माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

इथला भारतीय अजूनही  गुलामगगिरीत आहे...


थाठतो इथं भोंदू पसारा स्वत:ला देवाचा अवतार सांगून,
लोकांच्या श्रद्धेच्या नावाखाली गंडवण्याचा प्रयत्न जोरदार होतोय...
असतात आमचे दैववादी श्रद्धेचे विचार म्हणून,
मांडून श्रद्धेचा बाजार आम्ही माणसं माणसांनाच फसवतोय...
आपण कितीही म्हणालो भारत स्वतंत्र झाला तरी,
भारतीय अजूनही भोंदू दैववादाचा गुलाम आहे...


असतो इथं कोणी एक जीवांचं राजकारण करायचं म्हणून,
जातीधर्माचा आधार घेत स्वत:ची राजकीय पोळी भाजतोय...
असतात आमचे राजकीय मतभेद म्हणून,
घेऊन हाती शस्त्र आम्ही माणसं माणसांनाच संपवतोय...
आपण कितीही म्हणालो भारत स्वतंत्र झाला तरी,
भारतीय अजूनही राजकीय हिंसेचा गुलाम आहे...


उठतो इथं धर्मवेडा धर्मरक्षणाचा हेतू म्हणून,
लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न जोरदार होतोय...
असतात आमचे धार्मिक मतभेद म्हणून,
घेऊन हाती शस्त्र आम्ही माणसं माणसांनाच संपवतोय...
आपण कितीही म्हणालो भारत स्वतंत्र झाला तरी,
भारतीय अजूनही धार्मिक हिंसेचा गुलाम आहे...


मारले इथं कोणी गांधी, पानसरे, दाभोळकर म्हणून,
संपला नाही त्यांचा विचार, तो अजून फोफावतोय...
असतात आमचे वैचारिक मतभेद म्हणून,
घेऊन हाती शस्त्र आम्ही माणसं माणसांनाच संपवतोय...
आपण कितीही म्हणालो भारत स्वतंत्र झाला तरी,
भारतीय अजूनही वैचारिक हिंसेचा गुलाम आहे...



धर्मनिरपेक्षतेचा विचार संपत चालला आहे म्हणून,
माणसातला धार्मिक द्वेष वाढत चाललाय....
प्रत्येकाला वाटतो इथं वैर दुसऱ्याशी,
माणूस माणूसकीच्या नात्याला विसरत चाललाय...
म्हणून आपण कितीही म्हणालो भारत स्वतंत्र झाला तरी,
इथला भारतीय अजूनही गुलामगगिरीत आहे...


गणेशदादा शितोळे
(७ डिसेंबर २०१७)



आजकाल राहून राहून वाटतंय...!!!


आजकाल राहून राहून वाटतंय,
नको असं सारखं व्यक्त व्हायला...
आजवर मनातलं खूप बोललो,
आता धरावसं वाटतंय मौनाला...



मनात जे जे आलं ते शब्दांनी लिहीलं,
जणू भावनांचा डावच कागदावर मांडला...
आता शब्दांनाही कंटाळा आलाय बहुतेक,
म्हणून वाटतं थांबावं क्षणभर विश्रांतीला...



शब्दांच्या साथीनं भिजलो आठवणीत फार,
जणू आठवणींनाही होता पाझर फुटला...
अचानक आठवणींचा दुष्काळ पडला तर,
नुसत्या प्रश्नानंच आता शब्द आहे अडखळला...



उत्तरांच्या शोधात जागल्या अनेक रात्री,
आता थोडं झोपावसं वाटतंय मनाला...
पहावं तेच जूनं स्वप्न नव्यानं,
पहाटेच्या साखरझोपेला...



आजकाल राहून राहून वाटतंय,
दडवून ठेवावं का याला...
पुन्हा आठवणींच्या जून्या वहीत,
माझ्या शब्दांच्या मोरपिसाला...



गणेशदादा शितोळे

(७ डिसेंबर २०१७)


मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७


मला भेटलेला आनंदयात्री :- मंगेश मारुती मोरे


                         मी कधीच एकटा नव्हतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला मित्रांची साथ मिळाली. याच आयुष्याच्या एका टप्प्यावर तो भेटला. एकदम धिप्पाड व्यक्तिमत्व. त्यात बोलंक फार. ओळख लक्षात रहायला त्याची भाषा म्हणजेच तो. महाविद्यालयात त्या भाषेचं पेटंट फक्त त्यालाच. "काय म्हणतुया...!" एवढं एक वाक्यंच बास. त्यामुळे ओळख व्हायला अन मैत्री निभवायला फारसा वेळ लागला नाही. तेव्हा जोडलेली मैत्रीची साथ आज सप्तपदीनंतरही तशीच आहे. रक्ताची नाती असायलाच हवी असं नसतं. अशा मित्रासारखे भाऊ कशाचीही कमी पडून देत नाहीत. 
                        आज त्याचा वाढदिवस. तो कितव्या वर्षात पदार्पण करतोय माहित नाही (खरं जन्मसाल कोणती हा प्रश्न आहेच...?) पण श्वास आहे तोपर्यंत असाच जन्मदिवस साजरा करत राहो एवढीच इच्छा आहे. त्याच्याबद्दल काय सांगावं आणि काय नाही हा प्रश्न नेहमीचाच. एकूण मित्रांच्या ग्रुपमधे प्रत्येकासोबत त्याचे वेगळेच अविस्मरणीय किस्से आहे. नाव मंगेश मोरे. गाव सांगवी बहुतेक. साहेबांच्या मतदारसंघातील भारदस्त व्यक्तिमत्व. जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे कायम मित्राच्या पाठीशी रहाणारे दिलखुलास व्यक्तीमत्व. नोकीया ११०० आणि स्प्लेंडर एवढी ओळख पुरेशी आहे. मंगेश सहा सात वर्षात म्हटल्यांच आमच्यापैकी कुणाला आठवंत नाही. कारण सगळ्याकरता तो "मंग्या"च होता. क्रिकेटच्या मैदानावरचे त्याचे षटकार महाविद्यालयाचा "पोलार्ड" अशी ओळख करून देणारे होते. 
                        सहसा कुणाशी भांडणतंटे होत नाहीत अन झाले तर समोरच्याचं काही खरं नाही हेही तितकंच खरं. आभियांत्रिकीच्या एकूण काळात त्याचे अनेक किस्से आठवले की आजही हसायला येते. त्याचं आणि काष्टीच्या आठवडे बाजाराच नातं अतुट आहे. म्हैस हा त्याचा आवडता प्राणी. बाकी लिहीण्याअगोदरंच हसू आवरत नाही. महाविद्यालयातमुली पटवणे हा त्याचा प्रांतंच नव्हता. त्यामुळे त्यापासून चार हात लांबंच.  महाविद्यालयात एकदम सोज्वळ मुलगा. निदान सर्व शिक्षकांना तरी तसंच वाटायचं. पण त्याची नजर आणि धैय्य मात्र मोठी असायची. अगदी त्याच्यासारखींच. द्वितीय वर्षीच्या दुसऱ्या सत्राच्या सुरवातीला वार्षिक क्रीडास्पर्धात एका क्रिकेट सामन्यावेळी झालेले वाद मिटवतानाची भूमिका  कुणीच विसरू शकत नाही. समोरून पाहून घेण्याची भूमिकेला फलटणला सांगवीवरूनच बस जाते सांगून धडकी भरणारी प्रतिक्रिया आव्हान देणारे ते शिक्षक तर नक्कीच विसरू शकत नाहीत. नोकीया ११०० वरून असे काही नंबर फिरवायचा की पंधरा मिनिटात क्रिडाशिक्षक वाद मिटवायलाच भेटायला येतात. एकंदरीत मैत्रीकरता काहीही करण्यास तयार असणाऱ्या त्याला कुणीही सहजासहजी विसरू शकत नाही.
                        फोन केला की कायम आपल्या सातारी भाषेच्या ढंगात बोलताना एकदा वडीलांनी फोन उचलल्यावर झालेली फजिती आठवते. तरी अजूनही कधीही फोन झाला तरी सुरवात कोणाचा तरी उद्धार करूनच होणार. 
                        महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची खरंतर मनापासून इच्छा होती. परंतु आमच्याच माणसांनी आमचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिक्रिया द्यायचीच होती. अशात गणेशखिंडच्या एनएसएस कॅम्प मधे मंग्याचं नाव पुढं आलं आणि मग विधानसभेचं मैदान असल्यासारखी सुत्र हालवली गेली. भले नंतर मला माफी मागावी लागली हो गौण भाग ठरला. परंतु तो विद्यार्था प्रतिनिधी झाल्यानंतर चा तो जल्लोष पडद्यामागे पंख छाटणारांना उत्तर होतं. आम्ही पण कच्च्या गुरूचे चेले नव्हतो.
                        वार्षिक स्नेहसंमेलनात झालेले वाद हे एका ट्रॉफीकरता आहेत असा गो़ड गैरसमज करणारांना आमची एकी कळालीच नाही. ट्रॉफी फेकली की तुटली तशी आमची मैत्री तोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.  पण त्यांचा प्रत्येक प्रयत्न व्यर्थ गेला. कारण शेवटी काय तर "हारी बाजी को जितना हम को आता है..." आमच्या एकीवर सगळे "बेजुबान" झाले हे वार्षिक स्नेह संमेलनानंतरच्या पार्टीत चोरट्यासारखे सापडल्यावर समजले.
                        गोवा तसा मी सहा वेळा पाहून आलो होतो. त्यामुळे  तशी जाण्याची फारशी उत्सुकता नव्हती.पण केवळ सगळे मित्र जात आहोत म्हणून केलेला दहा दिवसांचा प्रवास मनात समुद्रासारखांच अथांग आठवणीत आहे. त्यातही मंगेश  अन त्याच्याच नावाचं मंदीरही. धमाल मस्ती केलेले असे अनेक किस्से गालावर हसूही देतात अन डोळ्यातून ओघळणारी टीपेही देतात. कारण काही माणसंच अशी असतात. ज्यांच्या आठवणी क्षितीजासारख्या कधीही ठाव न घेणाऱ्या असतात. 
           

( गोव्याच्या मातीत कुस्ती खेळलो तरी दोस्तीत कुस्ती कधीच नाही) 

(सात वर्षात शोधून सापडलेला गोव्यातीलं एक आठवण)

(स्वत:च्या नावाच्या मंदीरात)



              
                        मंग्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. तुला फोन करत होतो. योगायोगाने तो लागलाच नाही. आणि उचलला तरी तुझं वाक्य पाठ आहे. "काय म्हणतुया गणा भाय, रानात हाय / गाडीवर हाय नंतर करतु तुला फोन..." फोनवर हे फारसं बोललो नसतो. बरं झालं आज तुझा फोन लागला नाही. भावा आजवर मैत्रीकरता खुप जगला. आता स्वत:करता जग. महाविद्यालयात तर लय घोड्यावर बसला होता. पोहे खायला. उरकून टाक यंदा कर्तव्य मग. 

गणेशदादा शितोळे
(५ डिसेंबर २०१७)