माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५


मैत्रीच्या नात्यातील चूका....





एक दोन दिवसापूर्वी अशाच एका संध्याकाळी एका जून्या मित्राचा फोन आला होता...
खरंतर मैत्री मधे काहीच नवीन अन जूनं नसतं...
जे काही असतं तेच मैत्रीच नातं असतं...
मी जूना यासाठी म्हटलं की आमच्या मैत्रीच्या नात्याची सुरवात होऊन अर्ध तप होऊन गेलं...
फोन उचलला की पहिलं वाक्य,
"काय राव दादा, तुम्ही आम्हाला विसरलात.."
त्याचं हे वाक्य काळजावर खोल वार करून गेलं...
गेल्या दोन तीन वर्षांतील कित्येक प्रश्नांचं नकळत उत्तर देऊन गेलं..
त्याला काहीतरी कारण सांगून आमचं संभाषण सुरू झालं अन काही वेळाने थांबलंही..
पण त्या फोन काॅलने मला कित्येक वर्षात पडलेल्या असंख्य प्रश्नांवर विचार करण्यास भाग पाडलं...
असंख्य यासाठी की प्रश्न काय अन किती पडले मोजलेच नाहीत म्हणून असंख्य...

खरंतर आयुष्यात कोणतीही गोष्ट दोनदा घडत नसते. मी हे दोन अर्थाने म्हणतो ते यासाठी की आयुष्यात एखादी चूक झाली तर ती सुधारण्याची संधी आयुष्य पुन्हा देईलच याची खात्री कोणालाच नसते. दुसरं असं की आयुष्य आपल्याला आपल्या चूका सुधारण्याच्या संधी भरपूर देते पण प्रत्येक वेळी आपल्याला ती चूक न उमगता संधी हातातून गेल्यावर लक्षात येते की आपल्या हातून हे चूकलं अन हे बरोबर करता आलं असतं...

डिप्लोमा काॅलजनंतरचा अन आत्ताच्या डिग्री काॅलेजनंतरचा काळ मला ठिकाणं एक नसली तरी मला तसा एकच वाटतो...
दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी मी वेगळ्या प्रकारचे काॅलेजलाईफ जगलो. वेगळं यासाठी की दोन्ही ठिकाणी परस्पर भिन्न स्वभाव असणारी माझ्यातलीच व्यक्ती मी अनुभवली. पण एक खरं की दोन्ही वेळेस मी काॅलेजलाईफचा आनंद घेतला. दोन्ही काॅलेजमधील तीच मित्रांची दुनियादारी अनुभवली. पण या दोन्ही वेळेला शेवट हा आसवांनी भरलेलाच होता. मित्रांसोबतच्या जगलेल्या अविस्मरणीय क्षणांना घेऊन एका वळणावर नवीन ठिकाणी नव्या मित्रांसह नवीन दुनियादारी जगायला जाताना जुन्या आठवणी आजही नकळतपणे डोळ्यात पाणी आणतात हे नक्की.
गेली दहा पंधरा वर्षे मित्रांच्या गराड्यात रहाणारा मी आज त्याच मित्रांपासून खूप दूर गेलो आहे. एका वेगळ्या भावविश्वात. एकट्याच्याच. जिथं फक्त आठवणी आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटलेल्या माणसांच्या. काही हसर्‍या, काही लाजर्‍या बुजर्‍या तर काही डोळ्यात पाणी देणार्‍या.
या भावविश्वात जगताना एक वेगळा अन विलक्षण अनुभव आहे. हेच भावविश्व मी मित्रांपासून दूरवल्याची वारंवार जाणीव करून देते. डिप्लोमा काॅलेजनंतरच्या त्या तीन चार महिन्यांतही असंच झालं होतं. सुरवातीला रोज फोनवर बोलणारे मित्र आज हरवलेत. हरवलेत म्हणण्यापेक्षा आज कोणत्या मित्राला फोन लावून मनातलं बोलावंसही वाटत नाही. एककाळ होता की मोबाईल चा सातशे रुपयांचा बॅलंस पुरत नव्हता म्हणून दोन सिमकार्ड आलटून पालटून वापरायचो. दुसर्‍याचाही बॅलंस संपेपर्यंत बोलायचो. पण डिप्लोमा काॅलेज संपलं अन हा संवादही संपला बहुतेक. ना आज त्या जून्या मित्रांचा फोन येतो ना कधी मला बोलावसं वाटतं. त्या तीन महिन्यांनंतर नवीन काॅलेज अन नवीन मित्र भेटले. या नवीन मित्रांच्या भावगर्दीत ती जूनी माणसं हरवली की मी हरवून गेलो मलाही नाही माहित. सुरवातीला वाटायचं प्रत्येकाला न चूकता आठवड्यातून नाही निदान महिन्यातून फोन करावा. नंतर तीच जागा प्रत्येक वेळी मीच का फोन करायचा या इगोने घेतली अन हीच आयुष्यात सर्वांत मोठी चूक ठरली. या वाटण्यातून ते जूने मित्र दूरावत गेले. पण याला काही अपवादही ठरले. अपवाद म्हणण्यापेक्षा आयुष्यानं ही चूक सुधारण्याची संधी दिली होती.
एक दिवस अचानक अशाच जून्या मित्राचा फोन आला. "गण्या, कुठंय ? आम्ही तुला भेटायला येतोय घरी. " त्या फोन आल्यानंतरच्या काही क्षणासाठी माझं मन थार्‍यावर नव्हतं. ते पुन्हा त्या डिपोल्मा काॅलेजच्या तीन वर्षातल्या आमच्या वेगळ्या आयुष्याला भेटून आलं. त्यावेळी इतका आनंद झाला की तो क्षण आजवर परत कधी आलाच नाही. संध्याकाळी त्या मित्रांची गाडी घराकडे वळली अन ज्या क्षणी आमची नजरानजर झाली तो क्षण एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला. संध्याकाळी त्या जून्या काॅलेजलाईफची उजळणी झाली. डिप्लोमा काॅलेजनंतरच्या नवीन काॅलेजमधील दुनियादारीची गुर्‍हाळं झाली. एकमेकांचे नवीन छंद, आवडीनिवडी, मित्र मैत्रिणी, अशी बरीच देवाणघेवाण झाली. त्यावेळी त्या मित्राने दिलेलं नाटक "लव्ह इन डिसेंबर" आजही लॅपटॉप मधे तसंच जपून आहे. खरंतर ते मनावरच सेव्ह होऊन गेलंय त्या दिवसाची आठवण म्हणून. दुसर्‍या दिवशी दोन तीन मित्रांनाही भेटलो. ते दोघं खरंतर काॅलेजनंतरच्या आयुष्यात मित्रांना भेटायला म्हणून निघालेले. मलाही आग्रह झाला अन इच्छाही झाली. पण ती चूक सुधारण्याची संधी आहे तेव्हाही मला उमगलंच नाही अन ते राहून गेलं ते कायमचंच.
आजही डिग्रीनंतरच्या या आयुष्यात तीच डिप्लोमा नंतरची फेज सुरू आहे. रोज मित्रांच्या गराड्यात वावरणारा मी एकटाच असल्याचं जाणवतं. काॅलेज संपलं अन प्रत्येक जण आयुष्यात नवीन भरारी घेण्यासाठी करीअरच्या नावाखाली गुंतून गेला. अगदी मीही.
पण सोशल नेटवर्किंग साइट्सनं एक बरं केलंकी तो हरवत चाललेला संवाद वाढवण्याचा प्रयत्न केला.
बहुतेक आयुष्याने हीही एक संधीच दिली होती. व्हाॅट्सअप फेसबुकच्या महाजालात सुरवातीला सर्व चांगलं वाटलं. दूरवरचे मित्र रोज भेटू लागलो. शेअरिंग वाढलं. इतकं की जणू आजही त्या काॅलेजच्या कट्ट्यावर बसून बोलतोय इतकं. पण पुन्हा तेच. जे डिप्लोमा काॅलेजनंतरच्या तीन चार महिन्यांनंतर झालं तेच डिग्री नंतरही. तोच इगो अन तीच चूक.
माझ्या तत्वज्ञानाचा त्रास दुसर्‍याला झाला. त्यातून वाद, निर्माण झालेले इगो अन संपलेला संवाद.
माझ्या स्वभावातच चूक होती बहुतेक. पण म्हणतात ना स्वभावाला औषध नाही. तसंच तो संवाद संपलाय आमच्या मैत्रीतला. पण तत्वज्ञान आजही पूर्वीसारखंच चालू आहे. ते मित्र दूरवले की काय म्हणून जून स्कूलफ्रेण्ड्स नव्याने भेटलेत. या ना त्या कारणाने बाकीही जूने मित्र भेटतच आहेत. कोणा मित्राच्या लग्नाला म्हणून भेटताना पुन्हा ती जूनी मैत्री सुरू होत आहे. पण तीही अडखळत असणारीच...
आता ते कोणाला फोनही करण्याची इच्छा होत नाही ना बोलण्याची. व्हाॅटसअप फेसबुकच्या ऑनलाईन दुनियेत आपल्या भावनांना लपवून बोलण्याचाच आनंद वाटतो. त्या स्माईली स्टिकर्सनेच बहुतेक आता भावनिक देवाणघेवाण होत राहणार असंच दिसतंय. असो मी तर आयुष्याने ती चूक सुधारण्याची संधी देण्याची वाट पहातोय.
तो पर्यंत
एकटाच मी.
एकटाच आहे.
अन एकांतात एकटाच जगत आहे.






गणेश दादा शितोळे
(३० ऑक्टोबर २०१५)


1 टिप्पणी: