माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

संगीताशी मैत्री अन गाण्यांशी गट्टी


                         नुकताच खुप दिवसांनी लोकमतचा मंथन वाचला. जवळपास सर्वच लेख विचार करण्याजोगेच होते. पण मला मात्र त्यापैकी एक लेख आवडला. सचिन कुंडलकर लिखित विषय होता #संगीत. लेख वाचताना मला माझ्याच आजवरच्या आयुष्यावर एक प्रकाशझोत टाकण्याची संधी मिळाली आणि मग ओघात लिहिणे आले.
                       सचिन कुंडलकर म्हणतात ते एकदम तंतोतंत लागू पडते. *मलाही जर असं कुणी विचारलं की तू कोणत्या प्रकारची गाणी ऐकतो, संगीत ऐकतो किंवा आवडते..?*
                      तर मीही निश्चित एक उत्तर देऊ शकत नाही. कारण आजवर वेगवेगळ्या धाटणीची अनेक गाणी ऐकली आहेत. म्हणायचंच झाले तर अगदी सत्तरीच्या दशकापासूनची नितीन मुकेश, मोहम्मद रफी ते आजच्या काळातील संजय लोंढे, अजय अतुल यांच्यापर्यंत विविध गायकांची, संगीतकारांची गाणी मनापासून ऐकतो. त्यामुळे अमूक एका प्रकारचीच गाणी ऐकतो असं म्हणताच येणार नाही. 
                 संगीत आणि गाणी तसा माझा कधीही आवडता विषय नव्हता. म्हणजे दहावी पूर्ण होईपर्यंत तर आजिबातच आवड नव्हती. क्रिकेट, कबड्डी, कुस्ती या तीन *के*च्या पलीकडे जाऊन फावल्या वेळात आवडीच नव्हत्या. परंतु डिप्लोमा काॅलेज जाॅईन केल्यानंतर मात्र हळुहळु मी संगीत आणि गाणी ऐकण्याकडे झुकलो. आजही आठवतेय की मी पहिल्यांदा मोबाईल फोन एलजी केपी 110 हा केवळ तो एम पी थ्री प्लेअर करताच घेतला होता. मोबाईल घेतल्यानंतर रेडिओ एफ एमवर उशीरापर्यंत गाणी ऐकण्याची सवय झाली. पण तेव्हा ना गाण्याविषयी काही माहिती होते ना गायक, संगीतकार यांच्या विषयी. गाण्याच्या ओळींची खरी गोडी लागली ती काॅलेजच्या आयडाॅल स्पर्धेपासून. आयुष्यातील पहिल्या गॅदरींग दरम्यानच्या काळात आयडाॅल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. *गालावर खळी फेम स्वप्निल बांदोडकर* याच्या उपस्थित Suhas Kshirsagar जेव्हा पहिल्यांदा आयडाॅल झाला. तेव्हापासून गाणी ऐकण्याची गोडी निर्माण झाली. पुढे *आयुष्यावर बोलु काही या संदीप खरे आणि सलील कुलकर्णी* यांच्या कार्यक्रमाने यात अजूनच भर घातली. सकाळ महोत्सव माझ्या करता गाणी ऐकण्याची संधी होती. 
                        दुसर्‍या वर्षाच्या अंतीम सेमिस्टर ला हॅकर्स ग्रुपशी मैत्री झाली आणि ही आवड छंद सवयीचा होऊन गेला. काॅलेजच्या बाहेर पडलो की आपोआपच हेडफोन्स कानात जायचे. रोज वाडिया पार्कला तासनतास हा मनसोक्त गाणी ऐकण्याचा कार्यक्रम नित्याचा झाला होता. एखाद्या दिवशी त्यात खंड पडला की कसंनुसं व्हायचं. पण तरीही गाण्याचा विशिष्ट प्रकारच आवडता असं मात्र काही झालं नाही. कारण गॅदरींग दरम्यानच्या सर्व प्रकारची गाणी ऐकण्याची संधी मिळात होती. रिहर्सल ला मी जातीने उपस्थित रहात होतो. संगीत आणि गाणी यांच्याशी गट्टी जमली की याचीही सवय होतेच. 
                           तिसर्‍या वर्षी चे गॅदरींग अजूनही स्मरणात आहे. त्या गॅदरींग मधे काॅलेजच्या अनेक गायकांची गाणी ऐकण्याची संधी मिळाली. याच गाणी ऐकण्याची सवयीने असंख्य आठवणी त्या त्या गाण्याशी घट्ट बांधून गेल्या आहेत. आजही ही गाणी ऐकली की ते मित्र मैत्रिणी आणि त्यांनी गायलेली गाणी डोळ्यासमोर उभी रहातात. 
                            माझ्या संगीत आणि गाणी यांच्या गोडी लागण्यात हॅकर्स ग्रुपचा खूप वाटा आहे. आजही त्यावेळी असणारा कल्ला धमाल मस्ती सर्व आठवते. मी देव संकल्पनेला मानत नसलो तरी Nandkishor Moreने गायलेले शंकर महादेवन यांच्या आवाजातील *गणदेवताय*चे सुर कानी पडले की नंदूचा काॅलेजमधला परफॉर्मन्स आठवतो. *कजरा मोहब्बतवाला* गाण्याची ओळखच Aarti Dalviने गॅदरींग ला गायल्यानंतर झाली. या व्यतिरिक्तही काही गाणी संस्मरणीय आहेत. काॅलेजमधे Rahul Girheच्या ओठी असणारं *तुझे मेरी कसम* असो की *संतोष*ला आवडणारी *संदीप सलील ची गाणी,Mahesh Adep गुणगुणत असणारं अजब प्यार की गजब कहाणी मधील *तु जाने ना* किंवा Sagar Bhagat कायम ऐकणारा *खुदा ए खैर* असो. या प्रत्येक गाण्याशी आठवणी जुळल्या आहेत. *Nana Maindadचं एक हसीना थी* ऐकलं की आजही हिमेश रेशमियाचं हसू येतं. *Sagar Gadkar आणि खुदा जाने, कहने को जश्न बहारा है* अशी बरीच गाणी आणि मित्रांची नावे आठवत रहातात. 
