सचिन नावाचं वादळ
लहानपणी जेव्हा,
सचिन तेंडुलकर नाव ऐकलं....
तेव्हा क्रिकेट खेळाचं,
अभिजात गारूड मनावर दाटलं...
ब्लॅक व्हाईट टिव्हीवर कधीतरी दिसणार्या मॅचमधे,
सचिनला खेळताना पाहिलं...
अन पहिल्यांदा बॅट हाती आली तेव्हा,
सचिन झाल्यासारखंच खेळावसं वाटलं...
खेळताना एक झलक पहाण्यासाठी कधी मग,
शाळेला दांडी मारून टिव्हीसमोर ध्यान मांडलं...
झालाच कधी आऊट अचानकपणे की,
हातामधल्या घासालाही पुन्हा ताटात टाकलं...
एकाग्रता भंग करण्यासाठीच्या स्लेड्जिंगच्या जमान्यात,
सचिन बॅटनंचं दिलेलं उत्तर कायम लक्षात राहिलं...
अन वर्ल्डकपला मारलेल्या अप्परकटलाही मग,
कित्येकदा डोळे विस्फारून नव्यानं पाहिलं...
भारताच्या कितीही विकेट्स पडल्या तरी,
सचिन आहे ना मग भारत जिंकणार असंच वाटलं...
सचिन आणि विजय समीकरण बनवत बनवत,
नकळतपणे सचिनवरच अपेक्षांचं ओझं लादलं...
विक्रमाची शिखर सर करत करत,
मायभूमीवर जगजेत्तेपदही मिळवलं...
शतकांची शंभरी पार करता करता,
नकळत क्रिकेटचा देवच होऊन गेलं...
भरभरून आनंद देत देतच मग शेवटी,
आनंदाचीच आसवे देऊन गेलं...
जुन्या नव्या पिढीचा दूवा बनून,
क्रिकेट जगतातील हे वादळ कायमच रिटायर झालं...
गणेशदादा शितोळे
(१८ नोव्हेंबर २०१३)







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा