मला भेटलेला आनंदयात्री – महेश वारे
खरंतर हा लेख खूप अगोदरंच लिहायला घेतला होता. परंतू तो अपूर्ण राहिला अन तसाच अडगळीत पडल्यासारखा झालं. नुकताच महेशचा वाढदिवस होऊन गेला. खरंतर तेव्हाच प्रकाशित करायचा होता. परंतु काही मित्रांच्या व्यस्त कार्यक्रमाने ते जमलं नाही. शेवटी न रहावून आज ते पूर्णत्वाला घेऊन जात आहे.
महेश वारे. एक दिलखुलास व्यक्तिमत्व. शब्दांचा कीस काढणारा, कोणत्याही शब्दाचा अर्थ गंभीरपणे सांगून हसवणारा. तो जेथे जायचा तेथे सतत मित्रांचा गराडा. मित्रांमध्ये तो फारच प्रिय होता. तो असला की हास्याची कारंजी फुटत. मला भेटलेला आनंदयात्री या लेखमालेत एकदम योग्य व्यक्तिमत्व म्हणतात ना अगदी तो तसाच आहे.
तो तसा म्हटलं तर आमच्याच ग्रुपमधला. म्हणजे मी तरी अजूनही तसंच मानतो. अभियांत्रिकी महाविद्यालय संपल्यानंतर एकसंध असणाऱ्या आमच्या समुहाची शकलं पडली. तीस पसतीस जणाचा समुह विखरून गेला. अगदी झाडाची वाळलेली पानं वाऱ्यासारखी वहावत जातात तसा. पण कोणाचं लग्न किंवा इतर काही कार्यक्रम असला की एकत्र जमतो. म्हणून मी आजही आमचा एकच समुह असल्याचं समजतो. त्याच नात्याने तो माझ्या इतर जवळच्या मित्रांसारखाच एक मित्र.
तो म्हणायला गेलं तर तसा लाघवीच. एकदम प्रसन्न चेहरा. नेहमी काहीतरी गमती जमती सांगून सगळ्यांना मनमुराद हसवणारा. अन सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा. एखाद्या गोष्टीवर गंभीरपणे बोलायला लागला असं क्वचितंच झालंय. हा पण बोलायला लागला की असा बोलायचा की सारं काही विसरून त्याचं बोलणं ऐकत राहावंसं वाटे. त्याच्या आयुष्यातील कित्येक गोष्टी तशा का होत्या हे मला त्याचा जवळचा मित्र असूनही समजल्या नव्हत्या. कदाचित त्यालाही त्या समजल्या नसाव्यात. त्यापैकी एक म्हणजे हसऱ्या चेहऱ्यमागचा खराखुरा तो. खराखुरा तो यासाठी की माणसात कायम दोन स्वत्व लपलेली असतात. एक शरीराने असणारा तो. अन एक मनानं असणारा तो. एका नाण्याच्या भिन्न बाजू असतात अगदी तसं. म्हणून त्याच्यातला दुसरा अजूनही समजला नाहीच.
महेशची आणि माझी पहिली भेट नेमकी कधी अन कशी झाली आठवत नाही. द्वितीय वर्ष आभियांत्रिकीच्या वर्गात तसा माझा आणि महेशचा लगेच संबंध आला नाही. तो प्रथम वर्षातून उत्तीर्ण होऊन आलेला अन आम्ही आम्ही पदविका करून आलेलो. एका अर्थाने आमचा थेट प्रवेश घेणारांचा समुह मोठा असल्याने आमच्या लेखी तशी मुठभर प्रथम वर्षातून आलेल्यांची खिजगणतीही नव्हती. पण तरीही महेशला भेटलो असावा ते हिरडगाव कारखान्याला अभ्यासभेट देण्याच्या वेळीच. कारण तेव्हा मी शेवटच्या बाकावर एकटाच गाणी ऐकत बसलो होतो. शेजारी आमचे शिक्षक वाघोडे सर अन सोबत काही मुलं चेष्टामस्करी करत बसलेली होती. आमच्या भाषेत टुकारपणा करणारी. म्हणजे आमच्यासारखेच. तेव्हा खऱ्या अर्थाने जाणीव झाली की ही सगळी मंडळी आपल्या समुहाचा लवकरंच भाग असणार आहेत.
महेशशी संबंध आला तो खऱ्या अर्थाने तृतीय वर्षाच्या पहिल्या सत्रात. त्या पहिल्या सत्रात आमच्या वेळापत्रकात दुपारी महाविद्यालय नव्हतेच. आम्ही क्रिकट अन पत्ते खेळण्यातच मग्न असायचो. कधीकधी तर महेशच्या खोलीवर रम्मीचा असा डाव रंगायचा की दिवस कसा निघून जायचा कळत नसायचं. संध्याकाळी एकदम जोशात क्रिकेट खेळणंही रोजचंच. सोबत मी अनुत्तीर्ण झाल्यानंतर सगळ्यांना अवघड वाटणारा काळे सरांचा कोनॅम विषय लिलया शिकवताना येणारी मजा वेगळीच.
महेश म्हणजे फक्त खळखळून हसणे. पांचट विनोद हा नवीन प्रकार रूजवला तो त्यानेच. पिजे हीच आमच्या समुहाची ओळख निर्माण झाली होती. त्यात त्याला साथ द्यायला निलेश, श्रीकांत, संजय असी मंडळी होतीच. आमच्या महाविद्यालयीन जीवनात तर तो विनोदाचा शिडकावाच करत. पण अनेकांच्या तो पांचट विनोद करत फिरक्याही घ्यायचा. पिजे हे फक्त निमित्त होतं. पण यात वारेचा मामा कधी झाला मलाच काय पण कोणालाच कळलं नव्हतं. पीजे समुहाचा अध्यक्ष म्हणण्यापेक्षा आम्हाला त्याला मामाच म्हणायलाचं आवडायचं नव्हे तर आजही म्हणतोच. कारण कोणाला मामा म्हटलं की कोणी मामा होत नसतं. आपल्या विनोदाने त्याने आमचं महाविद्यालयीन जीवन हसरं केलं होतं.
आम्ही कधी एकमेकांवर रागवल्याचं मला आठवतंच नाही. रागावण्याशिवायही नातं टिकतं हे त्याच्यामुळेच कळलं आहे. मी कधी चुकलो तरी त्याने हक्काने सांगितलं. मागे एकदा व्हाट्सअप ग्रुपवर बोलायचं मी सोडून दिलं होतं. त्याला निमित्त होता तो महेशच. “दादा बास झाले तुमचे तत्वज्ञान. तुमच्याकडेच ठेवा ते. आम्ही एवढ्या बारीकसारीक गोष्टीचा नाही हो विचार करत. जो दिवस आहे तो आनंदात घालवायचा. प्रत्येकाला आपली मतं असतात आणि प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पटतील असंही नाही. अन मीही वाद घालण्यासाठी नाही तर माझं मतं मांडतोय.” असं बरंच काही लांबवर होतं. तो बोलल्याचं तेव्हा वाईट वाटलं पण नंतर चूक काय बरोबर काय हे कळलं. त्याचं शेवटचं वाक्य आजही लक्षात आहे. “अन शेवटी एकच सांगतो तुझं लिखाण आम्हाला काहीतरी प्रेरणा देणारं आहे. दादा इथून पुढे काही लिहीताना आमचा पण विचार करत जा, आमची पण मतं लक्षात घेत जा. आपल्याला वाटेल तसं जगायचं. अन काही गोष्टी आपल्याला जितक्या माहीत आहेत तितक्याच बऱ्या आहेत.”
तो कधी टोचून बोलला. तर कधी त्याने बिनधास्तपणे कौतुकाचे चार शब्दही ऐकवले. माझ्या लिहीण्याच्या प्रवासातला तो एक वाचक आहे, की जो कायमच मला लिहीण्याकरता प्रोत्साहन देत असतो. मागे मी महाविद्यालयीन काळातील आठवणी पुस्तकात उतरवण्याची कल्पना त्याला सांगितली. त्यावर त्याने एकट्यानेच त्याचं मत दिलं. बाकी मित्रांनी ती टिंगलीवारीच नेली. असो. त्यालाही सुरवात झाली आहेच.
महाविद्यालय संपलं. अन आम्ही स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत तलवारी घॆऊन निघालो. प्रत्येक जण नोकरी करण्याच्या शोधात वाट भेटेल तिकडे गेले. मीही सरते शेवटी उशीरा का होईना कामासाठी पुणे गाठलंच. आता जवळपास सर्वांना चांगल्या कंपनीत नोकऱ्या मिळाल्यात. आयुष्याच्या गाडीने जसा वेग घेतला तशी जुनी स्टेशनं आता बरीच मागे गेली होती आठवड्याला होणारा आमचा फोन कधीतरी होऊ लागले. इतरांचं माहित नाही पण त्याचं अन माझं बोलणं नव्हेच फक्त चॅटींगचं होतं. अन अशातच मागच्या वर्षी त्याची वाढदिवसाच्या दिवशी भेट झाली. जंगी अपेक्षित नव्हतंच पण वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं. अनेक गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर नियमित अंतराने आम्ही भेटतंच राहिलो. कधी मित्राच्या साखरपुड्यात तर कधी लग्नात.
महेशविषयी मांडलेली काही मित्रांनी मतं. खरंतर मला ती अनुवादीत करायची होती. पण नको ती जशीच्या तशीच अगदी चांगल्या पद्धतीने मांडली जातील.
"My engineering college was in a rural place, thus there was no means of 'entertainment' as like we see in other colleges. There was no ''greenery' at all...I hope you understand what 'greenery' means and so the college seemed boring for many of us. But I was lucky enough to have a friend who could create any sort of humor in any condition instantly! We laughed and kept laughing till completing the final year. He set a trademark of his jokes, no one could beat him. He was witty and had great presence of mind. We developed our own set of jokes and followed him. We soon named this funny gang as 'Pungas' group!!! We entertained ourselves for the years and this developed a bond between us which keeps on strengthening even if we are miles apart from each other. The prime reason for this was our handsome, humorous, ever smiling friend Mahesh Ware. Amongst many other funny moments, one funny thing about Ware I can share is- whenever he came to our room, he used to say I don't want to eat anything, we 3 can adjust in 2 tiffin’s... But actually he used to it all the 3 tiffin’s very easily😝😂 Happy birthday to such an amazing friend... Thanks Ganesh dada for writing a book on such amazing person. He is really an 'anandyaatri'!"

 |
| मिनी पुंगास गॅंग |
 |
| पहिलं स्नेहसंमेल्लन |
रोहीत साठे
२० जानेवारी २०१८
*********************************************************************************
*********************************************************************************
पीजे किंग महेश भाऊ वारे
महेश वारे म्हणजे एक असं नाव की ज्याने आमच्या महाविद्यालयीन जीवनात स्वत:च्या स्वभावाने अनेक चांगल्या आठवणी आमच्या आयुष्यात दिल्या. कुणाकरता मह्या, कुणासाठी वारे, कुणी मामा म्हणणायचं तर कुणी पीजे किंग असं विविधांगी टोपणनावांनं ओळखला जाणाऱ्या या आमच्या मित्रानं आपल्या हसतमुख व्यक्तिरेखेमुळे कायम सगळ्यांच्या लक्षात राहून अनेक गोड आठवणी देऊन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू दिलं. आजही तेच करतो.
कितीही आणीबाणीची परिस्थिती असो वा गंभीर विषय, त्यात हा कुठतरी त्याची कल्पनाशक्ती वापरून एखादा पंच फोडायाला कायस तयार असायचा. अन त्याने पंच मारला की सगळे भान विसरून एकदम हसायला लागायचे अन परिस्थिती एकदम बदलून जायची. आभियांत्रिकीमधे आम्ही सगळ्यांनी अनेक चढउतार अनुभवले. त्यात एखादा विषयात उत्तीर्ण होणं असो की, गृहपाठाच्या फायली पूर्ण करणे असो नाहीतर आपलीच शाखा कशी इतरांपेक्षा अधिक चांगली आहे दाखवण्याचा अट्टहास, खेळ असो की अजून काही प्रत्येक ठिकाणी आपणच कसं विजयी होऊ यासाठी केलेले जुगाड. प्रत्येकात आमचा काहीही संबंध नसलेला मामा पुढे मात्र असायचा. अन विशेष म्हणजे कंटाळलेला, थकून बसलेला किंवा एखाद्या चिंतेत बुडालेला मी स्वत:तर कधीच बघितलेला नाही. सतत काहीतरी गोष्टीत सहभागी दिसायचा. बरं नसलंच काही करायला तर अवती भोवती ८-१० मित्रांच्या गराड्यात एकमेकांची खेचाखेची करणे म्हणजे त्याचं आद्य कर्तव्य. भाऊने महाविद्यालयातील एखादी गोष्ट सोडली नाही की ज्यावर पांचट विनोद केला नाही. म्हणजे मैदानावर झोपलेल्या कुत्र्यापासून अभ्यासाचा विषय अन ते शिकवणारे शिक्षक असो की एखादी नवीन प्रवेश घेतलेली मुलगी असो की सुमुहाला नडणारा एखादा मुलगा असो, प्रत्येक विषयावर तो कायम बोलायचा. एखाद्याची टांग कशी खेचायची हे मी त्याच्याकडूनच शिकलो. त्याचा नकळत अनेकदा त्रासही झाला, कारण आमचे अजून दोन मित्र संजू भाऊ शेळके अन प्रमोद भाऊ मुरकुटे. हे दोघं कायम आमच्या नावांच्या यादीत प्रथम प्राधान्य असणारी मंडळी. वैज्ञानिक लोक कसे एखादा शोध लावतान प्राण्यावर अगोदर प्रयोग करतात तसे आम्ही या दोघांवर प्रयोग करत असायचो. सगळे या गोष्टीचा मनमुराद आनंद घ्यायचे. कितीही चिडवलं तरी ही दोघं आमच्यापासून कधीही दुरावली नाहीत हे विशेष. यातंच आमच्या दोस्तीची एकी लक्षात येते.
आमचा ग्रुप तसा खुपच मोठा. यातील काही चेहरे जे आयुष्यभर आमच्या सदैव लक्षात रहातील ते म्हणजे महेश वारे (पीजे किंग), विकास डोंगरे (डोंगरे साहेब), श्रीकांत नागवडे (पाटील), महेश बांडे (साहेब), आभाश शुक्ला (पंडितजी), गणेश शितोळे (दादा), मोहसीन शेख (मुसा), निलेश कापरे (निल्या), निलेश शितोळे (चॉकलेट हिरो), स्वप्निल साळुंखे (स्वॅप अन माझी तेव्हाची जानू), रोहीत ननावरे (गोट्या), कृष्णा साठे, निलेश कोलते, जयदीप नलावडे (जयड्या), मंगेश मोरे (पोलार्ड), प्रशांत पाचपुते (पशा), रोनक नय्यर (रॉनी), रोहीत साठे (ड्युड), संजय शेळके (संज्या), प्रदीप रोकडे (प्रोडो), प्रमोद मुरकुटे (पम्मन), प्रणीत समगीर (प्रन्या), बुवासाहेब, राहुल धायतडक, विकेश ठाकरे (किल्लर), पुरू, सुहास जगताप, निलेश कदाम, इजाज शेख. अजून भरपूर आहेत. काहींची नावं राहून गेली असतील तर क्षमस्व:. असे अनेक मित्र आभियांत्रिकीच्या निमित्ताने एकमेकांना भेटलो अन सगळ्यांना आठवणीत राहून गेलो ते कायमचेच.
मामाबद्दल एखादी कटाक्षाने सांगावी अशी गोष्ट म्हणजे भाऊंची चौफेर असणारी आमच्यासारखी जिव्हाळ्याची माणसं. त्याच्याशी एकदा ओळख झाली की त्याच्याशी खूप दिवसातून संपर्क झाला तरी त्याला विसरणं शक्य होत नाही. आजही हा असा मनुष्य आहे की जो व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अशा काही पोस्ट टाकतो ती त्याला कायमच भेटायची प्रचिती येते. त्या ग्रुपमळे एक तर नक्की की एवढ्या दिवसांनीही आम्ही सगळे पुन्हा त्याच कट्टावर भेटल्याची अनुभुती येत राहते अन जून्या आठवणींना नकळत उजाळा मिळत रहातो.
पीजे किंगला मी पहिल्यांदा कधी भेटले हे नक्की आठवत नाही आता. पण महाविद्यालयातंच एखाद्या तासाला भेटलो असेल. कारण एखाद्या शिक्षकांच्या चालू तासामधेही याच्या पीजेचा पल्ला सगळ्यांपर्यंत पोहचणारा होता. अन याच्या चेहऱ्यावरच्या भावना अशा असायच्या की विनोद नेमका यानेच केला आहे का हा प्रश्न पडावा इतका स्थितप्रज्ञ. कारण विनोद करून दुसऱ्या क्षणात हा असं काय ध्यान लावून शिक्षकाकंड समोर बघायचा की जसं त्या विनोदाशी त्याचा तीळमात्रही संबंध नाही. अन या सापळ्यात फसायचा तो आमचा मित्र संजूभाऊ. भाऊचं हास्यच असं होतं की ते शिक्षकांपासून ते लपून रहात नव्हतं. त्यामुळे मह्याच्या विनोदाइतका शिक्षकांच्या लक्षात रहायचा तो संजूच.
वारे कधीच कुणाशी विनाकारण हुज्जत घालताना मी तरी अजून पाहिला नाही. बहुधा तो समोरच्या व्यक्तीची बौद्धिक पातळी लक्षात घेऊन शांत बसत असेल. (माझ्याकडून शिकलेला एक चांगला गुण. हा....हा...हा...). अन जर त्याने ठरवलंच कुणाला त्रास द्यायचाच तर त्याला तो सळो की पळो करून सोडल्याशिवाय रहायचा नाही. असाच सगळ्यांचा पारा चढला होता तो म्हणजे स्नेहसंम्मेलनाच्या डिजे नाईटच्या वेळी अन नंतर झालेला राडा. जेव्हा शशिकांत ताजनेने महाविद्यालयात आलेल्या पाहूण्यांकरता दाखवण्यात येणाऱ्या छायाचित्रांच्या समुहातून जेव्हा आमच्या शाखेचे छायाचित्र टाकायचे टाळले अन नको त्या संकेताला निमंत्रण दिले. बरं दिले ते दिले तेही मंगेश भाऊ विद्यार्थी प्रतिनिधी असताना. मग काय गर्दीतूनही वाट काढत आमच्या श्रीकांत पाटलांनी ताजनेला बाजूला घेत यथेच्छ कानशिलात लावायला सुरवात केली. या सगळ्यामागं महेश भाऊंचं काहीतरी नियोजन असणार याबद्दल मला राहून राहून शंका येते. या सगळ्या मोहीमा संपवून आम्ही केलेला नाच विशेषकरून माझ्या लक्षात आहे.

आज सगळेच जण आपापल्या आयुष्यात असणाऱ्या जबाबदाऱ्यात व्यस्त झाले आहेत याचा अर्थ असं नाही की आपण सगळेजण एकमेकांना विसरूनच गेलेत. पण एकमेकांना समजून घेणार नाहीत ते मित्र कसले. म्हणूनच थोडा टॉण्ट मारून का होईना आजही सगळे व्हाट्सअप कट्ट्यावर भेटून गप्पा गोष्टी करतात. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून आपले मत मांडून चर्चा करून ऑनलाईन का होईना पण भेटतात हे महत्वाचं. वारे बद्दल वाचताना आज परत एकदा त्या सुवर्णक्षणांच्या आठवणी ताज्या झाल्या असतील हे नक्की. अशा या दिलखुलास मित्राला पुढील आयुष्याकरता अन पुढच्या हजारो यशोशिखरांना गवासणी करण्याकरता माझ्या शुभेच्छा. अन माझ्या सर्व मित्रांनादेखील पुढच्या आयुष्याकरता शुभेच्छा.
दादासारखी माझ्या लिखाणात चमक नाही पण दादांच्या आगामी येणाऱ्या पुस्तकाकरता मागणी वरून मी केलेला हा एक छोटासा प्रयत्न. दादाला अनेक येणाऱ्या पुस्तकांकरता मनापासून शुभेच्छा. अन मला दिलेल्या या संधीबद्दल आभार.
धन्यवाद
आपला मित्र
प्रविण गाडे
२० जानेवारी २०१८
*********************************************************************************
*********************************************************************************
महेश वारे म्हणजे आपला मामा. मला वाटतं की मामा म्हणजे फक्त एक व्यक्तिमत्वंच नाही तर असं एक मोठ व्यक्तिमत्व आहे की ज्याची सकारात्मकता आमच्या मित्र मंडळासाठी मोठी शक्ती आहे. मला वाटतंय मामा म्हणजे एक उर्जा आहे. तो असला म्हणजे सगळे ताणतणाव दूर होतात. त्याची ती विनोदी शैली, अन एक लहानमुलासारख असणारं बालपण खूप काही सांगतं. मामा कधीच कोणाला एकटा सोडू शकत नाही.
त्याच्या समजण्याचा एक दृष्टीकोन, दुसऱ्याकरता असणारी समर्पण अन आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खूप समाधानी माणूस. मी नाना पाटेकरला पहातो तेव्हा मला मामाची आठवण येते. काहीतरी नवीन शिकण्याची अन करून दाखवण्याची इच्छाशक्ती खूप आहे मामा मधे. वस्तीगृहात असताना लोकमतची पुरवणी असणारी ऑक्सिजन आवर्जून वाचायचा अन त्याची एक वेगळी फाईल करून ठेवायचा. त्याला वाचन खूप आवडते.
मामाला ग्रामिण भाग खूप आवडतो. माल वाटतं त्याने ग्रामीण भागाकरता काहीतरी केले पाहिजे. त्याच्या सारख्या व्यक्तीची गरज आहे. त्याला मी तरी कधी नाराज पाहिले नाही. त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्याकरता सर्वोत्तम आनंद देणारा क्षण आहे. लिहीण्यासारखे खूप आहे. पण मला वाटतं यावर लिहीण्यापेक्षा खूप काही बोलता येईल. त्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वैभव सोनावणे
२० जानेवारी २०१८
*********************************************************************************
*********************************************************************************
तसं मला फारसं लिहायला येत नाही. आपण बोलू शकतो कवहर पण. सगळेच मह्याच्या हसण्याचे किस्से सांगतात अन म्हणतात की मह्याला गंभीर झाल्याचं कधी पाहिलं नाही. पण मला एक किस्सा आठवतोय की जेव्हा मी पहिल्यांदा त्याला गंभीर झालेलं पाहिलं व्हतं.
६ जून ला रायगडला जाताना पाऊस पडला होता. वरंधा घाटात पावसाने चारचाकी गाड्या घसरत होत्या. तेव्हा मी पहिल्यांदा मह्याला गंभीर होताना पाहिलं आहे.
 |
| राज्याभिषेक सोहळा |
मह्यासोबत किस्सेच आहेत. पण लक्षात रहाणारे म्हणजे मैदानावरच्या कुत्र्यावरून पायऱ्यावर बसून पोरांची उडवणे. पम्मनला सगळ्यांच्या कोल्ड्रिंक्सच बाटल्यात शिल्लक राहिलेले घोट घोट एक बाटलीत भरून पाजलेलं. मुलींची खेचण्याचे किस्से काय सांगावेत. मुलीचं एकदम योग्य वर्णन करू शकणारा मह्या एकटाच.
मंगेश मोरे
२० जानेवारी २०१८
*********************************************************************************
*********************************************************************************
यंदा माझी वेळ होती. त्याच्या वाढदिवसादिवशी योगायोगाने त्याच्या जवळपासंच होतो. अन संध्याकाळी उशिरा भेटलो. बरं वाटलं. तो जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा तेव्हा त्याने कायमच जगण्याची उर्मी दिली. आनंद दिला. माझ्या ह्या आनंदयात्रीला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देताना ही शेवटची एक कविता लिहीन हा लेख संपवत आहे.
बाकी काही नाही पण इतकच सांगणं तुला असतं.
स्वतःहसता हसता तुही कायम हसायचं असतं.
मैत्री म्हणजे कधी तुझं कधी माझंच असतं.
त्याहून आपल्या मैत्रीत खासं काही होतं.
मामा आयुष्यात कायम भेटायचं असतं.
कधी तू तर कधी मी यायचं असतं.
आठवणीत तर मी तुझ्या तू माझ्या राहायचं असतं.
कधी मला आठवेल कधी तू आठवायचं असतं.
मैत्रीत काहीच लपवून ठेवायचं नसतं.
म्हणून जे काही ओपन आणि खुलं ठेवायचं असतं.
मैत्रीला कधी बंधनात गंतवून ठेवायचं नसतं.
म्हणून आपलं मैत्रीचं नातं अजून टिकलेलं दिसतं.
नातं आपलं प्रेमाचं निभावायचं असतं.
थोडं तू थोडं मीही प्रयत्न करत राहायचं असतं.
आयुष्यात कधीच काही योगायोगानं होत नसतं.
तुझं माझं भेटणं इथंच होणार होतं.
गणेशदादा शितोळे
२५ फेब्रुवारी २०१८