प्रिय तात्यास....!!!
प्रिय तात्या,
तात्या मी बोलतेय.
तुमची लाडकी परी.
मी आईला म्हनाली होती ना डोळ्यात पाणी आनुन की तात्या बोलतील का ??आणि तुझं माझ्या मरणानंतर पत्र मिळाल. वाचून खरतंर खूप रडाया येतंया. तुमची आठवण म्हणून तर हायेच. पण तात्या मला मारून तुला तुझ्या परीचं मन कधीच कळलं न्हाय...
मला तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं होतं ना. मग तरी बी मला मारायला मन कसं धजावलं रं तुझं... मला माहितिय् प्रिन्स दादानं मला नं परशाला मारलं कारण तू त्याला तसं करायला सांगितलं. कारण सभेतलं तुझंच वाक्य तुझ्या अंगलट आलतंया. "अधी आपल्या बायका पोरी संभाळा , कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे समद्या तालुक्याला माहिती आहे. " अन आता कशाला उसणं वाईट वाटलं म्हणतुया.. पोटच्या पोरीचा जीव घेताना काळजाला कसंच काहीही वाटलं नाही. जाऊ दे तात्या आता तुला दोष दिऊन बी मी थोडीच परत येणार आहे.
पण एक लक्षात ठेव तू तुझ्या नातवाला पोरकं केलं हायस. आणि याकरता तुला एक आई म्हणून म्या कधी बी माफ नाही करू शकत.
तात्या, तुला काय माहीत माझ्या या काळजाच्या तुकड्याला मी किती जपल होतं., तात्या, मी परश्या सोबत लग्न केले म्हणून तुला राग आला. पण म्या तरी काय करणार. तू मला कधी समजून घ्यायचा प्रयत्न केलाच नाही. प्रत्येक वेळी तू तुझंच म्हणणं माझ्या वर लादत गेलास. हो माझं परश्या वर प्रेम होतं आणि आजही हाय. पण ते तुला कधी कळलंच नाही. तात्या तू मला वाढविण्यात कमी पडला न्हाय पण मला समजण्यात कमी पडला. तात्या तू माझं कोणा तिसर्या मुलाशी लग्न जमवायला लागल्यावर मी काय करायचं. बरं मी तुझ्या सांगण्यावरून त्याच्या शी लग्न केले तरी मी त्याच्याशी एकनिष्ठ राहू शकेल. म्हणजे माझ्या सोबत त्याचंसी आयुष्य उध्वस्त होईल ना.. माझ्या परश्या च्या अन त्या दुसर्या च्या तिघांच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार तुला कुणी दिला तात्या. ठीक आहे माझ्या बाबतीत तू निर्णय घेऊ शकतोस, मला जन्म दिला आहे तू... परंतु परश्या आणि त्या दुसर्या मुलाच्या आयुष्याचं काय..? म्हणुन तात्या मला पळून जायचा निर्णय घ्यायला लागला.
मला वाटत होतं आपा तात्या चांगला हाय. पण तात्या तू असा कसा रे निघालास.. तू म्हणतो मी जातीपातीच्या चिखलातला नाहीस म्हणून. मग तात्या तुला परश्या का जावाई म्हणून नको होता. कामधंदा करत नव्हता म्हणून तर कामाला लावला असता ना तू... पण तू परश्या च्या घरदारावर माझ्या वर बलात्कार केल्याची खोटी तक्रार दाखल करायला लावली. अरं तात्या तुला परश्या समजलाच नाही. त्याला काही करायचं असतं ना तर केव्हाच करून मोकळा झाला असता. पण तो तसा नव्हता. माझ्या वर खूप प्रेम होतं आणि आहे त्याचं. तात्या, खरंच परश्या खूप मेहनती होता. हैद्राबादेला जाऊन पडेल ते काम करत तो मोठा झाला. वीस हजार रुपयांची चांगली नोकरी करत होता. त्याने आणि मी एक नवीन फ्लॅट बी बुक केला होता. लग्न लावून द्यायच्या वेळी तो रिकामटेकडा होता म्हणून तू त्याला स्विकारले नाही. पण मग चार वर्षांत केलेल्या मेहनतीच्या जोरावर हैद्राबादला घर विकत घेणार्या जावायाला स्विकारायला तुला काय हरकत होती. स्वतःच्या पायावर उभा होता. याचं तुला कौतुक वाटायला हवं होतं.
तात्या, तुला आमचं मन कधी कळलंच नाही. हो तात्या तू म्हणतोस तसं आमचं मन हळवं होतं. पण शरीराकरता भूकेलं नव्हतं. हैदराबादाला सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर दीड दोन वर्षांनी आम्ही रितसर कोर्टात हजर राहून लग्न केलं.
तात्या, तू म्हणतोस ते पटतंय आम्हाला.
त्या वयात आम्ही उज्वल करियर करायला हवं होतं. आणि आम्ही करिअर करण्याकरताच कॉलेजमधे शिकत होतो. कॉलेजमधे आम्ही प्रेमात पडलो यात चूक काय..? हे तर प्रेमात पडायचं वय असतं. बरं ठीक आहे तू म्हणतोस म्हणून आम्ही केवळ करिअर कडे लक्ष द्यायला हवं होतं तर तसं एकदा समजून सांगण्याचा तू प्रयत्न केला का नाही. परश्या ला मारण्याची काय गरज होती. तू बोलला असता तर आम्ही समजून घेतले असते.पण तुला तुझ्या समाजातील जातीय इज्जतीचा प्रश्न गंभीर होता.
तात्या, तुम्हा सर्वांपेक्षा काल परवा भेटलेला तो एक पोरगा जास्त महत्वाचा वाटला हा मुद्दाच नाहीए. तात्या मला जिवापाड जपणारी माझी आई आणि सोबत तु पण. माझ्या केसालाही धक्का लागु नये याची काळजी घेणारा भाऊ, आजी, आजोबा, मामा, मावशी, काका, काकी, आत्या या सगळ्यांवर माझं तितकेच प्रेम आहे जितकं परश्या वर.
तात्या, तुम्ही पुरुषांसारखं बायीला नसतं जमत असं अविचारी राहणे. त्यातली त्यात मुलीचं तर बापाइतकंच नवर्यावर प्रेम असतं. कारण बापानंतर आपलासा वाटणारा नवराच असतो. पण तात्या तुला हे समजलंच नाही. तात्या तूझी आठवण म्हणून मी माझ्या मुलाला तुझं नावंही ठेवलं होतं. "आकाश"
लहानपणी मला झोपवाण्यासाठी तासंतास खांद्यावर घेऊन फिरायचास मग इतकं प्रेम असूनही का वाटलं तुला मला संपवावं...?
तात्या, हे जातीय अभिभानाचं फॅड फक्त तुलाच वाटत होत असं नाही , ते समाजातील प्रत्येकालाच वाटतं घरात कुणी काही केले तर.. तात्या, समाज दुसर्या देशातील दुसऱ्या धर्माचा मुलगा जावाई म्हणून स्विकारायला तयार होतो पण आपल्या भोवतालीच असणार्या व्यक्ती वर विश्वास ठेवून लग्न लावून द्यायला तयार नसतो. तात्या तुलाही हेच वाटत असेल.
पण तात्या, नात्याची सुरवात प्रेमाने होते आणि प्रेमात जात धर्म, पंथ, प्रांत उच्च, निच काही नसतं. असतो तो फक्त विश्वास. जो मी परश्या वर दाखवला. आणि तो तू माझ्या वर दाखवू शकला नाहीस.
नव्हतं वाटत तात्या, आम्हाला काही जगावेगळं सैराट करावसं. पण ती परिस्थिती तू आणली. कधी तरी समजून घ्यायचं होतं तुझ्या या परीला. आईला कळत होतं पण तुझ्या धाकानं ती बोलली नाही काही... आणि तू माझं दुसर्या मुलाशी बळजबरीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होता मग आमच्या पुढे सैराट करण्याशिवाय मार्ग नव्हता...
तात्या, राणीलक्ष्मी बाई सारखं देशासाठी, मेधा पाटकर समाजासाठी, मदर तेरेसा रंजल्या गांजल्यांसाठी सैराट झाल्या होत्या.... तसे आम्ही पण समाजाकरता सैराट झालो होतो हे तुला कळलंच नाही. आम्हाला समाजातील जातीयवादाला कायमचं गाडून टाकायचं होतं. कारण आमच्या मधे जातील महत्त्व नव्हतं.
तात्या, तुला माहीत आहे का तुझ्यासारख्या बापांनी बळजबरीने मुलीचं दुसर्या मुलाशी लग्न लावून दिल्याने लग्नानंतर तीन व्यक्तींची आयुष्य कायमची बरबाद झाली आहेत. काहींनी जीवनाचा प्रवास संपवला. आणि बर्याच पोरींचे घटस्फोट होऊन मायबापांच्या घरी परतल्या आहेत.
अशा बळजबरीने होणार्या लग्नाच्या भीतीन आणि जातीधर्माच्या नावाखाली केलेल्या विचारांच्या लादण्यानं काही मुली मुकाट्याने सहन करत जगतही असतील पण सगळ्याच सहन करतील असं नाही.
तुझ्यासारखे जातीयभिमानी बाप समाजात तोऱ्यात मिरवत असतील पण घरातील पोरी जगण्याला कंटाळलेल्या असतील. मग यातून कुणी जीव संपवला की पश्चातापाची जाणीव सतावते.
काय साध्य झालं तात्या मला आणि परश्या ला संपवून..?
काय मिळालं माझ्या मुलाला अनाथ करून...?
मिळाला तुम्हाला पहिल्या सारखा समाजात जातीयभिमान..?
पडली का गळ्यात आमदारकीची माळ..?
की जगासमोर आला तुझ्या विचारातील बुडाखालचा अंधार..?
पळून जाऊन लग्न केलं म्हणून मला जग नावं ठेवेलही.
पण तात्या तुला मला विचारायचयं...
माझ्या कुटुंबाला उध्वस्त करुन खरंच तुझा जातीयभिमान जपणं जरुरी होत का ?????
तुझी आर्ची....
गणेश दादा शितोळे
(१९ जूलै २०१६)