी आपली भेट झाली. एक प्रेरणा देणारी मैत्री म्हणून बेस्ट लक म्हणत फॉरमँलिटी म्हणून का होईना प्रौत्साहन देणारी मैत्री कधी हक्काची झाली कळालंच नाही.
माझ्या जीवनात मैत्रीचा खूप मोठा वाटा आहे. जिवलग मैत्री होईपर्यंत किंवी अशी मैत्री करणारी व्यक्ती मिळेपर्यंत मी रागिटच होतो. तापट होतो. पण जसजसे नवनवीन मित्रमैत्रीणी भेटले तसतसा मी बदलू लागलो. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत गेलो. अनेक स्वार्थी नाही पण कामापुरता मित्र म्हणणारे भेटले. त्यांच्यापासून अनेक गोष्टी शिकलो. आणि आजही शिकत आहे. मी आज जो आहे त्याचं श्रेय माझ्या आईवडिलांइतकाच आपल्या मैत्रीलाही आहे.
लहानपणाचा मी आता खुप बदललो आहे. पूर्वी फक्त स्वतःपुरता विचार करणारा मी आता स्वतःच्या आनंदाचा विचार करण्याआधी दुसऱ्‍याच्या आनंदाचा विचार करतो. नेहमी आनंदी राहतो. कितीही दुःख असेल तरी चेहऱ्‍यावर नेहमी आनंद ठेवतो. आता या घडीला कुणासोबत भांडण नाही. प्रत्येक पहाट प्रसन्न वाटते. प्रॉब्लेम्स मला सुद्धा आहेत. पण परिस्थितीशी तोंड देण्यांचं आणि कोणतेही संकट 'फेस' करण्याचं सामर्थ माझ्याकडे आहे. ते फक्त मैत्री मुळेच. आता अर्धा भरलेला ग्लास बघण्याची सवय लागली आहे.
मी काही फार हुशार वगैरे मुलगा नाही. यशापेक्षा माझ्या वाट्याला अपयशच जास्त आलं. तरीही मी मोडून पडलो नाही. कारण एकच मैत्रीचा आधार. 'माय इन्स्पिरेशन' म्हणून मी नेहमी माझ्या मित्रमैत्रीणींकडेच पहातो. त्यांच्या अनेक आठवणी मी मनाच्या कोपऱ्‍यात साठवलेल्या आहेत. कधी सहज वाटल्यास एखाद्या निवांत संध्याकाळी माझ्या जगण्याला धीर म्हणून त्या आठवणीत रमण्याचा प्रयत्न करतो.
आयुष्याच्या वाटेवरून जाता जाता मागे वळून पाहावेसे वाटते. पुढे जाता जाता, थोडे थांबावेसे वाटते. इथवर आलो याचे कुतुहूल वाटते, जाता जाता थोडे स्वस्थ बसावेसे वाटते. थांबून जरा आजवरच्या प्रवासाचे पान उलगडावे वाटते, जाता जाता त्याबद्दल विचार करावेसे वाटते. सरत्या वर्षातल्या सुखदुःखाचा हिशेब मांडत ताळा करता येईल खरं तर या टप्प्यावर.
पण करायलाच हवा का?
पण वेळ होईल म्हणून पुन्हा एकदा उठावेच लागते, जाता जाता हेच दुःख अंगाशी बाळगत चालावेच लागते, चालावेच लागते.
तसे आपण प्रत्येकजण आपल्या कॉलेजच्या कट्ट्यावर, आपल्या खास अड्ड्यांवर भेटलो. परस्परांची सुखदुःख वाटून घेतली. कधी आपलं आयुष्य वाचता वाचता डोळ्यात टचकन पाणीच आलं तर कधी कुठल्याशा लेखातल्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या एका साध्याश्या वाक्याने आपण जगण्याचा नव्यानं विचार करायला घेतला. त्या साऱ्यातून एखाद्या साध्याश्या वाक्यामधून आपल्या कॉलेजच्या टीमलाही खास काहीतरी करण्याची नवी धडाडी सतत मिळत गेली. आपली 'मैत्री' अशी दिवसेंदिवस वाढतच गेली. परस्परांच्या मदतीने आपण समृद्ध होत गेलो. तसा क्वचित वादही घातला, टोकाची मतं मांडत चर्चा केल्या. जे आजिबात आवडलं नाही ते रोखठोक सांगून टाकलं. जीवाभावाची दोस्ती आपली. जीव लावणारी आणि मित्रमैत्रीणींसाठी जीवाचं रानं करणारीही! हक्कानं सांगणारी. अधिकारानं मागणारी.
इतक्या वर्षांचा आढावा घेताना मलाही वाटलं; एखादं पुस्तकचं 'मैत्री' वरच का असू नये? खास आपल्या सगळ्यांच्या आपल्या मित्रमैत्रीणींच्या मैत्रीवर !
आयडिया सुचली आणि नजरेसमोर उभा राहिली मैत्रीची शेकडो रुपं.
नुस्ती कल्पना करा, मैत्री किंवा मैत्री असा शब्द उच्चारला तरी मनात एक अवखळ लाटच येते. नजरेसमोर उभे राहतात आपल्या शाळेतले खास अड्डे. कॉलेजचे कट्टे. सबमिशनसाठी मारलेल्या नाईट्स आठवतात. एक प्लेट मिसळ तर्री टाकटाकून पाच जणांनी ओरपल्याच्या खास आठवणी. उडवलेल्या गाड्या आणि तुडवलेले रस्ते.. तासानतास मारलेल्या गप्पा. उसनवारीची पैसे. वडापावच्या पैजा. टाकलेले सिनेमे. घरी मारलेल्या थापा. पचवलले घोळ. रात्र रात्र केलेला कल्ला. अंगलट आलेल्या कुरपती. खुळचट गैरसमज नकोसे अबोले. डोकं भडकून केलेली भांडण. मग लावलेलं किलो किलो लोणी. होलसेलमधे खाल्लेला भाव. मित्रमैत्रीणींच्या नसत्या भानगडीत खुपसलेलं नाकं. ग्रुपमधील मित्रांच्या प्रेमाची केलेली राखण. त्यांच्यासाठी अरेंज केलेल्या सेटिंग्स. त्यांना आग्रहाने करायला लावलेले प्रपोज. त्यातून डोळ्यादेखत घडली मोडलेली 'प्रकरणं.'
काय आणि कसं मोलं लावणार आपल्या मैत्रीचं! यशाच्या पायऱ्‍या चढताना आणि अपयशाचे घाव सोसतानाही आपले मित्रमैत्रीणी सोबत आहेत. जगाने पाठ फिरवली तरी आपले मित्रमैत्रीणी आपल्याबरोबर असतील, आपल्यावर विश्वास ठेवतील ही भावना मोठमोठ्या संकटातून तगवून नेते. आपला छोट्यात छोटा आनंद मित्रमैत्रीणींबरोबर वाटला की तो कित्येक पटीने वाढतो. हा अनुभव तर नेहमीचाच. मैत्रीची सर कोणत्या नात्याला येईल? मैत्री असं नात्याचं नाव असलं तरी तिच्या छटाही व्यक्तीगणिक इतक्या बदलत जातात की केवळ मैत्री या नात्यात नाहीच बसवता येत त्या भावनेला !
फ्रेण्ड्स फॉरेव्हर असे आपण नेहमीच म्हणत असतो. तसे जर खरेच असेल तर हाताच्या कोपऱ्यापर्यंत फ्रेंडशिप बॅण्ड बांधून, मार्करने गिरगटून भरवलेले टि शर्ट कशाला हवे असतात. मोबाइलचा इनबॉक्स फ्रेंडशिपच्या मेसेजेसनी भरून वाहतो. स्वतःच्या मनातले काही नसते. इकडून तिकडून कॉपी पेस्ट झालेले सारे उसनीवारी पाठवतात. जर आपण सदा फ्रेंड्स फॉरेव्हर मानतो तर मग आपल्या मैत्राला का फक्त एक दिवसच साजरा करावा लागतो.
'रिश्तोंका इल्जाम' तसाही या मैत्रीला मान्य नाही. ती फक्त असते. तिची ना काही व्याख्या करता येते ना तिला जगाच्या व्यवहारातील काही नियम कळतात. ना तिला स्त्री पुरुष संबंधाच्या चौकटी बांधता येते. आजच्या पिढीतल्या आपल्याला विचारा स्त्री पुरषांमधे शुद्ध मैत्री असते की नसते असले खुळचट प्रश्न आपल्याला पडत नाहीत, त्यापलीकडे या मैत्रीने आपली निर्मळ जागा तयार केलीय. जिवाभावाचा एकच मित्र किंवा एकच मैत्रीण अनेकांना असते. 'जान से प्यारी दोस्ती' अनेकजण जगण्याच्या प्रत्येक प्रसंगात निभावतात. पण एकाच माणसाभोवती आयुष्य गुंफण्याची ही रीतही या नात्यानं मोडलीय. मोठा मित्र परिवार. त्याची सतत साथ पाठींबा. आणि त्यांचं असणं ही अनेकांच्या आयुष्याची खरी पुंजी झालेली दिसते.
एकीकडे माणसांच्या नात्यांवर अविश्वासाच्या सावल्या गडद होत असताना, नाती तुटत असताना मैत्रीच्या नात्याने मात्र नवीन माणसांचे परिवार तयार केले आहेत. साऱ्‍या भेदांच्या पलीकडे ही मैत्री माणसांतला स्नेह व्यापून उरलीय. मैत्रीच्या नात्याचा असा सुंदर वेध घेणारे, त्यातले पदर उलगडून दाखवणारे. मैत्रीच्या रंगानी खुललेल्या आयुष्यातला आनंद वाटणारे धावणाऱ्‍या आयुष्यात मागे पडलेल्या मित्रांसाठी काही काळ थांबून त्यांना हात देणारे हे विशेष पुस्तक.
हे विशेष पुस्तक वाचताना, आठवलेच काही दूर गेलेले मित्रमैत्रीणी तर त्यांना लिहा एखादं पत्र. करा एखादा मेसेज, रागावला असेल तो /ती तर फोन करुन सॉरी म्हणून टाका. वेळ नाही या सबबीखाली केलाच नसेल खुप दिवस फोन तर तातडीने लगेच नंबर फिरवा. आणि भेटलाच नसाल बरेच दिवस तर हातातली कामं सोडा आधी भेटून गप्पांचा अड्डा जमवा....
बघा जुने मित्र नव्याने भेटतील आणि नवे कायम आपले होऊन जातील. असं म्हणतात तुमच्या डोळ्यात दोन आश्रू आले तर तो टिपायला किती मित्रमैत्रीणींच्या ओंजळी पुढे येतात यावर ठरते माणसाची श्रीमंती.
आपण सारे असेच श्रीमंत होऊ....

समर्पित
हे पुस्तक माझ्या जिवलग मित्रमैत्रिणींना आणि आमच्या मैत्रीला समर्पित.

अनिकेत पटने, रोहन हिंगे, सागर लडकत, अक्षय निंबाळकर, विशाल देशमुख, ओंकार काळभोर, कार्तिक उडताले, अक्षय खवले, विपुल गिरमकर, रोहित देशमुख व बाकी साधना विद्यामंदीर, हडपसर मित्र परिवार.

वैभव पाचपुते, दत्तात्रय गायकवाड, वैभव कोकाटे, अमोल कोकाटे, धनंजय पाचपुते, राहुल पांडकर, राहुल सुर्यवंशी, विकास शिंदे, तुषार शिंगाडे, श्रीपाद राऊत, राहुल पठारे, पराक्रम शिंदे व बाकी जनता विद्यालय, काष्टी मित्र परिवार.

सागर भगत, ऋषीकेश बांडे, मोहन भुजबळ, विशाल वागस्कर, सावन मुनोत, किशोर व्यवहारे, सचिन कराळे, प्रवीण शिंदे, प्रतिक सोनावणे, प्रमोद लहाकर, सनी कानडे, हेमंत घोडे, विवेक नांगरे, सागर पाटील, सागर गडकर, सुहास गवळी, मोनीश मांढरे, अमर आंबेकर, सुरज जोशी, राहुल घोटेकर, निलेश घोटेकर, अभिजीत गोसावी, राम केळुसकर व बाकी शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर (मेकॅनिकल) मित्र परिवार.

राहुल गिऱ्हे, महेश आडेप, संतोष गाढवे, नंदकिशोर मोरे, स्वप्निल कोकाटे, बाळासाहेब खाडे, मेघराज जाधव, महादेव दोलनार, व बाकी शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर (संगणक विभाग) मित्र परिवार.
प्रशांत थोरात, राहुल गाढवे, सागर गाढवे, राहुल काकडे, सचिन भुसाळ, गणेश रायकर, निखील जाधव, परिक्षीत उगले, रामकृष्ण ढोकणे, विक्रम धाकतोडे, विशाल चेके, सुहास क्षीरसागर, वैभव साठे, संदिप आंधळे व बाकी वस्तीगृह, शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर मित्र परिवार.

प्रसन्ना गोडसे, अविनाश घोसाळकर, नाना मैंदाड, निखील पाटील, उमेश निंबाळकर, मनोज होलम, निखिल इंदलकर, मंगेश पोपळे, योगेश गारूडी, सचिन खरात, शिवप्रसाद शर्मा व बाकी शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर (विद्युत व संदेशवहन विभाग )  मित्र परिवार.

अबोली पाटील, आरती दळवी, प्रचेता गवारे, प्राची ठुबे, पुजा कोहक व व्हायरस ग्रुप.

मंगेश मोरे, श्रीकांत नागवडे, रोहित ननावरे, महेश बांडे, श्रीराम पवळे, निलेश शितोळे, स्वप्निल साळुंखे, रोहित साठे, जयदिप नलावडे, श्रीकांत इंगावले, महेश वारे, प्रनित समगीर, विकास डोंगरे रौनक नय्यर, कृष्णा साठे, प्रशांत पाचपुते, निलेश कोलते, प्रमोद मुरकुटे, प्रविण गाडे, आभाश शुक्ला, अल्पेश कराडे, स्वप्निल खंदारे, उमेश फडतारे, प्रशांत निंबाळकर, संजय शेळके व बाकी परिक्रमा अभियांत्रकी महाविद्यालय, काष्टी (यंत्र विभाग)  मित्र परिवार.

प्रशांत जगताप, अभिषेक पाचपुते, सोनल गवते, चेतन भापकर, रोहित सांबरे, वैभव सोनावणे व बाकी परिक्रमा अभियांत्रकी महाविद्यालय, काष्टी (स्थापत्य विभाग)  मित्र परिवार.

दादासाहेब कर्पे, अक्षय खैरे, विलास पुंड, अविनाश निंबोरे, प्रवीण जामदार, रोहित अहिरराव, निलेश साळुंखे, अविनाश कुसमुडे, अशोक चांडे, अक्षय लगे, महेश थोरात, सोमनाथ जाधव, राहुल मेरगळ, युवराज कुद्री, संदीप सोनटक्के, आशुतोष लांडे, शुभम जाधव, अक्षय कदम, प्रविण कुसमुडे व बाकी भोईटे रेसिडेन्सी, काष्टी मित्र परिवार.

गणेश शिंदे, सागर भोसले, आशिष शिंदे, अविनाश रणमोडे, किरण साळुंखे, दिपक जाधव, सुधिर पवार, धिरज जाधव व बाकी वृंदावन मित्र परिवार.

मनोहर रोहकले, अमोल जाधव, रिषभ शुक्ला, अभयसिंह राजेभोसले, सागर राजपुरे, श्रीकांत रासकर, विशाल सुर्यवंशी, प्रशांत चौधरी, प्रमोद रणदिवे, शेखर मोरे, रोहित बनसोडे, रणजीत ननावरे व बाकी परिक्रमा अभियांत्रकी महाविद्यालय, काष्टी (विद्युत व संदेशवहन विभाग)  मित्र परिवार.

श्रीकांत शितोळे, योगेश डोके, सागर पवार, सतीश डोके, राहुल सुपेकर, सुहास डोके, सागर काळे, गणेश डोके, रणजीत गिरमकर, तेजस तावरे, अमोल शिर्के व मित्र परिवार

किशोर खेडकर, प्रमोद बेंडभर, ओकार हंडोरे, योगेश कारंडे, प्रताप गवळी, विशाल खोरे, घणशाम पाटोळे, किरण दिवटे, सचिन उंडे व मित्र परिवार.

महेश जाधव, वैभव जाधव, आशिष मोगल, सुरज कांबळे, मंगेश बारवकर, सागर जगताप, ऋषिकेश जगताप,नागेश जगताप, विकास इथापे, मनोज कानवडे, गुलाब आवारी, सचिन चव्हाण, आशिष पाटील, निखिल महाजन व इतर प्रायमस टेकसिस्टिम मित्र परिवार.




गणेशदादा शितोळे
०५ ऑगस्ट २०१८



मैत्रीदिनाच्या लाख लाख शुभेच्छा...!!!

गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवसानिमित्ताने काही राहून गेलेलं लिहीण्यासाठी जंगी तयारी चाललेली होती. बाहेर फ्रेंडशिप बॅंडपासून गिफ्टपर्यंतच्या वस्तूंनी दुकाने ओसंडून वाहताना पाहिल्यावर मैत्री दिवस साजरा करण्याची खरोखरच गरज आहे काय़ असा प्रश्नही पडला. मैत्री एकाच दिवसाचीच आणि फ्रेंडशिप बँडच्या किमतीएवढीच आहे का असं राहून राहून वाटलं. मैत्री ढोलताशे पिटून वा कापडं गुंडाळून व्यक्त करण्याची बाब नाही, तर ती मनातून जोडली जाते. पहिल्या पावसानंतर येणार्‍या मातीच्या सुगंधासारखी धुंद व हळुवार वार्‍याच्या स्पर्शासारखी सुखद जाणीव देणारी असते. अशा या नात्याला पैशांत तोलणे म्हणजे या निर्मळ व पवित्र संबंधाचा अपमान नव्हे काय अशा विचाराचा मी आज त्याच एका दिवसाकरता लिहीताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पण मी आजही मैत्री ही काही एक दिवस साजरा करण्याचीही बाब नाही याच विचाराचा आहे. अजूनही मला वाटतं की जीवनातील प्रत्येक क्षणी मैत्रीचा सोहळा साजरा करायला हवा. हे वाटण्यामागची भावनाच मुळात त्यातून आली आहे कारण सध्या तसं काहीच आपल्या आयुष्यात घडत नाही. आजच्या झकपक, दिखाऊ जीवनशैलीत माणूस पैशाच्या मागे धावणाऱ्या रोबट सारखा झाल्याने मैत्रीचा अर्थ पार हरवल्यागत झाला आहे. म्हणूनच हा दिवस साजरा करण्याची गरज भासायला लागली आहे.
मैत्री. तसा इतर शब्दांसारखाच एक शब्द. पण विचार करायचाच ठरवला तर अनेकांना संशोधन करून पदव्या देईल असं शब्दाचं विद्यापीठ म्हणजे मैत्रीच ठरेल. मैत्री हे खरेतर केवळ दोनच शब्द पण अवघं ब्रम्हांड कवेत घेण्याचं ज्यात सामर्थ्य आहे असे ते शब्द. मैत्रीची निश्चित व्याख्या सांगणं किंवा नेमक्या शब्दांत वर्णन करणं महाकठीण. मैत्री अंत:करणातून जोडली जाते. मैत्री ही निरंतर वाहणाऱ्या निर्झरासमान निर्मळ व तितकीच हळवी असते. वर्षा ऋतूच्या  आगमनानंतर  येणार्‍या मातीच्या सुगंधासारखी, शीतल हवेच्या झुळूकासारखी व मनाला उभारी देणारी असते.
शरदाचं चांदणं, वसंताचा बहर, श्रावणाची पालवी या सर्वांहून अधिक मनमोहक आकर्षक कोण?, असा प्रश्न विचारला असता तर मैत्री हेच शब्द कानावर पडतील. असं बरंचस लहानपणापासून ऐकत आलो आहे आपण. पण हे सगळं खरंच तसं आहे का ते अनुभवल्याशिवाय कळत नाही. कारण मैत्री रोपटं जमिनीत पूर्णपणे रुजलं त्याचा गाभा शोधणं केवळ अशक्य असतं.  मैत्री कशी असते, कधी होते कोणासोबत आणि का होते? हे कोणालाच कधीही कळत नाही. मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज कशाचंच बंधन राहत नाही. मला विचारलं तर मी मैत्री म्हणजे माणूस असण्याची सुरवात समजतो. म म्हणजे एक तर मैत्री अन दुसरं माणूस.
जन्माला आल्यावर पाळ्यात असतानाचा खुळखुळा आपला पहिला मित्र. त्याच्या सहवासाने आपण आनंदून जायचो असा मित्र. नंतर आपण पहिल्यांदा जेव्हा शाळेत जातो, तेथे आलेल्या आपल्यासारखे इतरांना पाहतो. त्यांच्यातील ठराविक मुला-मुलींशी आपण बोलतो, शाळेच्या मधल्या सुटीत डबा खातो, मस्ती करतो, खिदळतो बस्स तेव्हापासून व्यक्तिच्या जीवनात अधिकृतपणे 'मित्र' नावाच्या पात्राची 'एंट्री' होते.  
आई आणि मुलगा या नात्यानंतर सर्वात विश्वसनीय आणि प्रेमाचे नाते म्हणजे मैत्री. मैत्री म्हणजे खांद्यावर हात आणि सदैव साथ. खरे मित्र जीवनाच्या वाटेवर साथ सोबत करतात, प्रसंगी रागवतात, समजूत काढतात, यशापयशाच्या गणिताचे मूक साक्षीदार बनतात. आजच्या या युगात आणि मुक्त विचारधारेत मैत्रीची व्याख्या बदलली आहे. काही वर्षांपूर्वी आई-वडील व मुलांमध्ये एक दुरावा होता. मुले आई-वडिलांसमोर स्वत:चे विचार मुक्तपणे मांडायला घाबरत होती, पण आज त्यांच्यामध्ये मैत्रीच्या नात्याची जोड झालेली आहे. हा बदल एका दृष्टीने चांगला आहे.
कोणतीही गोष्ट समजायला उमजायला आवश्यक असतो तो त्याचा नाद असणे. मला मैत्रीचा नाद लहानपणीच जडला.  म्हणजे तसा तो प्रत्येकालाच जडतो. मैत्रीचा नाद. कायम मित्रांच्या घोळक्यात रहायची सवय असल्याने आजही एकटा असलो की माझा जीव घुटमळतो. शाळा. महाविद्यालय जस जशी बदलत गेलो तसतशी आसपासची माणसं बदलत गेली. एकाची जागी दुसऱ्याने घेत गेली. पण मैत्रीचं नातं तसंच ठेवून नवी नाती रूजली. वय वाढत गेले तसे तसा मित्रांचा घरचा वावर वाढायला लागला. सोबत चार टाळकी दिसली तरी घरी चिंता करणे सुरू व्हायचे. नेमके याचे मित्र किती...? अनेकदा चारंच पण चांगले मित्र असावेत या सल्ल्याची पारायणंही झाली. पण मी मात्र मित्र जसेच्या तसे स्विकारले. त्यांच चिंता करणंही तसं स्वाभाविक होतं. कारण माझ्या मित्रमंडळीमधे जेवढे शिकलेले तेवढेच उनाडक्या करणारे हुकलेलेही होतेच. मी असाच त्यांच्यासोबत रहायला लागलो तर कसं व्हायचं असा भला मोठा प्रश्न. एक काळ होता की मित्र घरी येणार म्हटले की घरी सुरूंग लागल्यासारखाच धमाका व्हायचा. त्यात आसपासची फुकटात सल्ला देणारी मंडळी होतीच की. हे पोरगं वाया जाणार असा सिद्धांत मांडल्यासारखा आव आणूत असायचे. पण मैत्री हे असे एक रसायन आहे की ज्यात आपण कोणताही रंग मिसळला तरी त्याचा रंग बदलतो अन आपणच मिसळलो तर एक होऊन जातो.
यारा यारा, फ्रेंडशीपचा खेळ सारा असं म्हणत महाविद्यालयीन जीवनात दुनियादारी पूर्ण केली. भांडणतंटे, खुन्नशी, प्रेमप्रकरणं, मारझोड काहीही चूकलं नाही. फरक इतकाच होता की श्रेयाची भूमिका वठवण्याऐवजी दिग्याच संचारत राहिला. ही दुनियादारी करीत असताना मैत्री नात्याला अनन्यसाधारण महत्त्व येत गेलं. कारण मैत्री हे दोन शब्द उच्चारताच हृदयाच्या कोंदनामध्ये, आठवणींच्या मखमली कापड्याने गुंडाळेली एक प्रतिमा उभा रहात गेली. १७ मित्रांची प्रेमप्रकरण आज एकत्र नांदत आहेत कारण दिग्या कायम श्रेयस सारख्यांना शिरीण मिळवून देण्याकरता झटला. आजही अनेक मित्र हक्काने मदत मागत असतात. प्रेमप्रकरण त्यांची, रूसवेफुगवे त्यांचे अन समजूत काढायला चार शब्द लिहून द्यायला मी असतोच. मध्यांतरी असाच एका मित्राचा फोन आला की दादा मैत्री अन प्रेम या मधल्या अंतरावर काहीतरी लिहून द्या की माझ्या भावना पोहचतील.
अनेकदा असंही झालं ती एकदा काम झालं की कोण दादा अन कोण काय. साधा फोन करायलाही महाग होऊन बसतो. असं असलं तरीही मैत्री टिकवण्यात बेस्ट कोण मुली की मुलं?  असा प्रश्न विचारला तर दोस्ती के मामले में मुलंच बेस्ट आहेत असंच मी म्हणेल. मुली-मुली बेस्ट फ्रेंड्‍स असतील, त्यांची मैत्री जगावेगळी असेलही, मैत्रिणी एकमेकींसोबत अनोखं बाँडिंगही शेअर करत असतील हे सगळं खरं असलं तरी आयुष्यभराच्या मैत्रीसाठी दोस्तंलोकच हवेतंच. मित्रांच्या गरजेला धावून येणारे, मित्रांच्या आनंदासाठी आपला आनंद बाजूला ठेवणारी पोरंच असतात हे जाणवतं. एकदा मैत्री झाली की झाली. ती आयुष्यभर टिकवायची. मुलांचा हाच बाणा असतो. गरजेच्या वेळी तुमचा दोस्त हजर असलाच पाहिजे. मुलं मैत्रीचं मोल मुलींपेक्षा थोडं जास्त जाणतात. संकटातून सोडवण्यासाक्ष अर्थातच दोस्तावर सहज विश्वास टाकता येतो. मुलीही मैत्रीला जागतात. पण दोस्तासाठी एक पाऊल पुढे टाकताना पोरं मागे-पुढे पहात नाहीत हे नक्की.
मैत्री हे नाते रक्ताचे नसले तरीही त्या नात्याला श्वासाइतके महत्त्व आहे. कारण या नात्यामध्ये असणारा आपलेपणा, विश्वास, आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संकटसमयी धावून येण्याची जिद्द हेच होय. या शुध्द भावनांच्या आधारावर असणारी मैत्री ही कोणाबरोबर असावी याचा काही नियम नाही. मैत्री ही लहानांची मोठ्याशी, मुलाची मुलीशी तर संकट समयी धावून येणा-या प्रत्येक व्यक्तीशी आपली मैत्री असते. या मैत्रीला कोणत्याही भेदभावाचा डाग नाही. त्यामुळेच या नात्याचे महत्त्व रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे आहे. आम्ही मित्र एकमेकांशी भावाप्रमाणेच वागतो. या मैत्रीला काही नियम आणि कायदे असतात अन हे नियम आयुष्यभर पाळलेही जातात. मित्रांचा ग्रुप एकमेकांना स्पेस देतो. प्रत्येक गोष्ट शेअर करायलाच पाहिजे, असं काही त्यांच्यात गरजेचं नसतं. आपल्या मित्रांकडून त्यांच्या फारशा अपेक्षा नसतात. असल्या तरी त्या वास्तववादी असतात.
मैत्रीचं नातं हे विश्वासावर टिकत असतं. तसेच मैत्रीत भावनांना खूप महत्त्व असते. आपल्या मित्राच्या भावना दुखणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागत असते. परंतु कधी कधी या भावनांच्या गोंधळात मैत्रीला तडा जाते आणि सुरवातीला 'ही दोस्ती तुटायची नाय' म्हणणारे सहज दोस्ती तोडून मोकळे होतात.
कुणीतरी म्हणून ठेवलंय, ”The language of friendship is not words but meanings” खरंच मैत्री ही निरपेक्ष असते, एकमेकांच्या सुख-दु:खात लोण्यासारखी मुलायम व उर्जा देणारी असते. मैत्री ही ठरवुन होत नाही, तिचे कसलेच नियम नसतात, अपेक्षा आणि उपेक्षा तर मुळीच नाही. मित्र हा विविध भूमिकेत असतो. कधी सुख-दु:ख वाटणारा तर कधी संकट प्रसंगी मदतीला धावणारा, कधी विवाहाच्या दिवशी मिरवणुकीत खांद्यावर घेऊन नाचणारा तर आयुष्याच्या संध्याकाळी तिरडीला खांदा देत स्मशानापर्यंत साथ देणाराही असतो.
मित्र म्हणजे मी कुठलीही गोष्ट त्याच्याशी शेअर करू शकतो किंवा कुठलीही गोष्ट तो हक्काने मला बोलू शकतो एवढं घट्ट नातं. काही माणसे असतात ज्यांच्यासमोर आपल्याला काही सिद्ध करावे लागत नाही असे व्यक्तिमत्त्व म्हणजे मित्र. खरंतर माझ्या आयुष्यात अशी मंडळी तशी फार कमी आहेच. आमचे फारसे भेटणे होत नाही. पण जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा फारच गप्पा मारतो. काही चुकीचे वाटले तर तेवढय़ाच हक्काने एकमेकांना सांगतो. आजवर आम्ही खूप गोष्टी एकमेकांसोबत शेअर करत गेलो. आमच्या प्रत्येकाच्या पुढच्या संपूर्ण वाटचालीमध्ये तो काय करतोय कसे करतोय, त्याच्या काय समस्या आहेत, हे सगळे आम्ही एकमेकांशी चर्चा करतो. त्याचे काही चुकीचे वाटले असेल तर हे तुझे फारसे बरे झाले नाही असा सल्लाही देतो. मैत्रीत असतो ना एवढा हक्क त्याला आणि तिला. अशीच असते ही मैत्री, जी जीवनाच्या प्रत्येक उंबरठ्यावर प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या मदतीला धावते. तर सुखाचे क्षण व्दिगुणित करून दु:खाच्या समयाला विश्वासाचा आधार देते.
शेवटी शुभेच्छांचा समारोप माझ्या सर्व मित्रमैत्रीणांचे आभार मानून इतकं नक्कीच सांगेल की, हे आयुष्य म्हटले तर तुमचे आहे. अन एका कापडाच्या चिंधीत मावेल अशी आपली मैत्रीही नाही. आपण माझ्याकरता कोण आहात हे शब्दात नाही सांगू शकत अन सांगायचेही नाही. पण एका गोष्टीचं कायम वाईट वाटत रहातं की इतक्या मोठ्या मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात बहुसंख्य मित्रमैत्रिणी माझ्या कविता, लेख, स्टेटस कधी वाचत नाहीत. खूप पकवतो मी असं तोंडावर सांगतात. पण शेवटी एकच विनंती आहे की काही चूकत असेल, पटत नसेल तर जरूर सांगा. बदल घडेल. आजवरता बदल ही तुमचीच कृपा आहे. एक गोष्ट नक्की सांगतो, भले मी ब्रॅंडेड गोष्टी वापरणारा नसेल पण मित्रपरिवार असा कमावला आहे की कोणताच ब्रॅंड त्याची किंमत मोजू शकत नाही. तुमच्या साथीने आजवर जगलो याचा आनंदच आहे. आयुष्याच्या प्रवासात अशा मित्र, मैत्रिणींची तर पावलोपावली व्यक्तीला मित्राची गरज ही भासत असते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा 'फ्रेंडशिप डे' म्हणून साजरा करा. मैत्री केवळ एका दिवसापूरती मर्यादित न ठेवता युगांतरापर्यंत असीम, अमर्यादित ठेवून तिच्यात ओतप्रोत प्रेमभावना सतत जागृत ठेवूया. आजचा मैत्री दिन ही शपथ घेऊनच साजरा करूया.  मित्र केले पाहिजे, मैत्रिणी केल्या पाहिजेत.
अशाच या मैत्रीचा गौरव करणा-या फ्रेंडशीप डे साठी सर्व मित्रमैत्रीणींना हार्दिक शुभेच्छा...
यारा...यारा...फ्रेंडशीपचा खेळ सारा....


गणेशदादा शितोळे

५ ऑगस्ट २०१८