                        इंजिनिअरींगचा प्रवास तर गाण्याशिवाय कधी झालाच नाही. अगदी लेक्चरलाही गाणी ऐकल्याच्या आठवणी आहेत. पण संस्मरणीय अनुभव दिला तच अंतरंग ने. मग ते *बेजुबान* असो की *खुद को तेरे*. ही दोनच गाणी कित्येक महिने माझ्या प्लेलिस्टमधे होती. अगदी इतपत की खुद को तेरेची तर वेगळीच आठवण आहे. *खुद को तेरे वरून माझं नावही काही जणांनी त्या व्यक्तीशी जुळवले होते. असो तसे काही नव्हते.* पण अशी अनेक गाणी होती की ती वारंवार ऐकूनही समाधान मिळत नव्हते. कायम ऐकण्याची इच्छा होत होती. प्यार करना ना था आणि खुद को तेरे जवळपास वर्षभर अगदी कंटाळा येईपर्यंत ऐकले. केरळ ट्रीपमध्ये कविता ऐकण्याची सवय झाली. स्वतःच्या कविता स्वतःच ऐकत होतो. या प्रत्येकातून एक सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला. 
                        काळासोबत मात्र एक बदल घडत गेला आणि माझा कल हिंदी सोडून मराठी कडे अधिक गेला. मुंबई पुणे मुंबई, मितवा, दुनियादारी या सारख्या दर्जेदार चित्रपटातून आणि सोबत इतरही चित्रपटातून अधिक चांगली गाणी ऐकण्याची संधी मिळाली. *नेहा राजपाल चे मन हे बावरे, केवल वाळुंज चे वाटा* या गाण्यांचं गारूडही बरेच दिवस मनावर होतं. लाभले भाग्य अम्हास शिवाय आता दिवसाची सुरुवात होत नाही. 
                       मध्यंतरी *आरती*ने गायलेली *गलिया* आणि *समजावा* ही ऐकली आणि माझ्या प्लेलिस्टचा भाग होऊन गेली. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया अनेकदा केवळ समझावा गाण्याकरताच पहिला. 
                        काही महिन्यांपूर्वी सैराट चित्रपटाची गाणी आली आणि पुढील चार महिने तीच गाणी. नवीन व्हर्जन घेऊन ऐकली. पण आनंद दिला तो *सैराट झालं जी* आणि विरेश चाप्टे *यां मरणाच्या दारात* या दोन गाण्यांनी. अजूनही ती प्लेलिस्टमधे आहेत. ऑफिसमधे *Vijay Kadamकडून महेश काळे नाव ऐकलं आणि महेश काळे नावची कट्ट्यार काळजाला भिडली*. तोपर्यंत मी कट्ट्यार पाहिला नव्हता. पण जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा प्रत्येक गाणे आवडले. सुर निरगस असो की मग अरूणी किरणी. काही दिवसांपूर्वी *Âshîsh Mögâl* ने *शौनक अभिषेकीं*चं एक गाणे ऐकवले आणि आजतागायत *गर्द सभोवती रान साजणी* सोडून दुसरं गाणं ऐकवलं जात नाही. 
                           सचिन कुंडलकर लिखित लेख वाचताना मोबाईल चाळला तर तब्बल दोन हजारांहून अधिक विविध शैलीची गाणी मोबाईल मधे सापडली. तेव्हा मात्र सुरवातीला पडलेल्या प्रश्नाचं एक उलट उत्तर मिळालं. *कुणी मला तू कोणती गाणी ऐकतो..? हा प्रश्न विचारण्याऐवजी कोणत्या प्रकारची गाणी आवडत नाहीत तर उत्तर आहे. कर्णकर्कश, रीमिक्स, भावनाशुन्य गाणी कानावर पडली तरी कान झाकून घ्यायची इच्छा होते. मी पुष्कळ गाणी ऐकतो. वाचत लिहित बसेल त्याहून अधिक वेळ गाणी ऐकण्यात घालवतो. आजकाल त्याशिवाय झोप लागत नाही. जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा गाणी ऐकतोच. एका विशिष्ट प्रकारचीच गाणी आवडतात असं मात्र काही नाही. म्हणूनच सचिन कुंडलकर म्हणतात ते एकदम तंतोतंत पटतं. *मांजर जसे आपले रहायचे घर स्वतः निवडते. तसेच संगीत आणि गाण्याचे आहे. ते आपल्याला निवडते.* आपण कोणत्या प्रतवात जगतोय आणि आपले मन काय विचार करंतय यानुसार आपले मन आपोआपच ओळखीच्या संगीताची निवड करत असते. 

माझ्या या संगीत आणि गाणी यांच्याशी गट्टी जमवणार्‍या प्रत्येकाचा मी आभारी आहे. 

Thanks 
Santosh Gadhave
GS Group
Vijay Kadam
Âshîsh Mögâl




गणेशदादा शितोळे
(५ सप्टेंबर २०१६)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा